संघ आणि विज्ञान निष्ठा

स्वत:वरील टिकाकारांना चालना देऊन त्याचे विचार मागवून घेण्याचा - ते प्रसिद्धही करण्याचा संघाने नवा उपक्रम  राबविला आहे . उपक्रम स्तुत्य आहे . बुद्धिवाद - विज्ञान निष्ठे कडे टाकलेले एक पाउल आहे.  नवे शिकण्याची आणि वैचारिक आदान प्रदानाची  ही पध्दत. या उपक्रमाचे नावही आकर्षक आहे : संघाची ९० वर्षे: गरज मंथनाची, संधी आत्मचिंतनाची, समीक्षा विचारवंतांची. अशा उपक्रमामुळे मुळे संघाचे कल्याण होईल असा त्यांचा हेतू आहे , शिवाय  भारताचे तर कोट कल्याण होईल असे आम्हाला वाटते. संघ परिवार सत्तेत असताना असा उपक्रम राबवणे स्तुत्य आहे.  ज्यांना सहसा पुरोगामी म्ह्टले जाते त्यांच्यातही हा गुण अस्तंगत होत चाललेला आहे.  

 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच सांगितले की, ‘हिन्दू धर्मांतील कोणताही विचार जर विज्ञानविरोधी असेल तर तो टाकून दिला पाहिजे आणि वैज्ञानिक विचार स्वीकारला पाहिजे.’  (१) १० सप्टेंबर १५ च्या इंडियन एक्स्प्रेस मध्ये हि बातमी आहे . पण याउलट २४ सप्टेंबर च्या आउट्लुक मध्ये  भागवतांचे दुसरे विधान प्रसिद्ध झाले आहे. त्यात भागवत म्हणतात कि, " विज्ञानाला मर्यादा आहेत - वेदाला नाहीत " तसेच  हिंदु धर्माचे आचार्य , संत आणि अभ्यासकांनी   वेदाचा कालसुसंगत  काढावा अशी पुस्ती त्यांनी जोडली  आहे . (२) धर्मग्रंथांचा असा कालसुसंगत अर्थ अनेक प्रकारे काढता येतो. उदाहरणार्थ :- 


अ - आ - इ   

 

अ) वेदात विमाने होती, (हत्ती + माणुस =) गणपतीचा जन्म हे प्लास्टिक सर्जरीचे उदाहरण आहे किंवा गायीचे तूप जाळले कि ऑक्सिजन  निर्माण होतो असे म्हणता येते . परिवारातील अनेक महत्व पूर्ण व्यक्तींनी तत्सम विधाने केली आहेत . भारतीय संस्कृतीत / धर्मात विज्ञानच ठासून भरले आहे असे हे मत आहे.  (३)

 

आ) वेद फालतू आहेत. खरे विज्ञान अवैदिक परंपरात आहे. बौद्ध / बळी / शैव इत्यादी परंपरा खर्या अर्थाने वैज्ञानिक आहेत. विज्ञान पुरातन आहे. मात्र ते वेदात नसून अवैदिक प्रथात आहे. असाही युक्तिवाद करता येईल.  या आर्ग्युमेंट मागे काही राजकीय समिकरणांचे हिशोब असले तरी अशी श्रद्धाही  अनेक जण मनापासून बाळगतात.

 

इ ) मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. कष्ट करून पुढच्या  पिढीत संपत्ति वाढवत नेता  येते. जे संपत्ति बाबत खरे आहे तेच विज्ञाना बाबतही खरे आहे. दर पिढीत ज्ञानाची बेरीज होत असते. आणि ज्ञान वाढले कि त्यातून तर्कशास्त्र , तंत्रज्ञान आणि विज्ञान विकसित होत जाते … पिढी दर पिढी. त्यामुळे वेदाला, वेदांताला, अवेदाला  आणि  कुराण,  बायबल,  अवेस्ताला कपाटात ठेवून द्या. आजच्या जगण्याशी त्याचा काही संबंध नाही. 

 ----------------------------------

वरील  , ,  पैकी कोणता दावा 'अ'वैज्ञानिक आहे ? कोणता 'आ'चरट आहे ? आणि कोणता 'इ'ष्ट आहे ? हा लेखाचा विषय आहे. 

