एकात्म मानव दर्शन आणि नैतिक व्यवस्थापन

 


भारतीय तत्त्वज्ञान सर्व सृष्टीमागचे एक तत्त्व मानते. द्वैतवाद्यांनीसुध्दा प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांचे पूरक मानले आहेत, विरोधक नाही. बाहेर दिसणारी विविधता ही आंतरिक एकात्मतेचाच एक आविष्कार आहे. विविधतेत ही परस्परपूरकता आहे. बीज एकच असते, पण ते किती विविध प्रकारांनी आपल्याला प्रकट करते. मूळ, खोड, फांद्या, पाने, फुले, फळे या सगळयांचे मूळ एकच - बीज. यापैकी प्रत्येकाचे रंगरूप वेगळे आहे. काहींचे गुणधर्मही वेगळे आहेत. तरीही त्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध त्या बीजामुळे समजून येतात.

प्रत्येक देशासमोर ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आव्हाने उभी राहत असतात आणि त्यांचे पुढारी त्यातून वेळोवेळी मार्ग काढत असतात. हे उघड आहे की, जे व्यापारी आणि व्यवस्थापकीय प्रारूप एका परिस्थितीमध्ये उपयोगी ठरते ते सगळयाच परिस्थितीत उपयोगी ठरत नाही. पं. दीनदयाळजी म्हणतात, ''जरी सर्वांची शरीररचना एकसारखी असली तरी जे औषध इंग्लंडमधील व्यक्तीला उपयोगी पडेल ते भारतातील व्यक्तीला लागू पडेलच असे नाही. आजार हे हवामान, पाणी, आहाराच्या सवयी आणि वांशिकतेवर अवलंबून असतात. बाह्य लक्षणे जरी सारखी असली तरी एकच औषध सर्वांना लागू पडेल असे नाही.

सगळे विरोधी विचार व तत्त्वे ही स्थानिक असतात असे नाही. काही वैश्विक असतात. त्यामुळे दुसऱ्या समाजातील जुन्या व आजच्या वैचारिक परिवर्तनाकडे दुर्लक्ष करणे शहाणपणाचे ठरणार नाही. विशेष करून हे विधान पश्चिमेत उदय पावलेल्या व्यवस्थापनशास्त्राच्या बाबतीत खरे आहे. आधुनिक व्यवस्थापनशास्त्रातील बरीच तत्त्वे, संकल्पना, सिध्दांत, विशेषत: आर्थिक कार्यप्रणाली, वाहतूक या बाबतीतील हे वैश्विक महत्त्वाचे आहेत. आपले वेगळेपण जर कशात असेल तर ते मानव संसाधन व्यवस्थापन आणि विक्रीच्या तत्त्वांमध्ये आहे (विपणनशास्त्र).

आधुनिक व्यवस्थापनशास्त्र मनुष्याला यंत्र, मालसामान वा भांडवलासारखे एक साधन समजते. त्यामुळे आधुनिक व्यवस्थापनशास्त्रातील नवीन सिध्दांत/संकल्पना कर्मचाऱ्यांना काम करण्यास उत्तेजित करीत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यामधील सुप्त कौशल्य वापरले जात नाही. त्याचप्रमाणे विपणनशास्त्रातील सिध्दांत हे मनुष्याकडे फक्त एक गिऱ्हाईक म्हणून बघतात. त्याला पिळून काढायचे, त्याचे समाधान करायचे, त्याला खूश करायचे आणि जास्तीत जास्त नफा कसा उकळायचा याकडे त्यांचे लक्ष असते.

आजच्या व्यवस्थापनशास्त्रातील संशोधक गोंधळून जातात. भविष्यातील प्रगतीचा मार्ग त्यांना नक्की करता येत नाही. पश्चिमात्यही ठामपणे असे म्हणू शकत नाहीत की, 'हाच मार्ग बरोबर आहे. दुसरा कुठलाही बरोबर नाही.' आजपर्यंत झालेली गरीब वर्गाची पिळवणूक जणू कमी झाली म्हणून नवे पिरॅमिड सिध्दांत आजही पिळवणुकीसाठी तळागाळातील गरिबांकडे पाहत आहेत. पश्चिमेकडील वेगळया सांस्कृतिक व्यवस्थेमुळे कदाचित हे सिध्दांत तिकडे योग्य/उपयुक्त ठरत असतील.

