भारतातील राष्ट्रवादाचा आधार संघर्ष नसून सहयोग, समन्वय आणि परस्परानुकूलता आहे. तो शेअर होल्डर कंपनीप्रमाणे स्वार्थपोषक, सत्तावादी नाही. तो अखिल मानव कल्याण, सृष्टी संवर्धनाचा हेतू अशा श्रेष्ठ गुणांवर आधारित आहे. भारताचा राष्ट्रवाद हा सहस्रावधी वर्षांचा आहे. याउलट पाश्चात्त्य राष्ट्रवाद हा केवळ काही शतकांचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. इथे प्रतिद्वंद्वितेऐवजी परस्परपूरकतेचा मंत्रघोष झाला. क्षमा, दया, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य या मानवी विकासाच्या पायऱ्या मानण्यात आल्या.
साधारणपणे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतातील थोर विचारवंतांनी या राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे चिंतन केल्याचे दिसून येते. या चिंतनात या राष्ट्राचा सर्वांगीण विचार दिसून येतो. या राष्ट्राचा गुलामगिरीचा इतिहास, प्राचीन इतिहास, राष्ट्राचे वैभव, राष्ट्राच्या अवनीतीची कारणे, राष्ट्रजीवनाचा मूलकंद काय होता, पुन्हा हे राष्ट्र पुनरुत्थानाच्या वाटेवर प्रगती करणारे व्हावे या दृष्टीने समग्र विचारमंथन या कार्यकाळात घडून आल्याचे दिसून येते.
या कालखंडात या राष्ट्रजीवनाचे सत्यान्वेषण करून, तत् काळाची चिकित्सा करून, राष्ट्रीय सत्याचे दर्शन घडविणारे दार्शनिक पं. दीनदयाळजी होते. त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने भारताच्या मूलभूत प्रकृतीचे एक तत्त्वदर्शन घडविले. या देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासातील संघर्षशील चढावउतारांचे तसेच पौरुषेय व पराक्रमाचे, तद्वतच घोर विस्मृतीचेही त्यांनी विवेचन केले.
दीनदयाळजी ज्या कालखंडात देशसेवेचे व्रत घेऊन उभे झालेत तो कालखंडच कमालीचा अस्वस्थतेचा, पराधीनतेचा, गुलामगिरीचा, पदानुकरणाचा अक्षम्य घोर विस्मृतींचा काळ होता. अवघं राष्ट्रजीवन जणू शब्दातीत झालं होतं. दीनदयाळजींसारख्या मेधावी, बुध्दिनिष्ठ, सत्यान्वेषी नि सात्त्वि भावाचा विद्यार्थी या परिस्थितीने अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. या अस्वस्थ मनाला एक निःस्वार्थ, सकारात्मक देशभक्तीचा संस्कार लाभला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रचिंतनाचा. 1937 मध्ये ते संघकार्यात आले, रमलेत. त्यांच्या चिंतनाला एक प्रगल्भ वैचारिक पैस मिळाला तो राष्ट्राचा, मातृभूमीचा. मातृभूमीच्या भक्तीत ते रंगले, या भक्तीतून एका भावात्मक विचारांचे विकसन झाले. या वैचारिक विकसनात एक मूल्यगर्भ असा नवा संदर्भ होता तो एकात्म दर्शनाचा! या एकात्म दर्शनात नीरक्षीरविवेकाचा शास्त्रीय आधार होता तो दैशिकशास्त्राचा!
हा 'दैशिकशास्त्राचा' शास्त्रीय अभ्यास असलेला अनुपम गं्रथ दीनदयाळजींना गोळवलकर गुरुजींनी दिला. काशीचे प्रकांडपंडित बद्रिप्रसाद दुलधारिया यांनी हा दैशिकशास्त्र गं्रथ लिहिला. त्याला लोकमान्यांची प्रस्तावना लाभलेली आहे. दीनदयाळजींनी या संधीचे सोने केले. या दैशिकशास्त्राच्या आधारे या राष्ट्राचे स्वाभाविक चैतन्य असलेल्या चिरजीवन शक्तीचे खरे स्वरूप काय आहे? राष्ट्र संजीवक शक्तीचे स्वरूप, चैतन्य म्हणजेच या 'राष्ट्राची चिती' हा एक नवा राष्ट्रीय चिंतनाचा सिध्दांत-चितीचा सिध्दांत त्यांनी जगापुढे मांडला. राष्ट्र-राष्ट्रवाद मांडणारे अनेक सिध्दांत राजनीती शास्त्रज्ञांनी मांडले आहेत; पण पं. दीनदयाळजींचा चितीचा सिध्दांत या देशाची एक अद्भुत एकात्मता भावात्मक दर्शन घडविते. एक मूलगामी चिंतन, एक नवा पॅराडाइज या राष्ट्रीय चिंतनातून मिळतो, म्हणूनच दीनदयाळजींचे राष्ट्रीय चिंतन आगळेवेगळे, वैशिष्टय- पूर्ण ठरते. त्यांच्या अलौकिक प्रतिभेचे ते प्रकटन ठरते.