----------------------------------


विज्ञानाचे समर्थन सरसंघ चालकांनी करावे हे अत्यंत स्वागतार्ह आहे. पण विज्ञान म्हणजे काय ते आधी ठरवावे लागेल. अ ? आ ? की  - इ ? … त्या आधी हे ठरवावे लागेल कि संघानेच का बरे विज्ञान निष्ठ व्हावे? बुद्धिवादाची मक्तेदारी  तर डाव्यांकडे जाते ! ते सुद्धा  जर पुरेसे विज्ञान निष्ठ नसतील तर मग संघच का ? बुद्धिवाद कोरडा कोरडा असतो. त्यामुळे स्वयंसेवकांचा उत्साह भंग झाला तर ?  प्रश्न रास्त आहे. उत्तर सोपे आहे. उत्तराकडे जाण्याआधी लेखकाची भूमिका काय ? आणि संघाचा हेतू काय? यावर थोडेसे भाष्य करुया .

 आमची भूमिका : हिंदु हा धर्म नाही. ते लोक आहेत. त्यांचे अनेक धर्म आहेत. भारतातील समग्र  हिंदु संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा मला अभिमान वाटतो. आणि तिच्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्याची मला शरम / लाज वाटते. लाज स्वत:च्या वाइट गोष्टींची वाटत असते. परक्याच्या नव्हे. या अर्थाने माझी ओळख हिंदु अशीच आहे.  (धर्माच्या  अर्थाने नास्तिक असलो तरीहि) मी कितीही आटापिटा केला तरी जग मला हिंदू हि  आयडेंटिटि देणार आहे. तसेच हिंदुच्या  हितासाठी या समाजात बुद्धिवादी आणि उदारमतवादी प्रवाह वाढीस लागणे आवश्यक आहे असे मला वाटते. संघ ही हिंदु साठीची संघटना असेल तर त्याच्याशी संवाद साधणे आणि त्याकडून अपेक्षा बाळगणे मला गैर वाटत नाही.

संघाचा हेतू काय ? हिंदु हित ? 

  संघ हि जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. ही आनंदाची गोष्ट  आहे.  ती हिदू लोकांसाठी काम करते . ही त्याहून आनंदाची गोष्ट आहे . प्रश्न असा कि - 

हिंदु लोकांच्या हितासाठी कि संस्कृती  रक्षणासाठी ? हिंदू  लोकांचे हित कशात आहे ? मागे जाण्यात कि पुढे जाण्यात ?  

 कोणीतरी रामतीर्थकर नावाच्या बाईंची व्याख्याने मी ऐकली आहेत. बाईंचे विचार भीषण आहेत. हिंदु स्त्रियांनी गुलामीत जगणे  हा त्यांच्या कुटुंब  व्यवस्थेचा आधार आहे. (४) युट्युबवरील हे भयंकर विचार नव्या पिढीने ऐकले तर त्यांचे संघाविषयी  चांगले मत बनणे अशक्य आहे. या रामतीर्थकर  ताईंची भाषणे परिवारातल्या संस्थानि आयोजित केलेली मी पाहिली आहेत.

राजीव दिक्षित नामक व्यक्तीची भाषणे आजही परिवारात प्रचारित होत असतात. संघाच्या  फेसबुक पेजवर ही हे दिसेल. हे दीक्षित साहेब रेकोर्डेड भाषणात  राम मोहन रॉय सकट अनेक समाज सुधारकांची  टिंगल करत असतात. राजीव साने यांनी त्यांच्या ब्लोग वर केलेली दीक्षित ब्रँड स्वदेशीचे विचित्र विश्व  ही चिकित्सा अवश्य वाचावी.(५)