व्यवस्थापनातील बहुतेक सिध्दांत हे साधनाच्या जास्तीत जास्त शोषणावर आधारलेले आहेत. या शोषणवृत्तीचे मूळ कारण उत्पादन व्यवस्थेची खासगी मालकी हे आहे. कार्ल माक्र्सने दाखविले की, भांडवलशाही व्यवस्थेतील शोषण हेच तिच्या विनाशाचे बीज होते. आजच्या बदलत्या काळात आपण व्यवस्थापनाच्या जुन्या कल्पना न वापरता उलट त्यांचे विश्लेषण करून जरूर तिथे त्यात सुधारणा करून मगच त्या स्वीकारल्या.

पं. दीनदयाळजी म्हणत, 'भारतीय संस्कृतीचे पहिले वैशिष्टय हे की, ती जीवन 'एकात्म' आहे असे समजते. तिचा दृष्टिकोन एकात्मतेचा आहे. विभागांचा स्वतंत्र विचार करणे तज्ज्ञांच्या दृष्टीने ठीक असेल, पण ते प्रत्यक्षात उपयोगाचे नाही. पाश्चात्त्यांच्या विचारात जो गोंधळ आढळतो याचे कारण ते जीवनाचा विभागवार स्वतंत्र, विचार करतात आणि ते वेगवेगळया विचारांची ठिगळे लावून त्यांचे सिध्दांत बनवतात. जीवनामध्ये वैविध्य आणि बहुआयामित्व आहे, हे आम्ही मान्य करतो; पण आमचा प्रयत्न नेहमी त्यामागचे एकत्व शोधण्याचे असतो.

पाश्चिमात्य तत्त्वज्ञांच्या सामाजिक आणि आर्थिक विचारांवर आधुनिक व्यवस्थापनशास्त्राची उभारणी झाली आहे. हेगल याने वाद-प्रतिवाद-संवाद यांचा सिध्दांत मांडला. कार्ल माक्र्सने त्याचा सिध्दांत वापरून इतिहास व अर्थशास्त्राचे विश्लेषण केले, तर डार्विनचे 'जो सक्षम तोच जगेल' हा जीवसृष्टीचा एकमेव आधार मानला.

भारतीय तत्त्वज्ञान सर्व सृष्टीमागचे एक तत्त्व मानते. द्वैतवाद्यांनीसुध्दा प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांचे पूरक मानले आहेत, विरोधक नाही. बाहेर दिसणारी विविधता ही आंतरिक एकात्मतेचाच एक आविष्कार आहे. विविधतेत ही परस्परपूरकता आहे. बीज एकच असते, पण ते किती विविध प्रकारांनी आपल्याला प्रकट करते. मूळ, खोड, फांद्या, पाने, फुले, फळे या सगळयांचे मूळ एकच - बीज. यापैकी प्रत्येकाचे रंग- रूप वेगळे आहे. काहींचे गुणधर्मही वेगळे आहेत. तरीही त्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध त्या बीजामुळे समजून येतात.

हल्ली मनोऱ्या (Pyramid) च्या आकाराची रचना असलेल्या संघटनेमध्ये सगळे निर्णय अतिउच्च स्तरात घेतले जातात. सर्व नियम तिथे बनविले जातात आणि विविध कार्यप्रणाली आपआपली कामे करीत असतात.

एखाद्या संघटनेचे परीक्षण करताना आपण त्याची तुलना एखाद्या वृक्षाशी करू शकतो. समाज हे त्याचे मूळ. ग्राहक हे त्याचे खोड जो त्या आस्थापनाचा कणा आहे. मुळापासून संघटनेला पोषण मिळते. ग्राहकांचे समाधान होईल असे उत्पादन मिळावे यासाठी लागणारी साधनसंपत्ती पुरविणारा समाज व ग्राहक हे कार्यप्रणालीचे मालक असायला हवेत. झाडाच्या फांद्या त्या संघटनेतील सदस्यांची संस्कृती व मूल्ये दर्शवितात. पाने म्हणजे बाहेरच्या जगाशी संबंध ठेवणाऱ्या विविध कार्यप्रणाली समजाव्यात आणि आस्थापनाची उत्पादने किंवा सेवा ही त्याची फळे समजावीत.

