संघाला विचारायचे सात प्रमुख प्रश्न

माध्यमातला संघ आणि वास्तवातला संघ यांतलं अंतर लवकरात लवकर संपुष्टात येणं गरजेचं आहे, कारण संघ सत्तेत राहून देश बदलण्याच्या तयारीत आहे. संघाची ताकद आणि व्याप्ती पाहता ‘हे होणार नाही’ असं आपण म्हणू शकत नाही. या पार्श्वभूमीवर संघ विचारांच्या मंडळींची महत्त्वाच्या मुद्यांवरची धूसर किंवा परस्परविरोधी भूमिका अस्वस्थ करते, चीड आणते; आणि म्हणूनच साशंकता निर्माण करणाऱ्या  संघाकडून मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टपणे हवी आहेत.



वयाच्या अगदी पाचव्या सहाव्या वर्षीच मला संघाचं अगदी जवळून पहिलं दर्शन झालं. माझे वडील मला पुण्याच्या टिळक रस्त्यावर घेऊन गेले होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या बाजूला पदपथावर आम्ही दोघे उभे होतो. दसरा होता. संघस्वयंसेवकांचं संचलन होतं. शिस्तबद्ध स्वयंसेवक पदं म्हणत एक-तालात पावलं टाकत चालले आहेत, हे त्यावेळचं चित्र माझ्या मनात ५० वर्षं झाली तरी अजूनही स्पष्ट आणि ताजं आहे. संचलनाच्या अगदी सुरुवातीला असलेल्या घोषपथकातील एकानं त्याच्या हातातील घोषदंड खूप उंच उडवला आणि तो चालता चालता त्यानं अगदी सहज झेलला. ह्याचं कौतुक मला पुढे कित्येक वर्ष होतं. मी सुद्धा मग लहानपणी घरी तसं करण्याचा प्रयत्न पुढे बरेच दिवस करत असे. त्यानंतर थोडा मोठा झालो तेंव्हा सांगलीहून माझे आत्तेभाऊ संघशिक्षा वर्गाला यायचे ती आठवण आहे. ते तिथल्या गोष्टी सांगायचे. ते, त्यांचं बोलणं, वागणं, चहाला नको म्हणणं, त्यांचा गणवेष ह्या सगळ्याचंच मला फार अप्रूप होतं. पुढे ते अप्रूपही काही वर्ष टिकलं पण नंतर ते कमी कमी होत गेलं. माझे वडील अगदी लहानपणी संघाच्या शाखेत गेलेले, पण नंतर जाऊ शकले नाहीत. त्यांचे मोठे भाऊ, माझे काका, डॉ. वि. रा. करंदीकर हे तर कट्टर संघाचे. त्यावेळी दैनिक ‘तरुण भारत’चे अध्यक्ष. त्यांनी मला एकदा संघ शिक्षा वर्गाच्या बौद्धिकाला नेलेलं. आमचं राहणं पुण्याच्या सदाशिव पेठेत म्हणजे अगदी संघाच्या वातावरणाच्या आसपास, सध्याच्या पुणे विद्यार्थीगृहात. असं सगळं वातावरण आसपास असलं तरी मला संघानं आकिर्षित केलं नाही. मी आजवर एकही दिवस संघाच्या शाखेत गेलेलो नाही. मी शाखेवर गेलो नाही, ह्याची काही कारणं आहेत.