धर्म म्हणजे कर्तव्य असेल तर स्वत:च्या आईला सतीच्या चितेत ढकलणे हाही कधीकाळी पुत्रधर्म होता. सती शिळा हरेक जुन्या गावात दिसतात. काही सांस्कृतिक कार्यक्रमात वीरपुरुष आणि बरोबर या सती शीळेचे पूजन झालेले मी पाहिले आहे. सती प्रथेची शरम वाटली पाहिजे. आपल्या माता भगिनींनाना आपल्या पूर्वजांनी जाळून मारले त्याचा अभिमान कसा काय धरता येईल ? पराशर स्मृतीतल्या चौथ्या अध्यायात (श्लोक ३१-३३)  सतीचे समर्थन आणि कौतुक केलेले आहे.(६)

  राजा राम मोहन  रॉय हे सतिप्रथेचा विरोध करणारे समाजसुधारक होते. एकीकडे सुधारकांची टिंगल उडवणारे दिक्षित तुमचे ! (५) आणि दुसरीकडे सनातन धर्माचा जयघोष तुमचा! सनातन धर्मात पराशर स्मृती येते आणि दिक्षितांमधे विखार …. याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? प्रतिगामी आणि विज्ञान विरोधी प्रचार केला तर संघावर आधुनिक भारतीय मन प्रेम करेल? की टीका करेल ??

संघाचे स्वदेशी प्रेम केवळ बबुल टुथपेस्ट किंवा डाबर च्यवनप्राश खाण्या  इतके मर्यादित नाही. हिंदु जीवनपद्धती, विचारधारा, हिंदु अर्थशास्त्र, हिंदु विज्ञान वगैरे भागही  त्यात येतात. हिंदु विज्ञान? हा काय प्रकार आहे? विज्ञान विज्ञान असते. त्याचे हिंदु विज्ञान केले की मग वेदातली विमाने शोधत बसावी लागतात.


जयंत नारळीकर यांनी वाढवलेल्या पुण्याच्या आयुका संस्थेत प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि गणिती यांचे पुतळे आहेत.हिंदु लोकांनी काही प्रमाणात गणित आणि खगोल शास्त्र या विषयात प्रगती केली होती. शून्य वापरून दशमान पद्धतीने आकडे लिहिण्याचा शोध भारताने लावला आहे. आजच्या गणित आणि विज्ञानाचा तो पायाच आहे. पुढे अरब व्यापाऱ्यांनी भारतीय दशमान पद्धती आत्मसात करून हे गणित युरोपला शिकवले.  हे ही सर्वमान्य आहे. गंमत अशी कि हे "हिंदु" गणित आहे म्हणून अरब किंवा युरोपने नाकारले नाही. युरोपाने  त्याचा विकास   केला आणि पुढे जगावर राज्य केले.

 आर्यभटाचे गणित त्या काळी पुढारलेले होते ते इतरांनी स्वीकारले. आम्ही मात्र आज पुढारलेल्या लोकांचे आधुनिक विचार स्वीकारण्या ऐवजी वेदात विमाने शोधत असतो. विमान बनवायला स्क्रू लागणार. स्क्रू बनवायला - कारखाना - पोलाद -  खाणी. विमानाचे हजारो भाग त्याचे लाखो कारखाने. सारे वैदिक काळात होते ??  विमान उपटसुंभासारखे उडत नसते…  त्यामागे  गणित , विज्ञान , तंत्रज्ञान आणि हजारो लोकांचे श्रम उभे असतात. शेकडो पिढ्या त्याचा एक एक स्क्रू आणि पंखा  तयार करण्यासाठी झटलेल्या असतात .

 वेदातली विमाने शोधणे याला आपण विज्ञान समजू लागलो तर मानवी उत्क्रांतीचा मूलभूत प्रवास आपल्याला समजलेला नाही. जे विमाना बाबत खरे आहे तेच जीवनपद्धती आणि संस्कृती बाबत ही खरे आहे. त्याचाही दर पिढीत विकास होत असतो. कारण ज्ञानाचा साठा वाढत असतो.

 माझ्या लहानपणी संघातून आलेले एक निमंत्रण मला आठवते. कोणीतरी जोशीबाई नावाच्या व्याख्यात्या होत्या. आणि विषय होता : शिवलिंग आणि अणुभट्टी ! यावर काही चर्चेची आवश्यकता आहे काय ? हा  दंभ अपवादात्मक  आहे कि सार्वत्रिक ? याचा विचार संघ स्वयंसेवकांनीच करायचा आहे .

