पंडितजींचे द्रष्टेपण

दीनदयाळजींनी व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या नात्याविषयीचे केलेले विवेचनही त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रमाण ठरले आहे. मुळात समाजामधल्या वेगवेगळया संस्था व्यक्तिमात्राचे समाजाशी असलेले नाते पक्के करीत असतात. कुणीही माणूस जन्मल्यानंतर कुटुंबाशी जोडला जातो. नंतर वस्ती, गाव, जिल्हा या पायऱ्यांवरून प्रवास करीत तो वैरिश्वक भाषा बोलू लागतो. ''त्यजेदेकं कुलस्यार्थे, ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ग्रामं जनपदस्यार्थे ह्याऽत्मार्थे पृथिवी त्यजेत्।''- हा श्लोक आपणास सांगतो की, मी एकाकडून अनेकांकडे प्रवास केला पाहिजे, क्रमाक्रमाने व्यापक, विशाल बनले पाहिजे. हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे.


दीनदयाळजींच्या दुर्दैवी निधनानंतर अठ्ठेचाळीस वर्षे कालौघात वाहून गेली आहेत. या वर्षांमधल्या घटनांकडे नजर टाकली तर दीनदयाळजींच्या द्रष्टेपणाची कुणालाही प्रचीती येईल. या महापुरुषाला भविष्याचा वेध घेता आला, कारण एक तर ज्या घडामोडी होतात त्यांच्या मुळाशी जावे व तिथल्या शाश्वत सत्याचा विचार करावा, ही त्यांच्या स्वभावाची ठेवण होती आणि दुसरे म्हणजे पूर्वी इतिहासात वर्तमानाशी मिळत्याजुळत्या घटना घडल्या असतील, तर त्यांची काय परिणती झाली, या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करून त्यावरचे भाष्य अक्षरबध्द करावे, हीही त्यांचीच शैली होती. परिणामतः दीनदयाळजींच्या वृत्तपत्रीय लेखांमधूनही त्यांच्या सखोल चिंतनाचा वाचकांना साक्षात्कार होत असे. उदाहरणार्थ 22 फेब्रुवारी 1960 या दिनांकाचा दीनदयाळजींचा लेख तेव्हा वाजतगाजत असलेल्या विविध देशांच्या शिखर परिषदांविषयी मार्मिक भाष्य कागदावर उतरवून कृतार्थ झाला आहे. खालील परिच्छेद बघा किती मार्मिक आहे.

''जर विवक्षित शिखर परिषद असे सूचित करीत असेल की, आफ्रिकेतल्या राष्ट्रांनी आपापल्या स्वातंत्र्यसंग्रामांना सोडचिठ्ठी द्यावी आणि रशियाच्या हंगेरीतल्या, फ्रान्सच्या अल्जीरियातल्या, ग्रेट ब्रिटनच्या केनियातल्या तसेच चीनच्या तिबेटमधल्या आक्रमणास जगाने मान्यता द्यावी तर त्यातून जगातल्या लुटारू देशांनी मानववंशाच्या विरोधात रचलेल्या कारस्थानांना ही शिखर परिषद मान्यता देत आहे असे म्हणावे लागेल.'' (पहा : Political Diary पान - 80)


सध्या आपल्या देशात 'भारतमाता की जय' या घोषणेवर वादविवाद चालू आहेत. अनादिकाळापासून आपण सगळे जण भारतभूमीला आपली माता मानतो. साक्षात प्रभू रामचंद्रांनी ''जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी'' अशा उद्गारातून स्वतःचा भाव व्यक्तविला आहे; पण कुणी ओवेसी या उद्घोषाला आव्हान देतो आणि जावेद अख्तर खणखणीत शब्दांतून हा 'उद्घोष करणे म्हणजे स्वतःचा अधिकार बजावणे', हे समीकरण श्रोत्यांना ऐकवितात. आपल्या प्रसार माध्यमांकडून ओवेसीचा तिरस्कार, तर अख्तर महोदयाचा पुरस्कार होईल, ही सर्वसामान्य व्यक्तींची अपेक्षा होती. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी 24 एप्रिल 1965 या तिथीस एकात्म मानव दर्शनावर भाषण देताना या अपेक्षेमागचा तर्क शब्दबध्द केला आहे. ते म्हणतात, ''भारतमाता ही संकल्पना जीवमान चैतन्यदायी आहे; वंगमाता, आंध्रमाता, बिहारी माता, पंजाबी माता वगैरे मातांनी एकत्र येऊन, चर्चा करून भारतमातेला जन्म दिला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.'' भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी याच कारणासाठी भारतमातेचा जयजयकार केला पाहिजे हे निर्विवाद सत्य एक्कावन वर्षांपूर्वी उपाध्यायांनी मांडले.

