कोण म्हणते संघ कामात महिलांचे योगदान नाही?


रामजन्मभूीचं आंदोलन सुरू होतं. तेव्हा पुण्यात नातूबागेच्या मैदानावर स्वर्गीय प्रमोद महाजन यांची सभा झाल्याचं मला आठवतंय. त्या वेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं तीन प्रकारांध्ये वर्गीकरण केलं होतं. फार मजेशीर पद्धतीनं महाजन यांनी तो किस्सा सांगून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या होत्या. कारण संघ स्वयंसेवकांचे नियमित स्वयंसेवक आणि अनियमित स्वयंसेवक असे दोनच प्रकार त्या वेळी माहिती होते. हा तिसरा प्रकार महाजन यांनी कुठून काढला, हे जाणून घेण्याची उपस्थितांना उत्सुकता होती.

महाजन भाषणात म्हणाले, की पहिला प्रकार म्हणजे, ‘नियमित स्वयंसेवक.‘ संघाच्या शाखेवर नियमितपणे येणारे, विविध जबाबदाऱ्या घेऊन काम करणारे, असे नियमित स्वयंसेवक. दुसरा प्रकार म्हणजे, ‘नैमित्तिक स्वयंसेवक.‘ संघाच्या विविध उत्सवांना येणारे, नैमित्तिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणारे आणि सहली किंवा चंदनाच्या (सहभोजन) कार्यक्रमाला जरूर हजर असणारे, असे नैमित्तिक स्वयंसेवक. तिसरा प्रकार म्हणजे, काही घडताच तेथे ‘बेधडकपणे धावून जाणारे स्वयंसेवक.‘ शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांना कोणी त्रास देत असेल, तर त्याचा सामना तशाच पद्धतीनं करणारे असे हे स्वयंसेवक. रामजन्मभूी आंदोलनात तीनही प्रकारच्या स्वयंसेवकांनी उपस्थिती लावली, पण तिसऱ्या प्रकारच्या स्वयंसेवकांनी हे आंदोलन गाजवलं, असं महाजन त्यांच्या भाषणात म्हणाले होते.

हाच मुद्दा मला थोडासा आणखी पुढे न्यायचा आहे. संघाच्या स्वयंसेवकांचा आणखी एक प्रकार मला प्रकर्षानं जाणवतो आणि तो म्हणजे संघाच्या शाखेवर कधीही न येणारी, तरीही संघाबद्दल, संघाच्या कामाबद्दल कायमच सहानुभूती असणारी मंडळी. यामध्ये प्रामुख्याने समावेश करावा लागेल तो संघसहानुभूत महिलांचा. महिलांना संघामध्ये स्थान नाही, अशी टीका कायमच केली जाते. महिलांना शाखेच्या दैनंदिन कामात स्थान नाही, त्यांना संघाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, हे अगदी खरं आहे. कारण महिलांसाठी स्वतंत्र अशी ‘राष्ट्र सेविका समिती‘ ही संघटना आहे. त्यामुळे प्रत्यक्ष संघात महिलांना स्थान असण्याचं काहीच कारण नाही. तशी आवश्यकताही नाही. संघात महिला नसल्या, तरीही संघकार्याचा आज जो विशाल वटवृक्ष उभा आहे, त्यात महिला वर्गाचा वाटा मोलाचा आहे, असं मला वाटतं. किंबहुन संघाची आतापर्यंतची यशस्वी वाटचाल महिलांच्या पाठिंब्यामुळेच होऊ शकली आहे. वाचायला थोडं विचित्र वाटत असेलही, पण महिलावर्गच संघाचा कणा राहिला आहे. त्यामुळे संघामध्ये महिलांना स्थान नाही, असं म्हणणाऱ्यांना संघ कळलाच नाही, असं म्हटलं पाहिजे.