माझे वडील अनाथ विद्यार्थीगृहाचे. आधी तिथले विद्यार्थी आणि नंतर तिथेच आजीव सेवक होते. त्यांच्या शाळेचे, महाराष्ट्र विद्यालयाचे ते मुख्याध्यापक होते. ह्या संस्थेचे प्रमुख डॉ.ग. श्री. खेर हे जरा आधुनिक विचारांचे, अमेरिकन शिक्षण पद्धतीनं प्रभावित आणि थोडे गांधी विचारानं भारलेले होते. माझ्या बाबांना ते नोकरी करत असल्यानं फार उघडपणे संघात जाता येत नव्हतं. तो काळ १९६५-६६ चा. त्यावेळेस शिक्षणाची, मुलांवर संस्कार करण्याची एक वेगळी पद्धत रूढ होत होती. त्यावर थोडा अमेरिकन प्रभाव होता. माझ्या आईनं तोच थोडा धागा पकडून मला अणि माझ्या बहिणीला महाराष्ट्र मंडळामध्ये घातलं आणि आमचा एक वेगळा प्रवास सुरू झाला, इतका की सर्वसाधारण घरांमध्ये त्यावेळी संध्याकाळी परवचा म्हणण्याची, रामरक्षा किंवा मनाचे श्लोक म्हणण्याची जी पद्धत होती ती आमच्याकडे नव्हती. माझ्यावर त्यामुळे असले कुठलेच पारंपरिक धार्मिक संस्कार झाले नाहीत. श्लोक म्हणण्याऐवजी मला आणि माझ्या बहिणीला माझी आई रेडिओवरील बातम्या ऐकायला सांगायची (१९६५च्या युद्धाचा तो काळ!) किंवा गावांच्या नावाच्या भेंड्या आमच्याबरोबर खेळायची, वृत्तपत्रातील बातम्या ऐकवायची.

त्यावेळच्या घरांमध्ये जे पठडीबद्ध संस्कार व्हायचे, तसे माझ्यावर झाले नाहीत, म्हणूनच कदाचित माझा संघाशी संबंध आला नसावा, म्हणूनच कदाचित राहिलो पुण्यात, तेसुद्धा सदाशिव पेठेमध्ये, पण संघविचारांचा फार स्पर्श तेंव्हा मनाला झाला नाही. माझ्या आईनं तो होऊ नये असा काही विशेष प्रयत्न केला असं नाही पण ह्या एका वेगळ्याच प्रवाहात पडल्यानं तसं काही घडलं नाही; नंतर मग आणीबाणी आली.

विविध विचारांची तरुण मंडळी तुरुंगात जाऊ लागली. देशाचं वातावरण बदललं. आम्हालाही राजकीय आणि सामाजिक विचारांचा स्पर्श झाला आणि मी डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेत जाऊ लागलो. संघाच्या विचारांच्या माझ्या काकांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते फारच अस्वस्थ झाले. माझ्या वडिलांकडच्या नातेवाइकांमध्ये तेव्हा साधारण सुतकी वातावरण होतं. आपल्या घरातला एक मुलगा कम्युनिस्ट होतो, ह्याचं त्या सर्वांना दु:ख आणि वैषम्य वाटत राहिलं. संघाकडे मी अगदी जवळून पाहायला लागलो, थोडं चिकित्सक पद्धतीनं समजून घ्यायला लागलो ते तेंव्हापासूनच.

संघाला ४० वर्षं झाली तेव्हापासून मला संघाचं दर्शन होत आहे. म्हणजे साधारण ५० वर्षं. हे वर्ष तर संघाचं ९० वं. समजा पहिली १० वर्ष लहान होतो म्हणून सोडून दिली, तरी सुमारे ४० वर्षं संघाकडे मी, पाहतो आहे. हे नक्की की समजायला लागलं तेव्हापासून, डाव्या विचारांचा प्रभाव पडल्यामुळे असेल कदाचित, पण संघ विचारांनी किंवा संघाच्या आचारांनी मला मुळीच प्रभावित केलं नाही. ते तसं का घडलं, ह्याची मीमांसा करण्याची ही जागा नाही, पण तसं असलं तरी संघानं ह्या काळात देशातील राजकीय, सामाजिक पटल काही प्रमाणात तरी व्यापलं हे नक्की. आता तर संघाच्या विचारांची असल्याचे सांगणारी मंडळी देशाच्या सत्तेवर बसली आहेत.

आज देशाच्या सत्तास्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार-वारसा सांगणारे विराजमान आहेत.

