संघाचे हिंदुत्त्व: एक आव्हान?

 


 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आजमितीला एक प्रचंड बलशाली सामाजिक-सांस्कृतिक संघटना आहे. संपूर्ण जगात संघासारखी विशाल, बहुआयामी दुसरी कोणतीच संघटना नाही. त्यामुळे या संघटनेविषयी सर्वत्र कुतूहल, जिज्ञासा आणि क्वचित भीतीची भावना दिसून येते. संघाचे काम खुल्या मैदानात शाखेच्या स्वरुपात, किंवा विविधांगी सेवाकार्याच्या माध्यमातून चालते. तरी पण संघावर गुप्तपणे काम करण्याचा आरोप विरोधक करीतच असतात.

संघाची स्थापना १९२५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. देश स्वतंत्र करण्याचे स्वप्न त्यांनी बालवयातच जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकारले होते. त्यासाठी “इंग्रजांच्या पायातील बुटाला polish करण्यापासून तो त्याच बुटाने त्यांचे डोके सणकून काढण्यापर्यंत सर्व मार्गांचा” अवलंब करण्याची त्यांची तयारी होती. म्हणून ते सुरवातीच्या काळात क्रांतीकार्याकडे आकर्षित झाले होते. बंगालमध्ये काम करणाऱ्या अनुशीलन समितीच्या अगदी आतल्या गोटात त्यांनी प्रवेश मिळविला होता आणि कलकत्त्याहून वैद्यकीय पदवी प्राप्त करून आल्यावर नागपूर-मध्यप्रांत भागात क्रांतीकार्याचे जाळे विणण्याचे काम त्यांनी केले होते.

पुढे लोकमान्य टिळकांच्या नेतृत्त्वात ते कॉंग्रेस पक्षात सक्रीय झाले. महात्मा गांधींच्या कॉंग्रेसमध्ये ते मध्य भारतातील अग्रणी काँग्रेसी नेत्यांमध्ये गणले जात. १९२१ च्या असहकार आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यासाठी तुरुंगवास देखील स्वीकारला होता. तसेच संघस्थापनेनंतर १९३१ साली जंगल सत्याग्रहात हेडगेवार सामील झाले होते आणि त्यावेळीही अकोला येथे तुरुंगवास भोगला होता.

संघाची स्थापना:

देशाची त्यावेळची परिस्थिती मोठी विचित्र होती. हिंदू समाज, जो या देशाचा कणा मानल्या जात होता, जाती, भाषा, प्रांत इत्यादी भेदांनी विभागला गेला होता आणि त्यामुळे असंघटीत होता. सततच्या गुलामीमुळे एक पराभूत मानसिकता समाजात निर्माण झाली होती. हिंदुस्थानसारख्या प्राचीन आणि अति विशाल देशावर मुठभर इंग्रजांनी राज्य करावे याचे कारण डॉ हेडगेवार यांनी शोधून काढले. त्यांच्या मते ‘संघटीत नसलेला आणि रक्तात विविध दुर्गुण शिरलेला दुर्बल हिंदू समाज’ हाच या अवनतीचे मूळ कारण होता. या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढायचे असेल तर राष्ट्रीय स्वाभिमानाची वृत्ती आणि समाजाबद्दलची आत्मीयता निर्माण करणे हाच एक उपाय असू शकतो असे त्यांचे मत झाले आणि हे करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला.

डॉ हेडगेवार नेहमी म्हणत कि हिंदू समाजात राष्ट्रीयत्वाची, सामाईक नागरी शिस्तीची (Common Civic, National Character) भावनाच नाही. प्रत्येकाची वृत्ती स्वतःपुरती पाहणारी आहे. या संकुचित, आत्मघातकी मानसिकतेतून हिंदू समाजाला बाहेर काढून सामर्थ्यसंपन्न, राष्ट्रभक्तीने रसरसलेला, देशभक्तीने भरलेला आणि  समाजाबद्दल आत्मीयता, कणव आणि स्नेहभावनेने ओतप्रोत असा समाज घडविण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

