टीका पचविणारा संघ

‘ग्राहकहितच्या दिवाळी अंकात ‘रा. स्व. संघ : माध्यमातील व प्रत्यक्षातील’ या विषयावर अनेक मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले आहेत. त्यापैकी ‘युक्रांद‘ व समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षि यांचा ‘टीका सहन न होणारा संघ’ असा लेख प्रसिद्ध झाला आहे. डॉ. सप्तर्षि संघ विचारांचे फार जुने टीकाकार/विरोधक आहेत. गेल्या जवळपास ५० वर्षांपेक्षा जास्त काळ ते संधी मिळताच संघावर टीका करण्यास सदैव पुढेच असतात आणि एवढा प्रदीर्घ काळ होऊनही त्यांची टीका त्याच त्या गुळगुळीत झालेल्या मुद्यांभोवती फिरते आहे. डॉ. सप्तर्षि संघाबद्दल बरेच जाणून आहेत. आपले राष्ट्र तेजस्वी झाले पाहिजे व त्यासाठी तेजस्वी हिंदू समाज घडला पाहिजे, असे संघ मानतो हे त्यांचे म्हणणे का नाकारावे? तेजस्वी समाजच तेजस्वी राष्ट्र उभारू शकतो, यात गैर काय? किंबहुना साऱ्यांची धडपड आपले राष्ट्र तेजाने उजळून निघावे याचसाठी तर आहे ना ?


डॉ. सप्तर्षि लेखात म्हणतात की, प्रसार माध्यमांध्ये सर्वत्र संघबंधू आहेत व ते आपली भूमिका रेटून नेतात. खरे तर हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. उलटपक्षी, सर्व माध्यमांवर (Print /Electronics) फार पूर्वीपासून साम्यवादी-समाजवादी मंडळींचा पगडा अन् प्रभाव आहे. संघाने त्याच्या जन्मापासूनच एक पथ्य पाळायचे ठरविले होते; ते म्हणजे प्रसिद्धीपासून दूर राहावयाचे. कोणत्याच प्रकारची प्रसिद्धी संघाने स्वतःहून कधीही केली नाही. अलीकडे या भूमिकेत थोडासा बदल जरूर झाला आहे. त्याचे कारण असे की, प्रसार माध्यमे अधिक वेगाने वाढत आहेत व त्यातून ही माध्यमे पूर्णतः खोटे, भ्रामक, निराधार स्वरूपाचे चित्रण भडकपणे रंगवीत आहेत. स्वाभाविकच, समाजाला वास्तवता कळावी, म्हणून संघ अल्प प्रमाणात प्रसिद्धी तंत्राचा अवलंब करतो आहे. प्रसिद्धीचे प्रमाण अल्प आणि प्रारंभही नुकताच केलेला असल्यामुळे संघाचे भूमिका ‘रेटणे’ त्यांना कधी जाणवले? विविध वृत्तवाहिन्यांवर चालणाऱ्या

चर्चांध्ये क्वचितच, अगदी अपवादापुरता संघाच्या प्रतिनिधीचा सहभाग असतो. बहुतेक वेळा चर्चेत सहभागी असतात ते भाजपाचे प्रवक्ते. तो प्रवक्ता संघाच्या दैनंदिन कार्यक्रमाशी संबंधीत नसतो. तो संघाचा अधिकृत प्रवक्ता तर नसतोच नसतो. दिसणारे चित्र असे आहे की, तो एकटा व त्याच्या भूमिकेच्या विरोधात बोलणारे चार-पाच जण ! आता अशा चार-पाच जणांपुढे एकटा संघाचा कार्यकर्ता त्याचा विचार किती ‘रेटून‘ नेईल?

गूढ वाटण्याचे कारणच काय ?