सर्व देशभर पसरलेल्या, ध्येयवादी स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमातून आज संघ इथवर पोचला आहे. सत्तास्थानी पोचला असला तरी संघाच्या वैचारिक भूमिकांबाबत खूपशी साशंकता आहे, अस्पष्टता आहे, गोंधळ आहे. निदान तसं जाणवतं तरी आहे. त्यांचे काही प्रवक्ते एकतर आकांडतांडव करत काहीबाही बोलत असतात किंवा दुर्बोध संस्कृत-प्रचुर भाषेत आपली भूमिका माध्यमांसमोर मांडत असतात. त्यात काहींची पंचाईत होते, काहींचा प्रांजळपणा समोर येतो, तर काहींना मोदी चालत असलेल्या मार्गाची भलामण करता करता नाकी नऊ आल्याचं स्पष्टपणे दिसतं.

प्रत्यक्षातल्या संघाची माध्यमातील संघाशी गल्लत होते आहे. ही पंचाईत खरंच होते आहे की संघाचा स्वभावच तसा आहे, हे समजत नाही असं झालंय. काही बाबतीत संघवर्तुळात पुरेशी स्पष्टता नसावी असं वाटतंय आणि म्हणून प्रत्यक्षातील संघ कुठला आणि माध्यमातला कुठला, असा वाद घालण्याची आपल्याला गरज वाटते आहे आणि ते योग्यच आहे. म्हणूनच ह्या संदर्भात संघाला सात प्रश्र्न विचारावेसे वाटतात, ज्याची उत्तरं मिळाली की खरा संघ कुठला ते कळेल. ते सात प्रश्र्न असे :

१)आधुनिकतेकडे संघ कसा पहातो?

२)जागतिकीकरण व स्वदेशी ह्या दोन्हीचा संबंध संघ कसा लावतो?

३) संघाची ‘विकासा’ची कल्पना काय?

४)स्त्री-समानतेविषयी संघाचा विचार काय? भूमिका काय?

५)जातिभेदांनी युक्त अशा आपल्या समाजामधील सामाजिक दरी संघ कशी दूर करणार?

६)स्थानिक भाषा की एकच राष्ट्रभाषा किंवा राज्यकारभारात केंद्रीकरण की विकेंद्रीकरण किंवा राज्यांना अधिक अधिकार की केंद्र अधिक बळकट? राज्यकारभार कसा असावा असं संघाला वाटतं?

७) जगाच्या पातळीवर एक संस्कृती संघर्ष चालू आहे. त्या संदर्भात भविष्यातील जग कसं असावं, असं संघाला वाटतं?

इसवी सन २०१५ च्या सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगराचे एक अधिकारी म्हणतात की संशोधनानं हे सिद्ध झालं आहे की महिलांनी तंग कपडे घातल्यानं आणि उंच टाचांच्या चपला घातल्यानं त्यांना आरोग्याचे प्रश्र्न निर्माण होतात, त्यांनी आपल्याकडचे पारंपरिक कपडे घालावेत. (संदर्भ:२० सप्टेंबरचा इकॉनॉमिक टाईम्स)