हिंदू समाजात सामाईक नागरी कर्तव्यांची आणि राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणे हा संघाचा उद्देश होता. त्याच्या पूर्ततेसाठी ब्रिटीश लष्करी तंत्राचा वापर करण्यात आला. इंग्रजांचे सैन्य आणि त्यांची शिस्त यांचा डॉ हेडगेवार यांचेवर बराच प्रभाव होता. इंग्रजांकडे शिस्त, धैर्य आणि सामर्थ्य हे गुण असल्याने भारतासह जगाच्या बऱ्याच मोठ्या भूप्रदेशावर त्यांचे साम्राज्य होते. शिस्तबद्धतेसोबत सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव असणे हे इंग्रजांचे वैशिष्ट्य होते. असे राष्ट्रीय गुण निर्माण करण्याची कोणतीच व्यवस्था त्यावेळी हिंदू समाजात नव्हती. त्यामुळे डॉ हेडगेवार यांनी ब्रिटीशांची ही व्यवस्था स्वीकारून त्यात आवश्यक ते फेरबदल करून संघाचे मॉडेल तयार केले. या दैनंदिन शाखा तंत्राने हिंदू समाजाला सामर्थ्यवान आणि संघटीत करता येईल असा त्यांचा विश्वास होता. पण हे संघटन आक्रमण करण्यासाठी किंवा हिंदुत्वाचा धार्मिक (म्हणजे कर्मकांडी किंवा ब्राह्मणी) पक्ष बळकट करण्यासाठी निश्चितच नव्हते. देशाचा इतिहास, परंपरा, समाज, याबद्दल अभिमान निर्माण व्हावा आणि लोकांत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी संघाची स्थापना करण्यात आली.

संघ हा संप्रदाय नाही:

संघसंस्थापकाच्या मनात संघाच्या माध्यमातून हिंदुत्वावर आधारित एक संप्रदाय सुरु करावा अशी कल्पना मुळीच नव्हती. ते पुढारलेल्या विचाराचे होते. उच्च-नीचता, अस्पृश्यता अशा हिंदू समाजातील दोषांना संघात अजीबत स्थान नव्हते. खुद्द महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अस्पृश्यता निवारणाच्या कामात संघाने मिळविलेल्या यशाचे अप्रूप वाटले होते. डॉ हेडगेवार यांची राजकीय विचारधारा देखील धर्माधिष्ठित राज्याच्या (Theocratic State) विरोधात होती. भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास यावे आणि जगातील अन्य राष्ट्रांना भांडवलशाहीच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी भारताने मदत करावी असा प्रस्ताव त्यांनी १९२० च्या नागपूर कॉंग्रेस अधिवेशनात मांडला होता.

संघकार्याची जी पद्धत आणि तंत्र डॉ हेडगेवार यांनी निर्माण केले ते हिंदू धर्मातील कोणत्याही पंथासारखे नव्हते. कारण त्यांना ‘संघ म्हणजे हिंदू धर्मातील एक पंथ’ अशी प्रतिमा होऊ नये असे वाटत होते. त्यामुळे हिंदू धर्माच्या सर्व पंथातील तसेच गैर हिंदू पंथातील लोकांना संघात सामावून घेणे सहज शक्य झाले. ‘सर्वाना जोडणारा, संघटीत करणारा’ अशी संघाची प्रतिमा निर्माण झाली. हे संघाने धर्माच्या नावाखाली केले नाही हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.

संघ आज एक प्रचंड बलशाली संघटना झाली आहे. अर्ध्या लक्षाहून अधिक शाखांचे जाळे, कोट्यावधी स्वयंसेवक, दीड लाखापेक्षा जास्त सेवा कार्ये आणि त्यात गुंतलेले सामाजिक कार्यकर्ते, भारताबाहेरही ८० देशात संपर्काचे जाळे, ४० देशात प्रत्यक्ष काम असा संघाचा मोठा पसारा आहे. संघाची ही शक्ती कशा प्रकारचे परिवर्तन घडवून आणू शकते याचा प्रत्यय भारताने आणि जगाने २०१४ च्या लोकसभा आणि काही राज्यांच्या निवडणुकात घेतला आहे. या राजकीय परिवर्तनामुळे संघाचे राजकीय विरोधक अधिक भयभीत झाले असून त्यांनी “संघाला भारताचे ‘हिंदुराष्ट्र’ करावयाचे आहे; संघ मुस्लीम, ख्रिश्चन, वगैरे धार्मिक समुदायांच्या विरोधात आहे; विवेकानंद, आंबेडकर यासारख्या महापुरुषांना संघाने hijack केले आहे” असा भ्रामक प्रचार चालविला आहे. त्यांतून संघाचे हिंदुत्व हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काय सत्य आहे? खरेच का संघाला धर्मावर आधारलेले हिंदूराष्ट्र अपेक्षित आहे? मुसलमान आणि ख्रिश्चन पंथातील लोकांना दुय्यम दर्जाचे नागरिक करावयाचे आहे?