प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी 'चिती' म्हणजे चित्तप्रकृती असते व या चित्तप्रकृतीला अनुरूप असेच आपले वैयक्तिक आणि सार्वजनिक वर्तन असावे, ही भूमिका वर्तमानात देशोदेशी रुजत आहे; पण दीनदयाळजींनी हीच भूमिका आपल्या कैक भाषणांतून आणि लेखनांतून सप्रमाण मांडली होती!

सन 2001 च्या 11 सप्टेंबरला अमेरिकेत न्यूयॉर्कच्या जुळया मनोऱ्यांवर इस्लामी आतंकवाद्यांनी आत्मघाती जीवघेणे हल्ले चढविले आणि त्यानंतर वेगवेगळया देशांतून या अशाच हल्ल्यांच्या कैक Zerox Copies जगाने अनुभवल्या. कधी, केव्हा व कुठून दहशतवादी हल्ला होईल आणि किती जणांना रक्ताच्या थारोळयात निजविले जाईल याचा भरवसा नाही. या शतकाच्या प्रारंभी आणि नंतर जगभरात अशा घडामोडी झाल्यामुळे शशी थरूर यांनी मोठया अर्थपूर्ण शब्दांत अभिप्राय व्यक्त केला आहे. - "The present century is born in blood and baptize in fire." परिणामतः कोणत्याही देशात आतून वा बाहेरून आतंकवाद उद्भवू नये, हीच इच्छा जगात दृढमूल झाली आहे. ''एकेका देशात विविध संस्कृती व वेगवेगळया सभ्यता असतात. या सर्वांना, पंथांना व संप्रदायांना आपण सामावून घेतले पाहिजे,'' असे मत पूर्वी उत्साहाने मांडले जायचे. गेली वीस-पंचवीस वर्षे आणि खास करून सन 2001 पासून मात्र, ''एकेका देशाने स्वतःच्या चित्तप्रकृतीला अनुरूप असे वर्तनच शिरोधार्य मानावे, बहुसांस्कृतिकतेच्या नावाखाली कोणतेही दहशतवादी तत्त्वज्ञान आणि वर्तन कुठेही रुजणार नाही अशी दक्षता घ्यावी,'' अशी भूमिका आता मूळ धरत आहे. उदाहरणार्थ ः- अमेरिकेत Multiculturalism अथवा बहुसांस्कृतिकता आताआत्तापर्यंत स्वागतार्ह मानली जात असे.वर्तमानात मात्र सॅम्युएल हन्टिंग्टन हे विचारवंत ''अमेरिकेने White Anglo Saxon Protestant (WASP) या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवावे'' अशी मांडणी करू लागले आहेत. युरोपातही याच प्रकारचा nativism म्हणजे देशीवाद सर्वमान्य होण्याच्या मार्गावर आहे. सोव्हिएत संघ सन 1991 मध्ये कोसळला व त्या भूप्रदेशात जी पंधरा राष्ट्रे नव्याने जन्माला आली, तिथेही हा देशीवाद स्थिरपद होऊ पहात आहे. रशिया या राष्ट्राने अशा देशीवादाच्या आधारावरच युक्रेनला नमुनेदार आवाहन केले. ''तुमच्या कीव्ह राजधानीतच रशियन राष्ट्रवादाचा जन्म झाला. Kievan Rus हा शब्दप्रयोग यामुळेच रूढ झाला तेव्हा आपण एकत्र येऊन सहजीवनाचा आदर्श उभा करू या.'' युक्रेनियन नागरिकांनी हे आवाहन झिडकारले हे अर्थातच वास्तव आहे. मध्य आशियातल्या पाचही मुस्लीम राष्ट्रांनी गेली पंचवीस वर्षे आपापल्या चित्तप्रकृतीचा शोध घेण्यासाठी थेट इस्लामपूर्व इतिहासाचा अभ्यास सुरू केला आहे. सारांश, हिंसक-व्यावर्तक-मनांध इस्लामिक आतंकवादापासून आपणच आपला बचाव केला पाहिजे या जाणिवेपोटी सर्वदूर असा अभ्यास सुरू झाला आहे. दीनदयाळजींनी मात्र 24 एप्रिल 1965 ला एकात्म मानव दर्शन विशद करताना जो अभिप्राय श्रोत्यांना ऐकविला होता तो प्रतिक्रियेपोटी नव्हे, तर भावात्मकतेतून मांडला होता. ते म्हणाले होते- ''चिति को लेकर प्रत्येक समाज पैदा होता है और उस समाज की संस्कृति की दिशा चिति निर्धारित करती है। अर्थात जो वस्तु चिति के अनुकूल होती है, वह संस्कृतिमें सम्मलित कर ली जाती है।'

