संघाची नव्वद वर्षे: समाधान मानायचे का?


इतर संघटना फुटल्या व गेल्या नव्वद वर्षात संघात फुट पडली नाही अशा आशयाचे श्री. रमेश पतंगे यांचे लिखाण पाहण्यात आले. तसे पाहिले तर हे कौतुक करून घेण्याचे कारण आहेच, पण त्यावर् समाधान मानायचे का हा मोठा प्रश्न आहे. कारण नव्वद वर्षे जाऊ दे, स्वातंत्र्यानंतरच्या काळात तरी ही संघटना जेवढी वाढायला हवी होती, तसे झालेले दिसते का, याचा गांभिर्याने विचार व्हायला हवा.

अजूनही संघ पाकिस्तान, अफगाणिस्तानसह अखंड भारत अशा कल्पनांमध्ये अडकून पडलेला आहे. थोडा फरक दिसतो, तो म्हणजे अखंड भारताऐवजी या भुप्रदेशांचे कमीत कमी सहकार्याच्या दृष्टीने एकत्रीकरण तरी व्हावे. पण हेदेखील क्वचितच ऐकू येते.

भारतातील सा-या समाजांचे प्रतिनिधित्व संघ करतो असे चित्र दिसते का? उलट जातीनिहाय संघटना वाढताहेत. दलित व अनेक ओबीसी संघटना तर संघाला त्यांचे शत्रू मानतात, एवढी मोठी दरी त्यांच्यामध्ये आहे. जातपंचायती, खाप पंचायती यांना वेसण घातली जात असल्याचे दिसत नाही.
गुरूजींची काही मते आजच्या संदर्भात लागू होणार नाहीत. मनुस्मृतीतील अन्यायी संदर्भ दलित किंवा हिंदूविरोधक जसे उठसुट काढून फडकावताना दिसतात, तसेच गुरूजींच्या काही मतांबद्दलही केले जाते. संघ त्याबद्दल कधीही जाहीर प्रतिवाद करताना दिसत नाही, त्यामुळे या विरोधकांना आपोआपच कोलित मिळते. कोणी प्रतिवाद करताना दिसलेच, तर तोही आडवळणाने केला जातो, किंवा तो अनेकदा इतका लंगडा असतो की कोणाचाही त्यावर विश्वास बसू नये. त्यांची काही मते सद्यपरिस्थितीत लागू होत नाहीत हे मान्य करण्याचे धैर्य कोणाकडेही दिसत नाही. त्यांची सारीच मते आताच्या संघाच्या सा-याच मोठ्या नेत्यांना मान्य असतील असे नाही, पण शिस्तीच्या नावाखाली ते उघडपणे बोलण्याचे धैर्य त्यांच्यात नाही हे निश्चित. या दुष्टचक्रामधून बाहेर पडून समाजातील सा-या घटकांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये त्यामुळे खिळ बसते व दुर्दैवाने अशा मूलभूत मुद्द्यांबाबत संघनेतृत्व काही करताना दिसत नाही.

शिवाय तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अनेक संघटना आहेत, त्या अनेक तोंडांनी बोलत असतात. अनेकदा देशाच्या घटनेच्याविरोधी वक्तव्ये केली जातात. संघ त्यांना गप्प बसवताना दिसत नाही, त्यामुळे आधीच असलेले संशयाचे वातावरण अजिबात कमी होण्यास मदत होत नाही. केवळ हिंदुत्व-हिंदुत्व म्हणजे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे हे त्यामुळे लोकांना कळत नाही, उलट त्यांच्या अनेकदा गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमुळे चुकीचा संदेश लोकांपुढे जातो. अशा परिस्थितीत सारा हिंदू समाज तर सोडाच, पण बहुतांश हिंदू समाज तरी संघाबरोबर जाईल याची अपेक्षा कशी करत येईल?
जातपात नष्ट करण्यासाठी कोणतेही भरीव प्रयत्न केले जात नाहीत. सामाजिक समरसता अशे लोभस नाव दिले व मधूनमधून त्याचा उद्घोष केला म्हणजे समाजातील सा-या घटकांना विश्वासात घेतले जाते अशा समजात राहून चालणार नाही. प्रत्यक्ष कृती दिसायला हवी. आता समविचारी सरकारच केंद्रामध्ये असताना याबाबतीत भलेही काही अप्रिय निर्णय घ्यावे लागले तरी ते घेण्याची हिम्मत का कोण जाणे पण दिसत नाही.
संघाचे सदस्य नसलेले; मात्र संघाबद्दल आत्मियता असलेले अनेक जण समाजात आहेत, पण अनेक वेळा घेतल्या जाणा-या विसंगत भुमिकेमुळे संघाला पाठिंबा देण्याचे त्यांचे धाडस होताना दिसत नाही.
संघामध्ये पारदर्शकपणा अजिबात नाही. सारे निर्णय नेहमीच वरून खाली येताना दिसतात. त्यात कार्यकर्त्यांची मते, सहानुभूतीदारांची मते लक्षात घेतली जाताना दिसत नाहीत. एवढेच काय, संघाला विरोध करणा-यांची मतेही संघटनेत सकारात्मक बदल घडवून आणताना दिसत नाहीत, उलट अशा मतांविरूद्ध संघटनेत धृवीकरण होताना दिसते. त्यामुळे आपल्या मतांचे पुरावलोकन होणे हे तर सद्यस्थितीत अशक्यच.
आज भाजपचे सरकार आहे, त्यामुळे संघाचा उच्चार आधी कधी नव्हता एवढा ऐकू येत आहे. ही सत्ता पुढच्या निवडणुकांच्यावेळीही आणणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. काहीही कारणाने पुढच्या निवडणुकांमध्ये हे शक्य झाले नाही, तर संघाचा विस्तार पुन्हा एकदा मंदावेल.