हिंदुत्व समाजाला जोडणारा दुवा:

संघाची हिंदुराष्ट्राची संकल्पना ही धर्मावर आधारित नाही हे डॉ हेडगेवार यांनी प्रारंभीच्या काळात स्पष्ट केले आहे. त्यांच्या संकल्पनेत हिंदुत्व हा भारताच्या सर्व पंथीय लोकांना एकत्र आणणारा दुवा आहे. ती एक समाजाची धारणा करणारी व्यवस्था आहे. या देशातील लोकांची ती राष्ट्रीय ओळख आहे. जसे इंग्लंड हा इंग्रजांचा, फ्रांस फ्रेंचांचा, जर्मनी जर्मनांचा, तसे हिंदुस्थान हा हिंदूंचा असे त्यांचे प्रखर मत होते. ‘जोपर्यंत भारतात एक जरी हिंदू आहे तोपर्यंत भारत हिंदुराष्ट्र राहील’ असे निःसंदिग्ध मत त्यांनी अनेकदा नोंदविले आहे. त्याकाळी समाजात हिंदू म्हणवून घेणे कमीपणाचे मानले जात होते. ‘मला काहीही म्हणा पण हिंदू म्हणू नका’ तसेच ‘एक वेळ बेडकांना तराजूत तोलणे सोपे होईल पण चार हिंदुना एकत्र आणणे कठीण आहे’ किंवा ‘चार हिंदू तेव्हाच एकत्र येतात जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो’ अशी सामाजिक मानसिकता होती. या पराभूत मानसिकतेतून त्यांनी हिंदू समाजाला बाहेर काढले आणि हिंदू असण्याचा स्वाभिमान निर्माण केला. कोणताही धार्मिक, पांथिक किंवा सांप्रदायिक आधार त्यांनी यासाठी वापरला नाही.

हे खरे आहे की ‘हिंदू’ या शब्दाची समर्पक व्याख्या आजपर्यंत कोणी केली नाही. डॉ हेडगेवार देखील त्या फंदात पडले नाहीत. बाळासाहेब देवरस म्हणत तसे ऐतिहासिक आणि सामाजिक प्रवाहात जे शब्द रूढ होतात त्यांची व्याख्या करणे कठीण असते कारण त्यात अव्याप्ती आणि अतिव्याप्तीचा दोष येण्याची शक्यता असते. पण त्यामुळेच हिंदू ही संकल्पना वैध नाही आणि म्हणून या देशातील लोकाना सरसकट हिंदू म्हणून संबोधता येणार नाही असे विधान संघाचे विरोधक करीत असतात. याचा अर्थ हिंदू अस्तित्त्वातच नाही हे म्हणणे सत्याचा विपर्यास करणे होईल. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ आंबेडकर यांनी कायदामंत्री असतांना ‘हिंदू कोड बिल’ आणले. मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी वगळता सर्व हिंदू समाजाला ज्यात शीख, बौद्ध, जैन, यांचाही समावेश होतो त्या सर्वांना हा कायदा लागू होतो. या देशात हिंदू समाजच नसता तर हिंदू कोड बिल कसे बनले असते? हिंदू अस्तित्त्वात आहे याचा हा कायदेशीर पुरावा आहे. सावरकरांनी देखील त्यांच्या अनेक लेखातून हिंदूंच्या अस्तित्वाचे प्रमाण दिले आहे.

हिंदू एक प्राचीन संकल्पना:

वास्तविक हिंदू ही संकल्पना जगातील सर्वात प्राचीन आहे. ‘उत्तरेला हिमालयाच्या पर्वतरांगा आणि दक्षिणेला महासागरचा किनारा याच्यामध्ये जो विस्तीर्ण भूप्रदेश पसरला आहे तो हिंदुस्थान या नावाने ओळखल्या जात असे आणि तेथे राहणारा समाज हा हिंदू समाज म्हणून मान्यता पावलेला होता’ (उत्तरं यत समुद्रश्च हिमाद्रे श्चैव दक्षिणं// तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते//) असे उल्लेख आढळतात. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर हिमालयाचा विस्तार इराणपासून इंडोनेशियापर्यंत आहे. आज राजकीयदृष्ट्या या भूप्रदेशात अनेक देश आहेत. त्या देशांची ‘दैशिक ओळख’ (Territorial Identity) वेगवेगळी आहे. पण या सर्व देशात राहणाऱ्या समाजाची भावनिक तसेच सांस्कृतिक ओळख (Emotional and Cultural Identity) ही हिंदू आहे. हे सिद्ध करणारे अनेक पुरावे आज आढळतात. तेव्हा आज जो भारत या नावाने ओळखल्या जाणारा देश आहे त्याची ‘दैशिक ओळख’ भारतीय असली तरी भावनिक आणि सांस्कृतिक अस्मिता ही हिंदूच आहे. एकाच मातृभूमीचे पुत्र या नात्याने आम्ही सर्व हिंदू बंधू आहोत ही भावना डॉ हेडगेवार यांनी समाजात रुजविली. त्यांनी पहिले तत्व संघासाठी असे घालून दिले की, सर्वांनी आपापल्या लहान जाणीवा, अभिमान, हे सर्व ‘हिंदू’ या एका मोठ्या जाणीवेत विलीन करून टाकावेत म्हणजे एकसंध, सामर्थ्यवान, संघटीत आणि एकजूट समाज उभा करणे शक्य होईल.