देशाचे सांस्कृतिक मंत्री महेश शर्मांच्या एका विधानाला पुष्टी देताना त्यांनी हे म्हटलं होतं. त्या अगोदरचं महेश शर्मा महाशयांचं विधान होतं की, ‘हे सरकार सर्व क्षेत्रातील पाश्चात्यीकरणाचा खातमा करणार आहे.’ अशी अनेक विधानं, संघाचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या  अशा राज्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात केली आहेत. कधी ती ऐकून आम्ही गोंधळात पडलो आहे किंवा कधी ती ऐकून मनाचा संताप झालेला आहे, कधी कीव वाटलेली आहे. मोदी सरकार संघाचा वारसा सांगतं आणि त्याची दिशा जी चाललेली आहे, ती आणि संघाचे विचार ह्यांच्यात काही बाबतीत ठार विरोधाभास दिसतो आहे. माहीत नाही, हा खरा विरोधाभास आहे की नुसता आभास आहे ते, पण एक मात्र खरं की माध्यमांतल्या ह्या संघविचारांनी मला तरी फारच चक्रावून जायला झालं आहे. आज संघाच्या विचारांचं सरकार दिल्लीमध्ये असताना माध्यमांमध्ये ज्या प्रकारे संघ आणि संघाच्या विचारांचं दर्शन होतं, ते मनाला आवडत नाही. आज देशाच्या निम्म्यापेक्षा जास्त भागावर संघाचे संस्कार झालेले राज्यकर्ते आहेत. त्यांचं वागणं, बोलणं, काम करणं आणि धोरणांचा पुरस्कार करणं, देशाला पुढे नेणारं, समतोल असणारं, परखड पण आजच्या जगाच्या प्रवाहाशी, युगधमार्शी नातं सांगणारं असावं. पण, तसं होताना दिसत नाही. हे पाहिल्यावर प्रश्र्न पडला की असं का होत असावं?

देशाच्या राजकीय परिस्थितीनं कूस बदलली आहे आणि देश एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोचला आहे त्यामुळे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे कसा? वागतो कसा? आणि संघाचा विचार देशाला कुठे नेऊ शकतो, ह्याचा संपूर्ण विचार, अगदी तर्कशुद्ध पद्धतीनं होण्याची गरज आहे.

जगात इतक्या दीर्घ काळ टिकून राहिलेली, स्वत:ची विचारधारा पक्की ठेवलेली, कडक सांस्कृतिक पाया असलेली आणि सामाजिक जीवनाच्या इतक्या विविध क्षेत्रात, विविध अंगात पसरलेली दुसरी संघटना कदाचित नसावी. तिची कार्यपद्धती विशेष आहे. त्यातून संघटनशास्त्राचे बरेचसे धडे आपल्याला मिळतात. संघाच्या विचारांशी बांधीलकी असणारे स्वयंसेवक, त्यांची कर्तव्यनिष्ठा, चिकाटी, ध्येयवाद आपल्याला चकित करून सोडतात; पण तरीही देशाच्या वाटचालीतील संघाच्या विचारांचं योगदान आत्तापर्यंत तरी म्हणावं तितकं मोठं नाही; आणि मला ह्या गोष्टीचं कायमच आश्चर्य वाटत आलेलं आहे.

संघाच्या स्वयंसेवकांची तुलना देशातील कट्टर गांधीवाद्यांशी, नक्षल-वाद्यांशी किंवा मार्क्सवाद्यांशी किंवा कट्टर ख्रिश्चन अथवा मुस्लीम धर्मवाद्यांशी करता येईल, पण ह्या सर्वांपेक्षा संख्येच्या दृष्टीनं, संघाचे स्वयंसेवक निश्चितच आज खूप जास्त आहेत आणि गेल्या ५० वर्षांच्या देशातील घडामोडी बारकाईनं पाहिल्या तर त्यांची संख्या जास्त, खूप जास्त, पण त्यामानानं देशाच्या मुख्य-धारेवर, देशाच्या प्रगतिपथावर, समाजमनावर प्रभाव कमी असं चित्र आहे. इतकी वर्षं अत्यंत चिकाटीनं काम केलं असलं आणि आता सत्तेपर्यंत पोचले असले तरी संघाला अजून काही मूलभूत बाबींवर आपली स्पष्टता करता आलेली नाही. कित्येक प्रश्र्नांचा थेट वेध घेणं एकतर त्यांनी टाळलेलं तरी आहे किंवा त्याचा योग्य सोक्षमोक्ष त्यांनी लावलेला नाही. आता मात्र संघानं त्याविषयी वैचारिक स्पष्टता दिली नाही तर मात्र कठीण आहे. संघाचं आणि ते सत्तास्थानावर असल्यानं देशाचंही.