 

विज्ञान निष्ठा म्हणजे काय ? 

 

हेलिकॉप्टर , रोकेट आणि अणू बॉंम्ब म्हणजे विज्ञान………  विज्ञान निष्ठा नव्हे ! 

विज्ञान वेगळे आणि विज्ञान निष्ठा वेगळी . 

टेक्नोलोजी चा विकास म्हणजे विज्ञान निष्ठा नाही . विज्ञान निष्ठा हि कलाशाखेची  संकल्पना आहे. सर्व भौतिक व आर्थिक प्रगतीचा पाया विज्ञान आहे. तर विज्ञान निष्ठा हा सामाजिक सुधारणांचा, नैतिक प्रगतीचा आणि सांस्कृतिक उन्नतीचा पाया आहे . 

 या निवडणुकीत मोदींनी विकास हा मुद्दा घेतला होता. तो विज्ञानाचा पुरस्कार आहे. विज्ञान निष्ठेचा नव्हे. वाजपेयी सरकार ने केलेल्या पोखरण च्या अणुस्फोट स्थळी शक्तिमंदिर बांधायची घोषणा विश्व हिंदु परिषदेने केली होती. (७) यातून काय दिसते ? विज्ञान हवे पण विज्ञान निष्ठा नको !! प्रचंड उर्जा निर्माण करत विध्वंस करणारा अणुस्फोट करणे जेव्हढे आवश्यक व अवघड असते, त्यापेक्षा लोकांना विज्ञान निष्ठ पद्धतीने विचार करायला लावून त्यांच्यातील अंधश्रद्धेचा स्फोट करणे कितीतरी अधिक आवश्यक व अवघड असते. 

 

इंदिरा गांधीनी पहिले पोखरण घडवल्या नंतर घटनेच्या ५१(अ - ह ) कलमात सुधारणा करून   भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यात वाढ केली होती. त्यानुसार आज विज्ञान निष्ठ दृष्टीकोन (scientific temper)  , मानवता वाद (humanism) , चिकित्सक बुद्धी (spirit of inquiry) आणि सुधारणावाद (reform) यांचा विकास करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. (८)

यातला प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा आहे. हे  सर्व शब्द एकमेकांशी संबंधित आहेत. विज्ञान निष्ठ दृष्टीकोनातून धर्म आणि परंपरा यांची चिकित्सा करून धर्मात सुधारणा केल्या कि मानवतावाद जोपासता येतो. संघाला हे मान्य आहे का ?

इंदिरा गांधींनी अनेकदा घटना दुरुस्ती केली . त्यांना कोणी प्रतिगामी ठरवले नाही. मात्र संघ परिवार सत्तेच्या जवळपास फिरकला की , घटना बचाव चे नारे बुलंद होतात. विरोधाचा काही भाग हे राजकीय ढोंग असेलही. पण संघाची अनेक हिंदुनाच भीती वाटते हे सत्य लपवता येणार नाही. घटनेत दुरुस्तीला कोणाचा विरोध नाही. घटना हे कसले प्रतिक आहे ? - ते छोडो  कल की  बाते - मागचे सोडा पुढे पहा याचे प्रतिक आहे. संघाचा चष्मा भविष्य लक्षी नाही तो पुराणमतवादी आहे अशी भिती हिंदुनाच वाटते. तुमचा  इतिहासाचा अभिमान जितका सहज  आहे तितकीच शोषीतांना त्याची वाटणारी भीतीही नैसर्गिक आहे.

संघावर नेहमी टिका का होते ? 

त्यात सुशिक्षित लोक आघाडीवर का असतात ? चेतन भगत या लेखकाने एक मार्मिक वक्तव्य मागे केले होते. प्रधानमंत्रि मोदी हे  राहुल प्रमाणे हुच्च इंग्लिश बोलत नसल्याने इंग्रजी पत्रकार त्यांचा तिरस्कार करतात असे चेतन म्हणाला होता. त्यात काही अंशी तथ्य असले तरी आधुनिक विचार हा इंग्लिशचा बटिक नाही. गणपतीच्या प्लास्टिक सर्जरीचे उदाहरण प्रधानमंत्र्यांनी दोन हॉस्पिटलच्या उद्घाटनात दिलेले मी स्वत:च्या कानांनी ऐकले आहे.(३) हे सारे आधुनिक जगात आदरणीय ठरेल ? की विनोदी ?  हि सारी उदाहरणे मोदींनी बहुदा बात्रांच्या पुस्ताकात वाचली असावीत.