हे संघाचे मूळ हिंदुत्व आहे. त्यात कुठेही धार्मिक उन्माद नाही. धार्मिक (कर्मकांडी) आधार नाही. जो आहे तो विशुद्ध राष्ट्रीय आणि सांस्कृतिक आधार आहे. संघाचे हिंदुत्व हे समाजाची धारणा करणारे एक सामाजिक-सांस्कृतिक-भावनिक अधिष्ठान असलेले तत्व आहे. यात कुठेही धर्माधिष्ठित राज्य स्थापनेचा विचार नाही. तसेच मुस्लीम किंवा ख्रिश्चन यांचा विरोधही नाही. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील हे मान्य केले आहे की, हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे, धर्म (उपासना पंथ या अर्थाने) नाही. माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन देखील म्हणत की, हिंदू हे सर्व उपासना पंथाचे Commonwealth आहे. संघाचे म्हणणे देखील असेच आहे. म्हणून आज संघाचे हे हिंदुत्व भारतातील सर्व समाज घटकांना मान्य झालेले दिसून येत आहे. दलित, वनवासी, ग्रामवासी, नगरवासी, सर्व जाती-संप्रदायांचे, उपासना पंथाचे, इतकेच काय पण काही प्रमाणात मुस्लीम, आणि ख्रिश्चन लोक ही संघाच्या वर्तुळात येऊन स्वतःला हिंदू म्हणून घेत आहेत.

आणि संघ विरोधक सेकुलर राजकीय पक्षांची नेमकी हीच डोकेदुखी आहे!

हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र:

संघाने हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र या तीनही संकल्पना एकत्रितपणे मांडल्या. संघाचे विरोधक, मुख्यतः कम्युनिस्ट आणि काँग्रेस आणि त्यांचे सेकुलर मित्र, नेमक्या याच संकल्पनांना आक्षेप घेतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, हिंदू राष्ट्र ही कल्पनाच मुळी आधारहीन आहे, भ्रामक आहे आणि त्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. हिंदू राष्ट्र म्हणून कोणतेही राज्य राजकीयदृष्ट्या पूर्वी अस्तित्वात होते याचा पुरावा नाही. या देशात अनेक राज्ये होती आणि त्या राज्यामध्ये परस्पर वर्चस्वासाठी युद्धे होत असत. त्यामुळे हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र या संकल्पना आधारहीन आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस नेहमी म्हणायचे की, या विचारांच्या मुळाशी वैचारिक मतभेद आहेत. भारतात किंवा जे देश गुलामीत होते त्या सर्व देशात राज्य करणारे लोक आपल्यापेक्षा सरस आहेत, श्रेष्ठ आहेत त्यांच्याकडून आपण राज्यशास्त्र शिकलो, शासनतंत्र शिकलो, त्यांनी आपल्या देशाचे एक राजकीय अस्तित्व निर्माण केले असे मानणारा मोठा वर्ग आहे. या विचारसरणीच्या प्रभावामुळे १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री आकाशात चढणाऱ्या तिरंग्यासोबत पंडित नेहरू म्हणाले होते की, ‘आज आम्ही नियतीसोबत एक करार केला आहे’. (Tryst with destiny). आज एक नवीन राष्ट्र उदयास आले आहे. हे राष्ट्र आम्हाला घडवायचे आहे. We are a nation in the making.

साम्यवादी तर भारत हे एक राष्ट्र आहे हे मानण्यास तयारच नव्हते. त्यांच्या मते रशियाप्रमाणे भारतातही  अनेक राष्ट्रके आणि उप-राष्ट्रके (Nationalities and sub-nationalities) आहेत. त्या सर्वांना स्वतंत्र होण्याचा अधिकार आहे. या विचारातूनच भारताच्या फाळणीला साम्यवाद्यांनी समर्थन दिले होते. पण ते हे विसरले की, रशियात या सर्व वेगवेगळ्या राष्ट्रकांना एकत्र बांधून ठेवू शकेल असे समान सांस्कृतिक अधिष्ठान नव्हते. त्यामुळे काही वर्षातच रशियाचे विघटन झाले. भारतात असा सामाईक धागा आहे कारण भारत हे सांस्कृतिक दृष्ट्या एक राष्ट्र आहे.

