अहं ते वयं


लहानपणी केवळ 'मी' विद्यमान असतो. मात्र पुढे हे कुटुंब माझे आहे.., कुटुंब ज्या समाजाचा घटक आहे, तो समाजही माझाच आहे. पुढच्या पायरीवर केवळ समाजच नाही, तर हे राष्ट्र आणि हे अखिल जगत माझे आहे आणि मी त्याचाच सदस्य असल्याची भावना निर्माण होणे, ही कल्पना दीनदयाळजींच्या चिंतनात सर्वत्र आढळून येते. शेवटच्या टप्प्यावर मात्र दीनदयाळजी तादात्म्य होण्याची कल्पना मांडतात. निसर्गात दिसणारी विविधता ही त्या आंतरिक एकतेचाच आविष्कार आहे, असे हे दर्शन मानते.

गेले आठ-दहा महिने पध्दतशीरपणे प्रचारात आणली गेलेली असहिष्णुता, जे.एन.यू.तील देशविरोधी घोषणा प्रकरण, वर्तमानपत्रांतून व इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर घातले जाणारे चर्चेचे रतीब, समाजमाध्यमातून स्वनामधन्य विचारवंतांकडून चालणारी तर्कहीन व अर्थहीन चर्चा... अर्थात त्याला काही सन्मान्य अपवाद आहेत, पण जणू काही हा देश अराजकाच्या उंबरठयावर उभा आहे असा भास निर्माण केला गेला आहे. देशातील सर्व प्रश्न सुटल्याप्रमाणे केवळ भावनिक व अस्मितेच्या प्रश्नांवर सर्व चर्चा केंद्रित झालेली दिसते. जेमतेम पन्नास वर्षांपूर्वी मांडल्या गेलेल्या संपूर्ण मानवाच्या आणि मानवेतर सृष्टीच्या कल्याणाच्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आजची स्थिती तपासणे अगत्याचे ठरते.

जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणून भारताचा उल्लेख केला जातो; किंबहुना ही भूमी असंख्य विचार, दर्शने, धर्म आणि पंथ प्रसवणारी राहिली आहे. कालमानपरत्वे असंख्य विचारांची गुंतागुंत निर्माण होणे स्वाभाविक आहे. मानवाने निरंतर विश्वाच्या पोटात दडलेल्या रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आपणास दिसून येतो. आजची भौतिक व वैचारिक प्रगतीदेखील अखंडपणे चाललेल्या मानवाच्या चिंतनाचा आणि नावीन्याच्या शोधाचा परिपाक आहे. तत्कालीन द्रष्टयांनी नेहमीच त्यांच्या काळातील समस्यांवर त्यांच्या त्यांच्या परीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारताच्या संदर्भात सामान्यपणे विचार करताना मार्क्सवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद  आणि आंबेडकरवाद या विचारांनी भारताचे विसावे शतक ढवळून काढल्याचे दिसून येईल. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की, कुठलाही विचार जन्माला येताना त्याची दुसरी बाजू घेऊनच जन्माला येतो. मार्क्सवाद पुढे समाजवादात व त्याहीपुढे गांधीप्रणीत समाजवादात रूपांतरित झाला. हिंदुत्ववादाचे सावरकर आणि संघ असे दोन प्रवाह बघायला मिळतात; पण विशेष म्हणजे या दोन्ही प्रवाहांची हिंदुत्वावरील श्रध्दा अबाधित राहिली आहे. मार्क्स स्वत: विरोधविकासवादी होता. त्यामुळे प्रत्येक अंतिम वाटणारा विचार कालांतराने प्राथमिक अवस्थेत जातो, असे तो मानत असे. राहता राहिला प्रश्न आंबेडकरांच्या विचारांचा. तर त्यांनीदेखील बुध्दाच्या मार्गाने जात आपला विचार सतत ऊर्ध्वगामी राहील अशीच भूमिका मांडलेली दिसते. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या जवळ न थांबता पुढे जावे, असे त्यांना वाटे. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी वैचारिक घुसळण सुरू असताना स्वातंत्र्यानंतर साठीच्या दशकात पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानव विचाराचा परामर्श घेणे अगत्याचे ठरते.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या हातात प्रदीर्घ काळ सत्ता राहिली आणि  डाव्यांनी नेहमीच काँग्रेसची बौध्दिक गरज पूर्ण केली. त्यातही सर्व महत्त्वाच्या बौध्दिक संस्थांवर डाव्यांची मक्तेदारी असल्याने उजव्या मानल्या गेलेल्या दीनदयाळजींचा विचार दुर्लक्षित राहणे अगदी स्वाभाविक होते. पंडितजींचा वारसा सांगणाऱ्यांनीसुध्दा हा विचार त्यांच्या कार्याचा मूलाधार मानला खरा, पण प्रत्यक्षात त्याची व्यवहार्यता तपासून त्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करण्यात ते कमी पडले. शिवाय त्यांना अपेक्षित असलेला 'व्यक्तीचा अहं ते वयं' हा प्रवासदेखील धीमा असल्याचे प्रकर्षाने जाणवते. या प्रवासातील अडचणींचा विचारदेखील झाल्याचे दिसत नाही. वास्तविक कोणताही विचार केवळ विरोधी आहे म्हणून त्याज्य ठरविणे हा त्या विचारावरचाच अन्याय ठरतो.

