गरज माध्यमस्नेही होण्याची!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दीर्घकाळ टिकलेलं आणि नित्य वर्धिष्णू असलेलं जगातील एकमेव संघटन. या दीर्घायुष्यातच संघटनेची वैशिष्टयं अनुस्यूत आहेत. अशा या संघटनेला वयाच्या नव्वदीत 'मंथन'च्या रूपाने विचारमंथन करावंसं वाटावं, ही बाब स्वागतार्ह आहे. हे संघटन, नव्या विचारांच्या नव्या मनूचं स्वागत करण्याच्या मानसिकतेत असल्याचं द्योतक आहे. अशा चर्चेत सहभागी होणं हे आनंददायी आणि जबाबदारीचं काम आहे, असं मी मानते.


'संघ आणि माध्यम यांचं नातं कसं आहे, कसं असावं?' या संदर्भात मत नोंदवण्याआधी, माझं संघाशी नातं काय, त्याच्या बृहद् परिवारातील संघटनांशी माझा कसा संबंध आला हे सांगणं उचित ठरेल. त्यामुळे लेखन थोडं आत्मपर होईल हे खरं, पण त्याला इलाज नाही.

आमचं घर संघाचं नाही, पण कायमच 'संघ हितचिंतकाचं' राहिलं आहे. संघाचा बालेकिल्ला म्हणून ज्याचा लौकिक वर्षानुवर्षं टिकून आहे, अशा डोंबिवली शहरात मी लहानाची मोठी झाले. आजही वास्तव्य याच शहरात. त्यामुळे संघाचं वातावरण दृश्य-अदृश्य स्वरूपात आवतीभोवती कायमच राहिलं. वडील संघसंबंधित कोणत्याही संस्था-संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते नव्हते, पण ते त्यांच्या लहानपणी संघशाखेत गेलेले असल्याने संघाचे हितचिंतक, संघसमर्थक होते...आजही आहेत. घरातल्या आणि बाहेरच्या वातावरणाचा संस्कार झाला आणि मीही संघ हितचिंतक बनले.

बँकिंग क्षेत्रात असलेल्या आमच्या बाबांना भेटायला प्रभात शाखेतले दोन-चार ज्येष्ठ स्वयंसेवक महिन्यातून एकदा तरी घरी येत. त्यांची घरी येण्याची वेळही ठरलेली असायची - सकाळी ७.३० ते ८.३०च्या दरम्यानची. हा रिवाज वर्षानुवर्षं चालू राहिला. यातून एक गोष्ट मनावर कायमची ठसली, ती म्हणजे संघ स्वयंसेवकांचं संपर्ककौशल्य, त्यातून होणारे व्यक्तिगत संस्कार. एकदा परिचय झालेल्या व्यक्तीच्या आणि त्याच्या घराच्या संपर्कात राहण्यातलं त्यांचं सातत्य, त्या घरातील सर्व सदस्यांशी अकृत्रिम संवाद साधण्याचं कौशल्य आणि योग्य वेळी योग्य व्यक्तीला आपल्या कामाशी जोडण्याची संघ कार्यकर्त्यांची योजकता मी लहानपणापासून अनुभवली.

अशा अनुभवांमधूनच संघाशी संबंधित माणसं ही चांगली असतात, हे लहानपणापासूनच मनावर ठसलं गेलं. त्यामुळे एखादी व्यक्ती 'संघात जाणं' या कृतीला आपोआपच 'कॅरेक्टर सर्टिफिकेट'चं मोल आलं. संघाविषयी हे मत बदलावं असं अद्याप तरी काही घडलेलं नाही.

