तत्त्वज्ञ संघटक


भारतीय राजकारणात जनसंघ प्रस्थापित करण्यात दीनदयाळजींनी जसे यश मिळवले, तसेच यश त्यांनी काँग्रेसची सत्तेवरील मक्तेदारी मोडून काढण्याच्या बाबतीतही मिळवले. 1967 साली अनेक प्रांतांमध्ये बिगरकाँग्रेसी, सं.वि.द. सरकारे सत्तेवर आली. बिगरकाँग्रेसी पक्षांच्या आघाडीचा तो पहिला आविष्कार होता. आपापले वैचारिक आग्रह बाजूला ठेवून वेगवेगळया पक्षांनी एकत्र येण्याचे जे प्रयोग भारतात सुरू झाले, त्यांच्यामागील एक सूत्रधार दीनदयाळजी होते.

 

^mरतीय जनसंघाचे संस्थापक कै. पं. दीनदयाळ उपाध्याय हे स्वतंत्र भारताच्या राजकीय जीवनातील एक अत्यंत वेगळे व्यक्तिमत्त्व होते. कुशल संघटक असलेले दीनदयाळजी तेवढेच थोर विचारवंत आणि तत्त्वचिंतक होते. संघटनकौशल्य व तत्त्वचिंतन ह्या दोन्ही वैशिष्टयांचा संगम त्यांच्या ठायी झाला होता. जनसंघाच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षांत जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. त्यानंतर पुढील 15 वर्षे दीनदयाळजींनी जनसंघ वाढवला. स्वत: दीनदयाळजींना कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. कोणत्याही प्रकारचे वलय त्यांना लाभलेले नव्हते. दीनदयाळजींचे चरित्र विलक्षण होते. पंडितजींचा जन्म 25 सप्टेंबर 1917 रोजी झाला आणि त्यांना अवघे 51 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या जीवनाकडे एक धावता दृष्टिक्षेप टाकला तरी असे लक्षात येते की, परिस्थितीशी सतत संघर्ष करण्यातच त्यांचे सारे आयुष्य गेले. पंडितजींचे वडील एक सामान्य शिक्षक होते आणि ते छत्रदेखील दीनदयाळजी अवघे अडीच वर्षांचे असताना काळाने हिरावून घेतले होते. पंडितजींच्या बालपणीच त्यांची आई, धाकटा भाऊ, आजी, मामेबहीण, मामी, मामा, इ. मायेची माणसे एकापाठोपाठ एक थोडया थोडया अंतराने मृत्युमुखी पडली. आईवडिलांच्या पश्चात ज्या मामांनी त्यांना ममत्वाने वाढवले, ते एक साधे स्टेशनमास्तर होते. रेल्वेतील नोकरीपायी त्यांना सारखे फिरतीवर राहावे लागे. त्यामुळे पंडितजींच्या शिक्षणाची आबाळ झाली. 1917 रोजी जन्मलेल्या दीनदयाळच्या शालेय शिक्षणाची सुरुवात करण्यास 1924 साल उजाडले; पण एवढी प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांचे शैक्षणिक यश मात्र नेत्रदीपक ठरत गेले. शिष्यवृत्तीच्या आधारावर त्यांनी एम.ए., एल.टी.पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले.

1952 साली जनसंघाच्या महामंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी दीनदयाळजींचा कोणत्याही प्रकारच्या राजकीय चळवळीशी संबंध आलेला नव्हता. कानपूरला बी.ए. करीत असताना 1937-38च्या सुमारास रा.स्व. संघाशी दीनदयाळजींचा प्रथम संबंध आला. पुढे डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी, भाऊराव देवरस यांच्या विचारांचा व जीवनाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. शिक्षण पूर्ण करत असतानाच, पंडितजींनी आपले जीवनाचे ध्येय निश्चित केले. संघकार्य हेच जीवनकार्य असे त्यांनी एकदा जे ठरवले, ते जीवनभर कायम ठेवले. हे संघटनेचे कार्य करण्यास आवश्यक ते गुण त्यांच्या ठिकाणी उपजतच होते. विनय, संयम, सेवाभाव, मृदू भाषा व कुशाग्र बुध्दी या त्यांच्या स्वभाववैशिष्टयांमुळे त्यांच्या संपर्कात एकदा आलेली व्यक्ती कायमची त्यांच्या मित्रमंडळींत गणली जाई. त्याचा लोकसंग्रह मोठा होता. 1942 साली शिक्षण आटोपताच दीनदयाळजी संघकार्यासाठी आजीवन प्रचारक म्हणून बाहेर पडले. उत्तर प्रदेशात भाऊराव देवरस यांच्याबरोबर सहप्रांत प्रचारक म्हणून संघकार्याचे मोठया प्रमाणात जाळे विणण्यात पंडितजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थिवर्ग, तरुण कार्यकर्ते, अन्य पक्ष संघटनांतील उच्चपदस्थ संघाकडे आकृष्ट होऊ लागले. 1948च्या संघबंदीच्या काळात काही दिवस भूमिगत राहून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्या वेळच्या सत्याग्रहातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संघबंदी उठल्यानंतर रा.स्व. संघांतर्गत सुरू झालेल्या विचारमंथनातही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्या विचारमंथनातूनच 'भारतीय जनसंघ' हा नवा राजकीय पक्ष जन्माला आला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाची स्थापना करण्यात पडद्यामागील सूत्रधाराची महत्त्वाची भूमिका दीनदयाळजींनी पार पाडली.