 
आधुनिक परिभाषा आत्मसात नसल्याने …  परिवारापुढे नेमक्या काय अडचणी येतात ते समजून घावे लागेल. आधुनिक परिभाषा पाठांतर करून शिकता येत नाही … त्यासाठी विचारही आधुनिक असावा लागतो यावरही चिंतन करावे लागेल .

भाजपा सरकारच्या विविध नेमणुका का वादग्रस्त ठरतात ? ते समजून घ्यावे लागेल. उदाहरण म्हणून दिनानाथ बात्रा आणि सुदर्शन राव यांच्या नेमणुका पाहु या. हे दोघेही संघ परिवारात महत्वाचे व्यक्ती आहेत. दिनानाथ बात्रा हे संघाच्या विद्या भारतीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे तेजोमय भारत हे पुस्तक गुजरात सरकारने शाळेत अभ्यासाला लावले होते. या पुस्तकात बात्रा लिहितात :

 "महाभारत काळात जेनेटिक्स चे उल्लेख येतात. कुंतीला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र होण्याचे हेच रहस्य आहे . गांधारीच्या अबोर्शनचा मास गोळा द्वैपायन ऋषींनी औषधी प्रक्रिया करून -- शंभर तुकड्यात कापला -- मग तो १०० तुपाच्या रांजणात दोन वर्ष ठेवला. त्या रांजणातुन  गांधारीचे १०० पुत्र जन्मले." (९) 

मासाचा गोळा , शंभर तुकडे , जेनिटिक्स ? हि नेमकी कोणाची चेष्टा आहे ? गांधारीची  ? कि विज्ञानाची ? सूर्याबरोबर जेनिटिक्स ? सुर्याचे जीन्स कुठे मिळाले ? याबरोबर बात्रांनी  पेटंट अमेरिका असे शब्दहि वापरले आहेत. हे सगळे प्स्युडो सायन्स आहे.


कॉन्ग्रेस समाजवादी हे खरे सेक्युलर नाहीत ते इस्लामचे लांगुलचालन करतात म्हणून त्यांना प्स्युडो सेक्युलर म्हणावे हे संघाचे मत मला मान्य आहे . संघाच्या प्स्युडो सायन्स चे काय करायचे ? हे प्सुडो सायन्स शाळेतल्या विद्यार्थ्यांची बुद्धीहत्या करते आहे . पण मुद्दा त्याहून गभीर आहे. हे छद्म विज्ञान हिंदु समाजाच्या ही मुळावर उठले आहे. आणि दुष्ट रूढींचे समर्थन करून हिंदु समाज अधिक छिन्न विच्छिन्न करत आहे.

सुदर्शन राव हे संघाच्या इतिहासविषयक संकलन शाखेचे सदस्य आहेत. त्यांची (ICHR) सरकारी भारत इतिहास परिषदेचे प्रमुख म्हणून नेमणुक झाली होती. सुदर्शन यांनी जाती व्यवस्थेचे गुणगान करणारे लेखन केले होते. त्यावर  बरेच वादंग झाले. पुढे त्यांनी राजीनामा दिला (१०)

सुदर्शन नेमके काय म्हणाले या वादात खोल खोल जाता येईल. जात वर्ण याची चर्चा करत गोल गोल फिरता येईल. तरी कुंती सूर्य  जेनिटिक्स वाले बात्रा, विमानवाले  बोडस, जातवाले सुदर्शन यांची मते एकंदर संघ परीवारात मान्य आहेत यापासून पळुन जाता येणार नाही. कदाचित शीर्ष नेतृत्व आणि प्रवक्ते  अमान्य करतील पण  बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा यापासून परिवार कोसो दूर  आहे.