त्यांच्या राष्ट्रचिंतनात एक अखंड शोधकार्य त्यांच्या मनात सुरू होते. स्वातंत्र्य आंदोलनाचा अभ्यास, विभाजनाच्या उंबरठयावर उभा असलेला देश, एकात्मतेऐवजी भेदांची भुते थयथयाट करत होती. 1857 चे स्वातंत्र्यसमर, वंगभंग आंदोलन, क्रांतिकारकांचा संघर्ष, लोकमान्यांची चतुःसूत्री व स्वराज्य, विवेकानंद, अरविंद यांचे राष्ट्रजागरण, गांधींचा अहिंसा-सत्याग्रह, खिलाफतची चळवळ, सावरकरांचे हिंदुत्व, एका गटाचे अनुनय करणारे काँग्रेसी नेतृत्व, इंग्रजांपुढे हतबल होत चाललेले काँग्रेसी नेतृत्व, जागतिक पातळीवरील महायुध्दे नि त्याचे पडसाद, जागतिक स्तरावरील भांडवलशाही, साम्यवाद, समाजवाद यांचा वैचारिक संदर्भ, यातच देशाचे विभाजन करणारी विदीर्ण घटना-फाळणीचे शल्य! या सर्व घटनांचा ऐतिहासिक अभ्यास परिशिष्ट करताना काही गंभीर प्रश्न त्यांच्या मनात सातत्याने डोकावलेले दिसतात.
या राष्ट्रात अंतःकलह एकसारखा का वाढतोय? हे राष्ट्र सुदृढ व एकात्म का होत नाही? राष्ट्राला समर्थ आणि संघटित बनविण्याची निःस्वार्थ उभारी राष्ट्रीय नेतृत्वात, जनमानसात प्रखर का दिसत नाही! येथे परकीय हस्तक्षेप आणि परावलंबन, पदानुकरण का वाढत आहे? या देशात दास्य, गुलामगिरी, पराभूत मानसिकता यांच्या मुळाशी कोणते कारण आहे?
केवळ 'इंग्रज-विरोध' म्हणजे देशभक्ती ही एकांगी नकारात्मक देशभक्ती का शिकविली गेली? हा देश मुळातून माझा आहे, अशी भावात्मक, सकारात्मक देशभक्तीची अक्षम्य उपेक्षा का झाली? हे राष्ट्र कोणाचे? स्वातंत्र्य कशासाठी? कशा प्रकारचे जीवन स्वतंत्र भारतात निर्माण करायचे आहे? कोणती मूल्यव्यवस्था, कोणता विकासमार्ग आम्ही अंगीकार करणार आहोत? आमची प्राचीन मूल्यव्यवस्था होती की नव्हती? ती आम्ही स्वीकारणार की पदानुकरण, अंधानुकरण करणार? असे प्रश्नांचे एक राष्ट्रीय प्रश्न पिरॅमिड त्यांच्या चिंतनात डोकावतात.
या सर्व तळप्रश्नांचा सखोल अभ्यास त्या समस्यांच्या मुळाशी जाऊन दीनदयाळजींनी केला. या सर्वांची निःसंदिग्ध उत्तरेही संघर्षकाळात त्यांनी लोकांपुढे ठेवलीत. आधुनिक जगाचा इतिहास, राष्ट्रवाद, राष्ट्रजीवनाचे संपूर्ण अवधान राखून त्यांनी आपला 'राष्ट्रविचार' तर्कशुध्द पध्दतीने मांडला. प्रादेशिक राष्ट्रकल्पना चुकीची आहे एवढे सांगून चालणार नव्हते. तर राष्ट्र कसे घडते? राष्ट्र सक्षम उभे राहण्यासाठी राष्ट्राच्या प्रकृतीचे अवधान, राष्ट्रीय वैशिष्टये, राष्ट्राचा आविष्कार, जनसमाजाचे खरे अवधान कसे ठेवायला पाहिजे, ही भावात्मक मांडणी, हा समग्र विचार सोदाहरण, इतिहासाचे, समाजजीवनाचे दाखले देत त्यांनी, सर्वंकष, सर्वस्पर्शी मांडला.