आज माध्यमांमध्ये संघ दिसतो तेव्हा त्यातल्या विरोधाभासाचं लख्ख दर्शन होतं, ह्याचं कारण काही महत्वाच्या प्रश्र्नांना फार स्वच्छ अशी उत्तरं संघाने दिलेली नाहीत. ती देण्याचं टाळलेलं आहे. आता मात्र ती उत्तरं त्यांनी देणं आवश्यक आहे; नव्हे, ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे.

त्यात पहिली गोष्ट आहे, आधुनिकता; ह्या आधुनिकतेकडे संघ कसा पाहतो ही. एक गोष्ट आधीच स्पष्ट केली पाहिजे की आधुनिकता म्हणजे वरवरची आधुनिकता नव्हे; म्हणजे फक्त कपडे नव्हे, फक्त राहणीमान, जीवनशैली नव्हे, तर जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी म्हणजे आधुनिकता. समाज प्रवाही आहे, असतो. समाजरचना बदलत जाणारी आहे. तंत्रज्ञान माणसाला, समाजाला आणि समाजातील संबंधांना बदलत नेत आहे. कधीकधी तर वाटतं फरफटत नेत आहे. समाजात व्यक्तिवाद वाढतो आहे. माणसाची जिज्ञासा आणि स्वार्थी लालसा नवनवे शोध लावते आहे. जगभरात असे नवनवे शोध लावले जात असताना जुन्या संकल्पनांना, विचारांना आव्हान दिलं जात आहे. अणुऊर्जा हवी की नको किंवा जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी काय केलं पाहिजे, असे तात्त्विक मुद्दे आहेत. पयार्वरणाचा प्रश्र्न अगदी ऐरणीवर आला आहे. जगातले महत्वाचे देश त्यावर विचारमंथन करताहेत. अशा बदलत्या, प्रवाही, रोज नव्या कल्पना मांडत जुन्या कल्पनांना आव्हान दिलं जात असण्याच्या काळात त्या वृत्तीकडे, त्या जगाच्या रीतीकडे संघ कसा पाहतो आहे?

संघानं ह्या आधुनिकतेविषयी आपले विचार स्पष्ट मांडले पाहिजेत. जीवनाच्या सर्व अंगांना म्हणजे शिक्षणात, राज्य-कारभार करण्याच्या पद्धतीत, कलाक्षेत्रात अशा सर्वत्रातच आज आधुनिकतेचा स्पर्श होतो आहे. त्यामुळे त्याबाबतची आपली भूमिका संघानं पुढे आणली पाहिजे, सविस्तर मांडली पाहिजे. हे जसं आधुनिकतेविषयी आहे तसंच आहे जागतिकीकरणाविषयी. स्वदेशीबाबत संघाचा आग्रह सर्वश्रुत आहे. आपण सर्व तो आग्रह जाणतो. स्वदेशी जागरण मंचला संघानं दिलेली ताकद आपल्याला माहीत आहे.

मात्र आज संघविचारातून घडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस जास्तीत जास्त वेगाने महाराष्ट्राचे अर्थकारण जागतिकीकरणाशी जोडलं पाहिजे म्हणून अथक प्रयत्न करताना दिसताहेत. त्यांनी प्रेरणा घेतली आहे ती मोदींकडून. मोदींच्या आर्थिक मांडणीमध्येही जागतिकीकरणाचा आग्रह आणि अत्यंत वेगानं परदेशी भांडवल देशात कसं येईल, हा आग्रह दिसतो आहे, मग त्यात स्वदेशी ह्या मूल्याचं काय होणार? देशात बनवा किंवा मेक इन इंडिया असं म्हणताना त्यातून स्वदेशीची कास कशी धरली जाणार, ह्याविषयीची अस्पष्टता, काही गंभीर प्रश्र्न येत्या काळात संघापुढे निर्माण करू शकेल. संघापुढे आणि म्हणून देशापुढेही. आधुनिकता, जागतिकीकरण या बरोबरच विकास म्हणजे काय? हे स्पष्ट होणं गरजेचं आहे.

