काळाच्याही पुढे...


एप्रिल २०१६ रोजी भारतीय जनता पक्षांच्या स्थापनेला ३६ वर्षे पूर्ण झाली. स्थापनेच्या वेळेस भारतीय जनसंघाकडून भाजपला ज्या काही गोष्टी वारसारूपाने मिळाल्या, त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'एकात्म मानववाद' हे तत्त्वज्ञान. हिंदुत्व किंवा सांस्कृतिक राष्ट्रवाद ही जशी भाजपच्या राजकारणाची ओळख आहे, त्याचप्रमाणे एकात्म मानववाद म्हणजे काय हे स्पष्ट करणारा २२-२५ एप्रिल १९६५ या कालावधीत मुंबईमध्ये झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्याख्यानांचाही समावेश आहे. मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले. भाजपने इतिहासात पहिल्यांदा स्वबळावर बहुमत मिळवले. तीस वर्षांनी पहिल्यांदाच कोणत्याही राजकीय पक्षाला देशात स्वबळावर सत्ता मिळाली. या सत्ताबदलाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या निवडणुकांनंतर भाजपची धुरा खऱ्या अर्थाने नवीन पिढीकडे आली आणि पक्षाच्या स्थापनेपासून त्याचे नेतृत्व करणाऱ्या पिढीने मार्गदर्शकांची भूमिका स्वीकारली. आजच्या भाजपतील अनेक नेते जनसंघाच्या काळापासून आणि विशेषतः आणीबाणीच्या कालावधीत सक्रिय समाजकारणात आले असले, तरी १९९१ साली जागतिकीकरणाला प्रारंभ झाल्यानंतरच राजकीय पटलावर त्यांचा उदय झाला.

या नेत्यांनी ज्या निकषांवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली, त्यात जागतिकीकरणामुळे खुली झालेली अर्थव्यवस्था, परदेशी भांडवल आणि तंत्रज्ञान यांचा अर्थव्यवस्थेवरील पगडा, सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दोन अंकी दर वाढ आणि तरुणांच्या मनाला भिडणारी भाषा बोलण्याची क्षमता यांचा समावेश आहे. या नेतृत्वबदलामुळे भाजपच्या बाह्यरूपात मोठा बदल झालेला कोणीही नाकारणार नाही, पण त्याच्या आत्म्याचे किंवा गाभ्याचे काय? तो तसाच राहील, का काळानुरूप त्याच्यातही मोठया प्रमाणावर बदल करावे लागतील? सुमारे दोन महिन्यांपूर्वी - म्हणजेच २७ फेब्रुवारी २०१६ रोजी भाजप आंतरराष्ट्रीय लोकशाही आघाडी - International Democratic Union (IDU) या मध्यम-उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेत सामील झाला. या गटात सहभागी असलेले अन्य महत्त्वाच्या पक्षांच्या - उदा. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष, ब्रिटनमधील हुजूर पक्ष आणि जर्मनीची ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी यांच्या पंगतीला जेवायला बसल्यावर अंत्योदय आणि एकात्म मानववाद यांचे स्थान अडगळीत गेलेल्या पोथी-पुराणांप्रमाणे आहे, का खरोखरच आजही ते प्रासंगिक आहेत यावर व्यापक मंथन अव्यवहार्य ठरते.

लेखाच्या सुरुवातीसच मी नम्रपणाने नमूद करू इच्छितो की, एकात्म मानववाद विशद करणारी पंडितजींची भाषणे अगदी काल-परवापर्यंत पुस्तकरूपाने वाचली नव्हती. एकात्म मानववाद आजही कसा प्रासंगिक आहे यावर काही विद्वान वक्त्यांची भाषणे तसेच लेख वाचले होते, पण त्यातून फारसे काही आकलन झाले नव्हते. एकात्म मानववाद पुस्तकरूपामध्ये आणि थेट पंडितजींच्या शब्दांत वाचल्यावर त्याचे अधिक आकलन झाले असले, तरी त्यावर स्वत:चे मत मांडण्याच्या दृष्टीने ते फारच तोकडे आहे याची जाणीव ठेवून या लेखात काही महत्त्वाच्या मुद्दयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.