आपल्या भारतवर्षाची उत्पत्ती अर्थातच भारतीय अथवा हिंदू संस्कृतीच्या आधारावर झाली. आजही भारतात या संस्कृतीच्या प्रकाशात एकेकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो हे आहे पं.दीनदयाळजींचे चिंतन. इंग्लिशमध्ये Knowledge is power, Health is wealth, Honesty is policy वगैरे म्हणी आहेत. याउलट संस्कृत भाषेत 'नही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, नायमात्मा बलहीनेन लभ्यः शीलं परं भूषणम्' असे वाक्प्रचार आहेत.

वर्तमानात दीनदयाळजींच्या चिती-संकल्पनेला विश्वमान्यता मिळाली आहे, पण पश्चिमी जगाच्या एका विकृतीमुळे दुसरीच अडचण उत्पन्न झाली आहे. अमेरिकेत प्रोटेस्टन्ट पंथ, तर रशियात बिझन्टाईन ऑर्थाडॉक्स पंथ आपापली संस्कृतीच क्रमशः अमेरिकेत व रशियात इतरांवर लादतील व त्यातून नवे संस्कृतिसंघर्ष पैदा होतील हे भय आहे. आश्चर्य व आनंद म्हणजे अशा वायुमंडलात भारतवर्षच जगाला दिशा दाखवू शकेल, कारण भारतात 'एक सत् विप्रा बहुधा वदन्ति' या वाक्प्रचाराच्या अधिष्ठानावर निर्भेळ बहुविधता शिरोधार्य मानली जाते. भारतीय संस्कृतीच्या या अनोख्या श्रेष्ठतेवर सन 2008 मध्ये रस्तिस्लाव्ह रिबाकोव्ह या रशियन विचारवंताने प्रशंसापुष्पाची पखरण केली आहे. (पहा ः- ''S. Nihal Singh, Speed-dating civilisations : Courtesy the new Russia'' in Asian Age : 16/10/08) सन 2016 मध्ये म्हणजे अगदी कालपरवाच अहमद बद्रेद्दिन हसौन नामक विचारवंताने नवी दिल्लीत World Sufi Forum मध्ये भाषण करताना ''Indian Pluralism is an inspiration'' असे वक्तव्य करून रिबाकोव्ह यांना भरघोस दुजारा दिला. हे विचारवंत सीरियाचे Grand Mufti आहेत. (पहा ः- The Hindu : 14/3/16 P. 13)