संघ असे मानतो की, भारत हे प्राचीन काळापासून म्हणजे किमान महाभारत काळापासून सांस्कृतिकदृष्ट्या एक राष्ट्र आहे. या देशातील समाजात एक सांस्कृतिक ऐक्य आहे. आद्य शंकराचार्यासारख्या व्यक्तीने ८०० वर्षापूर्वी या समाजाची सांस्कृतिक ओळख पुन्हा प्रस्थापित केली. समान परंपरा, कल्पना, तत्वे, तत्वज्ञान यामुळे हा देश एकसंध राहिला, अनेक आक्रमणांची संकटे सोसली आणि या समाजाला संपविण्याचे सर्व प्रयत्न निष्प्रभ केले. तो आधार हिंदुत्वाचा होता असे संघाचे म्हणणे आहे. देशाचे भौगोलिक ऐक्य लक्षात घेत आद्य शंकराचार्यांनी चार दिशांना चार प्रमुख मठ स्थापन केले ते आजही अस्तित्वात आहेत.

संघ विरोधक संघाचे हिंदुत्व हे संकुचित आहे, संकीर्ण आहे आणि सांप्रदायिक आहे असे आरोप करीत असतात. हिंदू समाजात गेल्या शे-दोनशे वर्षात अनेक समाजसुधारक होऊन गेलेत. त्यांनी समाज जीवनाचे सखोल अध्ययन करून त्यात शिरलेले दोष दूर करीत समाजाला गुणसंपन्न करण्याचा प्रयत्न केला. तो कोणता समाज होता? कोणाला अस्पृश्यता दिसली तर कुणाला वर्ण आणि जातीभेद दिसले. त्या सर्वांनी हे दोष दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ज्या समाजासाठी केला तो हिंदू समाजच होता हे देखील तितकेच खरे आहे.

या देशाचे तत्वज्ञान देखील हिंदूच आहे. विदेशातून जर कोणी अभ्यासक येथे आले तर ते कोणत्या ग्रंथांचा अभ्यास करतील? वेद, उपनिषद, गीता, महाभारत, रामायण, बौद्ध, जैन, शीख ग्रंथाचाच अभ्यास करतील. त्यांना जर कुराणाचा अभ्यास करावयाचा असेल तर ते सौदी अरब मध्ये जातील. त्यामुळे बाळासाहेब देवरस म्हणत तसे हिंदुस्थान आणि हिंदू हे एकात्म आहे त्यांना वेगळे करणे शक्य नाही, सोपे देखील नाही. तेव्हा हिंदू समाजाचा विचार करणे हे संकुचित आहे, सांप्रदायिक आहे हे म्हणणे चूक आहे.

हिंदू सर्वात सहिष्णू:

सध्या देशात सहिष्णुता-असहिष्णुता या मुद्द्यावर वाद-विवाद सुरु आहे. संघाच्या तत्त्वज्ञांनामुळे देशात  असहिष्णुता वाढीस लागली आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गैर हिंदू समाजाप्रती असहिष्णुता वाढीस लागली आहे असे बेछूट आरोप राजकीय विरोधक, सेकुलर पत्रकार आणि बुद्धीजीवी करतात. अनेकांनी याचा निषेध म्हणून त्यांना मिळालेले पुरस्कार देखील परत केले.

पण वास्तविकता काय आहे?

सुप्रसिद्ध ख्रिश्चन धर्मगुरू बिली ग्राहम म्हणतात कि, जगात सर्वात सहिष्णू समाज कोणता असेल तर तो हिंदु समाज आहे. (Hindus are the most tolerant people in the world). पण हे देखील संपूर्ण सत्य नाही. सहिष्णुतेला एक मर्यादा असते. (Tolerance is good but not good enough). सहिष्णू व्यक्ती हे मानतो की, सर्वांना आपापल्या मतानुसार जगण्याचा अधिकार आहे पण त्याचे हे देखील मत असते की, त्याचा विचार हा जगात इतरांपेक्षा सर्वात श्रेष्ठ आहे. ही सहिष्णुतेची मर्यादा आहे. कार्डीनल ग्रेशस एकदा म्हणाले होते कि, “मी जगात सहिष्णुता असली पाहिजे हे तर सांगेन पण हे सर्व धर्म समान आहेत आणि कोणत्याही धर्माचे पालन केले तर मोक्ष मिळू शकतो हे मात्र सांगणार नाही कारण माझ्यावर ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराची जबाबदारी आहे. तेव्हा सर्व धर्म समान आहेत हे मी कसे म्हणणार?” ही सहिष्णुतेची मर्यादा आहे. याउलट हिंदूंचे म्हणणे आहे “एकं सत विप्राः बहुधा वदन्ति” म्हणजे ‘सत्य एक आहे विद्वान लोक अनेक प्रकाराने त्याची व्याख्या करतात’. ही विचारसरणी ज्यांची आहे त्या हिंदुना ते असहिष्णू आहेत असे म्हणणे, त्या हिंदू समाजाला संघटीत करण्याच्या प्रयत्नाला संकुचित म्हणणे, त्याचा विरोध करणे अत्यंत अपमानजनक आणि अन्यायपूर्ण आहे.