सगळयात पहिला जो मुद्दा हृदयाला भिडतो, तो म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर त्याच्या सामाजिक/आर्थिक/आध्यात्मिक वाटचालीची दिशा कोणती असली पाहिजे, यावर स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी एकत्रितपणे फारसा विचार झाला नाही, तसा तो स्वातंत्र्यानंतरच्या सतरा वर्षांतही (जेव्हा पंडितजींनी एकात्म मानववादाची मांडणी केली) झाला नाही. तीच गोष्ट आजही, म्हणजेच जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागल्याला २५ वर्षे उलटून गेल्यानंतरही तेवढीच खरी असल्याचे मला वाटते. तेव्हा जगाची वाटणी प्रामुख्याने दोन गटांत झाली होती आणि तुम्हाला निवडण्यासाठी समाजवाद किंवा भांडवलवाद या दोघांचीच विविध प्रारूपे उपलब्ध होती. पंडितजींनी पाश्चिमात्य जगतातून आणि तेथील सामाजिक अभिसरणावर बेतलेले हे दोन्ही पर्याय अमान्य करून भारतीय संस्कृती व जीवनदर्शन यावर आधारित राष्ट्रजीवनाविषयीचा आपला सिध्दान्त मांडला होता.

जागतिकीकरणामुळे आणि त्यानंतर आलेल्या माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट, मोबाइल आणि समाजमाध्यमांच्या क्रांतीमुळे अनेक भिंती कोसळल्या असून आज आपली अवस्था अशी आहे की, दिसायला पाण्याने भरलेली विविध आकारांची अनेक पात्रे आहेत, पण ती तळाशी एकमेकांशी जोडली गेली असल्याने एका पात्रातील पाण्याच्या पातळीत किंवा रंगात/रूपात फरक पडल्यास सगळयाच पात्रांमध्ये तसा फरक पडतो. मग त्यात अमेरिकेतील गृहनिर्माण क्षेत्रावर आलेले संकट, तेलाच्या वाढणाऱ्या किंवा कोसळणाऱ्या किमती, चीन आणि युरोपमधील घसरण यांचे जागतिक अर्थकारणावर प्रचंड परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत देशाचा आर्थिक गाडा हाकणे हे चौकात कोणत्या दिशेने गाडी घेऊन जायची असे नसून हिमालयात फेसाळलेल्या गंगाप्रवाहात राफ्टिंग करण्यासारखे आहे. वेगवान प्रवाहासोबत पुढे जाताना वाटेत येणाऱ्या असंख्य खडकांवर बोट आदळणार नाही याची काळजी घेत तुम्हाला पुढे जायचे आहे. इंटरनेट, २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमे यामुळे राजकारण अधिक उथळ, कर्णकर्कश व तत्त्वहीन होत आहे. झपाटयाने होणाऱ्या नागरीकरणामुळे पंचकोनी-षट्कोनी असणारी कुटुंबव्यवस्था आता त्रिकोणी झाली आहे. या तिन्ही कोनांची बेरीज १८० अंश होत नाही, कारण प्रत्येक कोनाला १८० अंशाचे आयुष्य जगायचे आहे.

त्यामुळे पंडितजींनी म्हटल्याप्रमाणे राजकारणातील साप-मुंगसाची युती, संधिसाधूपणा, समाजजीवनातील शुचिता आणि चारित्र्यहीनता यांत गेल्या ५० वर्षांत अनेक पटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे अशक्यप्राय वाटत असले, तरी आज आत्माभिमुख होऊन 'स्व'कडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. १९६० च्या दशकात चीनच्या आक्रमणामुळे देशातील विविध मतप्रवाहांना राष्ट्रीय हितासाठी एकत्र यायला भाग पाडले होते. आज कदाचित शत्रू म्हणून एखादा देश आपल्यासमोर नसेल, पण विविध आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या समस्या आ वासून समोर उभ्या असताना आणि जागतिक प्रवाहात आपण सगळेच वाहवत जात असताना सर्वांनी एकत्र येऊन प्रखर राष्ट्रीय चिंतन करण्याची गरज आज किती तरी पटींनी वाढली आहे.