संघटनेकडे आपण एक वृक्ष म्हणून पाहिले म्हणजे तिच्यात काहीही संघर्ष बाकी उरत नाही. संघर्ष हे संस्कृती व स्वाभाविकतेचे प्रतीक नाही आहे, तर ते अडचणींचे द्योतक/निर्देशक आहे. 'जंगलराज' अथवा 'जो सक्षम तोच जगेल' हा न्याय लावला तर तो संघटनेचा वृक्षच नष्ट होईल.

आपल्या तत्त्वज्ञानामध्ये मनुष्याच्या सहा हीन वासना (षड्रिपू) सांगितल्या आहेत. त्यात क्रोध, मोह, लोभ इत्यादी; पण आपण त्या वासना आपल्या सभ्यतेचा वा संस्कृतीचा आधार बनविला नाही. आजच्या समाजातील मोह व मत्सर यामुळे संघटनांमधील जहरी स्पर्धा वाढेल आणि परिणामत: त्याने पर्यावरणाचा व संघटनांचा नाश होईल.

वृक्षरूपी असलेल्या संघटनांमध्ये सहकार हे व्यवस्थापनाचे मूलतत्त्व आहे. वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी एकमेकांना जीवन पुरवितात. वनस्पतींमुळे आपल्याला ऑक्सिजन वायू (प्राणवायू) मिळाले तर आपण त्यांना त्यांच्या वाढीला उपयुक्त असा कार्बनडाय ऑक्साइड वायू पुरवितो. (कर्बादी प्रणाली)

पं. दीनदयाळजी म्हणाले होते, या परस्परावलंबनाने पृथ्वीवरील जीवसृष्टी जीवित राहते. सृष्टीमधील विविध घटकांचे हे परस्परावलंबन ओळखून त्याप्रमाणे मानवी जीवनाला परस्परपूरक बनविणे हे सभ्यतेचे मुख्य वैशिष्टय आहे. समाजहितासाठी आपला स्वभाव बदलणे ही संस्कृती आहे, तर त्याउलट आपल्या स्वभावामुळे समाजात संघर्ष उत्पन्न करणे ही विकृती आहे.

आपण सामुदायिक जीवनाचाच एकात्मतेच्या दृष्टीने विचार केला असे नाही, तर व्यक्तीच्या जीवनाचाही तसा विचार केला आहे. सामान्यत: व्यक्ती म्हणजे तिचे शरीर असेच समजले जाते. शारीरिक आराम व चैनचंगळ म्हणजे सुख समजले जाते; पण आपल्याला हे समजते की, मानसिक दु:ख हे शरीरसुखाचा नाश करते. शारीरिक ऐषआराम प्रत्येकाला हवा असतो; पण समजा, एखादा मनुष्य तुरुंगात आहे आणि त्याला आपण आराम व पंचपक्वाने दिली तर त्याला सुख मिळेल का? किंवा चांगल्या अन्नाबरोबर शिव्याशाप ऐकाव्या लागल्या तर त्यामुळे आनंद होत नाही आपल्याला. या कारणामुळे आजची प्रवृत्त/प्रेरित करण्याची पध्दत यशस्वी होणार नाही. भारतीय विचारसरणीचे आकलन व अवलंबनच आस्थापन सुस्थितीत चालवू शकेल.

पं. दीनदयाळजींची एकात्म मानवी जीवनाची संकल्पना मनुष्यजीवनाच्या चार प्रमुख ध्येयांवर, पुरुषार्थांवर आधारलेली आहे. ते चार पुरुषार्थ म्हणजे अर्थ, काम, धर्म व मोक्ष.

अर्थ - संपत्ती

काम - सुखोपभोग

धर्म - गुण, सत्कर्म व पुण्यप्राप्ती

मोक्ष - मुक्ती, आत्मोन्नती

भारतामध्ये व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान अर्थ, काम, धर्म व मोक्ष या पुरुषार्थांवर आधारलेले आहे. अर्थमध्ये राजकीय आणि आर्थिक परिस्थितीही येते. काममध्ये व्यक्तीची नैसर्गिक इच्छा-कामनांची पूर्ती  येते, तर धर्म म्हणजे ती मूलतत्त्वे, नैतिक मूल्ये ज्यांच्या आधाराने प्रयत्न करून अर्थ व काम हे पुरुषार्थ साधावयाचे असतात. तसे केल्यानेच एकात्मिक व यथोचित प्रगती साधता येईल.