दीनदयाळजींनी एक विदारक सत्य अधोरेखित केले. ते असे की, स्वातंत्र्य आंदोलनात एका गटाचा अनुनय करण्यासाठी, इंग्रजांचा विरोध म्हणजेच देशभक्ती असा जो नकारात्मक देशभक्तीचा आशय वाढत गेला नि त्यातूनच हिंदू-मुस्लीम ऐक्याचे मृगजळ उभे केले गेले, त्यासाठी जी टोकाची सतत धडपड काँग्रेसी नेतृत्वाने केली. या सर्वांचा परिणाम खंडित स्वातंत्र्याचे दान थकल्या-भागल्या काँग्रेसी नेतृत्वास स्वीकारावे लागले. भावात्मक देशभक्तीच्या उपेक्षेमुळे अटळ असलेली परिणामी परंपरा आजही आमच्या प्रत्ययाला येऊ लागली आहे.
दुसरी महत्त्वाची बाब अशी की, एकीकडे इंग्रज निघून गेल्यानंतर इंग्रजांना विरोध म्हणजे देशभक्ती ही नकारात्मक भूमिका संपल्याने, आता देशभक्ती कशाची याचा विधायक, सखोल, विभावात्मक राष्ट्रीय संस्कार नसल्याने एक वैचारिक पोकळीच निर्माण झाली. या वैचारिक पोकळीची जागा न्यूनगंडाच्या भावनेने पछाडलेल्या विचारवंतांनी पाश्चिमात्यीकरणच सुरू केले. सत्ताकारणामुळे स्वदेशी उद्दिष्टे धूसर बनली होती. पाश्चात्त्य देशांच्या प्रगती, विकास, विज्ञान-तंत्रज्ञान यांची झेप डोळे दिपवणारी असल्याने आम्ही परानुकरणाची कास धरणे स्वाभाविकच होते. अगदी राज्यघटनेच्या निर्मितीपासून ते लोकशाही संस्था, उत्पादनाची पध्दती, आर्थिक नियोजनाची योजना, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, मिश्र अर्थव्यवस्था, या युरोपीय विचारसरणीचा अंधानुकरणाचा प्रकार राष्ट्रजीवनात इतक्या मोठया प्रमाणावर घडत गेला, की जणू हे राष्ट्र 1947 सालीच जन्माला आले. 'इंडिया' या नावाने आमची राज्यपध्दती, न्यायपध्दती, शिक्षण, प्रशासन, सर्व इंग्रजांची कार्बन कॉपी!
स्वतंत्र भारताची अशी निव्वळ राजकीय स्वातंत्र्य नि पाश्चात्त्य मानसिक गुलामगिरीची अवस्थाच दीनदयाळजींसारख्या सच्च्या देशभक्ताला अस्वस्थ करत होती. सत्तावादी, अर्थवादी दृष्टिकोन अंगीकारल्यामुळे अनेक विकृती निर्माण झाल्यात. ही स्थिती विकृतीमूलक आहे. यासाठी राष्ट्रीय जीवनविषयक दृष्टिकोन बदलला पाहिजे... हे परिवर्तन भारतीय संस्कृतीच्या आदर्शाच्या आधारेच होऊ शकेल. या गौरवमयी संस्कृतीची पुनःप्रतिस्थापना केली तरच राष्ट्रजीवनात विकृतींचे शमन आणि निराकरण होऊ शकेल.
