संघ आणि महिला : वास्तविकता


संघ आणि महिला हा विषय लिहीतांना संघाने प्रारंभिक काळापासून स्त्री-पुरूष समादरतेच्या  जाणिवेतून स्त्रीयांच्या उन्नतीसाठी स्त्रीयांची शक्ती, स्त्रीयांच्या तसेच सर्व समाजाच्या उपयोगात यावी यादृष्टीने फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्त्रीयांच्या प्रगतीत संघाचे भरीव योगदान आहे असे शिर्षक अनेकांना दचकायला लावेल हे खरे. तथापि वास्तविकता मात्र अगदी तशीच आहे. संघाच्या वर्तनावर आणि इतिहासावर नजर टाकली असता संघाच्या वैचारिक आणि व्यावहारिक भूमिकेची तपासणी केली असता ‘मागासलेले’, ‘स्त्रीयांना घरात डांबून ठेवणारे’, ‘बायकांवर मातृत्वाचे ओझे लादणारे’  यासारखी विशेषणे किती अर्थहीन, तकलादू, पूर्वग्रहदूषित आहेत याची खात्रीच वाटू लागते.


सुरुवात प्रारंभिक काळापासून करुयात. राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका कै.लक्षमीबाई उपाख्य मावशी केळकर यांनी १९३६ मध्ये राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. या स्थापनेपूर्वी महिलांवर होणाऱ्या अत्त्याचाराने त्या अतिशय व्यथीत झालेल्या होत्या. स्त्रीयांच्या सुरक्षेसाठी काही भरीव कार्य करावेच लागेल अशा निश्चयाने त्यांन विविध पर्यायांचा शोध सुरू केला होता. त्यांची मुले संघाच्या शाखेत जात असत. इतर कुठल्याही पर्यायांपेक्षा संघाच्या कार्यशैलीने प्रभावीत झालेल्या मावशी संघकार्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या दृष्टीने संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांना भेटायला गेल्या. इतिहास असे सांगतो की, मावशी व डॉक्टर यांच्यात प्रदीर्घ विचारविनीमय झाला होता. मुला-मुलींच्या एकत्रित शाखा चालू नयेत एवढेच डॉक्टरांचे मत होते. संघाप्रमाणेच महिलांच्याही संघटनेची आवश्यकता त्यांना फार महत्त्वाची वाटत होती. संघ व समितीने एकाच ध्येयाने प्रेरित होऊन आपापली वाटचाल स्वतंत्रपणे करावी परंतु परस्पर सहयोगातून कार्य उभे राहावे असे डॉ. हेडगेवार व मावशी केळकर यांच्या दरम्यान निश्चित झाले होते. दोन्ही संघटनांची अद्याक्षरे (आर.एस.एस.) जाणीवपूर्वकच सारखी ठेवण्यात आली होती. ‘स्त्री शक्तीचा साक्षात्कार’ (ले.-दिनकर केळकर) व ‘दीपज्योती नमोऽस्तुते’ (ले.- सुशीला महाजन) या मावशी केळकरांवरील पुस्तकांधून वरील प्रकारची सर्व माहिती मिळते. संघाने समितीच्या कार्यवाढीला किती प्रकाराने प्रोत्साहन दिले याचीही माहिती या पुस्तकांधून उपलब्ध होते. दीपज्योती नमोऽस्तुते या पुस्तकामध्ये डॉक्टरांच्या २४-६-१९३८ रोजीच्या बौद्धिकाचा अंश देण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ.हेडगेवार म्हणतात, ‘ सर्वांगाने राष्ट्राची उन्नती व्हावी म्हणून समिती स्थापन करण्यात आली आहे. हिंदू राष्ट्र घसरत न जाता उत्कर्षाला जाईल अशी योजना समितीला करावयास पाहिजे. कार्य कठीण आहे तरी ते करण्यातच शोभा व पराक्रम आहे.’ (पृ.७६) डॉ.हेडगेवार जिथे जिथे प्रवासाला जात तिथे तिथे सगळीकडच्या महिलांना समितीकार्याची माहिती देत. कार्य वाढावे यास्तव मावशींशी संपर्क व्हावा असा स्वत: प्रयत्न करत. इथे एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे, समितीच्या कार्यवाढीला डॉक्टरांनी प्रोत्साहन तर दिले, मावशींनीच कार्यारंभ करावा यादृष्टीने प्रयत्न केले. मात्र मार्गदर्शकाची अथवा नियंत्रकाची भूमिका डॉक्टरांनी कधीच बजावली नाही व त्यानंतरच्या संघ नेतृत्वाने महिला संघटनेच्या स्वतंत्र अस्तित्वाची, व्यक्तिमत्वाविषयी आदर ठेवण्याची परम्परा सदैव कायम ठेवली आहे.

नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे संघकार्याचा प्रभाव, तशा कामाची नितांत आवश्यकता आणि संघ स्वयंसेवकांचा घरोघरी असणारा व्यवहार या सगळ्यामुळे गावोगावच्या कितीतरी महिलांनाही पुरुषांप्रमाणेच स्त्रियांचा संघ सुरू करावा असे वाटले होते. ‘राष्ट्रीय स्वयंसेविका संघ’, ‘हिंदू धर्म भगिनी मंडळ’ या प्रकारच्या नावांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व महाराष्ट्राबाहेर इंदूर, हैदराबाद याही ठिकाणी कार्य सुरू झाले होते. संघसदृश संघटना मावशींनी सुरू केलेल्या समिती कार्याशी जोडल्या जातील, एकाच ध्वजाखाली एकत्र येऊन आपला कार्यविस्तार करतील या दृष्टीनेही डॉ. हेडगेवार दक्ष राहून प्रयत्न करीत होते. समितीच्या दुसऱ्या प्रमुख संचालिका श्रीमती ताई आपटे यांनी देखील संघाच्या प्रभावामुळे पुण्यामध्ये महिलांची जोदार शाखा उभी केली होती. डॉक्टरांनीच केलेल्या प्रयत्नामुळे श्रीमती मावशी केळकर व श्रीमती ताई आपटे या मोठ्या कार्यकर्त्या सहजपणे एकत्र येऊन महिलांच्या कार्यात पुढे झेपावल्या. इतकेच नव्हे तर समितीच्या प्रारंभिक काळातील बहुतेकजणी संघ कार्यकर्त्यांच्या घरातूनच समिती कार्यासाठी बाहेर पडल्या होत्या असे दिसते. ही गोष्ट स्त्रियांच्या कार्याविषयी डॉ. हेडगेवारांनीच नव्हे तर सर्वसामान्य स्वयंसेवकांची मानसिकता लक्षात घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरावी.

पुढे जाऊन संघाचे द्वितीय, तृतीय अशा सर्वच सरसंघचालकांनी व सर्वसामान्य स्वयंसेवकांनीही महिलांच्या कार्याला सतत प्रोत्साहन दिले. सर्व प्रकारे मदतही केली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर भारतात रूढी-बंधनांचा कांच महिला वर्गावर मोठाच होता. अशा त्या वेळी उत्तरेत जाऊन समितीचा कार्यविस्तार करावा यासाठी श्रीगुरूजींनी समितीच्या ज्येष्ठ अधिकारी कै. वसधुताई फाटक यांना प्रचारिकेचे व्रत घेऊन काम करावे असे सुचविले होते. ‘गुरुजींच्या प्रेरणेनेच अगदीच प्रतिकूल वातावरणामध्ये (सुारे ५० वर्षांपूर्वी) आपण काम करू शकलो. स्त्रियांच्या कार्याविषयी गुरुजींना किती आस्था होती याचे जिवंत उदाहरण मी स्वत:च आहे’ असे वसधुताई नेहमीच कार्यकर्त्यांना सांगत असत.

श्रीगुरुजींच्या कार्यकाळात संघ विचाराने प्रेरित होऊन भारतीय जनसंघ, भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद आदी अनेक संस्था, संघटनांची निर्मिती झाली. प्रत्यक्ष कार्य पाहिल्यावर अनुभव असा येतो की, या सर्वच्या सर्व कार्यांमध्ये सतरंज्या घालण्यापासून स्टेज गाजविण्यापर्यंत प्रत्येक भूमिकेमध्ये महिला अग्रेसर राहिल्या आहेत. अगदी छोट्या छोट्या शाखा स्थानापासून सर्वोच्च स्तरावरील यंत्रणेपर्यंतच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा प्रथमपासूनच सहभाग राहिला आहे. आपल्या आयुष्यातील मोलाची वर्षे समर्पण वृत्तीने पूर्णवेळ काम करणाऱ्या कितीतरी महिला प्रत्येक संघटनेध्ये आहेत.

रा.से.समितीच्या कार्याध्ये आपले सर्व आयुष्यच समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येत आहेत. या सर्वच कार्यकर्त्या आपल्या संघटनांच्या कार्याद्वारे फार मोठे समाजकार्य उभे करीत असतात. कर्तृत्व, त्याग व समर्पण अशा कुठल्याच बाबतीत महिला कणभरही मागे नाहीत हे या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेले आहे. महिला कार्यकर्त्या फक्त शहरी भागात असतात असाही गैरसमज होऊ शकतो परंतु या कार्यकर्त्या दहशतवादाने भारलेल्या अशा वातावरणातही काम करीत आहेत. काश्मीर, पूर्वांचलाच्या भागात जशा महिला कार्यकर्त्या आहेत तशाच त्या सुदूर वनवासी, पहाडी क्षेत्रात ग्रामीण भागांत आनंदाने काम करीत राहतात असा सार्वत्रिक अनुभव आहे.