राष्ट्रीय चिंतनाची सुरुवात कोठून करायची याबाबत तेव्हा जेवढे मतभेद आहेत, त्याहून तीव्र मतभेद आजही आहेत. 'भारत तेरे तुकडे होगे इन्शा अल्लाह... इन्शा अल्लाह' ही घोषणा देशविरोधी नसून भारत हा कशा प्रकारे भिन्न भिन्न संस्कृती असलेल्या लोकांना एकत्र करून तयार केलेला देश आहे, केवळ ब्रिटिशांच्या राजवटीमुळे भारतात राष्ट्रवादाची कल्पना निर्माण झाली... इ. सिध्दान्तांवर देशातील डाव्या मंडळींचा आजही गाढ विश्वास आहे. त्यामुळे एखाद्या राज्याला अथवा लोकांना सरकारकडून सावत्रपणाची वागणूक मिळत असेल, तर 'आझादी' मागणे हे त्यांच्या दृष्टीने न्याय्य आहे. जे.एन.यू. प्रकरणात याच सिध्दान्ताचा आधार घेत डाव्या मंडळींनी कन्हैया कुमारला अन्यायकारी व्यवस्थेविरुध्द उभा ठाकलेला आदर्शवादी/स्वप्नाळू तरुण ठरवला. त्यांच्या दृष्टीने केंद्र व राज्यांतील भाजप सरकारचा अजेंडा हा भारताला २००० वर्षे मागे नेण्याचा असून पुराणातील भाकडकथांना, तसेच कल्पनाविलासांना वैज्ञानिक प्रगती ठरवण्याचा त्यांचा डाव आहे, असे आरोप स्वघोषित पुरोगामी उच्चरवात करतात. खरे तर त्यांनी पंडितजींचा एकात्म मानववाद वाचण्याची गरज आहे.

राष्ट्राची ओळख निर्माण करताना ज्याप्रमाणे आपण पारतंत्र्यात घालवलेल्या १००० वर्षांचा इतिहास किंवा त्यातील घडामोडी पुसून टाकू शकत नाही, त्याचप्रमाणे त्यापूर्वीचा देदीप्यमान इतिहासही आपण नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन करताना पंडितजी गंगेचे उदाहरण देतात. हरिद्वारमधील गंगा पुढे अनेक नाले, ओढे आणि नद्या यांना आपल्या पोटात सामावून घेऊन विशाल प्रवाह बनते. ही गंगा जरी हरिद्वार येथील गंगेएवढी स्वच्छ आणि शुध्द नसली, तरी ती तेवढीच पवित्र असते, असे सांगत ते परकीय आक्रमकांनादेखील कालांतराने आपल्यात सामावून घेऊन आपल्या संस्कृतीचा भाग बनवण्याच्या भारताच्या क्षमतेचे महत्त्व विशद करतात. पाश्चिमात्य जगातून विकसित झालेले विज्ञान आणि तंत्रज्ञान संकोच न करता स्वीकारले पाहिजे; मात्र तेथील विचार, राहणीमान, पोशाख आणि विचारपध्दती स्वीकारताना आपण 'स्व'चा विचार केला पाहिजे. तो न केल्यामुळेच आपल्यावर ही वेळ ओढवली आहे, असे ते म्हणतात.

युरोपातील आजची लोकशाही व्यवस्था ही धर्मसत्तेला आव्हान देणारी राजसत्ता, औद्योगिक क्रांतीमुळे व्यापाराचे वाढलेले महत्त्व, त्यातून पुढे आलेली राष्ट्र आणि राष्ट्रवादाची संकल्पना आणि त्यातून भांडवलशाहीचा तसेच माक्र्सवादाचा उदय याची मांडणी करताना पंडितजी भारतातील परिस्थिती यापेक्षा वेगळी असल्याचे सांगतात. पाश्चिमात्य जगात माणसाला कायम त्याच्या मर्यादांसह पाहिले जाते. त्यामुळेच Survival Of The Fittest - म्हणजेच 'बळी तो कान पिळी' या उक्तीनुसार निसर्ग आणि मानव या दोन शक्ती परस्परपूरक आहेत आणि निसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मानव कायम प्रयत्न करत असतो, अशा पाश्चिमात्य सिध्दान्तावर आपण विश्वास ठेवला. आपण जगाकडे त्यांच्या दृष्टीने पाहायला लागलो. समस्यांकडे आर्थिक, राजनैतिक, पर्यावरणीय आणि सामाजिक अशा वेगवेगळया कप्प्यांमधून पाहायला लागलो. भारतीय जीवन दर्शन याच्या बरोबर विपरीत असून 'अद्वैतवाद' हे आपल्याकडील सर्वोच्च तत्त्वज्ञान आहे. यात निसर्ग आणि मानव (सजीव सृष्टी) हे परस्परांच्या विरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत. मानव हा स्खलनशील नसून पूर्ण आहे, कारण त्याच्याकडे सत् आणि असत् यांच्यात भेद करणारी विवेकाची शक्ती आहे.