साधारणपणे साठच्या दशकात जनसंघाच्या कामानिमित्त भारतभ्रमण करीत असताना दीनदयाळजींचे याविषयीचे चिंतन सुरू होते. 1965 मध्ये विजयवाडा येथे भरलेल्या जनसंघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत पक्षाचा सिध्दान्त व नीतीविषयक जो प्रबंध स्वीकृत झाला, त्याची सुरुवातच मुळात एकात्म मानव दर्शनाने झालेली आहे. एकात्म मानव विचार हा भारतीय विचारांचे अधिष्ठान असलेला विचार असून दीनदयाळजी त्याची तात्त्वि मांडणी करतात. 'सर्वेपि सुखिन: सन्तु' म्हणत असताना किंवा 'भवतु सब्ब मंगलम' असे म्हणताना भारतीय विचार केवळ मानवाच्या कल्याणाचा विचार करीत नाही, तर त्याही पुढे मानवेतर सृष्टीचा त्यामागे विचार केलेला आपल्याला दिसून येतो. दीनदयाळजींनी चतुर्विध पुरुषार्थाच्या आधारे हा विचार मांडला असून एकात्म मानव दर्शनात व्यक्तीचा 'अहं ते वयं' हा प्रवास अधोरेखित केला आहे. या विचारसूत्राचे आणखी एक वेगळेपण म्हणजे हे दर्शन एखाद्या विचाराच्या वा व्यवस्थेच्या विरोधातली प्रतिक्रिया म्हणून जन्माला आलेले नाही. याउलट बहुतेक पाश्चात्त्य विचारप्रणाली या प्रक्रियेतून जन्मास आलेल्या दिसतात. प्रतिक्रियेतून संघर्ष व संघर्षातून पुन्हा प्रतिक्रिया हे खरे तर न संपणारे दुष्टचक्र आहे. वरवर पाहू जाता विरोधातून विकास हे मार्क्सचे तत्त्व जगभर स्वीकारले गेले असले, तरी शाश्वत व परस्परपूरक विकासात हे तत्त्व कुचकामी ठरल्याचे सिध्द झाले आहे. डार्विनने प्राणिशास्त्राचे, हेगेलने तत्त्वज्ञानाचे आणि मार्क्सने इतिहासाचे विश्लेषण हे विरोध विकास सिध्दान्ताच्या आधाराने केलेले दिसेल. याउलट एकात्म दर्शन हे प्रतिक्रियेतून नव्हे, तर व्यष्टी, समष्टी आणि त्याही पुढे परमेष्टीशी तादात्म्य पावण्यासाठी पुरुषार्थाच्या आधारे केलेली मांडणी होय. संघर्षातून जीवन विकास ही कल्पनाच एकात्म मानव दर्शन अमान्य करते. दीनदयाळजी म्हणतात, ''जर माणसाचा स्वभाव खरोखरच मुळात संघर्षाचा असेल, त्याच्या प्रत्येक कृतीमागची प्रेरणा दुसऱ्याला गिळंकृत करून स्वत: जगण्याची असेल, तर आपण त्याला दुसऱ्यासाठी जगणे व दुसऱ्यावर प्रेम करणे शिकवू शकणार नाही. यदाकदाचित प्रेम आणि सहकार्य यांना एखादा आधार असलाच, तर तो अधिक प्रबळ अशा एखाद्या शत्रूसमोर स्वत:च्या दुर्बलतेच्या आणि पराभवाच्या भावनेतूनच निर्माण होईल. तो आधार तात्पुरता असेल. त्यामुळे माणसामध्ये सद्भावना, त्याग, सेवा, सहिष्णुता, शिस्त आदी ज्या गुणांची निर्मिती होईल, ती केवळ एक धोरण म्हणून होईल. ते गुण मानवाच्या जीवनाचे अंग बनू शकणार नाहीत. संघर्षाच्या भूमिकेतून स्वेच्छापूर्वक आणि चिरस्थायी सहकार्याची सद्भावना निर्माण होऊ शकत नाही.''