महिलांच्या जीवनाशी संबंधित अशा समस्यांच्या निराकरणामध्ये महिला कार्यकर्त्या आणि पुरूष कार्यकर्तेही प्रयत्नशील राहतात. संघ विचाराने उभी राहिलेली सेवा कार्ये ही त्याची ढळढळीत उदाहरण आहेत. संघाच्या वतीने देशभरात दीड लाखांच्या वर सेवाप्रकल्प चालतात. या सर्व प्रकल्पांधून स्त्रियांच्या उन्नतीचा विचार निश्चितपणे केला जात असतो. स्त्रिशिक्षणापासून स्त्रियांच्या रोजगारापर्यंत अनेक सारे प्रकल्प चालविले जातात. काही प्रकल्प पूर्णत: महिलाकेंद्रित असे आहेत. प्रकल्पांधून कार्यकत्र्यांचे प्रमाण पुरूष कार्यकर्त्यांच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणात आढळते. राष्ट्र सेविका समितीच्या वतीने ८५० सेवाप्रकल्प देशभर चालतात सुदूर पुर्वांचल क्षेत्रात जिथे शासनाच्या शाळा नाहीत तेथेदेखील हे प्रकल्प चालविले जातात. महिलांनी महिलांसाठी चालविलेले प्रकल्प असे त्याचे स्वरूप आहे.

संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रात त्यांनी आपल्या मित्रांकरवी बाल-जरठ विवाह उधळून देवून मुलीला अनुरूप वाटणाऱ्या वराशी तिचा विवाह घडवून आणल्याचे उहाहरण मिळते. (डॉ.हेडगेवार ना.ह.पालकर, पृष्ठ ७१). तशीच शेकडो उदाहरणे सर्वसामान्य स्वयंसेवकाच्या व्यवहारातून हाताळलेली लक्षात येतात. महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा संघाचा दृष्टिकोन काय आहे ते श्रीगुरुजींच्या उद्बोधनावरून स्पष्ट होते. मातृशक्तीला आवाहन करताना श्रीगुरुजी म्हणतात, ‘प्रत्येक हिंदू बालकाच्या आणि बालिकेच्या मनावर मातृभक्तीचे, देशभक्तीचे आणि देवभक्तीचे संस्कार करण्याची पवित्र जबाबदारी मातांची आहे. मातांनी आपल्या मुलांवर असे उदात्त आणि पुरुषार्थाचे संस्कार केले, तरच भावी पिढी आपल्या देशासमोर उभ्या असलेल्या विविध आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊ शकेल. समाजातील गरजू भगिनींची सेवा करण्याची जबाबदारीही आपल्या मातांवर आहे. आपल्यापैकी बहुसंख्य मातांना दूरदूरच्या ठिकाणी जाऊन तेथील आपद्ग्रस्त निराधार भगिनींची सेवा करणे शक्य होणार नाही. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की त्यांनी सदैव घरीच बसून राहावे. भोवतालच्या वस्तीत राहणाऱ्या भगिनींशी संपर्क प्रस्थापित करून त्यांच्यासाठी खूप काही करता येण्यासारखे आहे. त्यांच्यावर व त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार होतील असे विविध उपक्रम हाती घेता येतील. आपल्या दैनंदिन संपर्कातून परस्पर सहकार्याची आणि सेवेची आवडही त्यांच्या मनात निर्माण करावी लागेल. आपल्या माता-भगिनींच्या मनात कोणत्याही कारणाने अगतिकतेची, न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ देता कामा नये. आपण पराशक्तीची जिवंत प्रतीके आहोत ही शिकवण त्यांना दिली पाहिजे.’ ते पुढे म्हणतात, ‘आपल्याभोवती अशा अनेक भगिनी आढळतात की ज्यांना उदरनिर्वाहास खूप शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात. यापैकी काही तर अगदी निराधार आणि अगतिक असतात. असे दृश्य पाहून आपले हृदय अथांग सहानुभूतीने भरून आले पाहिजे. त्यांना कामधंदा मिळावा, उपजीविकेचे साधन मिळावे या दृष्टीने काही योजना हाती घेतल्या पाहिजेत. आपल्या कोणत्याही भगिनीला, मातेला रस्त्यावरील उपेक्षिताचे जीवन कंठावे लागू नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे.’’ (विचारधन - श्रीगुरूजी पृ.३३३ ते ३३८)

संघाचा स्त्रियांच्या समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा वर उल्लेख केला आहे. प्रत्यक्ष संघकार्याला महिलांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले आहे. या सहकार्याध्ये जबरदस्ती अजिबातच नव्हती. आणीबाणीच्या काळात ठिकठिकाणचे कार्यकर्ते जेव्हा अनिश्चित काळासाठी जेलमध्ये गेले त्यावेळी सहधर्माच्या विलक्षण भावनेने स्त्रीशक्तीने आपले स्वरूप प्रकट केले होते. ही शक्ती आणीबाणीच्या विरोधात विलक्षण साहसी कार्यात सहभागी झाली होती.

आजवरच्या सर्व वाटचालीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग वाखाणण्याजोगा आहे. ‘‘संघाच्या शाखेत महिलां नाहीत परंतु संघकार्यात महिला आहेत.’’ या विधानाची यथार्थता सतत स्पष्टपणे अधोरेखीत करणारे आहेत. संघावरच्या आरोपांना संघकार्यातील महिलांच्या वाढत्या सहभागाने मिळणारे उत्तर अतिशय बोलके आहे. सर्व तथाकथित पूरोगाम्यांच्या एकत्रित शक्तीपेक्षा ते कित्येक पटीने जास्त आहे यात शंकाच नाही.