महात्मा गांधी यांची हत्या असो किंवा आणीबाणीसारखी घटना असो, दोन्ही वेळी सरकारने संघावर बंदी लादली आणि हजारो, लाखो संघ स्वयंसेवकांना तुरुंगात धाडले. अनेक घरांमधील कर्ता पुरुषच तुरुंगात होता. आणीबाणीच्या वेळी तर ‘मिसा‘ कायद्याखाली संघ स्वयंसेवक दीड वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते. तरीही त्याची झळ त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्यांना परिस्थितीचा फटका बसणार नाही, याची काळजी त्या त्या घरातील महिलांनीच घेतली होती. त्या वेळी घरातील महिलांनी अजिबात न डगमगता आणि परिस्थितीला शरण न जाता धैर्यानं परिस्थितीला तोंड दिलं. संसाराचा गाडा हाकला. घरातील उत्पन्नाचा स्त्रोत बंद असतानाही घर चालविण्याचं कसब त्या महिलांकडे काही जन्मजात नव्हतं. कदाचित त्या महिला फार शिकलेल्याही नसतील. तरीही त्यांनी कोणतीच तक्रार न करता एकटीच्या जीवावर घर चालविलं. कशाचीच अपेक्षा नाही. फक्त नवरा, मुलगा किंवा भाऊ संघाचं काम करतो म्हणून त्यांनीही त्या परिस्थितीला धैर्यानं तोंड दिलं. महिला वर्गाच्या अशा अजोड समर्पणाशिवाय संघ आज जिथे आहे, तिथे पोहोचू शकला असता का? उत्तर आहे, अजिबात नाही.

प्रपंच करणारे स्वयंसेवक हा संघाच्या कामाचा कणा आहे. हे स्वयंसेवक नोकरी, व्यवसाय सांभाळून संघाचं काम करतात. म्हणजे एकीकडे नोकरी किंवा व्यवसाय सांभाळायचा, संसाराचा गाडा हाकायचा आणि त्यातून वेळात वेळ काढून संघकाम करायचं. बरं, जबाबदारी घेऊन संघकाम करायचं म्हणजे सातत्यानं होणाऱ्या बैठका, वर्ग, शिबिरं, नित्यनूतन कार्यक्रम, उत्सव आणि बरंच काही... या सर्वांसाठी वेळ काढायचा म्हणजे घरातली अनेक कामांची जबाबदारी नकळतपणे घरातल्या महिलेवर आपसूक येऊन पडते. घरातील किराणा भरण्यापासून ते मुलांचा अभ्यास घेण्यापर्यंत. कदाचित कधीतरी खूप आधीपासून प्लॅन केलेली एखादी सहल किंवा कार्यक्रमही ऐनवेळी रद्द करावा लागतो किंवा पुढे ढकलावा लागतो. पण क्षणिक राग वगळता कधीच भुणभूण न करता, या महिला समजूतदारपणा दाखवितात. संसारात पडेल ती जबाबदारी पार पाडतात. संघस्वयंसेवकांच्या घरातील महिला जबाबदाऱ्या नीट पार पाडतात म्हणूनच संघस्वयंसेवक संघाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात.

विषयच निघाला म्हणून एक घटना सांगतो. पुण्यातील संघाच्या एका स्वयंसेवकानं त्याच्या पत्नीच्या लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक छोटेखानी ‘गेट टुगेदर’ आयोजित केलं होतं.  कार्यक्रमाला त्यानं संघाची पार्श्वभूमी असलेल्या भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याला बोलावलं होतं. अनौपचारिक स्वरूपाच्या त्या कार्यक्रमात बोलताना तो नेता म्हणाला, ‘आमचं लग्न झालं, इतकी वर्ष संसार झाला. मुलं स्थिरस्थावर झाली. मार्गाला लागली. पण इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहिल्यानंतर जाणवलं, की अरे, मुलं मोठी होताना मी कुठं होतो? प्रत्येक टप्प्यावर मी कुठं होतो? त्या सगळ्यात माझं योगदान काय होतं? संघाच्या नि पक्षाच्या कामात काही ना काही कारणामुळे व्यस्त असताना माझ्या पत्नीनंच तर संसाराचा गाडा नीट हाकला. मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. म्हणूनच तर सगळं व्यवस्थित झालं. ती नसती तर मला इतक्या मोकळेपणानं संघाचं काम करताच आलं नसतं. तिच्यामुळंच संसारही छान झाला आणि संघाचं, पक्षाचं कामही मला निर्धास्तपणे करता आलं.‘

अर्थात, त्यांनी नव्या स्वयंसेवकांना सल्लाही दिला. मी किंवा माझ्या पिढीनं केली ती चूक तुम्ही करू नका. संघकामाप्रमाणेच संसाराकडेही लक्ष द्या. मी दिलं नाही, असं नाही. पण तुम्ही जरा जास्त द्या. हिंदुराष्ट्र काय होईलच. त्यात शंकाच नाही. पण तुम्ही संघाचं काम करत असताना तुच्या संसाराची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या अर्धांगिनीचे कष्ट हलके करायला विसरू नका. त्या नेत्यानं सांगितलेलं स्वतःचं उदाहरण प्रातिनिधिक स्वरुपाचंच आहे. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात तसं आहे. बहुतांश संघस्वयंसेवकांच्या घरची परिस्थिती तशीच राहिलेली आहे. अशा परिस्थितीत महिलांचं संघकामात काहीच योगदान नाही, असं कोण बरं म्हणेल?