मात्र, इतका आदरभाव असतानाही संघाच्या विशाल परिवारातल्या राष्ट्र सेविका समितीत जाण्याचा आग्रह/जबरदस्ती आम्हा बहिणींना कधी झाला नाही, हे आमच्या घराचं वैशिष्टय. अपवाद एकच... चिपळूण इथे १९८५ साली झालेल्या राष्ट्र सेविका समितीच्या संमेलनाचा. या संमेलनाला मात्र माझ्या आईने मला आग्रहाने पाठवलं. पहाटे उठायला कायमच नाखूश असलेल्या मला तिथल्या कडाक्याच्या थंडीत उठणं अंमळ जडच गेलं, पण काही सत्रं आवडली. आज त्याचा तपशील काही लक्षात नाही, पण त्या गर्दीचं भारलेपण मनावर कोरलं गेलं ते कायमचं.

मी कॉलेजला असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकदम फॉर्मात होती. अभ्यास वगैरे सांभाळून अतिशय निष्ठेने आणि तळमळीने काम करणाऱ्या अगणित विद्यार्थ्यांची भलीमोठी फौज परिषदेकडे होती. त्या कामाबद्दल कौतुक असलं,तरी सक्रिय होण्याचं कधी मनातही आलं नाही. (तेव्हा मला वाटतं, २ रुपये सदस्यता शुल्क होतं. प्रश्न शुल्काचा नव्हताच. पण ते दिलं की आपल्याला कार्यकर्ताच व्हावं लागेल आणि तो आपला पिंड नाही, असं तेव्हा वाटत असे. एकदा कॉलेजच्या गेटवरच सदस्यता शुल्क घेण्यात आलं, तेव्हा ते देतानाही आता आपल्याला ही मंडळी आता कामात ओढणार याचंच टेन्शन होतं. मला चांगलं आठवतंय - पुढचे काही दिवस अभाविपचे कार्यकर्ते शेजारून गेले, तरी माझी धडधड वाढायची..)

तृतीय सरसंघचालक प.पू. बाळासाहेब देवरस यांनी या संदर्भात केलेलं दिशादिग्दर्शन....
या लेखाच्या निमित्ताने जी मांडणी केली आहे, ती नवीन नाही. तरुण भारतची पुणे आवृत्ती सुरू करण्यासंदर्भात 1957मध्ये जी बैठक झाली, त्या बैठकीत प.पू. बाळासाहेब देवरस यांनी परिवारातील वृत्तपत्रांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्या आज प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे. ते म्हणतात, ''हे दैनिक संघ कार्यकर्त्याने काढले असले, तरी तुमच्या कामामुळे नजीकच्या भविष्यकाळात आपले दैनिक बहुजन समाजाचे वृत्तपत्र झाले पाहिजे. यासाठी केवळ संघ, जनसंघ यांच्याच बातम्या देण्याचे धोरण ठेवू नका. सर्व समाजाच्या सुखदु:खाचे प्रतिबिंब, समाजाच्या आशा-आकांक्षा या सर्वांचे चित्र आपल्या दैनिकात उमटले पाहिजे. असे घडले, तरच समाजाच्या सर्व स्तरातील लोक आपले दैनिक स्वेच्छेने विकत घेतील. आपल्या दैनिकाला संघाचे बुलेटिन बनवू नका! या दैनिकाच्या माध्यमातून आम्हाला संघाचे विचारही मांडावयाचे आहेत. पण आपले हे विचार समाजाच्या तळापर्यंत पोहोचायचे असतील, तर ज्यांना संघविचार माहीत नाहीत अगर जे संघाचे विरोधक आहेत, त्यांच्याही घरात आपले दैनिक पोहोचले पाहिजे. पुणे तरुण भारत चालविण्यामध्ये आपण हे सूत्र कधीही दृष्टिआड करू नये.''
( संदर्भ : सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित ग्रंथ ‘द्रष्टा संघटक बाळासाहेब देवरस’ मधील ‘वृत्तपत्रचालक बाळासाहेब’ या प्रकरणातून, पान क्रमांक ७४)