ह्याबाबतही संघानं अजून फार स्पष्ट उत्तरं दिलेली दिसत नाहीत. निदान माझ्यापर्यंत तो विचार अजून आलेला नाही. परकीय भांडवल, खाजगीकरण, मोठमोठे पूल, चकचकीत रस्ते, अधिक उत्पादन, अधिक नफा, अधिक गुंतवणूक, अधिक कारखानदारी म्हणजे विकास असं संघविचार मानतात, असं दिल्लीतील राज्यकत्र्यांचं म्हणणं असल्यासारखं वाटतं. निदान तसं समोर येतं. तसं माध्यमांमध्ये प्रगट होतं. संघविचारांचे पर्यावरण मंत्री जावडेकर देशातील जंगलं वाचवायची असतील तर ती खाजगी उद्योगांना नफा-तोट्याचं गणित मांडूनच काहीतरी होईल असं मांडतात. मग जमीन अधिग्रहणासारखा मुद्दा येतो. राज्यसभेत पुरेसं संख्याबळ नसतानाही तो मुद्दा रेटला जातो आणि मग त्यानिमित्तानं पुढे आलेल्या विकासाच्या चर्चेमुळे, विविध आंदोलनांच्या रेट्यामुळे तो मुद्दा पुन्हा मागे घेतला जातो, असं दिसलं.

विकास म्हणजे संघाला नेमकं काय अभिप्रेत आहे? विकासाच्या केंद्रस्थानी कोण असावं? माणूस की राष्ट्र? की निसर्ग? माणूस असेल तर कुठला माणूस? राष्ट्र असेल तर राष्ट्र म्हणजे काय? तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीनं देशाच्या सीमारेषा पुसल्या जात असताना, फार झपाट्यानं जग एक होत असताना विकासाच्या केंद्रस्थानी राष्ट्र म्हणजे काय? अशांसारख्या प्रश्र्नांची उत्तरं संघानं ताबडतोब दिली पाहिजेत. म्हणजे माध्यमांमध्ये दिली पाहिजेत. कारण माध्यमं समाजाचा आरसा आहेत. संघाबाबतचा समज, संघाची विचारदृष्टी त्यातून आपल्या समोर येईल. तसाच प्रश्र्न आहे देशातील संघराज्य पद्धतीचा. संघ राज्यांकडे कसं पाहतो?

संघ विकेंद्रित राज्यकारभाराचा पुरस्कार करतो की केंद्रित?

प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र संस्कृती आहे, ती संस्कृती त्या त्या भाषेपासून सुरू झाली आहे. ती भाषा ही त्या राज्याची ओळख आहे, म्हणून प्रत्येक राज्याचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे असं संघ मानतो की नाही? आज माध्यमांमध्ये ह्याबाबतची संघाची स्पष्ट भूमिका येताना दिसत नाही. राष्ट्रवाद की प्रांतवाद? की प्रांतवादाबरोबर राष्ट्रवाद? ह्यासारखे मुद्दे आणि त्यावरची भूमिका संघानं स्पष्ट केली पाहिजे.

 संघाचा हिंदीबद्दलचा आग्रह मला फार धोकादायक वाटतो. आपल्या राज्यघटनेनी एक विशिष्ट प्रकारची संघराज्य पद्धती स्वीकारली आहे, त्याबरहुकूम संघ चालणार की संघाला राज्यांची ओळख पुसून टाकून एक भाषा-एक संस्कृती-एक राष्ट्र करायचं आहे, हे समजत नाही. येत्या काही दिवसांत देशातील विविध भागातील प्रादेशिक अस्मिता पुढे येणार, त्यांना संघ काय सांगणार? देशाच्या एकतेसाठी राज्यांची, प्रादेशिक अस्मिता मागे ठेवा असं संघ म्हणणार की ‘ह्या प्रादेशिक अस्मिता आहेत, असणारच म्हणून राज्यांना अधिक अधिकार देऊया’ असं संघ म्हणणार?