आता पुण्याजवळ ३ जानेवारी रोजी होत असलेल्या शिवशक्ती संगमचंच उदाहरण घ्या. या शिवशक्ती संगमच्या निमित्तानं तिखटमिठाच्या पुऱ्या, चटणी आणि तिळगुळाच्या वड्या यांचा समावेश असलेली शिदोरी (फूड पॅकेट्स) पुणे शहरातून गोळा करण्यात येणार आहे. दुसऱ्या शहरातून आलेल्या जवळपास लाखभर स्वयंसेवक आणि नागरिकांसाठी ही शिदोरी दिली जाणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही शिदोरी किंवा फूड पॅकेटस कोणत्या माध्यमातून गोळा होणार आहे? संघ काही ऑर्डर देऊन अशा प्रकारची पॅकेट्स तयार करून घेत नाही, तर संघाचे स्वयंसेवक आणि संघ विचारांची तसंच संघ सहानुभूत मंडळी यांच्या घरातून ही पॅकेट्स गोळा केली जातील. प्रत्येक वर्षी संघ शिक्षा वर्ग किंवा हिवाळी शिबिरांध्ये चपात्या (पोळ्या) अशाच पद्धतीनं जमविल्या जातात. शिवशक्ती संगमसाठी बदल म्हणजे तिखटमिठाच्या पुऱ्या. अधिक काळ टिकाव्यात म्हणून. पुण्यात १९८३ साली तळजाईच्या पठारावर संघाचं भव्य शिबिर झालं, तेव्हा स्वयंसेवकांसाठी हजारो गुळाच्या पोळ्या जमा करण्यात आल्या होत्या. म्हणजे तेव्हाही संघकामात महिलांचं योगदान होतेच.

काही दिवसांपूर्वी एक ज्येष्ठ प्रचारक भेटले. महाराष्ट्र प्रांतात त्यांचा प्रवास सुरू असतो. त्यांना आलेला एक अनुभव त्यांनी ऐकविला. महाराष्ट्रात फिरत असताना एका स्वयंसेवकांच्या घरी ते गेले होते. त्या वेळी त्या घरातील महिला आणि ज्येष्ठ प्रचारक यांच्यामध्ये गप्पा रंगल्या. घरातील महिला म्हणाली, ‘‘आता तुचा संघ मोठा झालाय का? श्रीमंत झालाय का? तुम्हाला आमची आठवण आता राहिली नाही का?’’ प्रचारकानं आश्चर्यचकित होऊन ‘‘तुम्ही असं का म्हणतायं‘‘, असा प्रश्न विचारला. त्यावर त्या गृहिणीनं उत्तर दिलं, ‘‘पूर्वी आमच्याकडे संघाचे स्वयंसेवक वर्षातून किमान एकदा तरी चपात्या नेण्यासाठी यायचे. आता मात्र, तुम्हाला आमच्याकडील चपात्यांची आवश्यकता नाही बहुधा. कारण आता आमच्याकडे कोणीच चपात्या नेण्यासाठी येत नाही.’’

संघाच्या नैमित्तिक कार्यक्रमांची घरातील महिलांनाही किती सवय झालेली आहे, यासाठी यापेक्षा अधिक उत्तम उदाहरण कोणते देता येईल? नाहीतरी संघाच्या कार्यकर्त्यांचा संपर्क हा चुलीपर्यंत असला पाहिजे, असं संघाच्या बौद्धिकवर्गांध्ये नेहमीच सांगितलं जातं.

चुलीपर्यंत म्हणजे घरातील आजी, आई, ताई, आत्या, मावशी, वहिनी यांच्यापर्यंत संपर्क. त्यांच्या योगदानामुळेच संघ इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळेच कदाचित चुलीपर्यंत संपर्क ठेवण्याची संकल्पना संघात लोकप्रिय झाली असावी.