काय आहे या राष्ट्राची प्रकृती, संस्कृती नि आर्थिक भूक याचे नीट अवधान जाणून घेतले पाहिजे. दीनदयाळजी म्हणतात, आपल्या प्राचीन राष्ट्राचा भावपिंड हा अन्य राष्ट्रांपेक्षा वेगळा आहे. अस्तित्व, अस्मिता वेगळी आहे. त्यांचे स्वत्व सिध्द झाले आहे. काळाच्या कसोटीवर सिध्द झालेली एक मूल्यव्यवस्था देशाने जतन केली आहे जे या देशाच्या प्रकृतीशी अनुकूल आहे ते सुखकारक, तृप्ती देणारे आणि परिपोषक ठरले आहे. जे प्रतिकूल असेल ते क्लेशदायक सिध्द होईल. पाश्चात्त्य राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांना स्पर्धा, संघर्ष, क्रिया-प्रतिक्रिया या न्यायाने आकार लाभला आहे. याउलट भारतीय जीवनविचारांत सर्व भर समन्वय, सहयोगावर आहे, संघर्षावर नाही; कर्तव्यावर आहे, अधिकारावर नाही; सहकार्यावर आहे आणि सर्वसमावेशकतेवर आहे. ही स्वाभाविक नैसर्गिक प्रकृती आहे.
एकदा राष्ट्राची नैसर्गिक प्रकृती आणि संस्कृती समजली की, राष्ट्राचे खरे स्वरूप नि राष्ट्रजीवन कळते.
दीनदयाळजी राष्ट्राची प्रकृती, संस्कृती समजावून सांगताना आम्हाला सहजपणे राष्ट्रजीवनाची शक्ती, सूत्रे आणि सूक्ष्म तत्त्वे स्पष्ट करतात. दीनदयाळजींच्या मते कोणत्याही राष्ट्राचा उदय, राष्ट्राचे अस्तित्व, राष्ट्राची धारणाशक्ती आणि पुढे राष्ट्राचा विनाश हे सूत्रसंचालन करणारी एक अमूर्त, अदृश्य शक्ती आहे. या अमूर्त शक्तीलाच शास्त्रकारांनी 'चिती' म्हटले आहे. सोप्या शब्दांत चिती म्हणजे आत्मा, चिती म्हणजे चैतन्य. हे मूलतत्त्व म्हणजेच 'राष्ट्राची प्रकृती' आहे. वरवर पाहता 'राष्ट्राची प्रकृती' म्हणजे 'राष्ट्राची व्यवस्था' - राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था म्हणजेच 'राज्य शासन' असले तरी या व्यवस्थांचे सूत्रसंचालन करणारी एक अंतस्थ शक्ती आहे ती म्हणजे चिती. चिती म्हणजे राष्ट्राची निसर्गदत्त प्रकृती.
'राष्ट्राची प्रकृती' हा राष्ट्राचा नैसर्गिक, स्वाभाविक स्वभाव असतो. तो मूलतः असतो, तो राष्ट्राच्या रोमारोमांत, इतिहासात, पानापानांतून व्यक्त होतो. माणसाप्रमाणे राष्ट्राचे स्वभाव दर्शन इतिहास पानापानांमधून टिपतो. रामायण, महाभारत, वेदसंहिता, उपनिषदे यातून भारताच्या प्राचीन, राष्ट्रीय भावनेच्या खुणा अंकित झालेल्या आहेत. 'राष्ट्र' या शब्दाचा उल्लेख वेदांत आहे. श्रीसुक्तात, ''प्रदुर्भूतो सुराष्ट्रेस्मित कीर्तिमृध्दि व दातुमें'' अशा ओळी आहेत. या उत्तम राष्ट्रात जन्मलो असल्याने मला उदंड कीर्ती आणि समृध्दी यांचा लाभ होतो, हा भावार्थ आहे. यात अभिमान आहे, मातृभूमीसंबंधी श्रध्दा आहे, हे राष्ट्रजीवन त्याचे आधारभूत तत्त्व आहे.
किती प्राचीन काळापासून हे राष्ट्र विद्यमान आहे? मा. दत्तोपंत ठेंगडी अथर्ववेदांचा दाखला देतात-
भद्रं इच्छन्त ऋषयः स्वार्विदं
तपो दीक्षां उपसेदुः अग्रे ।
ततो राष्ट्रं बलं ओजश्च जातयः
तदस्मै देवा उपसं नमन्तु ॥
आत्मज्ञानी ऋषी या राष्ट्रासमोर नम्र होतात, कारण सृष्टीची धारणा प्रारंभी दीक्षा या राष्ट्राने केली. तात्पर्य मातृभूमीची पुत्रवत सेवा म्हणजे या राष्ट्राची जनसेवा. ही समाजसेवा, समाज आणि व्यक्ती यांच्या कर्मप्रेरणांची दिशा, कर्तव्य आणि अकर्तव्य, समाजाचे उत्थान आणि पतन, समाजाची सुखदुःखे आदी गोष्टींचा विचार सहस्रावधी वर्षांच्या या काळात झालेला आहे. तो विचार कोणता?