संघाचे कार्य सुरू होऊन ९० वर्षे झाली. संघकार्य वेगाने वाढते आहे. संघ विचारांना समाजाची मान्यता सर्व दूर खेडोपाडी वाड्यावस्त्यांवर मिळते आहे. त्या मागे असंख्य समर्पित कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आहेत. डॉ. सप्तर्षिंना संघाच्या समर्पित कार्यकर्त्यांच्या कष्टांची माहिती आहे. मग यात खंत वाटावी, आक्षेप घ्यावा असे काय आहे? उलटपक्षी, देशासाठी, समाजासाठी सर्वस्व अर्पून काम करणारे असंख्य स्वयंसेवक-कार्यकर्ते संघाकडे आहेत ही गोष्ट गौरवाची नव्हे काय? सर्वत्र बोकाळलेल्या स्वार्थी वातावरणात, ‘तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे न रहे,’ अशा भावनेने काम करणारे कार्यकर्ते समाजाच्या आदरास पात्र आहेत, नव्हे तो देशापुढील एक आदर्श आहे. दुर्दैवाने अन्यत्र तसे दिसत नाही याचेच दुःख आहे. ‘समाजाला संघाचे गूढ वाटते’ असे डॉ. सप्तर्षि म्हणतात. आश्चर्य वाटावे असा हा आरोप आहे. जाहीरपणे, उघड्या मैदानावर संघाचे कार्यक्रम चालतात. तेथे व्यायाम, खेळही मैदानावरच होतात. राष्ट्रभक्तीपर गाणी-कथा, भाषणे सारे काही मोठ्या आवाजात चालू असते. मग ते गूढ कसे? या मैदानावर जो कोणी येईल त्याला सामावून घेतले जातेच. संघ लांबून कळत नाही. त्याच्या निकट येऊनच त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तेव्हाच कळते संघातील औदार्य, स्वातंत्र्य, मोकळेपणा, स्नेह आणि प्रेम ! डॉ. सप्तर्षिंना या अनुभवांचा आनंद इतकी वर्ष का घेता आला नाही, हे मात्र एक ‘गूढ’ आहे.

हा पतंग काटाकाटीचा खेळ नव्हे !

संघाच्या ध्येयवादाला डॉ. सप्तर्षिंनी पतंग व मांजाची उपमा दिली आहे. ध्येय लहान व संघटना महान असेही त्यांनी म्हटले आहे. पतंग तकलादू असतो व कोणीही तो आपल्या मांजाने ‘काटू’ शकतो. मुळात, संघाचे ध्येय कुणी सहजी ‘काटावे’ असे नाही. परम वैभवी राष्ट्राची निर्मिती हे संघाचे ध्येय आहे. डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली हे ठणकावून सांगितले होते की, ‘‘होय, मी म्हणतो हे हिंदुराष्ट्र आहे.’’ या हिंदुराष्ट्राला परम वैभवाप्रत न्यायचे असेल, तसे ते समर्थ-समृद्ध घडवायचे असेल, तर त्यासाठी व्यक्ती-व्यक्ती जमवून त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. देशभक्त, स्वाभिमानी, चारित्र्यसंपन्न, बलवान, जागरूक नागरिकच हे ध्येय प्राप्त करू शकतात. मग तो ‘मांजा’ कच्चा असून कसा चालेल? काम तसे कठीण आहे. हिंदुराष्ट्राचे ध्येय भारदस्त आहे; माणसांध्येही तसा भारदस्तपणा आणणे म्हणजेच परिवर्तन घडविणे असे हे काम आहे. एकेका व्यक्तीला घडविण्यासाठी वेळ लागणारच. कारण ती तपश्चर्या आहे. तो पतंग काटाकाटीचा खेळ नव्हे ! हे कठोर व्रत आहे आणि असे कठोर व्रत नेहमी प्रदीर्घकाळच आचरावे लागते. डॉ. सप्तर्षिंच्या ओळखीच्या विचार धारेचा ‘पतंग’ कच्चा मांजामुळे किती लवकर ‘कटला’ हे सर्वांना माहित आहे. संघाचा ध्येयवाद अल्पजिवी असणार नाही, तो राष्ट्रनिर्मितीचा ध्येयवाद आहे.

कुमार सप्तर्षींचा लेख येथे वाचा 

 

टीकाकारांमुळे संघाचे भलेच झाले...