समग्र विचार

प्रत्येक समाजाचा एक स्व-भाव असतो, हे दीनदयाळजींना चांगले कळत होते. यालाच ते 'चिती' असे संबोधतात. या चितीला त्याची निर्धारित गती आहे. चितीच्या अंतरंगात असलेला प्रत्येक घटक परस्परपूरक आहे, तसा परस्परावलंबी आहे. त्यामुळे त्यांनी समष्टीचा विचार मांडताना तो तुकडयांमध्ये न मांडता साकल्याने मांडलेला दिसतो; किंबहुना समग्र विचार हेच या दर्शनाचे मुख्य सूत्र आहे. विकासक्रम मांडताना पाश्चात्त्य विचार व्यक्तीला केंद्र मानून परिवार, समाज, राष्ट्र, मानवता आणि विश्व अशा चढत्या क्रमाने जाताना दिसतो. ही रचना वर्तुळाकार आहे. हे वर्तुळ अधिकाधिक कसे व्यापक होईल, यावर त्यांचा भर असतो.

परंतु यातील एक कच्चा दुवा दीनदयाळजींनी ओळखला. त्यांच्या मते ही वर्तुळे वाढत्या त्रिज्येची असली, निरंतर व्यापक होत जाणारी असली, तरी ती परस्परांपासून वेगळी आहेत. पृथकता हाच त्यांचा अंगभूत गुण आहे. याउलट एकात्म दर्शनात ही रचना अखंड मंडलाकार असलेली आपल्याला दिसेल.

व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी असा प्रवास होत असताना यातील सर्व घटक एकात्मतेच्या धाग्याने परस्परांना घट्ट बांधले गेले आहेत. व्यक्ती, कुटुंब, समाज असे टप्पे पार करीत असताना एकमेकापासून विलग न होता प्रत्येक वर्तुळ मागच्या वर्तुळाशी सबंध ठेवूनच विकसित होते. लहानपणी केवळ 'मी' विद्यमान असतो. मात्र पुढे हे कुटुंब माझे आहे.., कुटुंब ज्या समाजाचा घटक आहे, तो समाजही माझाच आहे. पुढच्या पायरीवर केवळ समाजच नाही, तर हे राष्ट्र आणि हे अखिल जगत माझे आहे आणि मी त्याचाच सदस्य असल्याची भावना निर्माण होणे, ही कल्पना दीनदयाळजींच्या चिंतनात सर्वत्र आढळून येते. शेवटच्या टप्प्यावर मात्र दीनदयाळजी तादात्म्य होण्याची कल्पना मांडतात. निसर्गात दिसणारी विविधता ही त्या आंतरिक एकतेचाच आविष्कार आहे, असे हे दर्शन मानते. चराचरात आत्मतत्त्वाचा वास आहे, असे आपण ऐकत असतो. अनेक प्रवचनकार व कीर्तनकार घासून गुळगुळीत झालेले एक वाक्य सहजपणे वापरत असतात, ते म्हणजे 'प्रत्येकाच्या ठायी तो आत्माराम आहे'. प्रत्यक्षात त्याचा अर्थ किती जण समजून घेतात, हा भाग अलाहिदा; परंतु आपल्या प्रत्येकात एक चैतन्य आहे, माझ्यात जे तत्त्व विद्यमान आहे तेच तत्त्व इतरांमध्ये आहे, हा भाव एकदा आला की भेद उरत नाही, हा विचार या दर्शनाच्या मुळाशी  आहे.

संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात,

तुज सगुण म्हणू की निर्गुण रे

सगुण निर्गुण एक गोविंदु रे।

तुज स्थूल म्हणू की सूक्ष्म रे

स्थूल सूक्ष्म एकू गोविंदु रे।

तुज दृश्य म्हणू की अदृश्य रे

दृश्य अदृश्य एकू गोविंदु रे।

वरील ओळींमधील 'गोविंदु' हे चैतन्य आहे आणि ते स्थूलात, सूक्ष्मात, सगुणात, निर्गुणात सर्वत्र व्याप्त आहे. आपल्याकडे 'जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी परमेश्वरतत्त्व आहे' असे म्हणतात, ते वर उल्लेखिलेल्या 'गोविंदु'साठीच आहे. ज्या मंडळींनी ध्यानधारणा केलेली असेल किंवा विपश्यना केली असेल, त्यांना स्थूल आणि सूक्ष्म यातील फरक नक्कीच कळेल. यात पृथक विचार न करता व्यक्ती, परिवार, समाज, राष्ट्र, विश्व आणि परमेष्टी यांच्यातील परस्परपूरकता लक्षात घेऊन त्यांच्यातील एकत्वाचा आग्रह यात मांडलेला आहे.

चतुर्विध पुरुषार्थ

एकात्म दर्शनात तृष्णातृप्ती मान्य आहे, पण ती पूर्ण करत असताना पुरुषार्थाचे भान सुटू नये, असा आग्रह कायम आहे. भारतीय परंपरेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्माच्या आधारे काम आणि अर्थ हे पुरुषार्थ साधले, तर मोक्ष या पुरुषार्थाकडे जाण्याचा मार्ग श्रेयस्कर होतो. या ठिकाणी 'धर्म' या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे. प्रार्थनास्थळावरून ठरतो तो धर्म नाहीच. धारणा करतो तो धर्म. भगवान बुध्ददेखील 'धारेती धम्म:' असे म्हणतात. धर्म हा निसर्गाचा नियम आहे. धर्माच्या आधारे अर्थार्जन म्हणजे नैतिक भान सुटू न देता केलेले अर्थार्जन होय. मात्र अर्थाचा अभाव व अर्थाचा प्रभाव हे दोन्ही व्यक्तीला धर्मभ्रष्ट करण्यास कारणीभूत ठरतात.

शरीर, मन, बुध्दी व आत्मा यांच्या तृष्णा तृप्त झाल्या की आपणास समाधान लाभते. त्या सर्व प्रकारच्या तृष्णा म्हणजे काम होय. स्त्री-पुरुष समागम इतका संकुचित अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही. माणसाच्या मनात उद्भवणाऱ्या सर्व इच्छा, आकांक्षा, वासना म्हणजे काम होय. एखाद्या वेळी या भौतिक जगाकडे पाठ फिरवून सर्वसंगपरित्यागाची इच्छासुध्दा काम या संकल्पनेत मोडते. माणसाला क्रियाशील करणारा हा पुरुषार्थ आहे.