त्यामुळे पाश्चिमात्य देशांतील भांडवलवादी लोकशाही, हुकूमशाही किंवा माक्र्सवाद यांचे अंधानुकरण न करता आपण भारतीय जीवन दर्शनावर आधारित व्यवस्था तयार केली पाहिजे, ही पंडितजींची मांडणी सैध्दान्तिकदृष्टया अमान्य करायला काही ठोस कारण मिळत नाही. खरे तर आजच्या जगामध्ये स्मार्ट शहरे आणि गावे, 3-डी प्रिंटिंगद्वारे घाऊक पातळीवरील उत्पादन न करता आवश्यकतेप्रमाणे आणि आवश्यक तेवढेच उत्पादन, नैसर्गिक स्रोतांचा कार्यक्षमतेने वापर, हरित ऊर्जा आणि इमारती, पाण्याचे पुनर्चक्रीकरण, बॅटरीवर धावणाऱ्या गाडया आणि वैयक्तिक गाडयांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर, घराजवळ कार्यालये या संकल्पना निसर्गाशी पूरक बनण्याच्या एका बृहत् विचाराचा भाग आहेत. एकात्म मानववाद वाचताना त्यांची आठवण होत असली, तरी या सर्व गोष्टी ज्या व्यवस्थेतून निर्माण होत आहेत, ती पराकोटीची भांडवलशाही व्यवस्था आहे.

पराकोटीची भांडवलशाही व्यवस्था अशासाठी म्हटले की, अमेरिकेतही अनेक दशके बहुजनवादी भांडवलशाही अस्तित्वात होती. ही व्यवस्था चंगळवादाला पोषक असली आणि निसर्गाला मारक असली, तरी त्यातून समाजातील मोठया प्रमाणावर असलेल्या मध्यमवर्गाला रोजगार आणि अधिक काम करून स्वत:चा भौतिक जीवनस्तर उंचावण्याची संधी मिळत होती. आजची मोबाइल-इंटरनेट क्रांती विकसित देशांतील मध्यमवर्गाच्या मुळावर उठली असून दहा मोठया कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी यांच्याकडे प्रचंड सुबत्ता आहे. दर वर्षी काही नवीन स्टार्ट-अप कंपन्या ज्या गॅरेजमध्ये सुरू होतात, अब्जावधींची संपत्ती निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत; पण दुसरीकडे मध्यमवर्ग आकुंचन पावत आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतले तरी नोकऱ्या मिळत नाहीत, कारण सगळया क्षेत्रांत ऑॅटोमेशन होत आहे. कंपनीचा सीईओ आणि सामान्य कर्मचारी यांच्या वेतनातील दरी गेल्या तीस वर्षांत शेकडो पटींनी वाढली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे बर्नी सँडर्स यांना मिळणारा पाठिंबा बघितला की एक गोष्ट स्पष्ट जाणवते, ती म्हणजे लोक या व्यवस्थेवर प्रचंड चिडले आहेत. या व्यवस्थेला जे पर्याय सुचवले जात आहेत, त्यांच्यात आणि एकात्म मानववादामागच्या भूमिकेत अनेक साधर्म्यस्थळे आहेत असे मला वाटते. पण केवळ अशी साधर्म्यस्थळे आहेत म्हणून आपण आज तरी कोणताही निष्कर्ष काढता कामा नये. एक मात्र नक्की आहे, ते म्हणजे आज जी लाट अमेरिकेत उभी राहताना दिसत आहे, ती नजीकच्या भविष्यात किती तरी पट मोठी त्सुनामी बनून भारतावर आदळणार आहे. कारण ३०% मध्यमवर्ग असणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन कायम ५% वर्गाच्या हातात राहिले आहे.