दीनदयाळजींनी व्यक्ती आणि समाज यांच्यातल्या नात्याविषयीचे केलेले विवेचनही त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रमाण ठरले आहे. मुळात समाजामधल्या वेगवेगळया संस्था व्यक्तिमात्राचे समाजाशी असलेले नाते पक्के करीत असतात. कुणीही माणूस जन्मल्यानंतर कुटुंबाशी जोडला जातो. नंतर वस्ती, गाव, जिल्हा या पायऱ्यांवरून प्रवास करीत तो वैश्विक भाषा बोलू लागतो. ''त्यजेदेकं कुलस्यार्थे, ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ग्रामं जनपदस्यार्थे ह्याऽत्मार्थे पृथिवी त्यजेत्।''- हा श्लोक आपणास सांगतो की, मी एकाकडून अनेकांकडे प्रवास केला पाहिजे, क्रमाक्रमाने व्यापक, विशाल बनले पाहिजे. हीच आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. व्यक्तिमात्राचे समाजाशी असलेले नाते अशा संस्कारांमधून सुदृढ होते, कागदी करारामधून नव्हे! बघा, दीनदयाळ उपाध्याय काय म्हणताहेत, ''हम व्यक्ति के विभिन्न रूपों तथा समाज की अनेक संस्थांओं में स्थायी संघर्ष या हितविरोध नही मानते। यदि कही ऐसा दिखता है, तो वह विकृतिका द्योतक है। प्रकृति अथवा संस्कृति का नही।'' (दि. 24 एप्रिल 1965).

सोव्हिएत संघ कोसळला, कारण तिथे वर्गसंघर्षाचे नगारे वाजविण्यात आले. बिचारे मिखाईल गोर्बाचेव्ह ''Let us worship human interest, keep aside class interest'' वगैरे आशयाचा उपदेश करीत राहिले. सोव्हिएत संघाने गोर्बाचेव्ह यांनाच पुढे करून आत्महत्येचा पर्याय स्वीकारला.

राज्यसंस्थेविषयीचे दीनदयाळप्रणीत विवेचनही काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहे. घ्या हे
प्रमाण ः- ''जिन लोगों के प्राण राज्य में थे वहाँ राज्य के नष्ट होते ही राष्ट्रका प्राण भी निःशेष हो गया। किन्तु जिन राष्ट्रोंने यह माना की, हमारा प्राण राज्यमें नही है, वहाँ राज्य जाने के बाद भी राष्ट्र नही गया ।'' (दि. 24 एप्रिल 1965).

सोव्हिएत संघाच्या विध्वंसाचे खरे कारण या उताऱ्याच्या पूर्वार्धात आहे. माक्र्स व लेनिन राज्यसंस्थेवर कामगारांनी वर्चस्व मिळवावे व राज्याने समाजावर निरंकुश प्रभुत्व गाजवावे या विचाराचे कट्टर समर्थक होते. भांडवलशाहीमध्ये भांडवलदारांचे प्रतिनिधी राज्यसंस्था ताब्यात घेतात आणि कामगार वर्गाचे निष्ठुर शोषण करतात, तेव्हा या कामगार वर्गाला सुखी करण्यासाठी कामगार वर्गानेच राज्यसंस्था भांडवलदारांकडून स्वतःच्या वर्चस्वाखाली आणावी असे माक्र्सवादाचे सार होते. प्रत्यक्षात यातून स्टालिनची जुलमी झोटिंगशाहीच जन्माला आली. सन 1956 मध्ये ख्रुश्चेव्हने स्टालिनशाहीच्या राज्यसंस्थेवरच्या वर्चस्वाला सुरुंग लावला... पण राज्यसंस्थेचे समाजावरचे वर्चस्व कायमच ठेवले. सन 1991 मध्ये मग समाजालाच पुढाकार घेऊन राज्य उद्ध्वस्त करावे लागले. परिणाम भयानक झाला. बोल्शेविक क्रांतीनंतर जन्माला घातलेल्या कृत्रिम सोव्हिएत राष्ट्राच्याच चिंधडया उडल्या. वर उद्धृत केलेल्या उताऱ्याच्या उत्तरार्धात भारताच्या शाश्वत जीवनाच्या रहस्यावर दीनदयाळ उपाध्यायांनी प्रकाश टाकला आहे. भारतात मोगल आले, पाठोपाठ ब्रिटिश आले, म्हणजेच किमान बाराशे वर्षे तरी भारतात स्वतःचे असे राज्य नव्हतेच; पण भारतवर्षाचा प्राण राज्यसंस्थेत नव्हता व म्हणूनच राष्ट्रजीवनाचा प्रवाह इथे सतत खळाळत राहिला.