 भारतीय राजकारणाच्या समाजकारणाच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर ते आत्मसात केले पाहिजे. बात्रा , बोडस , सुदर्शन पेक्षा अधिक बरी माणसे मिळवता आली पाहिजेत, टिकवता आली पाहिजेत. त्यासाठी काही मूलभूत भूमिकांवर चिंतन करावे लागेल. 

 -----------------------------

भारतीय संस्कृती ही इतरांपेक्षा थोर आहे. ती जगाला मार्गदर्शक आहे. अशी भूमिका एकदा घेतली की मग जुन्या शिळ्या  गोष्टींचे येन केन प्रकारेण समर्थन  करत बसावे लागते. आणि संघ ते  करतो हि वस्तुस्थिती आहे. 

-----------------------------

सेक्युलारीझम = विज्ञान निष्ठा  

 राजनाथ सिंहाचे पंथनिरपेक्ष विधान बरेच गाजले. ते मत त्यांच्या एकट्याचे नाही. धर्मनिरपेक्ष या शब्दा ऐवजी पंथनिरपेक्ष असा शब्द वापरावा असे मत संघात प्रचलित आहे. का ? धर्म म्हणजे कर्तव्य - मातृधर्म पितृधर्म  शेजारधर्म इत्यादी … मग कर्तव्याला  कर्तव्यच  का म्हणायचे नाही ? धर्म का म्हणायचे ? 

कारण हिंदु ही जीवन पद्धती आहे असे संघाला वाटते. सगळी गोची इथून सुरु होते. मौलवी  झाकीर नाईकाला इस्लाम हि जीवनपद्धती वाटते. बुरख्या पासून शरिया पर्यंत आणि हदीस मधील बुद्धिवादापर्यंत सारे जीवन कसे जगावे याचे मार्गदर्श इस्लाम करतो म्हणून तो "दिन " = जीवन पद्धती आहे असे कठमुल्ल्यांचे मत आहे. तुम्ही जर हिंदु हि जीवन पद्धती म्हणार असाल तर मग … फरक काय राहिला ? 

जीवन पद्धती म्हणजे कसे जगावे , कोणते कपडे घालावेत ? (जीन्स ) काय खावे ? (सामिष ) काय प्यावे ? कसा विचार करावा ? बायकोने नवर्याशी  कसे संबंध ठेवावे ? आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवावे काय ? खाप पंचायती असाव्यात काय ? समलिंगी संबंधांना परवानगी द्यावी  का ? जातिव्यवस्थेचे काय करावे ?

हे सगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे जीवनपद्धती - हि जीवनपद्धती हिंदूची - आता यावर आक्षेप येणार हे उघड आहे. या आक्षेपांची चर्चा वर दिलेल्या अ / आ / इ अशा तिन्ही प्रकारे करता येईल. एकतर आमच्या कडील सर्व परंपरा अतिशय उत्तम सुधारक आहेत असे म्हणत वैदिक कि  अवैदिक ? - धर्म ग्रंथ - त्याचा खरा अर्थ - बफेलो न्याशनालीझम कि गोमाता ? याचा पिंगा घालत गोल गोल घुमत राहता येईल. किंवा धर्म ग्रंथ आणि परंपरा आता जुन्या झाल्या. मागचे सोडा पुढे पहा असेही म्हणता येईल. (= सेक्युलारीझम )

भारताच्या राज्यघटनेत अगदी पहिल्या पासून सेक्युलारीझम आहे तो घटनेच्या २५ व्या कलमात आहे. पुढे तो प्रिएम्बल मध्ये आला म्हणून घटनेच्या ढाच्यात काही फरक पडत  नाही. आपल्या घटनेतले प्रत्येक कलम सेक्युलर आहे . सेक्युलारीझम चा भावार्थ - मागचे सोडा पुढे पहा इतकाच आहे .  

 उदाहरणार्थ समान नागरी कायदा हि संघाची अतिशय चांगली मागणी आहे. त्याचा पायाच मुळी  सेक्युलारीझम आहे.  कुराण किंवा शरियत मधील कायद्यानुसार चार बायका - तीनदा तलाक आणि अरबी पोटगी चालणार नाही. इस्लामी कायदे पाळण्याचा अधिकार मुस्लिमाना नाही. त्यांनी आधुनिक कायदे पाळावेत असा तो आग्रह आहे. हा कायदा मुस्लिम स्त्रियांच्या हिताचा आहे .