जो विचार या राष्ट्राच्या मानसाची एक अद्भुत मानसिकता एकात्मतेतून व्यक्त करतो. या राष्ट्राचे स्वाभाविक चैतन्य स्पष्ट करतो. यासाठी राष्ट्र, राज्य, देश या संकल्पना वेगवेगळया आणि अस्तित्वप्रधान आहेत. पाश्चात्त्य विचारांपेक्षा वेगळया आहेत. राष्ट्र निराळे, राज्य निराळे या संकल्पना संक्षेपाने सांगणे कठीण आहे; पण संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न करू.
दीनदयाळजी म्हणतात, माणसाप्रमाणेच राष्ट्र जन्माला येते. राष्ट्र ही एक जिवंत वस्तू आहे. वर्षानुवर्षांचा नव्हे, तर शतकानुशतकांच्या दीर्घ कालखंडात व्यतीत करता करता त्याचा विकास होतो... सोप्या शब्दांत राष्ट्र ही भावात्मक संकल्पना आहे. ती अमूर्त आहे. या भूमीवरील समाज, जनसमुदाय भूमीवर प्रेम करतो. तिला मातृवत समजतो, तिच्यासाठी त्याग, तपस्या, बलिदान करतो. श्रेष्ठ जीवनमूल्यांसाठी प्रयत्न करतो. महापुरुषांचा आदर करतो आणि एक सांस्कृतिक जीवन भूखंडात प्रकट करतो असे भावात्मक एक स्थायी सत्य म्हणजे राष्ट्र!
याच अर्थाने राष्ट्र ही सांस्कृतिक, आध्यात्मिक अंतःकरणाची भावना आहे, अंतःकरणाची वेदना आहे, अंतःकरणाची आकांक्षाही आहे. आधुनिक राजनीतीशास्त्रज्ञ फे्रंच विद्वान अर्नेस्ट रेनाँ म्हणाले, 'A nation is a spiritual principle; the result of the intricate workings of history, a spiritual family and not a group determined by the configuration of the Earth. (Ernest Renam : what is nation)
राज्य ही राष्ट्राची शासनव्यवस्था आहे. कायदा सुव्यवस्था आहे. राज्य राष्ट्राचे प्रतिनिधित्व करते. राज्ये राज्याकरिता राष्ट्र नसते. राज्ये स्थायी नसतात, राष्ट्रे स्थायी असतात. ते जागृत ठेवणे नेतृत्वाचे, संस्थांचे काम आहे. - 'वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः' ही यजुर्वेदातील ऋषींची मनीषा प्रसिध्द आहे.
राज्याप्रमाणेच देश आणि राष्ट्र भिन्न आहेत. हे समानार्थी शब्द नाहीत हे अभ्यास केल्याने कळते. देश ही राष्ट्राची अभिव्यक्ती आहे, दृश्यमान सत्ता आहे. देश हे 'शरीर' आहे. त्याचे वर्णन आपण करतो. या शरीराचा आत्मा म्हणजे, 'राष्ट्र' आहे. शरीराशिवाय आत्म्याचे प्रकटीकरण होत नसते आणि आत्म्याशिवाय शरीर जिवंत राहू शकत नाही म्हणून या राष्ट्राचा आत्मा-राष्ट्रात्मा म्हणजेच चिती, चैतन्य, राष्ट्राची जिवंत सत्ता मानली आहे, हे विशेष!
दैशिकशास्त्रानुसार देश आणि राष्ट्र अभिन्न स्वरूप असूनही त्यांच्यात भिन्न भिन्न सत्ता आहेत. ते अतिशय गूढ आहे आणि चिरंतनही आहे. व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राची अस्मिता असते. ती अमूर्त आणि आत्मतत्त्वावर अंतःसूत्रावर अवलंबून असते. राष्ट्रीय अस्मितेवर राष्ट्र जिवंत राहते. ही अस्मिता म्हणजे त्या राष्ट्रातील 'एक जन', लोकसमूह; हा एकरूप जनसमाज ही एक जिवंत आणि पूर्ण वस्तू आहे. जसा माणूस जन्माला येतो, तो जुळवता, घडविता येत नाही, तसाच समाजही जन्माला येतो आणि राष्ट्रदेखील जन्माला येते, ती एक स्वयंभू स्वतंत्र सत्ता असते.