तेव्हा जरी धर्म हा अर्थ आणि काम यांना नियंत्रित करीत असला तरी ते तीनही एकमेकांशी संबंधित आणि एकमेकांना पूरक आहेत. अर्थप्राप्तीसाठी धर्म साहाय्य करतो. धंद्यामध्येसुध्दा प्रामाणिकपणा लागतो, संयम लागतो, सत्यवचनीपणा लागतो आणि हे सर्व धर्माचे गुण आहेत. तेव्हा हे नक्की की, अर्थ आणि काम, प्राप्तीसाठी धर्म हे आवश्यक साधन आहे. अमेरिकन म्हणतात, 'सचोटी हे धंद्याचे उत्तम धोरण आहे.' युरोपीयन म्हणतात, 'सचोटी हे उत्तम धोरण आहे.' भारतीय तत्त्वज्ञान यांच्याही पुढे एक पाऊल जाऊन म्हणते, 'सचोटी हे केवळ धोरण नाही तर तत्त्व आहे.' केवळ अर्थ मिळविण्यास मदत करतो म्हणून आम्ही धर्मावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ते सुसंस्कृत जीवनातले एक मूलभूत तत्त्व आहे.

या विचारसरणीचा विश्वास आहे की, व्यक्ती आपले अंत:करण बदलू शकते. जेव्हा तिला समजते की, भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि भौतिक बाबींना अवास्तव महत्त्व दिले, तर त्यामुळे व्यक्तीच्या मनात आणि समाजातही असमतोल निर्माण होतो. मानवतावाद असे मानतो की, सामाजिक-सांस्कृतिक धारणांचा आर्थिक वृध्दीवर परिणाम होतो. जी माणसे काहीच आध्यात्मिक मूल्ये मानत नाहीत ती देशाभिमान, एकात्मता, स्वयंशिस्त आणि कर्तव्यबुध्दी हे गुण जोपासू शकत नाहीत आणि अनैतिक गुन्हेगारी व्यवहारात गुरफटले जातात.

भारतीय तत्त्वज्ञानामध्ये जे चार पुरुषार्थ आहेत त्यात अर्थ हा कामापेक्षा कमी महत्त्वाचा, काम हा धर्मापेक्षा कमी महत्त्वाचा आणि धर्म हा मोक्षापेक्षा कमी महत्त्वाचा मानला आहे. कमी महत्त्वाचा पुरुषार्थ, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषार्थ साधण्याचे साधन बनते. मनुष्याच्या नैसर्गिक कामना पुरविण्यासाठी जी मूल्ये वापरली जातात ती व्यावहारिक मूल्ये. अशी व्यावहारिक मूल्ये अनेक आहेत. ती सर्व 'अर्थ' या मुख्य व्यावहारिक मूल्याखाली येतात आणि त्यापासून जे साध्य केले जाते ते सर्व 'काम' या खाली येते. ही सर्व मूल्ये आयुष्याला उपयोगी व पूरक मूल्ये आहेत. आजच्या भाषेत सांगायचे तर अर्थ आणि काम ही धर्माशी संबंध नसलेली व्यावहारिक मूल्ये आहेत. म्हणजे अशी मूल्ये की, ज्यांच्याकडे सर्वसामान्य मनुष्याचा स्वाभाविक कल असतो.

धन जमा करणे हे मुळात पाप नाही; पण धन हे फक्त ते मिळविणाऱ्यासाठी नसते. धनसंपत्तीची जगात सर्वांनाच जरूर असते; उपभोगासाठी आणि दानधर्मासाठीसुध्दा. उपभोग हा प्रमाणाबाहेर व हीन अभिरुचीचा असू नये. तो समाजाच्या नैतिक व धार्मिक मर्यादांमध्ये असावा. कर्तव्याच्या मर्यादांमध्ये असावा. अशा प्रकारचा उपभोग पुण्यप्रद असतो. त्याने पुण्यसंचयही होतो. पुण्यसंचय आपल्या जीवनात जास्त आनंद आणतो. जोपर्यंत उपभोग नैतिक मूल्यांचे उल्लंघन करीत नाही तोवर त्याची निंदा करण्याचे कारण नाही. उपभोगाने पुण्य प्राप्त होते आणि पुण्य आपल्याला आनंदही प्राप्त करून देते.