दीनदयाळ याच संदर्भात एक अत्यंत मौलिक अशी माहिती देतात. राज्यसंस्था एकमेवाद्वितीय नाही, अन्य संस्थांवर वरवंटा फिरविण्याचा हक्क राज्य शासनाला नाही हे सांगता सांगताच ते माहिती देतात की, ''राज्य भी एक महत्त्वपूर्ण संस्था है, भले वह सर्वोपरि नही होगी।'' डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधान सभेत भाषण करताना, ''आपल्या पूर्वजांनी राज्यसंस्थेकडे दुर्लक्ष केले, ग्रामसंस्थेवरच सर्व लक्ष केंद्रित केले व म्हणून आपणास पारतंत्र्य भोगावे लागले,'' असे मत मांडले होते हेही दीनदयाळ उपाध्याय आपल्या निदर्शनास आणतात.

मनात विचार येतो, जनसंघाच्या स्थापनेपूर्वी दीनदयाळ उपाध्यायांनी शंकराचार्यांना कथानायक समजून कादंबरी लिहिली, कारण भारत हे राष्ट्र ज्या संस्कृतीच्या अधिष्ठानावर उभे आहे, त्या संस्कृतीचे, त्या आत्म्याचे संगोपन शंकराचार्यांनी केले. पंडित उपाध्यायांनीच सम्राट चंद्रगुप्ताला केंद्रस्थानी ठेवून दुसरी कादंबरी लिहिली, कारण या राष्ट्राच्या, या आत्म्याच्या सुदृढ आविष्कारासाठी तितक्याच सुदृढ राज्यरूपी शरीराची गरज होती. दीनदयाळजींनी स्वतःच्या आयुष्यातही हाच विवेक सहजपणे आचरणात उतरविला. एका राजकीय पक्षाचे संवर्धन करीत असतानाच, ''मैं राजनीती में संस्कृति का दूत
हूँ ।'' हे या सत्पुरुषाने केलेले आत्मकथन किती बोलके आहे.

पंडित उपाध्याय यांचे पुंजीवादाबाबत, भांडवलशाहीबाबत झालेले निदानही अचूक ठरले आहे. 'एकात्म मानव दर्शन' या शीर्षकाच्या सुरूचि प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात दीनदयाळ उपाध्याय, श्रीगुरुजी व मा. दत्तोपंत ठेंगडी यांची भाषणे वाचण्यास मिळतात. त्यापैकी दीनदयाळजींनी मुंबईला एप्रिल 1965 मध्ये जी चार भाषणे दिली होती, ती या पुस्तकाच्या प्रारंभी आहेत. या भाषणांमध्ये एके ठिकाणी दीनदयाळजींनीच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंच्या अधिष्ठानांवर ज्या विचारधारा बेतलेल्या आहेत त्यांच्या भविष्यासमोर प्रश्नचिन्ह मांडले आहे. (पान 21) या षड्रिपूंपैकी काम, लोभ व मोह हे तीन रिपू भांडवलशाहीने दत्तक घेतले, तर क्रोध, मद व मत्सर या रिपूंना माक्र्सवादाने शिरोधार्य मानले. भांडवलशाहीत Self interest अथवा स्वार्थ कळीची भूमिका बजावतो. दीनदयाळ म्हणतात, ''पश्चिम का अर्थशास्त्र तो इच्छाओं को बराबर बढाते जाना और उनकी आवश्यकताओं की निरंतर पूर्ति करनाही अभीष्ट समझता है।''(पान. 61) पुंजीवादी अर्थशास्त्र मनुष्य को एक अर्थलोलुप प्राणी मानकर चलता है ।... वह (याने मनुष्य) अर्थोत्पादन की प्रेरणासेही काम करता है । अधिकसे अधिक लाभ उसका लक्ष्य है । जैसे बाजार में अन्य वस्तुएं खरेदी-बेची जाती है, वैसेही मानवश्रम क्रय-विक्रय की वस्तू है । यह मुक्त व्यापार की व्यवस्था है ।'' (पान. 71)