व्यक्तिसमूहाच्या संस्था कृत्रिम रीतीने तयार केल्या जाऊ शकतात. मंडळे, संस्था, संविधान, उपासना पंथ, संप्रदाय, उद्योग, व्यवसाय संघटना, राजकीय पक्ष हे सगळे आर्टिकल ऑफ असोसिएशन' असतात. त्यांचे घटनापत्र, पंजीकरण असते, उद्दिष्टे असतात. उद्दिष्टे संपली की, त्या संस्था विसर्जित होतात.
पण राष्ट्रीय जनसत्ता अशी कृत्रिम उपायांनी तयार होत नसते. ती एक नैसर्गिक, सजीव वस्तू आहे. तिच्या ठायी रसरशीत जिवंतपणा आहे, प्राणशक्ती आहे. इथे दीनदयाळजी उपमा देतात अश्वाची ! घोडा जन्माला येतो, तो वेगाने धावतो. त्याची अश्वशक्ती असते ती नैसर्गिक असते. मोटार ही वेगाने धावते, तिलाही अश्वशक्ती आहे, पण ती कृत्रिम आहे. हा फरक लक्षात घ्यायला हवा... झाडे जमिनीतून उगवतात. त्यांचा विकास आतून होतो. फांद्या, फुले, पाने त्यांना बाहेरून चिकटवून त्यांचा विकास होत नसतो. तद्वतच राष्ट्रीय जनसमाज हा आतून विकसित होतो. समाज हा स्वयंचलित असतो. समाज स्वतःच्या प्रयत्नाने पुष्ट, बलशाली होतो. या प्रक्रियेलाच संघटन असे म्हणतात. या संघटनेचा आधार प्रेम असतो. या प्रेमाचा आधार मातापुत्रवत प्रेमाचा असतो. अखंड दीर्घ प्रक्रियेतून विशिष्ट स्वभाव, प्रकृती बनवीत, घडवीत जनसमाज प्रकट होतो. या जनसमाजाची मूळ प्रकृती म्हणजेच राष्ट्राची अस्मिता, राष्ट्राचा मूलाधार असतो.
हा जनसमाज आपल्या मातृभूमीशी पुत्रवत संबंध जोडतो, कारण त्याला जीवनाधार स्वरूप सगळी मूलभूत पोषक तत्त्वे (अन्न, वस्त्र, पाणी, निवारा) भूमीतून प्राप्त होतात. भूमी या जनसमाजाचे पुत्रवत पोषण, संवर्धन करते. मग तो भूभाग केवळ जमिनीचा तुकडा राहत नाही. ती एक जिवंत मातृशक्ती बनते, भारतमाता बनते!... इति दीनदयाळजी.
पुढे दीनदयाळजी म्हणतात, कुटिल इंग्रजांनी हा भारतीयांचा, क्रांतिकारकांचा मातृभाव ओळखला. 'वंदे मातरम्' ओळखले म्हणून त्यांनी 'भारताला' 'इंडिया' केले. आमचे संविधानकारही इंग्रजाळल्याप्रमाणे - इंडिया दॅट इज भारत' असे नोंदविते झाले !''
दीनदयाळजींनी ही मातृभूमीविषयीची चेतना, ही अक्षय शक्ती, ही अमूर्त राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रीय प्रकृती यालाच चिती संबोधिले. दीनदयाळजी म्हणतात- ''आपल्या मातृभूमीविषयीच्या एकांतिक निष्ठेने आपली मूळ प्रकृती अर्थात चिती- राष्ट्राचे चैतन्य जागृत ठेवून राष्ट्राला समर्थ, स्वावलंबी, कार्यक्षम, काळविजयी, सदासर्वदा नवनवोन्मेष- शास्तिनी शक्तीने युक्त बनविणे हे कार्य जिथे नित्य होत असते तिथेच चितीचा आविष्कार होतो. या चितीच्या प्रकाशाने राष्ट्र चैतन्ययुक्त बनतात. जोपर्यंत चिती जागृत असते व निरामय असते तोपर्यंत राष्ट्राचा अभ्युदय होत राहतो. राष्ट्र या चेतनेच्या आधारेच संघटित होतात, एकात्म होतात, राष्ट्राचे संरक्षण करतात. तिलाच राष्ट्राची क्षात्रशक्ती असे म्हणतात. तिलाच विराट शक्ती म्हणतात. चितीचेच व्यापक, उदात्त रूप म्हणजे 'विराट' रूप होय. विराट समाजरूप दर्शन हेच चितीचे रहस्य होय. हाच या राष्ट्राचा, राष्ट्रविषयक चिरंतन सत्य-सिध्दांत आहे. या राष्ट्राचे सत्याचे प्रकटीकरण आहे.''