मोक्ष या शब्दाचा अर्थच मुक्त होणे असा आहे. मुक्ती कशापासून? तर आसक्ती, भय, लालसा, राग, द्वेष या सर्वांपासून मुक्ती. एकात्म दर्शनातील आत्म्याच्या तादात्म्यभावाशी हा पुरुषार्थ संलग्न आहे. या चार पुरुषार्थांनी युक्त असा मानव हा या दर्शनाचा केंद्रबिंदू आहे. माणसाच्या सर्व तृष्णा शांत होण्यासाठी संस्कृतीने चार पुरुषार्थ आपल्यासमोर ठेवले आहेत. दीनदयाळजींनी त्याचा मूलगामी विचार केलेला दिसून येतो.

पंडितजींच्या चर्चेत वर्णव्यवस्थेचा ऊहापोह येतो. व्यवस्था म्हणून तिच्या प्राचीनत्वाची ते चर्चा करतात. एके काळी गुणकर्मसिध्दान्तावर आधारित व्यवस्था म्हणून तिचा उल्लेख करतात. मात्र वर्तमानात ती त्याज्य ठरत असेल, तर तिला कवटाळून बसण्याचे अजिबात कारण नसल्याची निःसंदिग्ध ग्वाही ते देताना दिसतात. त्यामुळे वर्णव्यवस्थेचे समर्थक असे बोल त्यांना लावता येणार नाही.

व्यवहार्यता

एकविसाव्या शतकात - विशेषतः आजच्या परिप्रेक्ष्यात जेव्हा आपण एकात्म दर्शनाचा विचार करतो, तेव्हा मनात एक निराशा दाटून आल्याशिवाय राहत नाही. जागतिकीकरणाची  भयचकित करणारी अजस्र यंत्रे सर्व समाजक्षेत्रे व्यापून उरली आहेत. काँग्रेस असो की भा.ज.प. - राजकारणातील अगदी खालचा तळ आम्ही गाठलेला आहे. 'अरे'ला 'का रे’ हे इतके सहज घडताना दिसते की, आम्ही संयम गमावून बसलो आहोत काय? असा प्रश्न उपस्थित व्हावा. येनकेनप्रकारेसत्ता मिळविण्याकरिता जातीचे क्षुद्र राजकारण. यामुळे समाज जोडण्याच्या प्रक्रियेला खीळ बसत असेल तर बसू दे, पण आम्ही त्याचा तात्कालिक फायदा उपटणार. देशाप्रति असलेल्या कर्तव्याचा अजिबात विसर पडलेला असताना आणि अधिकाराची चर्चा फार उच्चरवाने होत असताना प्रत्येक क्षेत्र जणू काही अधोगतीची शर्यत लावल्यासारखे अधोगामी धावताना दिसते. वाईट घडते आहे याचे अजिबात दु:ख नाही; दु:ख याचे आहे की ते वाईट आहे, काही तरी चुकीचे आहे हेच समाजाला कळेनासे झाले आहे. अमके काम करायला तमके पैसे द्यावेच लागतात, हा भाव सहजपणे आमच्यात भिनला आहे. या पार्श्वभूमीवर दर्शनाची व्यवहार्यता बघितली पाहिजे.

मुंबईत झालेल्या 'नीती आणि सिध्दान्त' या विषयाच्या समारोपात दीनदयाळजी या विचाराच्या व्यावहारिकतेला स्पर्श करताना दिसतात. ते म्हणतात, ''भारतीय आणि भारताबाहेरील विविध विचारप्रवाहांचा सम्यक विचार करून आणि त्या विचारातील सामर्थ्य आणि दुर्बलता ध्यानात घेऊन एकात्म मानव विचार असा एक मार्ग दाखवीत आहे की, जो मानवाला त्याचे आजवरचे चिंतन, अनुभव आणि सिध्दी या सर्व बाबतीत पुढे घेऊन जाईल.''