या मालिकेतील आपल्या तिसऱ्या 'व्यष्टी आणि समष्टी यांच्यातील समरसता' या व्याख्यानात पंडितजी राष्ट्र (Nation) आणि राज्य (State) यांच्याविषयीच्या संकल्पनांचा शोध घेतात. यामध्येही मानवी जीवनाकडे बघण्याच्या पाश्चिमात्य आणि पौर्वात्य दर्शनांतील फरक उपयोगी ठरतो. पाश्चिमात्य संकल्पनांत आत्मा हा शरीराप्रमाणे नश्वर असतो, तर पौर्वात्य दर्शनांत तो शरीर आणि मन यांच्यापेक्षा वेगळा असतो आणि शाश्वत असतो. तोच दृष्टान्त राष्ट्राच्या बाबतीत वापरताना पंडितजी दाखवून देतात की, आपण अनेकदा राज्याला राष्ट्र म्हणजेच शरीरालाच आत्मा समजण्याची चूक करतो. जिथे राज्याला राष्ट्र म्हणून गृहीत धरले जाते, तिथे ते राष्ट्र कितीही सामर्थ्यवान असले तरी ते नामशेष होऊ शकते. त्यासाठी प्राचीन ग्रीसचे किंवा इजिप्तचे उदाहरण देता येईल. याउलट जिथे राष्ट्राची संकल्पना ही संस्कृतीवर आणि समाजमनावर आधारित असते, तेथे राज्य नसले तरी (ज्यू लोकांची राष्ट्राविना २००० वर्षांची वणवण आणि तरीही इस्रायल देशाच्या स्थापनेबद्दलचा त्यांचा दृढविश्वास) किंवा त्याची भूमी अनेक आधुनिक राज्यांमध्ये विखंडित झाली असली, तरी कधी ना कधी ते राष्ट्र म्हणून उभे राहू शकते.

या व्याख्यानात धर्म आणि धर्मराज्य या संकल्पना व्यापक अर्थाने मांडण्यात आल्या आहेत आणि त्या रीलिजन, मजहब आणि थिओक्रॅटिक स्टेट यांच्यापेक्षा कशा वेगळया आहेत, हे अतिशय सुलभतेने पण विस्तृतपणे मांडण्यात आले आहे. 'य: धारयति स: धर्म:' या उक्तीप्रमाणे आजच्या काळात ज्याला आपण चिरस्थायी, शाश्वतता किंवा सस्टेनेबिलिटी म्हणतो, तोच धर्म भारतीय जीवनदर्शनात अभिप्रेत आहे; पण आजच्या 'राइट टू प्रे'च्या युगात या विषयावरील प्रामाणिक चर्चेला योग्य वातावरण दुर्दैवाने भोवताली दिसत नाही. या विषयावर परिवारामध्ये चर्चा होऊ शकते, पण त्या परिघाबाहेर पडताक्षणीच आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत जेव्हा तुम्ही हिंदू धर्म हा इतर मोठया धर्मांप्रमाणेच एक आहे आणि अन्य धर्मांप्रमाणेच हिंदू धर्मातील वैविध्यपूर्ण गोष्टी या एका दृष्टीने बघितल्यास अडगळीसारख्या असून ही अडगळ साफ करून एकविसाव्या शतकातील जगाशी सुसंगत हिंदू धर्माची मांडणी झाली पाहिजे, असा स्वर तथाकथित पुरोगाम्यांकडून आळवला जातो. दुसरीकडे समाजजीवनातील साधनशुचितेमध्ये सातत्याने घसरण होत असून निवडणुकीच्या राजकारणात धनदांडग्यांचे आणि पैशाच्या प्राबल्यामुळे  सार्वजनिक चर्चेत राष्ट्रजीवनात धर्माचरणाचे महत्त्व या विषयावरील चर्चा हा थट्टेचा विषय ठरतो. त्यापेक्षा पुरोगामी बनून दांभिकतेचे आयुष्य कंठत धर्मांतील आणि खासकरून हिंदू समाजातील दांभिकतांवर प्रहार करणे सोपे पडते.