‘संघाला टीका सहन होत नाही’ असे डॉ. सप्तर्षिंचे निरीक्षण आहे. संघाला सातत्याने ९० वर्षे टीकाच सहन करावी लागली आहे. त्या टीकेला उत्तर न देता टीकेचे गरळ पचवूनच संघाने एवढी प्रदीर्घ व यशस्वी वाटचाल केली आहे. डॉ. सप्तर्षि व त्यांच्या विचार पंथातील भाईसाथी हे संघावर टीका करण्यात नेहमीच आघाडीवर होते, आहेत. सर्व पातळ्यांवर, अन् कधी कधी पातळी सोडून केलेली त्यांची टीका संघाने नेहमीच पचवली आहे. कधी संघाने त्यांच्या टीकेचा ‘समाचार’ घेतला? कधी त्यांना जाब विचारला? साधे शाब्दिक हल्ले करणे सुद्धा संघाने टाळले आहे. कोणत्याही टीकेला उत्तर द्यायचे नाही. त्याने आपल्याच समाजबांधवांध्ये कटुता येईल. असे कटुतेचे वातावरण निर्माण करायचे नाही, असेच धोरण संघाने पाळले आहे. तसे करण्यात वेळ व शक्ती यांचा अपव्यय होतो, असे संघाचे म्हणणे आहे. कदाचित संघाचे विचार-कार्यपद्धती कुणाला आज पटत नसली तरी उद्या ती त्यांना पटेल, भविष्यात ते संघाचा आदरही करतील, संघात सहभागी होतील, अशीच संघाची धारणा आहे. विेशास आहे. अशी हजारो उदाहरणे आहेत, की ज्यांनी संघावर पूर्वी भरपूर टीका केली ते आज संघाचे कट्टर समर्थक आहेत. डॉ. सप्तर्षींचे गुरुवर्य लोकनेते डॉ. जयप्रकाश नारायण यांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. आणीबाणीमध्ये जयप्रकाशजींना संघकार्यकर्त्यांचा सहवास घडला, तेव्हा जयप्रकाशजींनी संघाबद्दलचे आपले मत बदलले असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. ही गोष्ट डॉ. कुमार विसरलेले दिसतात. डॉ. सप्तर्षि आणीबाणी नंतर जनता पक्षातर्फे नगरमधून विधानसभेची निवडणूक लढले आणि विजयी झाले. त्या वेळी त्यांच्याबरोबर पोटतिडकीने, तळमळीने काम करणारे कोण होते? ते सारे संघाचेच कार्यकर्ते होते. अर्थात संघाचे टीकाकारांमुळे भलेच झाले आहे. म्हणून त्यांच्याबद्दल संघाला सहानुभूतीच वाटते. असाच आणखी निखालस खोटा आरोप डॉ. सप्तर्षि करतात... म्हणे संघ शत्रुत्वाची भावना ठेवतो. संघ कुणालाच शत्रू मानत नाही. ना तसा शत्रुत्वाचा व्यवहार विरोधकांबरोबर केला जातो. डॉ. सप्तर्षि तुम्ही एवढी वर्षे संघावर टीका करता, सांगा कधीतरी, कुणीतरी अधिकृत संघवाल्याने आपल्याशी शत्रूवत व्यवहार केला आहे? एखादे उदाहरण तरी? उलटपक्षी संघामध्ये द्वेषाऐवजी प्रेम आणि शत्रुत्वाऐवजी मित्रत्वाचा संस्कार केला जातो. पुण्यातील तळजाई पठारावर १९८३ साली महाराष्ट्र प्रांतातील ३५ हजार संघस्वयंसेवकांचे तीन दिवसांचे शिबीर झाले होते. त्या शिबीरातले ३५ हजार स्वयंसेवक दिवसातून पाच-सहा वेळा सामूहिक गीत म्हणत असत. त्या गीतातील ओळी होत्या...‘कोणी नाही शत्रू आपला, स्नेहाने अवकाश भरू, चारित्र्याच्या आधारावर हिंदुराष्ट्र हे नव उभवू, समन्वयाने, नम्रपणे विद्रोहाला शमवू या...!’

संघाचा हा संस्कार घेऊनच ३२ वर्षांपूर्वी ३५ हजार स्वयंसेवक गावोगावी परतले. त्याचा परिणाम खेड्यापाड्यांत झाला. समाजातील विविध घटक संघाशी जोडले गेले. पुराव्यांशिवाय, आधारांशिवाय, अनुभवाशिवाय ‘दे धडक‘ विधाने करून काय साधणार ? डॉ. सप्तर्षि वर्षानुवर्षे संघाचे टीकाकार/विरोधक असूनही संघ विचारांच्या प्रकाशनांध्ये किती तरी वेळा ते आपले विचार व्यक्त करीत असतात. त्याचे स्वागतच आहे. कोण देतो ही संधी डॉक्टर साहेब आपल्याला?

हे कशाचे फलित आहे...?

