संघ आणि जनसंपर्क

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा फार पुर्वी आणि फार ओझरता संबंध आला होता. ६६-६७ साली मी माडीवाले कॉलनीजवळ ढमढेरे बागेत भरणा-या शाखेत काही महिने जात होतो. माझे वडील समाजवादी विचारसरणीचे असल्याने आमच्या घरात संघाबद्दल फारशी सहानुभुती नव्हती. अर्थात त्या काळात मला संघ म्हणजे काय आणि समाजवाद म्हणजे काय याबद्दल मला काहीही माहिती नव्हती. बाकी मित्र जातात म्हणून मीपण शाखेत जायला लागलो. त्या काळात शाखेत कोणत्याही साधनाशिवाय खेळता येतील असे खेळ आम्ही खेळत असू. त्याकाळच्या अंधूक आठवणीत संधीप्रकाशात होणारी प्रार्थना नमस्ते सदा वत्सले मातृभुमे वगैरे प्रार्थना आठवते. नंतर आम्हाला स्काऊटमध्ये घातले गेले आणि माझा शाखेशी संपर्क तुटला. सोलापुरला मामाच्या घरी गेल्या नंतर मात्र मामा आम्हाला ब-याचवेळा सक्तीने तेथल्या शाखेत पाठवायचा. त्यामुळे समुद्रात योगायोगाने जवळ आलेल्या ओंडक्यांइतकाच माझा आणि संघाचा संबंध होता.


जेव्हा मला मते फुटू लागली त्या सुमारास झालेल्या ७१ च्या युध्दातल्या भारतीय सैन्याच्या दैदिप्यमान कामगिरी नंतर मला इंदिरा गांधींच्या कणखर आणि निर्णायक नेतृत्वाबद्दल खूपच आदर वाटू लागला. त्यामुळे संघाकडे किंवा त्यावेळच्या जनसंघाबद्दल मला कधीच आकर्षण वाटले नाही. संघ वा जनसंघ हे आता ज्यांना फ्रिंज एलेमेंटस म्हटले जाते त्यांपैकी आहेत अशी अटकळ बाकीच्यांप्रमाणे माझ्याही मनात होती. हिंदूमहासभेप्रमाणे तेही काही कालानंतर अस्तंगत होतील असे मला त्याकाळी वाटायचे. भाजपाच्या बाबतीत ही अटकळ चुकीची ठरली कारण काळाप्रमाणे ते बदलत गेले. संघाच्या बाबतीत मला ती खात्री नाही. हळुहळू समजायला लागले होते की भारताचे विचारमन अतिशय भाबडया आणि देशाला सदैव गरीब ठेवणा-या पण अतिशय प्रभावी प्रचारतंत्र अवगत असलेल्या समाजवादी विचारसरणीने भारून गेले आहे. सरकारी आश्रयाने सरकारला अनुकूल असलेल्या विचारांवर पोसलेल्या जवळ जवळ दोन पिढया जनमानसावर प्रभाव टाकणा-या सर्व विचारधारा ग्रासून बसल्या आहेत आणि त्यामुळे चित्रपट, लेखन, नाटके, प्रसारमाध्यमांतून फक्त बहुसंख्यांबद्दलचा तिरस्कार आणि अल्पसंख्यांकाचे तुष्टीकरण व्यक्त करणे हा देशातल्या सर्व विचारवंतांचा स्थायीभाव आहे हे दिसायला लागले.