चौथे आणि शेवटचे व्याख्यान 'राष्ट्रीय जीवनाच्या अनुकूल अर्थरचना' या विषयावर सर्वाधिक वाद-चर्चा होऊ शकते. याचे कारण एकात्म मानववादाच्या मांडणीच्या वेळेस मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला भारत 1970च्या दशकात टोकाच्या समाजवादाकडे झुकला. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, तर जनता सरकारच्या काळात कोका कोलाला देश सोडण्यास भाग पाडण्यात आले. या आणि अशा अनेक आर्थिक निर्णयांमागचा विचार चुकीचा नसेल, पण या निर्णयांमुळे देशाचा आर्थिक गाडा घसरायला सुरुवात झाली. राजीव गांधींनी आपल्या काळात जरी तंत्रज्ञानाची कास धरली असली, तरी 1990च्या उंबरठयावर देशाला आपल्याकडील सोने आणि पर्यायाने आपली आर्थिक भूमिका गहाण टाकावी लागली. ती अर्थनीती योग्य होती अशातला भाग नाही, पण आर्थिक उदारीकरण आपल्यावर लादले गेले. गेल्या 25 वर्षांत काँग्रेस आघाडी, भाजप आघाडी, तिसरी आघाडी आणि आता भाजपची एकटयाच्या बळावर सत्ता आली असली, तरी आर्थिक सुधारणांच्या वेगाला लगाम लावण्याचे धारिष्टय कोणत्याही अर्थमंत्र्यांनी अथवा पंतप्रधानांनी दाखवले नाही. लोकांच्या ध्यानीमनी नसणाऱ्या गोष्टींची कृत्रिमरीत्या मागणी निर्माण करायची आणि मग विक्री करायची, या भांडवलवादी मॉडेलवर पंडितजींनी केलेली टीका आजही अनेक क्षेत्रांत लागू ठरत असली, तरी हीच विधाने आजच्या सर्जनशील आणि नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या जगाच्या विपरीत आहेत. स्टीव्ह जॉब्सशी जोडली गेलेली बहुतांश उत्पादने - आय-मॅक, आयपॉड, आयपॅड ते आता आयफोन ही सर्व लोकांच्या कल्पनेपलीकडे होती; पण ती लोकांपुढे सादर केल्यानंतर फायद्याचे राक्षसी प्रमाण असूनही लोक त्यावर उडया मारत आहेत. यामुळेच ऍपलच्या तिजोरीत २०० अब्ज डॉलर एवढी रोकड पडून आहे, जी अनेक देशांच्या सकल उत्पन्नापेक्षा अधिक आहे. तीच गोष्ट ऍपलचे भाऊबंद असणाऱ्या गुगल आणि फेसबुक यांसारख्या कंपन्यांबाबतही म्हणता येईल. या नावीन्यपूर्णतेमुळेच टेस्ला या कंपनीच्या बॅटरीवर चालणाऱ्या गाडीसाठी दीड वर्ष अगोदरच लाखोंच्या संख्येने बुकिंग केले.

'कमानेवाला खायेगा' या पश्चिमेच्या विचारापेक्षा 'कमानेवाला खिलायेगा, पैदा हुआ वो खायेगा' हा पूर्वेचा विचार तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने कधीही श्रेष्ठच आहे; पण आज तो व्यवहार्य आहे का? भारतासारख्या सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात जोपर्यंत पैदा होणाऱ्या लोकसंख्येवर नियंत्रण नसेल तोपर्यंत आणि पडेल ते काम करण्याची तयारी त्यांची नसेल, तर नुसते बसून खाण्याचा अधिकार देणे धोक्याचे ठरू शकेल. अर्थात 'पैदा हुआ वो खायेगा' ही राजकारणात निवडणुका जिंकून देणारी घोषणा असल्याने विविध पक्षांच्या सरकारांनी रोजगार हमी योजनेला किंवा अन्न सुरक्षा योजनेला कात्री लावायचे धैर्य दाखवलेले नाही. देशाची अर्थव्यवस्था ८-१०% वेगाने वाढत असेल, तर पैदा झालेल्या प्रत्येकाला दोन वेळ जेवणाची तजवीज सरकार करू शकते. तसेच त्याला किमान गरजेच्या सेवा पुरवू शकते. पण पंडितजींनी म्हटल्याप्रमाणे सर्वांना मोफत शिक्षण आणि आरोग्यसेवा पुरवण्यापासून आजही आपण अनेक कोस लांब आहोत.

पंडितजी या भाषणशृंखलेचा शेवट ज्या परिच्छेदाने करतात, त्याबाबत कोणालाच दुमत असायचे काही कारण नाही. विश्वाचे ज्ञान आणि आपल्या संपूर्ण परंपरांची जाण ठेवून आपला भारत आपल्या पूर्वजांच्या भारतापेक्षा अधिक गौरवशाली असेल. नराचा नारायण करण्याची क्षमता भारतीय संस्कृतीत असून आज सारे जग एका वळणावर उभे असताना त्याला भारत मार्ग दाखवू शकतो.