जर मुस्लिमाना आधुनिक कायदे पाळायचे आवाहन करायचे असेल - तर हिंदुनि काय करावे ? आधी स्वत: आधुनिक व्हावे ? कि धर्म - पंथ - कर्तव्य - उपासना पद्धती यात गोल गोल फिरत राहावे ? 

हमीद दलवाई काय म्हणतात ? 

खरे पुरोगामी आणि मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई म्हणतात , 

  " हिंदू आणि मुसलमान अशा जातीय तत्त्वावर या देशाची एकदा रक्तरंजित फाळणी झाली. एक देश इस्लामी पाक पाकिस्तान झाला.  तेंव्हा  दुसरा देश हा हिंदुचा हिदुस्थान झाला पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. मग हिंदूचे धर्मराज्य वगैरे आपोआप संकल्पना येतात , दुसरी संकल्पना मुस्लिमांची ! कि हा देश धर्म निरपेक्ष आहे. इथे धर्म स्वातंत्र्य आहे … तेव्हा हवा तेव्हढा आणि वाटेल तसा इस्लाम आम्ही पाळणार ! इस्लाम पाळणे हा आमचा घटना दत्त अधिकार आहे . दोन्ही संकल्पना साफ चूक आहेत ."


मुस्लिमांच्या पक्षपाता साठी  देश सेक्युलर नाही. या देशात १०० % हिंदू असते तरीही हा देश सेक्युलरच राहीला पाहिजे.  .   

या देशात जी धर्मनिरपेक्षता आहे ती मुस्लिमांसाठी नाही . या देशात एकही मुस्लिम नसता तरी हा देश धर्म निरपेक्षच राहिला असता. सेक्युलरीझम म्हणजे शासन आधुनिक राहील. शासकीय निर्णय न्याय, नीती, आचरण इत्यादी आधुनिक  चष्म्यातून घेतले जातील. आदत आणि इबादत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कुणाची पूजा करावी आणि पारमार्थिक बाबींना इबादत म्हणतात . या इबादत चे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेत जरूर आहे.  आदत म्हणजे इहलोक आणी  इथले नियम . किती लग्ने करावीत ? बुरखा घालावा का ? अस्पृश्यता पाळावी का ? तोंडी तलाक असावा का ? या बाबतीत कायदे करण्याचा कोणताच हक्क धर्माला नाही. सर्व हक्क शासनाकडे आहेत.  या देशात फक्त हिंदूच राहिले असते तरीही हा देश सेक्युलरच राहिला असता. मनुस्मृती नाही, कुराण नाही कोणताच फायनल ! असा ग्रंथ नाही. आम्ही नव्या ज्ञानाचे, मानवतेचे आणि बहुविधतेचे चाहते ……हि आमची  चाहत. आणि शेवटची इच्छा ! माणसाचं भल माणसांनी करायचं असते … माझे मुस्लिम समाजावर प्रेम आहे आणि या समाजाचे भले व्हावे त्यात बुद्धिवादी , उदारमतवादी आणि मानवतावादी प्रवाहांची निर्मिती व्हावी म्हणून मी परंपरांशी  युद्ध लढणार आहे. आयकल का ?  हे माझे धर्मयुद्ध आहे आणि एक मुसलमान म्हणून मी ते लढणार आहे. आमेन... सुम्मा आमेन !  (११)

एक मुसलमान म्हणून मुस्लिमांच्या हितासाठी हमीद लढू शकतो - त्याना आधुनिक बनवायचे व्रत घेऊ शकतो.  तर मग संघ हिंदुसाठी असे का करू शकत नाही ? 

 

उत्साह भंग : वास्तव कि कल्पना ? 

 बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा या फार कोरड्या गोष्टी आहेत. त्यात भावनेचा ओलावा नाही, समर्पण नाही असा एक विचार मी ऐकला आहे. बुद्धिवाद माणसे जोडू शकत नाही. विज्ञाननिष्ठा संघटना बांधु शकत नाही. भारता पुढच्या समस्या सोडवायला संघटन हवे. ठीक आहे. 

