९० वर्षाच्या इतिहासावर एक दृष्टीक्षेप


माझी संघाची पहिली तोंडओळख हैदराबाद येथे झाली. माझ्या वयाच्या १४-१५ वर्षांपर्यंत मी हैदराबाद येथे होतो. त्यावेळी म्हणजे साधारण १९४६ साली हैदराबाद हे निजामाचे संस्थान होते. त्यामुळे तिथे संघाच्या शाखा लागायच्या नाहीत पण आमचे क्रीडा शिक्षक रोजचे खेळ खेळून झाल्यावर प्रार्थना घ्यायचे ती मात्र संघाची प्रार्थना असायची. नंतर मी पश्चिम महाराष्ट्रात शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने आल्यावर माझा संघाशी जास्त परिचय झाला. तेंव्हापासून गेली ६९ वर्षे मी संघाचे काम जवळून बघितले आहे. संघाच्या अनेक कार्यक्रमात मी भाग घेतला आहे. काही कार्यक्रमात व्याख्यानेही दिली आहेत. आज माझ्याकडे संस्कार भारती या संस्थेमध्ये अखिल भारतीय स्तरावर प्राचीनकला संयोजक म्हणून जबाबदारी आहे. 

 संघाच्या ९० वर्षांच्या इतिहासाकडे बघता असे दिसते की सुरुवातीची काही वर्षे निर्वैर होती मात्र भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघावर अनेक संकटे आली. त्यातून संघ जरी तावून-सुलाखून निघाला असला तरी एकूण कामाला जी क्षती पोचायची होती ती पोचलीच. त्यानंतर विशेषतः श्री गुरुजींच्या काळात संघाचा विस्तार विविध क्षेत्रात झाला. विश्व हिंदू परिषदेच्या १९६६ साली भरलेल्या पहिल्या विश्व हिंदू संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून माझे काका कै. धुंडामहाराज देगलूरकर होते. संघापासून प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या विविध क्षेत्रातील संस्था या मला एखाद्या वटवृक्षाच्या दूरवर पसरलेल्या मुळ्यांसारख्या म्हणजे स्थापत्यशास्त्रातील भाषेत बोलायचे तर Buttresses वाटतात. या सर्व संस्थांमुळे संघाचा पाया अधिक भक्कम झाला. याचे प्रत्यंतर आपल्याला अनेक वेळा आले आहे. संघविचारांची मंडळी राजकारणात सुद्धा गेली. श्री गुरुजींनंतर या सर्व संस्थांचे दृढीकरण मा. बाळासाहेब देवरसांमुळे झाले असे मला वाटते. 

 संघाचे देशासाठी/समाजासाठी फार मोठे योगदान आहे. उदा. संघ कार्यकर्त्यांचे / संस्थांचे ईशान्य भारतातील काम - या कामामुळे तेथील लोकांमध्ये भारताबद्दल आपलेपणाची भावना दृढ करण्यात / टिकवून ठेवण्यात संघाचा सिंहाचा वाटा आहे. संघाच्या काही संस्थांमार्फत Students' Exchange Programme अंतर्गत ईशान्य भारतातील विद्यार्थी उर्वरित भारतात येऊन काही वर्षे येथील कुटुंबांमध्ये राहतात, इथल्या चालीरीती, परंपरा यांचा अनुभव घेतात, त्यांचा अभ्यास करतात आणि हा सर्व संचय घेऊन परत आपल्या गावी जातात. या देवाण-घेवाणीतून आपलेपणाची व एकत्वाची भावना दृढ होते. हे काम कित्येक सरकारांनाही जमलेले नाही. दुर्दैवाने संघाला या चांगल्या कामाचे पुरेसे श्रेय मात्र दिले जात नाही. 

 या बरोबरच वनवासी कल्याण आश्रमाचे कामही खूप मोठे व उपयोगी आहे. अशा संस्थांच्या माध्यमातून संघ आज समाजाच्या सर्व थरात पोचला आहे व त्यांनी भारतीय परंपरा व विचारसरणी लोकांपर्यंत पोचवली आहे. याचे महत्व सामाजिक व धार्मिक दोन्ही कारणांमुळे आहे. 