अर्थ आणि काम यांची व्यावहारिक मूल्ये काहीशी डळमळीत असतात, शाश्वत नसतात. एखाद्या प्रसंगी ती उपयोगी असतील तर दुसऱ्या प्रसंगी निरुपयोगी ठरतील. ही मूल्ये अशाश्वत असतात, कारण त्यामुळे मिळणारे समाधान हे क्षणिक असते. थोडयाच वेळात त्या समाधानाची जागा दुसरी कामना घेते. धर्म आणि मोक्ष ही मूल्ये आध्यात्मिक म्हणता येतील. आपण नेहमी या आध्यात्मिक मूल्यांचा अवलंब केला पाहिजे.

पाश्चिमात्य विचारवंत अर्थशास्त्र स्वतंत्र समजतात आणि मनुष्याला एक आर्थिक जीव समजतात. हा विचार एकात्म विचाराच्या विरुध्द आहे. एकात्म मानवतावाद शिक्षण, पर्यावरण, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र आणि इतर शास्त्रांचा एकत्रित विचार करतो. यापैकी प्रत्येक शास्त्राने संपूर्ण जीवनाचा एकात्म विचार करावा, अशी अपेक्षा असते. या प्रकारे विचार केल्यामुळे व्यक्तीला आपल्या आवडीनुसार काम करता येते व आत्मिक उन्नतीही साधता येते. व्यक्ती त्यामुळे एक साधे, सुंदर व समृध्द जीवन जगू शकते. पं. दीनदयाळजींच्या मानवतावादाची एकात्मता हे खास वैशिष्टय आहे.  मनुष्याचे आयुष्य सुखकर करण्यामध्ये सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचे योगदान ते मान्य करतात. तरीही त्यांनी मानवाच्या जाणिवेच्या जडणघडणीवर व संवर्धनावर जास्त भर दिला आहे, कारण ते योग्यरीत्या झाले नाही तर कितीही चांगली समाजव्यवस्था असली तरी ती अपेक्षित फळ देणार नाही.

मानवतावादाच्या दृष्टीने विचार केला तर नैतिक मूल्ये आयुष्याच्या प्रत्येक क्रियेला, प्रयत्नाला लागू होतात. मानवतावादाच्या नीतिशास्त्रात व्यापार-उद्योग, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे सामाजिक कर्तव्यांइतकेच महत्त्वाचे असतात.

नैतिक मर्यादा सांभाळून घेतलेला आरोग्यवर्धक, आयुष्यकारी उपभोग मानवतावादाला मान्य आहे. मानवतावाद प्रेमाचे सौंदर्य आणि सौंदर्याचे प्रेम जाणतो, त्याचा आदर करतो. मानवी जीवनातील सर्व शुभकारक गोष्टींचे धागे विवेकाच्या आधाराने एकत्र गुंफून मानवतावादी त्याचे एक सुंदर आनंदरूप महावस्त्र निर्माण करतो. मानवतावादाच्या नीतीचे 'उन्मेषकारी समृध्दी' हे परवलीचे वाक्य आहे.

मानवतावादाला मूल्याधारित विचार म्हणता येईल. श्री. अमर्त्य सेन त्यांच्या On Ethics and Economics (1987) या ग्रंथात म्हणतात, धर्म हा मूल्याधारित जीवनाची व अर्थशास्त्राची शिकवण देतो याला नीतिशास्त्र म्हणतात. राष्ट्रीय उत्पादनांमध्ये जो मोठा फरक/तफावत दिसते याचे कारण मूल्याधारित अर्थव्यवस्था आणि मूल्यरहित अर्थव्यवस्था हे आहे. मूल्यरहित मुक्त समाजाचे राष्ट्रीय उत्पादन नेहमीच जास्त असते, कारण त्यात वाममार्गाने मिळविलेले उत्पन्नही मिळवलेले असते.

एकात्म मानवतावादाच्या चौकटीमध्ये मी व्यवस्थापनाची अशी व्याख्या करीन- 'उत्पादक आणि ग्राहक या दोघांना आनंद आणि समाधान देण्यासाठी तंत्रज्ञानाचा व साधनसंपत्तीचा वापर करून लोकांनी नैतिकतेने अनुसरलेली कार्यपध्दती.