दीनदयाळजींचे हे विवेचन माक्र्सवादी विवेचनाची आठवण करून देणारे आहे; पण रोगाचे निदान जरी अचूक असले, तरी रोगनिर्मूलनासाठी सुचविले जाणारे उपायही अचूक असावे लागतात. माक्र्स व दीनदयाळ दोघेही धनलाभाच्यार् ईष्येने झपाटलेल्या भांडवलशहांवर कडाडून टीका करतात, जित्याजागत्या श्रमिकाला वस्तू मानून त्याची खरेदी-विक्री करण्यात अमानुष उत्साह दर्शविणारा भांडवलदार माक्र्स व दीनदयाळ या दोघांनाही तिरस्करणीय वाटतो; पण माक्र्स भौतिकवादी, तर दीनदयाळ अध्यात्मवादी आहेत व म्हणूनच माक्र्सला क्रोध, मद आणि मत्सर या दुष्प्रवृत्तींच्या अधिष्ठानावर सर्व विचारविश्व उभे करताना कसलेही सोयरसुतक वाटले नाही, एकदा राज्य शासन कामगाराच्या हाती सोपविले की, धरतीवर नंदनवन उत्पन्न होईल या भ्रमात माक्र्स महोदय रंगून गेले; किंबहुना कामगारांचे राज्य अवतीर्ण झाले की, या राज्याला कुणीही विरोध करायचा नाही असा फतवाच माक्र्सच्या अनुयायांनी काढला. दीनदयाळजींनी या माक्र्सवादावर केलेली टीका आपण अभ्यासिली आहे; पण व्यक्तिगत इच्छेच्या अधिष्ठानावर उभा राहिलेला पुंजीवाद अथवा भांडवलवादही कोसळेल. हेही दीनदयाळजींचे भाकीत होते आणि ते सन 2007 च्या लेहमान अरिष्टाच्या निमित्ताने खरे ठरले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह सिस्टमचे भूतपूर्व कर्णधार ऍलॅन ग्रीनस्पॅन यांचे या संदर्भातले विवेचन किती मौलिक आहे पहा.- ''लेहमान अरिष्ट उद्भवल्यानंतर ग्रीनस्पॅन सांगून गेले की, Self interest किंवा स्वार्थ अशा अरिष्टापासून समाजाचा बचाव करील या गृहीतावर भरवसा ठेवणारी विचारसरणी दोषपूर्ण आहे.'' (पहा ः- Frydman and Goldberg, Did Capitalism Fail in Times of India - 16/9/2013)

