अनोख्या संघगीतांचे रसग्रहण

 

शाळेत असतांनाची गोष्ट...स्फूर्तीगीतांची स्पर्धा होती..त्यात मी गाणं म्हणलं, ’आज एकदा पुन्हा सिंहनाद होऊ दे, आज एकदा पुन्हा तुतारी भेरी वाजू दे..’

आमच्या परिक्षक बाईंनी मुद्दाम ते गीत माझ्याकडून लिहुन घेतलं..

हे गीत कोणी लिहिलं, संगीत कोणी दिलं..काही माहित नव्हतं..हे गीत माझे मोठे भाऊ गायचे. त्यांना ते शाखेत शिकवलं गेलं होतं. लहान असूनही त्या गाण्यात काहीतरी वेगळं छान वाटत होतं..म्हणणा-याच्या, ऐकणा-याच्या अंगात जोश यावा, असं ते गीत नक्कीच होतं..

अजूनही माझी मोठी बहिण कुठल्या कार्यक्रमात तिला गाणं म्हणायचा आग्रह झाला, की ती हे गाणं म्हणते,

अमूर्त मूर्त मूर्तीमंत तुजसमान होऊ दे,

येत शरण तव पदासी, देशकार्य विरमू दे ।

सगळं वातावरण त्या शब्दांनी, त्या सुरांनी भारावून जातं..ते शब्द, सूर मनात रेंगाळत रहातात. मनाला मोहिनी घालतात...हे सुद्धा शाखेत म्हणलं जाणारं गाणं.. मोठ्या भावंडाकडून कानावर आलेलं..

हे सर्व सांगायचं कारण म्हणजे शाखेत म्हणल्या जाणा-या गाण्यांनी संघस्वयंसेवकाला तर स्फुर्ती मिळतेच. पण त्याचे कुटुंबियही त्या गाण्याच्या प्रभावाखाली येतात. वर्षानुवर्षे ती गाणी मनाचा कब्जा घेतात.

संघशाखेत गीतांसाठी केवळ ५ मिनिटे वेळ असतो..पण त्या ५ मिनिटाच्या गीताने स्वयंसेवकाला आपल्या जाज्वल्य इतिहासाचे ज्ञान मिळते..आपल्या संस्कृतीची ओळख होते..एकतेची जाणीव होते..आपल्या भुमीशी एकनिष्ठ रहाण्याची प्रेरणा मिळते, मनाची मरगळ, दुबळेपणा तर निघून जातोच..पण मनाला सामर्थ्य मिळते. त्यातील शब्द, चाली इतक्या सुंदर असतात, की एक आनंदही मिळतो. सहज सोपे, पण अर्थपूर्ण शब्द..ज्यात हृदय ओतलेले असते.

आज इतक्या वर्षानंतरही सगळी गाणी मुखोद्गत आहेत. सहजपणे लिखाणातून प्रतिबिम्बित होतात. आता हे गीत बघा,

एकदिलाची सिंहगर्जना दिशादिशातुन घुमते रे,

परचक्राची भीती कशाची, चक्र सुदर्शन फिरते रे ।

या गाण्यातून रामायण, महाभारत का झाले, हे सांगितले आहे. सोन्याची रे लंका जळली, रावण वधिला, सीता सुटली, पतिव्रतेच्या शीलासाठी रामायण हे घडते रे..

महाभारत युद्धात नेमकं काय झालं? सत्यासाठी पांडव लढले,जगावेगळे समर रंगले,महाभारती कृष्ण सारथी, युद्ध करा, हे वदतो रे ...राणा प्रताप, तानाजी मालुसरे, झाशीची राणी यांचा त्याग या गाण्यातून सांगितला गेलायं..त्याग असा रे अपूर्व अपुला, बलिदानाचा दिव्य सोहळा, भारतमाता कौतुक करते, ज्योत भक्तीची जळते रे..अहाहा! काय सुंदर ओळी...!

तसेच हे गीत..