संघामध्ये लोकशाही आली की पारदर्शकपणा आपोआप येईलच. पारदर्शकतेमुळे लाथाळ्या सुरू होतील, वेगवेगळे मतप्रवाह उघड होतील, या भितीपोटी ती नकोच हे म्हणणे योग्य नाही. पण त्यातूनच विश्वासार्हता वाढेल आणि सामाजिक पाया विस्तारता येईल. भारतीय विचारांच्या दलित व विविध समाजातील नेत्यांना संघटनेत मानाचे स्थान द्यावे लागेल. भलेही त्यासाठी त्यांना संघटनेबाहेरून आणावे लागले तरी. ते करायचे झाले की आधी त्यांच्या अतिशय अवघड प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील, त्याची तयारी ठेवावी लागेल. दिसते का हे करण्याची कोणाची तयारी?

प्राचीन संस्कृतीचा आदर मनात ठेवतानाच पुराणातली विमाने, गणपतीचा ब्रेन/हेड ट्रान्सप्लॅंट, वगैरे गोष्टी पुराणातच ठेवावी लागतील. कोणत्याही भंपक गोष्टींना विज्ञानाचा मुलामा चढवून त्या लोकांच्या गळी उतरवण्याचा जो प्रयत्न केला जाताना दिसतो, तो कोणालाच कसा दिसत नाही? वाटते का की आताच्या संघाच्या नेत्यांची तयारी असेल या गोष्टीला?

समाजातील अंधश्रद्धा दूर झाल्याशिवाय या समाजाचे व पर्यायाने देशाचे भले होणे केवळ अशक्य. संघाची ताकद पाहता त्यांना हिंदू धर्मातीलच काय, पण तर धर्मातील अंधश्रद्धांना हात घालणे शक्य व्हावे. पण मुळात या स्फोटक गोष्टींना हात घालण्याची हिम्मत तरी हवी ना!

वर म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मियांमध्येच संघाला स्वत:बद्दल विश्वास निर्माण करता येत नाही, तेव्हा हिंदुत्वावादी भुमिकेमुळे इतर धर्मियांमध्ये अविश्वासाची भावना असणे तर अगदीच नैसर्गिक. उठसुट काही झाले की पाकिस्तानात जा अशा वक्तव्यांमुळे याबाबतीत देशाचे काय भले होणार आहे? इतकी वर्षे कॉंग्रेसप्रणित भंपक सर्वधर्मसमभावामुळे इतर धर्मीय लोकांचे केवळ तुष्टीकरण झाले असे म्हणत असताना त्या धर्मातील कडव्या लोकांना बाजुला सारून तरूणांना, महिलांना साद घालण्याची त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची संघाची तयारी दिसते का? तसा प्रयत्न दिसतो का? अन्यथा शिवसेनेसारख्या संघटनेप्रमाणे; ज्यांना हिंदुत्व म्हणजे काय हेच माहित नाही, केवळ भगवा टिळा लावून आणि भगवा झेंडा हातात घेऊन इतर धर्मियां मध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करत, सामाजिक सौहार्दासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी महाआरतीसारखे पराक्रम करून दोन्ही धर्मियांच्या भावना भडकावणे हीच संघाचीही हिंदुत्वाची कल्पना आहे असे संघाबाहेरील हिंदूंनी व इतर धर्मियांनी समजायचे का?

तेव्हा जोपर्यंत संघाकडे आधुनिक विचारांचे नेतृत्व येत नाही आणि बुरसटलेल्या विचारांची खोडे बदलली जात नाहीत, तोपर्यंत संघाची खरी व मोठी वाढ होणे अशक्य! त्यामुळे नव्वद वर्षांनंतर संघ अस्तित्वात आहे याबद्दल कोणाला अभिमान वाटत असेल, तर तो केवळ संघटना टिकण्यापुरताच आहे असे खेदाने म्हणावे वाटते. केंद्रात समविचारी सरकार असल्यामुळे कधी नव्हे ते संघटनावाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे, पण एकूणच विविध आघाड्यांवरील आपल्या भुमिकांचे पुनरावलोकन करण्याची इच्छा नसल्यामुळे फार बदल होताना दिसतील असे वाटत नाही.

यावेळच्या दस-याच्या निमित्ताने सरसंघचालकांनी केलेल्या भाषणामध्ये वर उल्लेख केलेल्या काळजीच्या विविध मुद्द्यांवर विशेष भर दिसला नाही, त्यामुळे ही मोठी संधी गमावल्यासारखे वाटते.

अखेर देशहिताचा निर्णय कोणी मुठभर लोक पोलादी पडद्यामागे राहून करू शकतील आणि देशाच्या जनतेच्या गळी उतरवू शकतील असे संघाला वाटते का? तेही स्वत:बद्दल आधीच संशयाचे वातावरण सभोवताली असताना! तेव्हा स्वत:बद्दलचे संशयाचे वातावरण निवळण्यासाठी संघ लवकरात लवकर प्रभावी पावले उचलेल ही अपेक्षा व त्यासाठी शुभेच्छा!