सन 1991 मध्ये भारतात खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण म्हणजे खाउजा या विचारप्रवाहांची कार्यवाही सुरू झाली. तत्पूर्वी सरकारीकरणाचा बोलबाला होता. सन 1991 मध्ये मात्र खासगी उपक्रमशीलतेला, वैश्विकीकरणाला जाणीवपूर्वक प्रोत्साहन देण्यात आले. सन 2016 मध्ये या खाउजा पर्वाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. समजा, या पर्वाचे समालोचन-सिंहावलोकन करण्याचे कुणी ठरविले तर जमेच्या व खर्चाच्या अशा दोन्ही बाजू सहजपणे लक्षात येतील. दीनदयाळजींची या संदर्भातली भाकितेही इथे अचूक ठरली आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी खासगी उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देण्यात आले. दीनदयाळजींच्या शब्दांत सांगायचे तर, ''संपत्ति से तथा उसके, अर्जन की एशणासे व्यक्तित्व का विकास और पुरुषार्थ की प्रेरणा मिली ।'' पण त्याचबरोबर मनुष्यमात्राच्या आवश्यकतांकडे नव्हे, तर त्याच्या खिशाकडे अर्थात क्रयशक्तीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. (पहाः- पान. 73 व 72)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती क्रिस्तिन लॅगार्ड यांनी गेल्या पंचवीस वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत झालेल्या प्रगतीची तोंड भरून प्रशंसा केली आहे. ''काय सांगावे, मला संधी मिळाली तर मी माझी स्वतःची कमाई भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवीन.'' या आशयाचे कौतुकदेखील लॅगार्डबाईने भारतीय श्रोत्यांना ऐकविले आहे. (पहा ः- टाइम्स ऑफ इंडियातले संपादकीय, 13 मार्च 2015) मायक्रोसॉफ्टचे संस्थापक व दानशूर उद्योगपती बिल गेट्स यांनीही क्रिस्तिन लॅगार्ड यांच्या सुरात सूर मिळविला आहे. (पहा ः- 'इकॉनॉमिक टाइम्स' - 30/9/15); पण नेमक्या गेल्या पंचवीस वर्षांतच आर्थिक विषमता व दारिद्रयही वाढले आहे. ज्या मध्यमवर्गीय समाजघटकांची संख्या या काळात प्रकर्षाने वाढली आहे ते दिवसेंदिवस करुणाहीन होत आहेत. साहजिकच तळागाळातल्या घटकांची दुर्दशा वाढत आहे. श्रीमंतांमध्ये आणि मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये उपभोगप्रियता व स्वच्छंदता वाढत आहे. वस्तूंचे व सेवांचे उत्पादक कल्पक जाहिरातींच्या माध्यमातून लोकांच्या उपभोगप्रियतेला जोरदार प्रोत्साहन देत आहेत. जाणीवपूर्वक अल्पकाळ टिकणाऱ्या वस्तूंचे आणि सेवांचे उत्पादन करीत आहेत अथवा 'सध्या वापरात असलेल्या चिजा टाकाऊ ठरल्या आहेत, तेव्हा नवनव्या चिजा विकत घ्या' अशा प्रचाराचा रतीब घालत आहे. पंडित दीनदयाळजीप्रणीत एकात्म मानव दर्शनाने खाउजा युगातल्या या उणिवांविषयीही सन 1965 मध्ये भाकीत केले होते! खालील परिच्छेद दीनदयाळजींच्या द्रष्टेपणावर मान्यतेची मोहोर उठविणारा आहे.

''पश्चिम का अर्थशास्त्र इच्छाओं को बराबर बढाते जाना और उनकी आवश्यकताओं की निरंतर पूर्ति करनाही अभीष्ट समझता है। इस विषय में उसकी कोई अधिकतम मर्यादा नही है ।'' सामान्यतया तो पहले इच्छा होती है और फिर उसकी पूर्ति के साधन जुटाये है, किन्तु अब तो हालत यह हो गयी है कि जो कुछ पैदा किया जाता है, उसका उपयोग हो, इसके लिए लोगोंमें इच्छा पैदा की जाती है। बाजार के लिए माल पैदा करने के स्थानपर पैदा किये हुए माल के लिए बाजार ढॅूंढना न मिले तो नया बाजार पैदा करना आज की अर्थनीति का प्रमुख अंग बन गया है । प्रारंभ में उत्पादन उपभोग का अनुसरण करता था। अब उपभोग उत्पादन का अनुचर है।'' (पान 61)

एकदा अमर्याद उपभोग आणि या उपभोगाच्या पूर्तीकरिता अमर्याद उत्पादन असे चक्र सुरू झाले की, सृष्टीवर आक्रमण अटळ बनते. त्यातूनच प्रदूषणाचा प्रारंभ होतो. एकात्म मानव दर्शन या संदर्भात व्यष्टी, समष्टी, सृष्टी व शेवटी परमेष्ठी यांच्यातल्या निर्मळ संबंधांना अधोरेखित करते. सध्या आपल्या देशात Corporate Social Responsibility या शब्दप्रयोगाचाही बोलबाला आहे, किंबहुना C.S.R. कायदाही वाजतगाजत आहे. एकेका कॉर्पोरेशनने Profit People and Planet या तीन Ps वर लक्ष केंद्रित करावे हा मुळी या कायद्याचा आदेशच आहे. हे तिन्ही 'P' क्रमशः व्यष्टी, समष्टी आणि सृष्टी यांच्यातल्या निर्मळ संबंधांवरच प्रकाश टाकणारे आहेत.