रणी फडकती लाखो झेंडे, अरूणाचा अवतार महा,

विजयश्रीला श्रीविष्णुपरी, भगवा झेंडा एकच हा..।

या गीतात या झेंड्याचे, झेंड्याच्या काठीचे वर्णन खूप सुंदर आहे. ही झेंड्याची काठी कशी आहे, तर,

शिवरायाच्या दृढ वज्राची, सह्यादीच्या हृदयाची,

दर्या खवळे, तिळभर न ढळे, कणखर काठी झेंड्याची ।

गाण्यात जोश तर आहेच, शब्दही लालित्यपूर्ण आहेत. वृत्तात बसविलेले गीत आहे, त्यामुळे चालीत म्हणता येते..

तलवारीच्या धारेवरती, पंचप्राणा नाचविता,

पाश पटापट तुटती त्यांचा खेळ पट झेंड्यावरचा ।

लीलेने खंजीर खुपसता, मोहक मायेच्या हृदयी,

अखंड रुधिरांच्या धारांनी, ध्वज सगळा भगवा होई..

वा..वा..! काय कविकल्पना...!

पूर्ण गीतच अतिशय सुंदर आहे..शेवटची ओळ कळस आहे.

गगनमंदिरी धाव करी

मलिन मृत्तिका लव न धरी,

नगराजाचा गर्व हरी....

भगव्या झेंड्याचं वर्णन यापेक्षा सुंदर कुठे मिळणार आहे?

हे गीत..याला समरगीत म्हणायचं? पण म्हणतांना कसं स्फुरण चढतं.. अंगात एक वीजेची लहर उठते.

"आज एकदा पुन्हा, सिंहनाद होऊ दे,

आज एकदा पुन्हा, तुतारी भेरी वाजू दे ।

युद्धाची वेळ आलीयं.. आता शृंगार, भक्ती, वात्सल्य, कुठल्याही रसापेक्षा वीररस पाहिजे आहे. त्यामुळे गीतात शब्द, भावनाही तीच पाहिजे.

मातृभूमी संकटात आहे. सज्ज तर आपण व्हायलाच पाहिजे.

उत्तरेस गर्जतो, नगाधिराज सांगतो

आग अंतरी प्रचंड, शत्रु मजसी वेढितो

मातृभूस रक्षिण्यास सैन्य सज्ज होऊ दे

आज एकदा पुन्हा तुतारी भेरी वाजू दे ।

हे गीत लिहिलयं तरी कोणी? माहित असतं, तर त्याला नक्कीच साष्टांग दंडवत घातले असते. या स्फूर्तीगीतात अध्यात्मही किती छान सांगितले आहे.

आज स्वप्नभूमी कर्मधर्मभूमी होऊ दे,

सुषुप्तीतुनी जिवाशिवास जाग येऊ दे,

मोहपटल सारूनी, दुरी तमास जाऊ दे

आज एकदा पुन्हा तुतारी भेरी वाजु दे

कधी कधी शत्रु स्पष्ट असतो..पण कधी कधी कळतही नाही, तो आपल्यात लपून बसलेला असतो. तो समाजाला पोखरून टाकतो..समाज खिळखिळा करून टाकतो.

आज लागला सुरुंग, पोखरीत ऐक्य तो,

शौर्य, धैर्य, वीर्य, स्थैर्य, स्वार्थची विनाशितो,

सूर्यबिंब ग्रासण्यास राहु केतु सिद्ध ते

आज एकदा पुन्हा तुतारी भेरी वाजू दे ।

आज कोण जन्मले पाहिजेत?

आज राम कृष्ण आज रामदास जन्मू दे,

आज भरत आज पार्थ शिव मनात जागू दे,

कुरुक्षेत्र भरत भू, पुन्हा पुनीत होऊ दे,

आज एकदा पुन्हा तुतारी भेरी वाजू दे ।

सत्याच्या वाटेवर संघ स्वयंसेवक चालू तर लागलेत. त्यांचे मनोधर्य तसेच राहिले पाहिजे. आणि ते तसेच राहणार, ही खात्री हे गीत देते.