जनसंघाची स्थापना झाली, तेव्हा त्यांचे वय केवळ 37 वर्षांचे होते. जनसंघाच्या कामात जोडले गेलेले त्यांचे सर्व सहकारी जवळपास त्यांच्याच वयाचे आणि त्यांच्याचसारखे सर्वसामान्य होते. डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी हे एकमेव वलयांकित नेतृत्व जनसंघापाशी होते; पण 1954 साली त्यांचीच अकाली हत्या केली गेली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशाच्या राजकीय मंचावरील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. पं. नेहरूंबरोबर त्यांची तुलना केली जात असे. त्यांच्या निधनानंतर जनसंघाकडे तसे उत्तुंग, प्रभावी नेतृत्व नव्हते. रा.स्व. संघाची पार्श्वभूमी आणि राष्ट्रवादी विचारधारा ह्यामुळे त्या काळच्या समाजवादाच्या जादुई प्रभावाने भारलेल्या वातावरणात जनसंघ देशात राजकीयदृष्टया अस्पृश्य होता. जनसंघाला चिरडून टाकण्याची भाषा (I Shall crush Jansangh) देशाचे पंतप्रधान पं. नेहरू संसदेच्या व्यासपीठावर व बाहेरदेखील वारंवार वापरत असत. ह्या पार्श्वभूमीवर व अशा प्रतिकूल परिस्थितीत जनसंघ वाढवण्याची जबाबदारी दीनदयाळजींच्या खांद्यावर पडली होती; पण त्यांनी ती जबाबदारी एवढया समर्थपणे पार पाडली की, भारतीय राजकारणातील मोठी ताकद म्हणून अवघ्या दहा वर्षांत जनसंघ प्रस्थापित झाला. 1952 पासून 1967 पर्यंत झालेल्या लोकसभेच्या व विधानसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत जिंकलेल्या जागा आणि मिळवलेल्या मतांची टक्केवारी सतत वाढवीत नेणारा जनसंघ हा देशातील एकमेव पक्ष होता.

भारतीय राजकारणात जनसंघ प्रस्थापित करण्यात दीनदयाळजींनी जसे यश मिळवले, तसेच यश त्यांनी काँग्रेसची सत्तेवरील मक्तेदारी मोडून काढण्याच्या बाबतीतही मिळवले. 1967 साली अनेक प्रांतांमध्ये बिगरकाँग्रेसी, सं.वि.द. सरकारे सत्तेवर आली. बिगरकाँग्रेसी पक्षांच्या आघाडीचा तो पहिला आविष्कार होता. आपापले वैचारिक आग्रह बाजूला ठेवून वेगवेगळया पक्षांनी एकत्र येण्याचे जे प्रयोग भारतात सुरू झाले, त्यांच्यामागील एक सूत्रधार दीनदयाळजी होते. काँग्रेसविरोधी राजकारणाच्या मुद्दयावर  त्यांनी डॉ. राम मनोहर लोहियांसारख्यांना आपलेसे केले. डॉ. लोहिया यांच्याबरोबरची त्यांची मैत्री राजकारणाच्या पलीकडे गेलेली मैत्री होती.  समाजवादी कार्यकर्त्यांना उद्देशून डॉ. लोहिया एकदा म्हणाले होते, ''पं. दीनदयाळजी का एकात्म मानवतावाद हमारे विचारोंसे भी अधिक समाजवादी है।'' याच मैत्रीमधून डॉ. राम मनोहर लोहियांची साथ मिळवून त्यांनी आघाडयांचे राजकारण भारतात सुरू केले. एवढेच नव्हे, तर ते यशस्वी होऊ शकते हेही त्यांनी दाखवून दिले. आज भारतात एकपक्षीय राजवटीचे दिवस मागे पडले असून केवळ आघाडयांचे राजकारणच यशस्वी होऊ शकेल अशी स्थिती आली आहे. 11 फेब्रुवारी 1968 रोजी निर्घृण हत्या करून त्यांची जीवनयात्रा संपवली गेली नसती व दीनदयाळजींना दीर्घायुष्य लाभले असते, तर आज भारतातील राजकीय चित्र फार वेगळे दिसले असते.