हिंदू शब्द उपासना-पद्धती वाचक नाही:

संघाचे हे मत सुरवातीपासूनच राहिले आहे कि हिंदू शब्द उपासना-पद्धती वाचक नाही. डॉ हेडगेवार यांनी जरी पारंपारिक अर्थाने जो हिंदू समाज आहे त्याला संघटीत करण्यासाठी संघाची स्थापना केली असली तरी त्यांना याची जाणीव होती की, या देशात कोट्यावधी मुसलमान आणि लाखो ख्रिश्चन राहतात. ते सर्व या देशाच्या सामाजिक जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. इतिहासाच्या कोणत्या तरी वळणावर त्यांच्या हिंदू पूर्वजांनी काही कारणांनी उपासना पद्धती बदलली असेल. पण त्यामुळे त्यांचे पूर्वज, संस्कृती परंपरा बदलत नाही. त्यानाही राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. तेव्हा हिंदू शब्दाचा उपयोग करताना त्यांच्या मनात उपासना पद्धती नव्हती तर सांस्कृतिक आणि राष्ट्रीय दृष्टीने त्यांनी या शब्दाचा वापर केला. म्हणून संघाच्या नावात ‘हिंदू’ नाही तर ‘राष्ट्रीय’ शब्द आहे. संघाचे हिंदुत्व तत्वज्ञान डॉ हेडगेवार यांनी सूत्ररूपाने मांडले. ते विकसित करण्याचा त्यांना वेळच मिळाला नाही. पण त्यांच्यानंतर सरसंघचालक झालेले श्री गोळवलकर गुरुजी यांनी त्याची अत्यंत विस्ताराने व्याख्या केली, त्याकाळच्या परिस्थितीला अनुसरून त्या भाषेत ते तत्वज्ञान मांडले. त्यांच्या काळात या तत्वज्ञानाच्या मजबूत पायावर संघकार्याची इमारत पुढे उभी राहू शकली.

संघाचे काम जसे वाढत गेले तसे राजकीय क्षेत्रात त्याचा विरोधही वाढत गेला. पंडित नेहरूसारख्या प्रगतीशील, स्वतंत्र विचारांच्या आधुनिक राजकारणी नेत्यानेही संघ विरोधाने आंधळे होत संघावर बंदी घालून संघाला संपविण्याचा प्रयत्न केला. यासाठी महात्मा गांधींसारख्या महान नेत्याच्या दुर्दैवी हत्येचा त्यांनी उपयोग करून घेतला. हजारो स्वयंसेवक तुरुंगात डांबले. पण संघ संपला नाही. वाढत राहिला. पुढे नेहरूकन्या इंदिरा गांधीनी देखील आणीबाणीच्या काळात संघाला समाप्त करण्याचा घाट घातला. त्या संकटातूनही संघ वाचला, तावून-सुलाखून बाहेर पडला आणि नव्या जोमाने फोफावला. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळातही संघावर बंदी घालण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कॉंग्रेस सरकारने करून पाहीला पण त्यातही ते अपयशी ठरले.

हिंदुत्वावर आघात करण्याचे कारस्थान:

