मी बी घडलो....


माझ्या ४६ वर्षांच्या आयुष्यातील जवळपास ४० वर्षे मी स्वयंसेवक आहे. संघातला मी आणि माझ्यातला संघ याकडे पाहण्याचा हा प्रयत्न आहे.

 

"एक देव-एक प्रेषित-एक धर्मग्रंथ" हे संस्थात्मक धर्मांचं रुढ प्रतिमान समोर ठेवून आपण जर हिंदुत्वाच्या आकलनाचा प्रयत्न केला तर पदोपदी अडखळणं, दिशाभूल होणं हे आपल्या वाटेला येणार हे जसं नक्की आहे तसंच केवळ पुस्तकं/लेख वाचून, काही विशिष्टच प्रसंग, व्यक्तींचा संदर्भ घेत आपण जर संघाविषयी मत बनवू लागलो तर त्यात उणीवा राहण्याची संभाव्यता खूप जास्त असणार.

संघ माझ्यात रुजत गेला ते सुरुवातीला रोजच्या शाखेतून, नैमित्तिक उत्सवांमधून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे दिसणार्‍या, भेटणार्‍या स्वयंसेवकांच्या वागण्या-बोलण्यामधून. हळूहळू कालानुक्रमे संघाचं ध्येय, विचारसरणी वगैरेंशी परिचय होत गेला. शिबिरांमधून, बौद्‍धिकांमधून, संघशिक्षावर्गातून हा परिचय दृढ होत गेला. याच काळात माध्यमांमधून, भाषणांमधून, व्यक्तीगत संपर्कातून संघाविरोधातले मतप्रवाह, काही मवाळ तर काही अत्यंत कडवट, हेही ओळखीचे झाले. माझ्यावर घडलेल्या संघसंस्कारांचं श्रेय संघस्वयंसेवकां इतकंच संघ विरोधकांनाही आहे. त्यांचे आक्षेप, त्यामागची कळकळ, हेतू या सगळयाचा उपयोग मला आपल्या धारणा तपासून घेण्यासाठी झाला आहे. आज त्या सर्वांविषयी मी कृतज्ञ आहे.

 परं वैभवं नेतुमेतत स्वराष्ट्रं हे संघाचं ध्येय आहे आणि तिथपर्यंत पोचण्याचा संघाने निवडलेला ध्येयपथ हा हिंदुसंघटनाचा आहे. या राष्ट्राचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ ला झाला ही राष्ट्रकल्पना संघाला मान्य नाही. या राष्ट्राची ओळख, अस्मिता याअर्थी हे हिंदुराष्ट्र आहे. इथली राज्यव्यवस्था धर्माधिष्ठित असणं हे संघाला अभिप्रेत नाही आणि मान्यही नाही. राज्यव्यवस्थेचं (विधिमंडळ, शासनयंत्रणा, न्यायपालिका) संचालन हे घटनेला अनुसरूनच व्हायला हवं आणि समोरील व्यक्तीचा धर्म, लिंग, वय, जात या कशाचाही प्रभाव या संचालनावर पडायला नको. राष्ट्रवैभव म्हणजे कोण्या पौराणिक/मध्ययुगीन कालखंडाकडे परत जाणे असे नव्हे तर त्या संचिताचा यथायोग्य उपयोग करत आधुनिक कालसुसंगत वैभव प्राप्त करणे आहे. या राष्ट्राच्या इतिहासात परंपरेत ज्यांचा अभिमान बाळगावा अशा घटना/व्यक्ती आहेत आणि त्याप्रमाणेच ज्याबद्दल लाज वाटावी, चीड यावी असंही आहे.

 राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन त्याआधारे समाजोन्नतीच्या कामांमध्ये आपले योगदान देण्याचे असंख्य मार्ग आहेत. संघ (आणि परिवार) हा त्यातील एक पर्याय आहे. आमच्याच मार्गाने आलात तरच हे सिद्‍धीस जाईल असा प्रेषितोद्भव ह्ट्ट संघाचा नाही. हे करण्याची एकमेव ठेकेदारी आमचीच आहे असंही म्हणणं नाही. "संघावाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान" या गीताबद्द्ल बोलताना मा. प्रल्हादजी (तत्कालीन प्रांतसंघचालक) यांनी हा मुद्दा स्पष्ट केल्याचे मला आजही आठवते आहे. आमच्याशिवाय कोणी हे करूच शकणार नाही हा दर्प आम्हाला आमच्यात नको आहे, कोणी करण्याची वाट न पाहता आम्ही हे आव्हान स्वीकारले आहे हा निर्धार आम्हाला हवा आहे. आमचे विरोधक हे आमचे शत्रू नव्हेत आणि आमचीच ती खरी देशभक्ती हा अहंकारही आमच्याकडे नाही.

 मला कळलेल्या या संघसंस्कारांच्या संपूर्ण विपरीत अशी खूप उदाहरणे दाखवता येती; ती उदाहरणे मलाही माहीत आहेत. माध्यमांमध्ये ती उदाहरणे, त्या प्रतिक्रिया झळकत असतात. आचरणातून, परिचयातून ओळखीचा होत जाणारा संघविचार रुजणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून माणसं घडवण्याचं व्रत स्वीकारलेल्या संघाला काहीअंशी अपयश स्वीकारावं लागल्याच्या या नोंदी आहेत; पण संघसंस्कारांनी घडलेल्या माणसांनी उभ्या केलेल्या, चालवलेल्या अनेक संस्था, प्रकल्प, अगणित सेवाकार्ये यांचा विस्तार या व्रताच्या यशस्वितेची साक्ष देत आहेत.

 समाजजीवनाच्या बर्‍याचशा पैलूंना स्पर्श करणार्‍या संघपरिवारातील अनेक संघटना आहेत. एकेक विषय/ठिकाण निवडून त्यात पाय रोवून काम करणार्‍या संघटना आहेत. आपल्याला यातील काय जवळचे वाटेल ते कार्य निवडून कोणीही त्यात सहभागी होऊ शकतो. ते करण्यासाठी तुम्ही संघविचारांशी बांधीलकी स्वीकारलीच पाहिजे असा आग्रह अजिबातच नाही. आपल्यामध्ये मतभेदांचे मुद्दे असतातच पण काहीतरी समान धागाही असतोच. त्याच्यापासून सुरुवात करू आणि दोन पावलं बरोबर चालू ही लवचिकता आणि चिकाटी हे संघसंस्कारांमधून येतं; कालांतराने आम्ही तुम्हाला आमचं पटवून देऊच हा विश्वासही असतोच.

 राष्ट्रबांधणीचं काम हे एकट्या-दुकट्याचं नाहीच, ते हातात हात घालून, सुरात सूर मिसळूनच करायचं काम आहे. ’परं वैभवं नेतुमेतत स्वराष्ट्रं’ हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न/ध्येय असेलच, असायला हवे. त्या ध्येयावर संघाचा स्वामित्वहक्क नाही. त्या ध्येयाकडे जाण्याची वाट ज्याची त्याची ज्याने तिने अवश्य निवडावी. वाटा वेगळ्या असल्या तरी दिशा एक आहे आणि बराच काळ वाटचाल मात्र सोबत करायची आहे हा संघाचा विश्वास आहे.