विवेकानंदांनी याच चितीला राष्ट्र संजीवन, अध्यात्म शक्ती मानले आहे!
Our life-blood is spirituality if it flows clear, if it flows strong and pure and vigorous, everything is right, political, social, any other material defects, even the poverty of the land, will all be cured if that Life-blood is pure!
या राष्ट्राचा, राष्ट्रविषयक चिरंतन सिध्दान्त हा खरा भारतीय राष्ट्रवाद आहे!
पाश्चात्त्य देशातील राष्ट्रवाद आणि भारतातील राष्ट्रवाद या दोन्ही विचारांमध्ये फरक आहे. पाश्चात्त्य देशातील राष्ट्रवाद हा हिंसा, स्पर्धा नि विकास हा संघर्षोत्पन्न आहे; या भूमिकेवर आधारित आहे. जगाच्या इतिहासाचे सूक्ष्म अध्ययन केले असता पं. दीनदयाळजी म्हणतात, युरोपीय देशांतील राष्ट्रसंख्या हजार-बाराशे वर्षांपूर्वीच्या निर्माण झालेल्या आहेत. या राष्ट्रांनी राष्ट्रीयतेच्या नावावर मानवतेवर संकटे आणलीत. याला कारण राष्ट्रीय भावना दोषी नसून युरोपीय देशांचा जीवनविषयक दृष्टिकोन जबाबदार आहे. मानवतेचा व्यापक, निकोप विचार न करता, विकासाचा विचार, संघर्षात्मक जीवनस्पर्धात्मक असाच केला. माणूस हा स्वार्थमूलक प्राणी आहे असे गृहीत धरून सर्व सृष्टी, प्राणी, प्रदेश, संपत्ती ही आपल्याच उपभोगासाठी आहे या भीषण संघर्षातून पाश्चात्त्य राष्ट्रवादाचा उदय झाला.
राष्ट्रीयतेचा उदय होण्यापूर्वीच युरोपात उपासना पंथाच्या झेंडयाखाली सांप्रदायिक युध्दे झालीत. भयानक रक्तपात झाला. रोमन सत्तेचा विरोध करत इंग्लंडची राष्ट्रीयता निर्माण झाली. संप्रदाय, आर्थिक प्रभुत्व यासाठी इंग्रज, फ्रेंच लढले. पुढे सीमावादातून फ्रेंच आणि जर्मन लढलेत. इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेन इथे जसा राष्ट्रवाद सुरू झाला तसाच इटली आणि जर्मनीत विकसित झाला. तात्पर्य राष्ट्रवाद समन्वय, सहयोग यातून नव्हे तर संघर्षातून झाला. घृणा, द्वेष आणि विनाश या भूमिकेतून महायुध्दे झाली.
पण भारतातील राष्ट्रवादाचा आधार संघर्ष नसून सहयोग, समन्वय आणि परस्परानुकूलता आहे. तो शेअर होल्डर कंपनीप्रमाणे स्वार्थपोषक, सत्तावादी नाही. तो अखिल मानव कल्याण, सृष्टी संवर्धनाचा हेतू अशा श्रेष्ठ गुणांवर आधारित आहे. भारताचा राष्ट्रवाद हा सहस्रावधी वर्षांचा आहे. याउलट पाश्चात्त्य राष्ट्रवाद हा केवळ काही शतकांचा आहे हे लक्षात घ्यायला हवे. इथे प्रतिद्वंद्वितेऐवजी परस्परपूरकतेचा मंत्रघोष झाला. क्षमा, दया, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य या मानवी विकासाच्या पायऱ्या मानण्यात आल्यात. इथे द्वैताचे, संघर्षाचे नगारे वाजविले गेले नाहीत, तर अद्वैत जीवनाची एकात्मतेची बासरी वाजविली आहे. दोन्ही वाद्येच आहेत, पण स्वरलहरी आणि परिणामकारकता वेगवेगळी आहे.