माघार न जन्मात, सारखे होऊ देत आघात..

ध्येयसाधना , अमुचे जीवन,

हर्षित हृदये, स्वार्थविसर्जन,

पशुतेवर ही मात, सारखे होऊ देत आघात..

भेद बेगडी निपटू आता,

शुद्ध मनाने , करु एकता,

हीच यशाची वाट..

संघस्वयंसेवकांना मातृभूमी ही ईश्वरासमान..तिच्यासाठी तन, मन धन, वेचण्याची भावना..संपूर्ण शरणागती दुसरी कोणती असते? या गीतात, किती छान सांगितलं आहे,

अमूर्त मूर्त, मूर्तिमंत, तुजसमान होऊ दे,

येत शरण तव पदांसी, देशकार्य विरमू दे ।

..............................................

आम्हांसी तुची, ध्येय देव,सेवु धरूनी भक्तीभाव,

पूजने तुझ्या आम्हांसी, देवरूप होऊ दे...!

स्वयंसेवकाच्या मनाची जडणघडण अशा गीतातूनच होत जाते. मनाचा निश्चय होतो.आणि त्यांच्या कंठातून हे गीत येते.

यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची,

अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची,

माणसेच ना अम्ही, क्वचित कली शिरायचा,

राखुनी परी विवेक कलह आवरायचा,

शत्रुला प्रवेशिण्या कधी न संधी द्यायची...।

 

खरेच, एकापेक्षा एक सुंदर संघगीते..कोण बरं असेल त्याचा कवी? कोण अशी व्यक्ती, जिला प्रसिद्धीचा, नाव छापून यायचा मोह नाही? अर्थात कवी नक्कीच समर्पित हृदयाचा असणार.. या सर्व कविता त्याच्या हृदयापासून आल्या असणार, म्हणून आपल्याही हृदयाला जाऊन भिडतात. हृदयात ठसतात.

संघाचा स्वयंसेवक हा साधक असतो. प्रार्थना म्हणून मन एकाग्र होते. उदात्त भावनेनं भरुन जातं.. गीतांमुळे कार्यप्रवणता येते. उत्साह येतो, चैतन्य येतं..

या गीतात चुकुनही कुणाची निंदा, अपशब्द नसतात. मनातल्या सुंदर भावनांना जागृत केलं जातं..शब्द, लय, ताल..भाव..सगळचं सुंदर..

शिवाय कधी कधी गंमतही असते.. शब्दांची..

आमी बिघडलो, तुमी बिघडाना..

असं म्हणल्यावर एकदम मनात येतं, अरेच्या, हे स्वतः बिघडले आहेत, आणि ते दुस-याला बिघडायला सांगताहेत? मग लक्षात येतं, ’आमीबी घडलो, तुमी बी घडा ना..! आम्ही पण घडलोयं, तुम्हीपण घडा..!

ही गाणी गुणगुणत स्वयंसेवक मातृभूमीची सेवा करतात. कुठेही संकट येऊ दे..सर्वात आधी मदतीला संघस्वयंसेवक धावून जातात. त्यांच्या मनाची घडण अशी घडविण्यास बौद्धिकाबरोबर या गीतांचाही हातभार असतोच.

अजूनही काही भावपूर्ण गीते,

एक हे वरदान दे, संभ्रमी पार्थास या गीतेपरी तू, ज्ञान दे..

नौजवान सैनिका, उचल पावला, पुढे चला, पुढे चला, ध्वनी निनादला..

शत नमन माधव चरणमें, शत नमन माधव चरणमें

खरोखर असा भाव,गीतात असायला हवा..आपण लिहिलेले गीत मंत्र व्हायला हवे, हीच प्रत्येक कवीची इच्छा असते.. स्वप्न असते. आपण लिहिलेले गीत संघगीत व्हावे.. कोटी कोटी मुखातून उच्चारले जावे, कोटी कोटी मनांचे ध्येयदर्शक व्हावे, स्फुर्तीगीत व्हावे..अमर व्हावे..या संघगीतांसारखे...!