याच मंडळींचा संघावर आणखी एक आरोप नेहमीच असतो, जो प्रस्तुतच्या लेखातही केला आहे, की ‘माणसांच्या डोक्यातील स्वाभाविक विचार काढून टाकून तेथे लष्करी (regimentation) विचार कोंबले जातात.‘ डॉक्टर असल्यामुळे सप्तर्षिंना हे नक्कीच माहीत आहे की, एखाद्या अवयवाला शरीरापासून operation द्वारा दूर करता येते, पण विचार बिंबवायचे असतील, तर सद्विचारांचे संस्कार करावे लागतात. प्राणवायू किंवा रक्त बाहेरून जसे भरता येते, तसे शरीरात विचार भरण्याचे तंत्रज्ञान अद्याप पावेतो अस्तित्वात आलेले नाही. उलट विचारांनी ‘भारावले’पण घडत असते. लष्करी शिस्त आत्मसात केली, तर त्यात काय बिघडले? जीवन सुंदर, शिस्तबद्ध करण्याचा तोही एक मार्ग असू शकतो. विचारांचेच म्हणाल, तर संघ स्वयंसेवकांनी देशभरात चालवलेली दीड लाख सेवा कार्ये पाहा ! शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती, ग्रामविकास, सुरक्षा, स्वावलंबन, वनवासी विकास आदी शेकडो क्षेत्रात काम करताना ते कुंठीत बुद्धीने केले तर ती कामे होतील का? दूरवर वाड्या-वस्त्यांवर, डोंगरापहाडात चार-दोन स्वयंसेवक जिद्दीने विविध संकटांवर मात करून कार्यरत असतात. तेथे कोण असते रोज त्यांच्या डोक्याचे ‘रेजिमेंटेशन‘ करायला? ही सारी कामे आज यशस्वीतेचे मापदंड म्हणून उभी आहेत, आदर्श म्हणून उभी आहेत. हे सारे कुंठीत वा कोंबलेल्या विचारांचे फलित आहे काय?

फिरत्या विज्ञान शाळा चालविणाऱ्या किंवा खेड्यांध्ये स्वावलंबनासाठी उद्योग काढणाऱ्या वा पतपेढ्या चालविणाऱ्या स्वयंसेवकांची विचारशक्ती शून्य ठरवायची का?

संघ विजयरथाचा मानकरी

संघाच्या प्रशिक्षण वर्गांबाबत टिपण्णी करताना डॉ. सप्तर्षि म्हणतात, तेथे कच्चा मडक्याचे पक्के मडके बनविण्याचे उद्योग चालतात. आपली संघटना मजबूत व्हावी, निर्दोष असावी, संघटनेचे काम गतीने व प्रभावीरीतीने वाढावे, ही तर प्रत्येक संस्था संघटनेची आवश्यकता असतेच. त्या करिता प्रशिक्षित कार्यकर्ते असावेच लागतात. त्यासाठी संघात तीन वर्षांचे प्रशिक्षण वर्ग चालतात. अशा वर्गांधील प्रशिक्षीत ‘पक्क्या मंडक्यांनी’ देशभरात आणि देशाबाहेरही परिवर्तनाचे अजोड कार्य उभे केले आहे. नवनवीन प्रयोग करून आपल्या विचारांच्या प्रभावाने समाजात आदराचे स्थान मिळविले आहे. हे मडके घडते ना, ते निष्ठावान असते. ध्येयवादावर श्रद्धा ठेवण्याचा ‘घाट’ त्याला प्राप्त झालेला असतो. उलट, असे संघटनात्मक प्रशिक्षण न दिल्यामुळे, आपल्या कार्यपद्धतीवरील, ध्येयावरील निष्ठा, श्रद्धा कार्यकर्त्यांध्ये प्रविष्ट न झाल्यामुळे कितीतरी ‘युवादलांची’ शोकांतिका झाली आहे. संघ मात्र विजयरथाचा मानकरी ठरतो आहे. पक्क्या मडक्यांची ती करामत आहे !