एक अजून महत्त्वाची बाब अशी की, भारतीय तत्त्वज्ञानांत 'राष्ट्र', राज्य यांच्या विविध पायऱ्या असून आदर्श रचना ही - न राज्यं तैव राजाऽसीत न दण्डयो, न च दाण्डिक : अशी शासनविहीन समाज ही 'आदर्श रचना' मांडली आहे; पण तीसुध्दा परस्परानुकूल आणि सहयोगाची सत्य, अहिंसेवर आधारित 'चक्रवर्ती साम्राज्याची' आहे. पाश्चात्त्य विचारवंतांमध्ये माक्र्सने शासनविहित समाजविचार मांडला; पण तो वर्गसंघर्षावर आधारित होता. माक्र्सप्रमाणेच बाकुनिन (Bakunin), क्रोपोटकीन (Kropotkin) या साम्यवादी विचारकांनीसुध्दा शासनविहित समाजरचना मांडली, पण त्यात राज्यतंत्र कोलमडणे, अनारकीझमची कल्पना आहे. क्रोपोटकीन यांनी स्वायत्त छोटी राज्ये, विकेंद्रित शासनव्यवस्था मांडली आहे; पण हे क्रांतीतून घडेल, असे तो म्हणतो; पण भारतीय तत्त्वज्ञानाला हे मान्य नाही. 'न राज्यं नैव राज्यासीन' ही उत्क्रांत, आदर्श व्यवस्था परस्परानुकूलतेतून धर्म निर्माण करतो, असे भारतीय विचारवंत मानतात. इति दीनदयाळजी ! (रा.जी. दिशा)
दीनदयाळजींनी चितीच्या सिध्दांताद्वारे राष्ट्रभक्तीचा, राष्ट्रविषयक जीवनदर्शनाचा भावात्मक आशय मांडला आहे. राष्ट्राचे पुनरुजीवन याचा अर्थ भूतकालीन जीवन जसेच्या तसे उभे करण्याचा आग्रह नाही. घडयाळाचे काटे उलटे फिरविण्याचा प्रयास उपकारक ठरायचा नाही हे वास्तवाचे भान दीनदयाळजींना होतेच; पण याचा अर्थ असाही नाही की, हजारो वर्षांपासून या देशाने जोपासलेल्या मूल्यांचा, शाश्वतांचा आग्रह धरायचा नाही! नवतेचा स्वीकार आपल्या जीवनमूल्यांशी सुसंगत असायला हवा. नवीन गोष्टींचा स्वीकार हा राष्ट्रानुकूल करून घेऊन स्वीकारायला हवा. आज राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी आपण परलक्षी न बनता आत्मलक्ष्मी बनले पाहिजे. दीनदयाळजींची चिंतनाची झेप अशी मानवकल्याणाची होती. या मानवकल्याणकारी भूमिकेतूनच, एकात्म दर्शनाचा नवा विचार, नवा प्रकाशपुंज दीनदयाळजींनी एकात्म मानव दर्शनातून घडविला ! मी एकात्म दर्शनाचा आधार, पायाभूत राष्ट्रसिध्दांत म्हणून चिती आणि विराट या संकल्पनांची धारणा हाच दीनदयाळजींच्या राष्ट्रचिंतनाचा खरा गाभा आहे.
आज भारताच्या वर्तमान राष्ट्रजीवनाचा विचार करताना असे प्रकर्षाने जाणवते की, या राष्ट्राची चिती क्षीण झाली आहे. आत्मविस्मृततेमुळे, असंघटित अंतःकलह बघितला की वाटते, हा समाज 'विचार-शून्य' झालाय का? चितीच जागृत नसेल, अंतःशक्तीच जागृत नसेल, तर दीनदयाळजी म्हणतात त्याप्रमाणे समाज-विराट-निराधार बनतो, राष्ट्र दुर्बल बनते, शक्तिहीन होते, मूल्य व्यवस्था ढासळते.
अशा वेळी, या राष्ट्राची अस्मिता, चिती राष्ट्राची विराट शक्ती जागविणे, कर्मप्रवण करणे हा पं.दीनदयाळजींचा विचार कालजयी ठरतो. राष्ट्रोत्थानाची दिशा दर्शविणारा हा सिध्दांत एक नव-विचारांचा, नवप्रतिभेचा व नवपुंज वाटतो. जन्मशताब्दीनिमित्ताने दीनदयाळजींच्या दार्शनिक व्यक्तिमत्त्वाला कृतानेक साष्टांग नमस्कार !