संघाला physically संपविणे शक्य नाही हे ध्यानात आल्याबरोबर या संघ विरोधकांनी संघाचे जे बलस्थान आहे त्या हिंदुत्व विचारावर आघात करण्याचे धोरण अवलंबिले असे नंतरच्या काळात दिसून येते. संघाचे कार्य वाढत होते, काही राज्यात संघ स्वयंसेवक सत्तेत होते आणि उत्तम प्रकारे शासन करीत होते. २००२ च्या गुजरात दंग्यानंतर हे आघात अधिक तीव्र होऊ लागलेत. मिडीयाचा जसा विस्तार झाला तसा या हल्ल्याची तीव्रता वाढली. कॉंग्रेस, साम्यवादी, बुद्धिवादी, सेक्यूलर पत्रकार हे सर्व या हिंदुत्वावर तुटून पडले. विदुरनीतीचे एक तत्व आहे. त्या तत्वानुसार एखादे राष्ट्र नष्ट करावयाचे असेल तर त्या समाजात वैचारिक गोंधळ (Ideological Confusion) निर्माण करणे हे सोयीचे असते. एकदा का हे वैचारिक अधिष्ठान हलले तर तो समाज पतनाच्या दिशेने अग्रेसर होतो आणि त्याला कोणीही वाचवू शकत नाही असे हे तत्व सांगते. संघ विरोधकांनी या तत्वाचा हिंदुत्वाच्या संदर्भात वैचारिक गोंधळ पसरविण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात बहुमताने सत्त्तारूढ झाल्यानंतर हे हल्ले अधिकच तीव्र झाले आहेत. हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांकडून, भाजपच्या नेत्यांकडून आणि काही धार्मिक नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या वक्तव्यांचा उपयोग करून, संदर्भ न देता ही वक्तव्ये वापरून असा गोंधळ पसरविण्याचे काम हे संघविरोधी गट करीत आहेत. गेल्या काही दशकात कॉंग्रेसचे शासन राहिले आहे. त्यांनी मिडीयाच्या आणि साम्यवादी आणि डाव्या बुद्धीजीवी लोकांच्या मदतीने संघाच्या हिंदुत्वाला इस्लाम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध अशा सांप्रदायिक बंधनात जखडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो बव्हंशी यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. हिंदू किंवा भगवा दहशतवाद हे असेच एक हत्यार आहे ज्याचा उपयोग या लोकांनी हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी आणि पर्यायाने संघाला समाजमनातून उखडून टाकण्यासाठी केला आहे. त्यामुळे त्या संकल्पनेचा संकोच झाला आणि त्याचा मूळ भू-सांस्कृतिक परिचय धूसर होत गेला.

हिंदुत्वाचा संकोच:

हिंदुत्वाच्या मूळ संकल्पनेचा असा संकोच झाल्यामुळे आज संघ जेव्हा हिंदू राष्ट्र, हिंदुत्व किंवा हिंदू संघटन अशा भाषेत बोलतो त्यावेळी त्याचे प्रतिपादन वेगळ्या प्रकाराने केले जाते. ‘मुसलमानांचे काय?’ ‘ख्रिश्चनांचे काय होणार?’ ‘दलितांचे भवितव्य काय?’ मुस्लीम, ख्रिश्चन याना दुय्यम नागरिकाचा दर्जा मिळेल का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. त्यासाठी श्रीगुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉटस’ या पुस्तकातून संदर्भ सोडून उद्धरणे घेतली जातात आणि समर्थन केले जाते. हिंदुत्वाला या संकुचित धारणेतून बाहेर काढून या देशातील सर्वांची ती राष्ट्रीय ओळख म्हणून प्रस्थापित करणे हे संघासमोर आज एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

संघाचे काम समाजाच्या सर्वच घटकात वाढते आहे. संघाचे हिंदुत्व सर्व समाज घटकांना स्वीकार्य होत आहे. अशा वेळी या प्रश्नांमुळे त्यात अडथळे निर्माण होऊ शकतात याची जाणीव संघनेतृत्वाला नसेलच असे म्हणता येणार नाही. संघातही बऱ्याच पूर्वीपासून हिंदू ऐवजी भारतीय शब्दाचा प्रयोग करावा काय असा एक विचारप्रवाह होता. श्रीगुरुजींच्या ठाण्याच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होऊन त्यात ‘हिंदू’ चाच आग्रह धरावा असे ठरविण्यात आले होते. श्री बाळासाहेब देवरस यांच्या काळात देखील यावर पुन्हा एकदा चर्चा झाली होती. संघाचे म्हणणे असे आहे की, हिंदुत्व हे हजारो वर्षांच्या परंपरेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ते सोडून देणे म्हणजे आपले मूळ नाकारण्यासारखे आहे. भौगोलिक सीमांच्या पलीकडे हिंदुत्वाचा विचार आहे. भौगोलिक सीमा बदलत असतात. १९४७ पूर्वी पाकिस्तान नव्हता तेव्हा सर्वांचीच ओळख भारतीय किंवा हिंदू अशीच होती. १९७१ पूर्वी बांगलादेश नव्हता तेव्हा त्या प्रदेशातील लोकांची ओळख पाकिस्तानी होती. तेव्हा हिंदू ही संकल्पना भौगोलिक अस्मितेच्या पलीकडची आहे (Pervading territorial boundaries), सुरवातीला म्हटल्याप्रमाणे इराणपासून इंडोनेशियापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांची सांस्कृतिक-भावनिक ओळख हिंदू आहे हे सत्य संघाने स्वीकारले आहे.   