 आपल्या देशात अधिदैविक व अध्यात्मिक अशा दोन्ही शक्ती पहिल्यापासून आहेत. तसेच अधिभौतिक शक्तीदेखील आहे; पण त्यात काही त्रुटी राहिलेल्या होत्या. त्या त्रुटी भरून काढण्याचे मोठे व अतिशय आवश्यक असे काम संघाने केले आहे. उदा. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे "धर्मांतर म्हणजे देशांतर". याचा प्रत्यय आपल्याला १९४७ साली आला. त्यामुळे धर्मावर आधारित संघटन करणे अपरिहार्य आहे हे जाणून संघाने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धर्माची जाणीव व धर्माचे यथार्थ शिक्षण समाजाला देण्याचे काम १९६४ पासून आरंभले आहे. संघटना निर्माण झाली, भगवंताचे अधिष्ठान होतेच पण "सामर्थ्य आहे चळवळीचे" हे प्रत्यक्षात आणले संघाने. हे श्री गुरुजींचे भारतीय पर्यायाने हिंदू समाजावर मोठे ऋण आहे.

 संघाचा हा सर्व Positive प्रवास पाहताना राहिलेल्या काही उणीवाही लक्षात येतात. या चुका बोलण्यामधून होतात. त्यामुळे बोलावे कसे, विरोधी विचारांना मुद्देसूद उत्तर कसे द्यावे, सर्वसामान्यांना कळेल अशा सोप्या भाषेत विषय कसा मांडावा याचे शिक्षण संघाचे स्वयंसेवक व विशेषकरून संघाच्या विविध संस्थांचे प्रवक्ते यांना दिले पाहिजे. एकविचाराने भारलेला समाज निर्माण करताना बोलण्याचे भान असावे. आपल्या वागण्या-बोलण्यातून विरोधकांना खाद्य पुरवू नये असे मला जाणीवपूर्वक सांगावेसे वाटते. प्रसिद्धीपरांड़मुखता हा संघाचा गुण समजला जातो; पण जेंव्हा संघावर आरोप होतात, संघाबद्दल समाजात गैरसमज पसरवले जातात तेंव्हा संघाचे चांगले कार्य लोकांसमोर आणायला पाहिजे असे मला वाटते. 

 आता संघ जागतिक पातळीवर पोचला आहे. अनेक देशांमध्ये संघाचे काम सुरु आहे. त्यामुळे जागतिकीकरणाचा परिणाम संघावर होईल असे वाटत नाही. परंतु बदलत्या काळानुसार मूळ विचारसरणीला धक्का न पोचवता गतिशील कसे व्हावे व अधिक लोकांपर्यंत कसे पोचावे याचा विचार संघाने करावा असे सुचवावेसे वाटते. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील लोकांकरता अजून कार्य करायला पाहिजे. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वात प्रथम संघ धावून जातो. त्या चांगल्या कामाची प्रसिद्धी व्हावयास हवी. प्रत्येक माणसाचा आर्थिक, वैचारिक, धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. 

गेली १०-१५ वर्षे मी इतिहास संकलन समितीचे काम करीत आहे. भारतीय संस्कृतीच्या स्रोतातून घडलेली सामाजिक व्यवस्था व तत्संबंधीचा इतिहास यथातथ्यपणे सबळ पुराव्यानिशी जगासमोर आणायला हवा. इतिहास म्हटला की मतभिन्नता आलीच; पण पुराव्याच्या आधारे सांगितले तर पटते. सध्या इतिहासाकडे प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या सोयीप्रमाणे बघतो. स्वतःला इतिहासतज्ञ म्हणवणारे लोकही इतिहासाची त्यांच्या सोयीप्रमाणे तोडमोड करतात. त्यामुळे सबळ पुराव्यानिशी "हा सूर्य हा जयद्रथ" या भूमिकेतून इतिहास समोर आणला पाहिजे. शेवटी इतिहासातल्या चुकांपासून जो देश शिकतो त्याच देशाचे भवितव्य उज्ज्वल असते हे आपण विसरता कामा नये. 

 संघाला पुढील यशस्वी वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.