तेव्हा कोठेतरी जाणिव झाली की अरे कदाचित संघ हा या सामुहिक बुध्दीभेदाविरूध्द उघडलेली आघाडी असेल. आणि मग माझ्या मनात कोठेतरी संघाचे अस्तित्व आवश्यक आहे ही भावना जन्म घ्यायला लागली. तसेच या सर्व काळात संघावर चालणारी अविरत टीका ऐकून मात्र मनात कोठेतरी वाटायला लागले की अरे एवढेजण नावे ठेवताहेत त्याअर्थी संघात नक्की काहीतरी चांगले असणार. मुख्यत्वेकरून समाजवादी आणि कम्युनिस्टांची संघाबाबतची टीका वाचून तर खात्री पटली होती की संघ देशहिताचे काहीतरी काम नक्की करत असणार. पण ते काम काय आहे किंवा संघाची मूलभूत विचारसरणी काय आहे हे समजावून घ्यायची कधी गरज वाटली नाही. आणि संघाने सुध्दा आपल्या कार्याबाबत अनभिज्ञ असलेल्या लोकांना ते समजावण्याची फारशी तसदी घेतली नाही असे मला वाटते.

पण संघ ही जर साम्यवादी आणि समाजवादी बुध्दीभेदाविरूध्द उघडलेली आघाडी असेल तर ही आघाडी अतिशय दुर्बल ठरली आहे यात मला मुळीच नवल वाटत नाही. याचे कारण म्हणजे, संघाचे एकंदर कार्यक्रम मला इंग्लीशमध्ये म्हणतात त्याप्रमाणे प्रीचींग द कॉयर या स्वरूपाचे वाटतात. ज्यांचे विचार आधीच संघाशी मिळते जुळते आहेत त्यांचे विचार अधिक गडद करण्याचे काम फक्त संघ करतो असे माझे प्रामाणिक मत आहे.

संघाचा कार्यक्रम, त्यांच्या नेतृत्वाची वक्तव्ये, संघाच्या विचारसरणीच्या लेखकांनी लिहीलेले लेख, संघावरच्या टीकेला दिले जाणारे प्रत्युत्तर यात मला कधीच असे काहीही विशेष आढळले नाही की ज्यामुळे संघावर टीका करणारा एक तरी माणूस संघात सामिल होण्याचा विचार करेल.

आणि त्यातून प्रचाराच्या आवाजाचे सामर्थ्य? संघाचे टीकाकार जेव्हा गल्ली गल्लीत लाऊडस्पीकर घेऊन ओरडत असतात तेव्हा संघ फक्त नागपूरमध्ये कुजबुजत असतो. संघाच्या कार्याला प्रसिध्दी मिळालीच तर ती संघावरच्या आक्षेपांना पुष्टीकरण देणारीच असते. साम्यवादी विचारांची भारतीय माध्यमांवरची जबरदस्त पकड जरी मान्य केली तरी संघ आपल्या कामाच्या आणि विचारांच्या प्रचारात मागे पडला ही गोष्ट सत्य आहे. आधुनिक काळात कोणत्याही संघटनेच्या अस्तित्वासाठी प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर हा अपरिहार्य आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या पक्षाला जे सकाळी सकाळी समजते ते संघ आणि भाजपाला कधी समजणार? रात्र झाल्यावर? प्रत्येक वाहिनीवर भाजपा आणि संघाचे प्रवक्ते खरपूस मार खात असतात, सत्तेत असतानाही आणि विरोधात असतानाही. भ्रष्टाचाराचा कळस गाठलेले आणि कुटुंबाला निष्ठा वाहिलेले पक्ष प्रत्येक वृत्तपत्रात आपल्याला अनुकूल लेख छापून आणतात, आणि कोटयावधी रुपयांच्या देणग्या मिळवणा-या भाजपाला एकही वृत्तपत्र किंवा वाहिनी विकत घेता येत नाही ? एवढे ही न कळणा-या संघटनांचा बो-या वाजणार ही काळया दगडावरची रेघ. मग हातात फक्त पांचजन्य राहणार हे नक्की.