परंतु आज मोठी अडचण अशी दिसते आहे की, संघाचे हिंदुत्व अत्यंत व्यापक आहे याची जाणीव संघ विरोधकांना अधिक आहे. ही सर्वसमावेशक हिंदुत्वाची संकल्पना प्रभावी ठरली तर आपले अस्तित्वच धोक्यात येऊ शकते याची जाणीव त्यांना झाली आहे. म्हणून खूप जोर लावून संघाचे हिंदुत्व कसे संकुचित, ब्राह्मणी आहे, दलित, आदिवासी, मुस्लीम, इसाई, यांना त्यात स्थान कसे असणार नाही, असे बळजबरीने लोकांच्या गळी उतरविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात बऱ्याच प्रमाणात त्यांना यश मिळत असल्याचेही दिसून येत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतात असहिष्णुता वाढीस लागली असे जे विधान केले होते त्याच्या मुळाशी हीच मानसिकता होती हे लक्षात घेतले पाहिजे.  

हिंदुत्वाचा हा सर्वसमावेशक सिद्धांत आजच्या युगानुकूल परिभाषेत कसा मांडावा ही संघ नेतृत्वासमोर मोठीच समस्या आहे असे दिसते. वर्तमान युग हे ज्ञानयुग आहे. संगणकाच्या आणि इंटरनेटच्या युगात माहितीचा विस्फोट होत असताना हिंदुत्वाची पुनर्मांडणी युगानुकूल परिभाषेत होणे आवश्यक आहे. ही मांडणी करीत असतानांच हिंदुत्वावर होणारे हल्ले यशस्वीपणे परतवून लावण्याचे तंत्र देखील संघाला आणि संघ नेतृत्वाला विकसित करावे लागणार आहे.

कडव्या विचारांचे स्वागत नाही:

आज अमेरिका आणि युरोप यांना कडव्या इस्लामचे चटके सहन करावे लागत आहेत. इस्लामिक दहशतवाद हा या दोन्ही खंडातील देशांना पोळून काढत आहे. फ्रान्समध्ये नुकताच झालेला दहशतवादी हल्ला हे त्याचे द्योतक आहे. त्यामुळे अमेरिका आणि युरोप यांनी अशा कडव्या, मूलतत्ववादी (Fundamentalist) इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला नाही. उलट त्याचा तिरस्कार केला आहे. सर्वसामान्य भारतीय हिंदू मनुष्य  कडव्या हिंदुत्वाला स्वीकारत नाही हे २०१४ नंतर लगेच झालेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या पोट निवडणुकीत दिसून आले होते. भारतात हिंदुत्वाच्या विरोधात मिडिया आणि राजकीय विरोधकांकडून जे विषवमन केले जात आहे त्याचा परिणाम म्हणून जगातील देश भारताकडे, हिंदुत्वाकडे त्याच दृष्टीने पाहण्याची शक्यता आहे. भलेही भारतीय किंवा हिंदू योग दिवस जगाने साजरा केला असेल. पण कडव्या इस्लाम किंवा ख्रिश्चन पंथासारखे कडवे हिंदुत्व नाकारण्याकडे जगातील महाशक्तींचा कल राहू शकतो.

संघाची जबाबदारी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश प्रवासात भारतीय लोकांना संबोधताना येणारा काळ भारताचा आहे असे सांगत असतात. माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम देखील हेच सांगत असत. संघाचे माजी सरसंघचालक सुदर्शन तर बऱ्याच आधीपासून योगी अरविंद यांचा दाखला देत ही गोष्ट सांगत असत. हे जर खरे व्हायचे असेल तर संघाची एक मोठी जबाबदारी आहे. कारण भारत हा ‘एक देश-एक जन-एक राष्ट्र’ आहे हे ठासून सांगण्याचे सामर्थ्य केवळ संघात आहे. संघाकडे प्रभावी नेतृत्व आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आस लावून बसले असताना जगाला सार्थक जीवन जगण्याचा संदेश देण्याचे सामर्थ्य संघाच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत आहे हे नक्की. बाळासाहेब देवरस म्हणत तसे ‘हिंदुत्वाच्या योग्य जागरणाने देशापुढील समस्या सोडविण्यास मदत होईल. आज वातावरण हिंदुत्वाच्या विचारासाठी अत्यंत अनुकूल आहे. हिंदुत्वाचा संकुचित अर्थ लावून काही लोक समाजाची दिशाभूल करतात त्यांचे प्रयत्न विफल करावयाचे असतील तर हिंदुत्वाचा सर्व समावेशक अर्थ लोकांना समजावून सांगावा लागेल. हिंदुत्व आणि मानवता हे समानार्थी आहेत. कोणत्याही एका पंथ, संप्रदाय किवा मताशी हिंदुत्वाचा संबंध जोडणे चूक ठरेल.

पण त्यासाठी हिंदुत्वाच्या या सिद्धांतसूर्याला सेकुलर ग्रहणाच्या मळभातून बाहेर काढून संपूर्ण जगात त्याचा प्रखर प्रकाश कसा पसरविता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे. संघाला हे आव्हान स्वीकारलेच पाहिजे.