पण बुद्धिवादी दृष्टीकोन घेतल्याशिवाय या समस्या सुटतील काय ? की आपण त्याच अ - आ - इ मध्ये अडकून पडत आहोत ? याचा विचार संघ परिवाराने करायचा आहे. व्यक्तिगत आयुष्यात अतिशय मृदू, अजिबात जात पात न पाळणारे, आधुनिक विचाराचे, अगदी आंतरजातीय विवाह करणारे अनेक स्वयंसेवक मी व्यक्तिगत रित्या ओळखतो. मग संघाच्या धोरणाना नेहमी संशयाने का पाहिले जाते ? सेक्युलारीझम बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठा यावरिल भूमिकेत काही आत्मचिंतन - बदल करणे.  आधुनिक परिभाषा आणि आधुनिक विचार समजून घेणे आवश्यक आहे का ? श्री रमेश पतंगे यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकात संघ ही बदलत जाणारी संस्था आहे असे म्ह्टले आहे. काही अंशी ते सत्य आहे. त्यामुळे मी प्रस्तुत लेखात गोळवलकर गुरुजींचे विचारधन इत्यादी विषय टाळून संघाच्या केवळ आजच्या भूमिकांची चर्चा केलेली आहे. 

आणिबाणीच्या आजूबाजूला समाजवादी व इतर लोकांशी आलेल्या संबंधाचा आणि  चर्चेचा परिणाम म्हणून संघाच्या अनेक भूमिकात बदल झाले. त्याने उत्साह भंग झाला ? की सळसळून कामाला लागून संघाची समाज मान्यता  वाढली ? सांस्कृतिक राष्ट्रवादाचा अर्थ संस्कृती विकसन असा करायला हवा. वेदाचे कालानुरूप अर्थ काढणे असा नाही . 

 विंडोजचे नवे व्हर्जन दररोज येतात. जुन्या व्हर्जनचे  अर्थ काढले जात नाहीत. आणि त्यामुळे जुन्या व्हर्जनचा अपमानही होत नाही. काही हिंदु लोकांना काही सांस्कृतिक प्रतीके आवडतील - काही आवडणार नाहीत. त्यात किती वेळ गोल गोल फिरत राहणार ? आता वेळ भविष्याची खिडकी उघडायची आहे.

 वैचारिक आदान प्रदानाची संधी दिल्या बद्दल मी आभारी आहे. संघासारख्या ९० वर्ष जुन्या मोठ्या संघटनेवर माझ्यासारख्या क्षुल्लक माणसाने टिका करावी … हा लहान तोंडी मोठा घास आहे काय? कदाचित असेल. पण मांडलेले मुद्दे योग्य आहेत कि नाही ? हिंदुच्या हिताचे आहेत कि नाही ? यावर विचार करावा अशी विनंती मी अतिशय तळमळीने आणि मनापासून करतो आहे . 

 राष्ट्र म्हणजे नद्या, झाडे, जमीन नाही. मंदिर , घंटा,  ग्रंथ नाही. इथली जिती  जागती जिवंत माणसे  म्हणजे राष्ट्र. हे अ - आ - इ  चे एरंडाचे गुर्हाळ बंद  करून आता उद्याच्या भारताच्या चष्म्याने पहायला हवे. इथल्या माणसांच्या भल्यासाठी बाह्या दुमडाव्यात आणि संस्कृतीचे पुराण टाळून निडर छातीने भविष्याच्या मैदानात यावे. हे नव्या युगाचे आव्हान स्वयंसेवकांचा उत्साह वाढवेल अशी अशा करुया. हिंदु समाजाबद्दल प्रेम बाळगुन काम करायचे म्हणजे या समाजाला  अंधश्रद्धा , जातिवाद, मूर्ख रूढी यातून बाहेर काढायचे. धर्म चिकित्सक आणि आधुनिक बनावायचे -  सुरवातीला  हुंडाबंदी सारखे साधे आवाहन सहज पेलता येण्यासारखे आहे .