नाझीवाद, फॅसिझम, हिटलर वगैरेंकडून संघाने बहुसंख्याकांचा राष्ट्रवाद स्वीकारला आहे, असा जावईशोध डॉ. कुमार लावतात. खरे तर आपल्याला ध्येयवादाची प्रेरणा कोठूनही मिळते. त्या प्रेरणेचा उगम शोधण्यापेक्षा ती किती वेगाने प्रवाहित होत आहे, हे पाहणे महत्त्वाचे ! आणि राष्ट्रवाद हा बहुसंख्याकांचाच असतो. म्हणूनच तर तो ‘राष्ट्रवाद’ असतो. अल्पसंख्य राष्ट्रवादाचा दावा करीतच नसतात. संघाला राष्ट्रवादाची प्रेरणा घ्यायला बाहेर जाण्याची आवश्यकता नव्हती. ज्या भूीत छत्रपती शिवराय जन्मले आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्य उभे केले, ती प्रेरणा पुरेशी नाही का? नाझी-हिटलर नाही, तर छत्रपती शिवाजीराजे हे संघाचे स्फूर्तिस्थान आहेत. प्रेरणास्त्रोत आहेत. किंबहुना त्यांचाच वारसा आज संघाच्या रूपाने जगभर पुढे पुढे जात आहे. सर्व समाजाच्या उत्थानाचे स्वप्न पाहणारे स्वामी विवेकानंद ही संघाची प्रेरणा आहे. समर्थ रामदासांच्या ‘राष्ट्रधर्म वाढवावा’ या शिकवणुकीतून संघाला आपल्या कार्यासाठी बळ मिळते. बॅ. सावरकरांनी मॅझिनी वाचण्याच्या अगोदर शिवचरित्र नक्कीच वाचले होते, पण सप्तर्षिंना हे सारे मानवत नाही. मुठभरांचा राष्ट्रवाद ते ढिगभरांवर थोपटू इच्छितात, आता याला काय म्हणावे ?

संघाचा कारभार संघशाखेवर

डॉ. कुमार सप्तर्षिंनी संघाचे नागपूर येथील मुख्यालय केव्हा पाहिले कुणास ठाऊक? तेथे रीाू army headquarter सारखा कारभार चालतो म्हणे ! headquarter मधून कारभार चालण्यासाठी तेथे नित्य सारे head quarter commander किंवा command incharge उपस्थित असावे लागतात. संघाचे सारे chief in command वर्षभर देशभरात नियोजनपूर्वक प्रवास करीत असतात. जागोजागीच्या कार्यकर्त्यांना बळ देत असतात. त्यामुळे मुख्यालयातून कारभार कसा आणि कोण हाकणार? संघाचे कार्यालय म्हणजे चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या आणि ध्येयवादाने भारलेल्या उत्साही-तेजस्वी मंडळींचे स्फूर्तिस्थान असते. तिथे व्यवहार चालतो तो आत्मीयतेचा, परस्परांधील स्नेह-प्रेमाचा. संघाचा खरा कारभार चालतो तो संघशाखेवर, कार्यालयात नव्हे !

तेजस्वी बनायचे म्हणजे ‘हिंसक’ बनायचे असे सप्तर्षिंना वाटते. तेज हे बुद्धीचे असते. मनातील प्रगल्भ विचारांचे असते, चेहऱ्यावर सुसंस्कृततेचे तेज दिसते ! हिंसकतेला ‘तेज’ कसे म्हणावे? देशभरामध्ये ज्या हिंसक दंगली पूर्वी झाल्या, त्यात संघाचा सहभाग नसल्याचे निर्वाळे मा. न्यायालयांनीच दिले आहेत. महात्मा गांधीजींच्या हत्येच्या आरोपातूनही संघाची निर्दोष मुक्तता झाली आहे. उलटपक्षी, संघाच्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांच्या हत्या पूर्वी झाल्या, पण त्याचा प्रतिशोध संघाने कधी घेतला नाही. हे ढळढळीत सत्य सर्वांना माहीत असूनही संघाकडे हिंसक नजरेतून बघण्याची ‘हिंसा’ सप्तर्षि मंडळ नेहमीच करते.

संघात म्हणे ‘आदेश’ दिले जातात. हाही या मंडळींचा नेहमीचा लाडका आरोप !