दीनदयाळजी या सिध्दान्ताची केवळ तात्त्वि बाजू न मांडता ही जगण्याची पध्दती प्रत्यक्षात येण्याकरिता काही मौलिक सूचना करताना दिसतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या आधारे स्वत:चा विकास साधत असताना समष्टीचे हित नजरेआड होता कामा नये, अशी सूचना ते वारंवार करतात. अपेक्षित समाजाची उभारणी करण्याकरिता असंख्य संस्कारकेंद्रे, संस्था, शाळा या विचारांचा वसा घेतलेले तरुण याकामी उभे करावे लागतील. जुन्या केंद्रांचे पुनरुज्जीवन त्यात अपेक्षित आहे. एकीकडे या विचाराने ते समाजाचे निर्माण करू पाहतात, तर दुसरीकडे असा समाज भौतिक प्रगतीच्या दिशेनेदेखील पुढे सरकला पाहिजे, असा व्यवहार्य दृष्टिकोन ठेवतात.

परंतु इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. दीनदयाळजींचे हे चिंतनच मुळात भारतीय विचारांचीच अभिव्यक्ती आहे. मात्र असा उदात्त ध्येयवाद या भूमीला नवा नाही. भारतीय चिंतनावर गेली दोन शतके एक सामाईक आक्षेप सतत घेतला जातो आणि तो म्हणजे विचारांनी प्रगल्भ असलेल्या या भूमीवर प्रत्यक्ष आचरणाच्या पातळीवर मात्र टोकाचा विरोधाभास का? याचे उत्तर साधे आहे. तात्त्वि पातळीवर मांडलेला 'अहं ते वयं' हा प्रवास सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येथील व्यवस्था कमी पडल्या, हे स्पष्टच आहे. प्रत्येकाला व्यक्तिगत स्वार्थ आहे. जिथे केवळ पैसा हा धर्म झालेला असताना समष्टीच्या कल्याणाचा विचार किती लोक प्रत्यक्षात आणतात? असे लोक भारतात नाहीत असे मुळीच नाही. अशी असंख्य माणसे, संघटना या देशात आजही सापडतील. शक्य आहे, हा विचार व्यावहारिक पातळीवर उतरवताना ज्या व्यवस्था आपल्याला उभ्या करायच्या होत्या, त्या आपण करण्यास अक्षम ठरलो. शिक्षण हे खरे तर प्रभावी माध्यम. मात्र तेदेखील आपल्याकडे मेकॉलेच्या मार्गाने गेल्याने विचारांची व्यावहारिक बाजू लंगडी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वामी विवेकानंदांपासून तर अरविंद घोषांपर्यंत आणि महात्मा गांधींपासून ते विनोबा भावेंपर्यंत या देशाची मांडणी या देशाच्या विचारावर करण्याचा आग्रह धरतात, म्हणजे नेमके काय? याचे उत्तर एकात्म दर्शनात सापडते. या देशाचे आणखी एक वैशिष्टय जाता जाता सांगितले पाहिजे, ते म्हणजे सतत नव्याचा स्वीकार. या देशात मुघल आले, आम्ही त्यांच्या अनेक गोष्टी घेतल्या. इंग्रज आले, त्यांचा पेहराव, भाषा, शिक्षणपध्दती लगेच स्वीकारल्या. तात्पर्य काय, तर सतत नवे शिकण्याचा आमच्या समाजाचा स्वभाव आहे. मात्र हे नवे घेत असताना आपला विसर पडत गेला, हे या देशाच्या जडणघडणीसाठी घातक ठरले. असे असले, तरी दीनदयाळजींचा विचार आजही प्रासंगिक ठरतो. तो त्याज्य ठरवला जाऊ शकत नाही ते केवळ त्याच्या समग्र समाजाच्या चिंतनामुळे. फक्त पुन्हा तो मांडताना कसे जगायचे हे सांगण्याच्या भानगडीत न पडता असे जगले पाहिजे हा आदर्श समाजासमोर उभा करणे, हीच काळाची गरज आहे.