काँग्रेसविरोधासाठी वैचारिक आग्रह बाजूला ठेवण्याचा आदर्श त्यांनी स्वत: घालून दिला होता. 1956 साली केरळमध्ये काँग्रेसचा पराभव करून कम्युनिस्ट सत्तेवर आले. दीनदयाळजींनी ह्या घटनेचे मोकळया मनाने स्वागत केले. ''काँग्रेसचा झालेला हा पराभव ज्यांची ह्या देशावर यत्किंचितही निष्ठा नाही, ज्यांचा लोकशाहीवर व घटनात्मक कार्यपध्दतीवर विश्वास नाही अशा पक्षाकडून झाला आहे. असे असले तरी आम्ही ह्या घटनेचे स्वागत करतो, कारण जनता काँग्रेसलाही थप्पड मारून दूर करू शकते, हे ह्या घटनेने सिध्द झाले आहे.'' (बडोदा येथील भाषण, दि.23-12-1956.) हे दीनदयाळजींचे उद्गार त्यांच्या राजकीय सहिष्णुतेचे द्योतक होते. काँग्रेसने आणि डाव्या मंडळींनी देशात निर्माण केलेल्या कमालीच्या असहिष्णू व राजकीय विद्वेषाच्या वातावरणाच्या तुलनेत दीनदयाळजींची उदारमनस्कता फार वेगळी आणि दुर्मीळ होती. ही उदार मानसिकता दीनदयाळजींनी अखेरपर्यंत जपली.

जनसंघाची उभारणी करताना दीनदयाळजींनी केवळ संघटनाच बांधली अशातला भाग नाही, तर जनसंघाच्या तत्त्वज्ञानाची मांडणीदेखील त्यांनी केली. दीनदयाळजींनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा विशेष हा होता की, ते पूर्णपणे भारतीय होते. त्या बाबतीत म. गांधींशी त्यांची जवळीक होती. म. गांधींनंतर एवढे विशुध्द भारतीय आर्थिक व राजकीय चिंतन मांडणारे दीनदयाळजी हे स्वतंत्र भारतातील एकमेव राजकीय नेते होते. डॉ. राम मनोहर लोहियादेखील भारतातील सामाजिक आर्थिक परिस्थितीला अनुरूप असे राजकीय चिंतन मांडत होते हे खरे असले, तरी त्यांची मूळ प्रेरणा, मूळ वैचारिक बैठक साम्यवाद-समाजवादाची होती. तरीदेखील भारतीयत्वाचा आधार असल्यामुळे दीनदयाळजी व डॉ. लोहिया एकत्र येऊ शकले. म. गांधी, डॉ. लोहिया व दीनदयाळजी ह्यांच्या राजकीय-आर्थिक विचारांचा तौलनिक अभ्यास आजच्या काळात अत्यावश्यक आहे, कारण 'ग्रामीण भारत' हा ह्या तिघांच्याही चिंतनाचा व चिंतेचा विषय होता. खेडयापाडयातून पसरलेला भारत संपन्न, समृध्द व्हावा, हा त्यांचा ध्यास होता. ग़्रामीण भारत व ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, ती बळकट झाल्याशिवाय भारताचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही, हे त्यांनी ओळखलेले होते. म्हणून म. गांधी, डॉ. लोहिया आणि दीनदयाळजी हे तिघेही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करीत होते. दीनदयाळजींनी मांडलेला एकात्म मानववाद म्हणजे म. गांधींनी भारताच्या आर्थिक समस्यांबद्दल मांडलेल्या वैचारिक सूत्रांचा अधिक व्यापक विस्तार होता, असे म्हटले तरी त्यात काही फारसे वावगे ठरणार नाही.

आजच्या जागतिकीकरणाच्या आणि खासगीकरणाच्या वावटळीत ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडू लागली आहे. खेडयापाडयातून पसरलेल्या, शेतीवर अवलंबून असलेल्या भारतासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी निखळ भारतीय अर्थचिंतनच आपल्यासमोरील समस्यांना  व्यावहारिक उत्तर देऊ शकते.