संघ एक कुटुंब आहे. संघात वडीलधाऱ्यांचा मान जरूर राखला जातो. संघाचा सारा विस्तार जो झाला आहे तो आपापसातील विश्वासावर, प्रेमावर आणि आत्मीयतेच्या व्यवहारावर ! ‘आदेश’ सरकार देते, हुकुमशाहा देतात, आदेशांना ‘फतवे’ म्हटले, तर ते देणारेही अनेक ‘खोमेनी’ देशात आहेत. संघाचा हिंदू संस्कृतीवर स्वाभाविक विश्वास आहे. त्या संस्कृतीत उपदेशांना, शिकवणुकीला महत्त्व आहे. कुटुंबात वडीलधारे शिकवतात व बाकीचे त्यांचा आदर करतात. संघाचा लोकशाहीवर विश्वास आहे, पण सप्तर्षिंना तो शोधण्यात रस नाही. आरोप करण्यात त्यांना मजा वाटते. एकदा आरोपच करायचे म्हटले की, अशा आरोपांची मजा लुटण्यात ते दंग होतात.

जातीयतेचा गुळगुळीत आरोप

‘संघ जातीय आहे’ हा आरोप तर संघाच्या पाचवीलाच पुजला गेला आहे. आता तर संघ जातीय राजकारण करतो, असाही आरोप होतो. यशस्वी राजकारण करण्यासाठी कुणा एकाची भलावण कोणी करीत असतील, पण जातीय राजकारण एकगठ्ठा मतांसाठी अनुनयाची परंपरा संघ विचारांध्ये, आचारांध्ये नाही. उलट, जातीयता नष्ट व्हावी, एकरस-समरस समाज घडावा म्हणून संघ प्रयत्नशील आहे. तसे कार्य संघ करतो. अलीकडचे उदाहरण म्हणजे संघाने मागास समजल्या जाणाऱ्या वर्गातील-जातीतील तरुणांना पौरोहित्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि त्यातील काहींना पंढरपूरच्या देवस्थानामध्ये अधिकृत पुजारी म्हणून नेणूकही मिळाली. संघाच्या धर्मजागरण विभागाने हे क्रांतीकारी पाऊल उचलले. जातीयता संपवायची असेल तर ती अशा कृतीतून, प्रयोगातून ! केवळ प्रवचने झोडून आणि कुणाला तरी जातीयवादी म्हणून ती नष्ट होणार नाही. त्यासाठी रत्नागिरीतील स्थानबद्ध काळातील सावरकरांच्या प्रयोगांसंबंधी डॉ. कुमारांनी उपलब्ध साहित्य वाचावे. महात्मा गांधींजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. जयप्रकाशजी इत्यादी मान्यवरांनी संघशिबीरांना भेटी दिल्या होत्या. तिथे जातीयता पाळली जाते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण तसे काही त्यांना आढळले नसल्याचे या सर्व माननीयांनी जाहीरपणे त्या त्या वेळी सांगितले आहे. पण डॉ. सप्तर्षिंना आरोपांची हौस आहे. संघावरील नेहमीच्या आरोपांचे निराकरण झाल्याचे ते सोईस्कार नजरेआड करतात ! जातीयता, अस्पृश्यता संपवायची असेल तर तसा विशुद्ध व्यवहार आचरणात आणला पाहिजे, असे संघ मानतो व तसा प्रयत्न संघ नित्य करीत असतो. पण लक्षात कोण घेतो?

एकूणच काय आता करण्यासारखी कामे आणि प्रयोग उरलेले नसल्याने ही सारी ‘सप्तर्षिय’ मंडळी बलवान होणाऱ्या संघाला बदनाम कसे करता येईल याच विवंचनेत असतात. त्यांना त्यात आनंद मिळतो; मिळो बापडा आनंद त्यांना ! पण त्यांचे दुःख, वेदना वेगळी आहे. त्यांच्या विचारांचा लोकशाही मार्गाने विजय होऊ शकलेला नाही. उलट ज्याला प्रतिगामी विचार म्हटले तो सत्तामार्गी झाला हे दुःख त्यांना आहे. आजपावेतो अथकपणे केलेले बिनबुडाचे, तेच ते गुळमुळीत आरोप-आक्षेप आता जनताही ऐकत नाही, त्याच त्याच आरोपांना भिक घालत नाही, म्हणून पित्त खवळते, मळमळ बाहेर पडते. आता डॉक्टरांना या व्याधीवर आपण काय उपाय सुचविणार? एक सांगता येईल. आता वेळ भरपूर मिळाला आहे. कुठल्याही संस्था, संघटना, दले अस्तित्वात नाहीत; तेव्हा ‘चिंतनात’ वेळ घालवावा. कदाचित आपली ‘स्व-त्वाची’ ओळख त्यांना होईल. त्यासाठी शुभेच्छा !