दीनदयाळजींना काळजी वाटत होती ती सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाची ! पण नेमक्या या मानवकल्याणावरच भांडवलशाहीने व समाजवादाने तुळशीपत्र ठेवले. एकात्म मानव दर्शन जे विश्लेषण करते ते इथे उद्धृत  करण्याजोगे आहे.

''पूँजीवाद और समाजवाद इन दोनोंही व्यवस्थाओं में मानव के सही एवं पूर्ण रुप को नही समझा गया। एक में उसे स्वार्थी, अर्थपरायण, संघर्षशील एवं मात्स्यन्याय-प्रवण-प्राणी माना गया है तो दुसरी में व्यवस्थाओं और परिस्थितीयों का दास, अकिंचन एवं अनास्थामय माना गया है । शक्तियों का केंद्रीकरण दोनों में अभिप्रेत है । फलतः दोनों का परिणाम अमानवीकरण में हो रहा है।...
हमे समाजवाद अथवा पूँजीवाद नही, मानव का उत्कर्ष और सुख चाहिए । मानव को दाँवपर लगाकर आज दोनो लड रहे है । दोनों ने न तो मानव को समझा है और न उन्हे मानव की चिंता है ।'' (पान 74, 75)

भांडवलशाहीत आणि समाजवादातही डार्विनप्रणीत Survival of the fittest या तत्त्वाला शिरोधार्य मानण्यात आले आहे. म्हणजे 'बळी तो कान पिळी' या वाक्याला जणू वेदवाक्याचा दर्जा देण्यात आला आहे. महात्मा गांधीजी आणि दीनदयाळ उपाध्याय हे दोघे सत्पुरुष हिंदू संस्कृतीचे प्रवक्ते होते. या दोघांना सर्वसामान्य माणसांविषयी उत्कट आस्था वाटत होती म्हणूनच या दोघांनी उपरोल्लेखित विचारधारांना विरोध केला. अमेरिकेतल्या सॅन फ्रॅन्सिस्को विद्यापीठातले प्राध्यापक वामसी जुलुरी यांना महात्माजी व दीनदयाळजी यांच्यातले हे साधर्म्य खूप लोभसवाणे वाटले आहे. हे प्राध्यापक महोदय काय म्हणताहेत ते समजून घ्या ः- ''दीनदयाळ उपाध्यायांना गांधीजींप्रमाणेच 'बळी तो कान पिळी' हा जंगली कायदा कदापि मंजूर नव्हता व म्हणूनच त्यांनी काम, क्रोध, मोह, मद... या दुष्प्रवृत्तींवर बेतलेल्या विचारधारांना सर्वशक्तिनिशी विरोध केला.'' (पहा ः The Hindu, 2 Oct. 2015, P. 15)

'बळी तो कान पिळी' हा जंगली कायदा 'जो कमाएगा, वह खाएगा' हे सूत्र डोक्यावर घेतो. वेगळया शब्दांत जो कमवू शकत नाही अशा दीनदुबळयांना वाऱ्यावर सोडून देतो. एकात्म मानव दर्शन मात्र, 'जो कमाएगा, वह खिलाएगा', 'खानेवाला कमाएगा...' या सुभाषितांमधून दरिद्रीनारायणाची निरपेक्ष पूजा करावी असे मार्गदर्शन करतो.

दीनदयाळ उपाध्यायनामक द्रष्टया महामानवाने जे भव्य, उदात्त उद्दिष्ट आपल्यासमोर ठेवले आहे ते उद्धृत करूनच या लेखाचा समारोप करणे इष्ट आहे.

''हमने मानव के समग्र एवं संकलित रुप का थोडा विचार किया है। इस आधारपर हम चले तो भारतीय संस्कृति के शाश्वत मूल्यों के साथ राष्ट्रीयता, प्रजातंत्र, समता और विश्व एकता के आदर्शों को एक समन्वित रुप में रख सकेंगे । इनके बीच का विरोध नष्ट होकर वे परस्परपूरक होंगे । मानव अपनी खोयी हुई प्रतिष्ठा और जीवनोद्देश्य को प्राप्त कर सकेगा ।''