स्त्री समानतेविषयी, स्त्रियांना समान हक्क देण्याबाबतची, qलगभेदाबाबतची भूमिकाही संघानं फार स्पष्ट करून सांगितली पाहिजे. मी असं म्हणतो कारण संघविचारांच्या कित्येक प्रवक्त्यांनी ह्याबाबतची फार खळबळजनक आणि प्रसंगी राग आणणारी विधानं केलेली आहेत आणि ही विधानं गेल्या काही वर्षांत, विशेषत: संघविचारांचे लोक दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर केली आहेत. ज्यावरून पंतप्रधान मोदींनाही त्यांच्या सहकारी मंत्र्यांची कानउघाडणी करावी लागलेली आहे. इथेही माध्यमातील संघाची प्रतिमा फार दोलायमान झालेली दिसली. फार स्पष्टता दिसली नाही.

विविध जातींमध्ये आपला समाज विखुरलेला आहे. आज प्रत्येक जात स्वत:च्या सामाजिक आणि राजकीय अस्तित्वासाठी प्रयत्नशील आहे, सत्तेत वाटा मिळण्यासाठी धडपडत आहे. जातींवर आधारित सवलतींसाठी रस्सीखेच चालू आहे, अशा परिस्थितीत गेली ९० वर्षं देशात अव्याहतपणे, ध्येयनिष्ठेनी काम करीत असलेल्या संघाकडे ह्या प्रश्र्नांवर काय उत्तर आहे? सामाजिक समरसता म्हणजे नेमकं काय? समरस होणं म्हणजे प्रत्येक जातीनं आपापली ओळख विसरून एक राष्ट्र म्हणून एक होणं म्हणजे सामाजिक समरसता का?

आज जगात एक प्रकारचा ‘संस्कृती संघर्ष’ चालू आहे. मुस्लीम तरुण जिहाद म्हणून संघटित होऊन अमेरिकेशी संघर्ष करीत आहेत. हा संघर्ष ‘गौरवर्णीय पाश्चात्य ख्रिश्चन विरुद्ध मुस्लीम’ असा आहे. त्यासारखा संघर्ष आपल्या देशालाही करावा लागणार आहे किंवा आपल्याला ह्या संघर्षात काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. ह्याबाबतीत काय आहे संघाचा विचार? ह्यापुढच्या ५०-१०० वर्षांचं जगाचं चित्र संघ कसं पाहतो? भविष्यातील जग कसं असावं, असं संघाला वाटतं? त्या चित्रात आपण कुठे आणि कसे असणार, ह्याबाबतीत संघाचा विचार काय ह्या आणि अशा प्रश्र्नांचीही उत्तरं संघाला द्यावी लागणार आहेत.

मी जे हे प्रश्र्न संघाला विचारले ते खरं म्हणजे मलाही पडलेले प्रश्र्न आहेत. मलाच कशाला आपल्या सर्वांच्याच समोरचे ते प्रश्र्न आहेत. मात्र आज हे प्रश्र्न संघाला विचारण्याची फार आवश्यकता आहे. त्याची दोन कारणं. एक म्हणजे माध्यमांतील संघाची भूमिका फार अस्पष्ट वाटते. त्याबाबतची स्पष्टता यावी म्हणून. आणि, दुसरं म्हणजे, संघ आज सत्तेत आहे आणि सत्तेत राहून देश बदलण्याच्या तयारीत आहे. संघाची ताकद, संघाची व्याप्ती पाहता तसं होणारच नाही असं नाही म्हणून. म्हणून मग माझ्यासारखा ह्या देशाचा नागिरक, ज्याचं ह्या देशावर, इथल्या मातीवर नितांत प्रेम आहे, तो संघाकडून ह्या प्रश्र्नांची स्पष्ट उत्तरं मागू इच्छितो आहे.

कारण मला पुढचा भारत देश कसा असावा, ह्याची काळजी आहे. त्याबाबतची आत्मीयता आहे. आस्था आहे.