प्रेरक वैशिष्टये

दीनदयाळजींबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे. अल्पायुष्यात त्यांनी उभ्या केलेल्या कार्याचा व्याप थक्क करणारा आहे. सामान्यातून साकार झालेले हे स्वयंभू असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. दीनदुबळयांविषयी कळवळा हा त्यांच्या नावातच नव्हे, तर त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात एक अत्यंत जिव्हाळयाचा विषय होता. तो काही मतपेटीवर लक्ष ठेवून टाळया मिळविण्यास उपयुक्त असा मुद्दा ते मानीत नसत. 1967 साली कालिकत येथील आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, ''जिनके पास न रोजी-रोटी है, उन्हे न रहने के लिए मकान है, न तन ढकने के लिए कपड़ा है, जो अपने मैले कुचैने बच्चों के साथ दम तोड़ रहे हैं, गांवों और शहरों के उन करोड़ों निराश भाई-बहिनों को सुखी और संपन्न बनाना हमारा व्रत है।'' ही त्यांची जीवननिष्ठा होती.

भारतीय अर्थनीतीविषयी ते म्हणतात, ''अर्थ का अभाव और प्रभाव, दोनों घातक तत्त्व है।'' अर्थसंकल्प, आपली घटना, लोकशाही, तिबेट, काश्मीर, अखंड भारत, स्वदेशी, राष्ट्रभाषा, शिक्षण, इ. विषयांवर आपली भूमिका त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली.

समग्र चिंतन

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे थोर विचारवंत होते. त्यांचे विचारविश्व विशाल होते आणि अभ्यास व व्यासंग अफाट होता. ते विविध विषयांवर सहजपणे अभ्यासपूर्ण विवेचन करीत. समाजकारण, राजकारण, अर्थकारण असे अनेक विषय त्यांनी यशस्वीपणे हाताळले. राष्ट्रधर्म प्रकाशनाच्या माध्यमातून 'राष्ट्रधर्म', 'पांचजन्य', 'दैनिक स्वदेश', 'ऑर्गनायझर' या नियतकालिकांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले. 'जगद्गुरू शंकराचार्य',  'आर्य चाणक्य', 'भारतीय अर्थकारणाची दिशा' ही त्यांची पुस्तके त्यांच्या विचारांची विशालता, प्रगल्भता दाखवणारी आहेत.

अनेक वर्षांच्या सखोल चिंतनातून साकार झालेले त्यांचे एकात्म मानव दर्शन हे भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित व येथील वास्तवाचा सखोल अभ्यास करून मांडलेले अस्सल भारतीय चिंतन होते. 1965 साली प्रथम ग्वाल्हेर, नंतर विजयवाडा, मुंबई, पुणे येथे त्यांनी व्याख्यांनातून आपले याविषयीचे विचार मांडले. मानवी जीवनाचा विचार एकात्मिक करावा लागेल. तो तुकडयातुकडयांत करता येणार नाही हे त्यांचे मुख्य सूत्र आहे. व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्ठी या चतु:सूत्रीविषयी समग्र विचार या सिध्दान्तात अभिप्रेत आहे. अंगांगीभाव, परस्परावलंबन, परस्परपूरकता, संघर्ष नव्हे तर समन्वय, परस्परांबद्दल विद्वेष नव्हे तर प्रेमभाव, शोषण नव्हे तर दोहन, संयमित उपभोगाचा सिध्दान्त ही या विचारदर्शनाची प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे सांगता येतील. व्यक्तीप्रमाणेच राष्ट्रदेखील सचेतन आहे, मानवी शरीरात प्राण, आत्मा यांचे जे महत्त्व तेच राष्ट्रासाठी चिती व विराट यांचे आहे, असे दीनदयाळजींनी स्पष्ट सांगितले. असे हे एकात्म मानव दर्शन हे मानवी वर्गा-वर्गांतला, वंशा-वंशांतला, मानव व मानवेतर सृष्टीचा परस्परसंबंध दाखवणारा, सुखी, समृध्द जीवनाचा मूलाधार आहे. दीनदयाळजी सनातन भारतीय  संस्कृतीचे अभिमानी असले, तरी नवीन गोष्टी स्वीकारण्यास त्यांचा विरोध नव्हता. नवीन बदल आपल्या मूलभूत संस्कृतीला अनुरूप असले पाहिजेत, एवढेच त्यांचे म्हणणे होते. आज आपण राजकीय-आर्थिक-सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध संघर्षांना तोंड देत आहोत. गेली 65-70 वर्षे जे संघर्षाचे तत्त्वज्ञान देशात रुजवले गेले, त्याचे ते अपरिहार्य परिणाम आहेत. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आणण्यासाठी आज दीनदयाळजींच्या विचारांचा मागोवा घेणे आवश्यक आहे.