अनेक अतिशय मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण लेख लिहीणारे लेखक, फर्डे वक्ते दिमतीला असूनही संघाची प्रतिमा शेंदूर लावून काठया फिरवणा-या केसाळ आणि जाड भुवया आणि अरूंद कपाळ असलेल्या माणसाचीच राहते असे का? कम्युनिस्ट पक्ष हा भारतात जवळ जवळ नामशेष झाला आहे, या पक्षाच्या विचारसरणीला भारतानेच नव्हे तर जगानेही नाकारले आहे, पण तरीही त्या पक्षाचे प्रवक्ते, नेते नेहमी प्रभावीपणे बदललेल्या परिस्थितीनुरूप बोलणारे आधुनिक मुत्सद्दी वाटतात, आणि संघाचे प्रवक्ते, दोन डावे पाय असणा-या, पदोपदी ठेचा खाणा-या गावंढळासारखे. हे का होते? असे नाही की संघात बुध्दीमान माणसे नाहीत. माझ्या मते या सादरीकरणाच्या त्रुटीमागचे मूळ कारण असे की संघाला आपण कोण आहोत आणि का आहोत याबाबत संभ्रम पडला आहे. एक सांस्कृतिक संघटना? मग संघवाले का राजकारणात स्वतःला गुंतवतात? संबंध नसलेल्या राजकिय घटनांवर नको ते भाष्य करून का वादंग निर्माण करतात? एक सामाजिक संघटना? मग संघवाले या सामाजिक कार्यासाठी फक्त नैसर्गिक आपत्तींची वाट का बघत बसतात? ते स्वच्छ भारत अभियानात, स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधात वर्षभर का गुंतून राहत नाहीत? कदाचित ते ही कार्ये अविरत करतही असतील, पण सामान्य माणसांना ते कधीच माहित पडत नाही. एका राजकिय पक्षाचा विचारकोश? मग का तसे प्रामाणिकपणे सांगितले जात नाही? हिंदूधर्म रक्षक? विहिंप किंवा शिवसेनेच्या किंवा ओवेसीच्या अंगात आपली विचारसरणी टीकेच्या गदारोळात सुध्दा ठणकावून सांगण्याचे जे धारिष्ट आहे ते संघाच्या अंगात का नाही? फक्त एक प्रखर राष्ट्रवादी संघटना? मग या संघटनेला सगळया भारतीयांनाबरोबर घेऊन का जाता येत नाही? संघात किती अल्पसंख्यांक आहेत?

हिंदूधर्मातील फक्त उच्चवर्णीयांचे कैवारी? मग सरसंघचालक आरक्षणाबाबत कभी हां कभी ना हा पवित्रा का घेत राहतात? मराठीत एक म्हण आहे, मुळमुळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे. संघाला याचा विचार करायला हवा. सदैव कुंपणावर बसून फक्त आपल्या अस्तित्वाची काळजी वाहणारे अनेक महाभाग भारतात आहेत. दोन कारणांनी विचारधारेंचा हास होतो. जर विचारधारा कालबाह्य असेल तर - उदाहरण कम्युनिस्ट,- किंवा विचारधारा गढूळ असेल तर - उदाहरण रास्वसं. या माझ्या प्रश्णांना कदाचित काही संघवाले संतापाने उत्तर देतील की, या सगळया प्रश्णांची उत्तरे आम्ही वेळोवेळी दिलेली आहेत. तू ती वाचायला पाहिजेस, आणि मग तू अकलेचे तारे तोड. हे कदाचित खरे असेल की मी विचारलेल्या प्रश्णांची उत्तरे केवळ माझ्या अज्ञानामुळे मला माहित नसतील. पण व्यवहारातले उदाहरण घेतले, तर मी जर टाटा उत्पादन घेतले नाही तर रतन टाटा मला दोष देणार नाहीत, ते त्यांच्या मार्केटींग टीमला दोष देतील. संघाला आपल्या मार्केटींगचा फार मुळातून विचार करायला पाहिजे असे मला वाटते.

सध्या संघाला जे चांगले दिवस आले आहेत ते फक्त भाजपाच्या लोकप्रियतेमुळे, किंबहुना मोदीजींच्या लोकप्रियतेने. हीच वेळ आहे की संघाने मी नमूद केलेल्या मुद्दयांचा, त्यांच्या संघटनेचे सामान्य माणसाच्या मनामधले प्रतिबिंब म्हणून तरी विचार करायला हवा.