नंतर काही वर्षांनी भारतीय स्त्री शक्तीच्या कामात अगदी अपघाताने ओढले गेले. या कामाचा विषय जिव्हाळयाचा आणि तिथल्या सगळया कार्यकर्त्या समविचारी, कालसुसंगत विचार करणाऱ्या होत्या, त्यामुळे ९ वर्षं विविध जबाबदाऱ्या घेत कामही केलं. या कालखंडात एक कार्यकर्ती म्हणून शिस्तबद्ध सामाजिक कामाशी माझा पहिला परिचय झाला. कामासाठी संपर्कातलं सातत्य किती महत्त्वाचं असतं याची जाणीव झाली. काम करताना स्वत:तल्या क्षमता आणि कल ओळखण्याची संधी मिळाली. संघर्षात्मक कामापेक्षा प्रबोधनात्मक, विधायक कामाकडे आपला कल आहे, हे लक्षात आलं. आणि संघटनेच्या कामात विविध क्षमतांची गरज असते, त्यासाठी योग्य माणसं हेरावी लागतात, जोडावी लागतात हे समजलं. माझ्याबरोबर स्त्री शक्तीच्या कामात असलेल्या बहुतेकींना विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी होती, तर काहींच्या घरात संघ-समितीत काम करणारी माणसं होती. माझ्यासारखी पाटी कोरी असलेल्या खूपच कमी. तरीही या सगळ्यांनी पठडीबद्ध विचार न करण्याच्या माझ्या स्वभावासकट मला सामावून घेतलं, हे त्या सर्वांचं मोठेपण आहे. इतकंच नव्हे, तर शिक्षणक्षेत्रात काम करायचं या विचाराने ज्ञान प्रबोधिनीचं काम करण्यासाठी, कोणतेही मतभेद न होता मी स्त्री शक्तीच्या कामातून बाहेर पडल्यानंतरही आमच्यातला स्नेह अतूट राहिला.

संघविचारांचा उपहास हेच माध्यमांचं वैशिष्टय

पुढे करिअरची दिशा स्पष्ट झाल्यावर, पत्रकारितेत राहायचं नक्की झालं आणि मी संघ परिवारातल्या नियतकालिकांशी जोडली गेले.. आधी मुंबई तरुण भारत आणि नंतर साप्ताहिक विवेक. या दोघांच्या मध्ये आकाशवाणीसाठी लेखन, तर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तविभागात काही काळ काम केलं. पत्रकार म्हणून माध्यमांच्या जगात वावरायला लागल्यावर विशेषत्वाने एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे संघविचारांची होणारी हेटाळणी, प्रसारमाध्यमांमधून संघविचारांचं/संघकार्याचं होणारं वरवरचं, बेजबाबदार चित्रण... आणि अशा नियतकालिकांची पार्श्वभूमी असलेल्या पत्रकारांच्या वाटयाला येणारा उपहास. याबद्दल मनात खंत होती आणि माध्यमात संघासंबंधी असं वातावरण का? हा विचारही मनात चालू होता. ते व्यक्त करण्याची संधी 'मंथन'मुळे मिळाली. म्हणूनच जे जाणवलं, खटकलं आणि संघश्रेष्ठींपर्यंत पोहोचवावंसं वाटलं, ते पोहोचवायची संधी आज साधते आहे.

तत्पूर्वी एक गोष्ट आवर्जून नमूद करायला मला आवडेल. साप्ताहिक विवेक या संघविचारांशी जवळीक असलेल्या एका सुस्थापित, दीर्घायुषी नियतकालिकाची कार्यकारी संपादक म्हणून आज माझ्यावर जबाबदारी आहे. ही जबाबदारी आली, तेव्हा संघाशी संबंधित असलेल्या देशभरातल्या अन्य कोणत्याही नियतकालिकामध्ये महिलेला हे पद देण्यात आलेलं नव्हतं. या पदासाठी माझ्या नावाचा विचार होताना, कोणत्याही प्रकारच्या संघकार्याशी माझा थेट संबंध नसणं ही गोष्टही आड आली नाही, हे मला विशेष वाटलं. संपादक म्हणून माझ्या निर्णयस्वातंत्र्यावर किंवा विषय वा लेखक निवडीच्या स्वातंत्र्यावरही आजवर गदा आलेली नाही, हेही आवर्जून सांगावं लागेल.

डाव्यांचा प्रभाव आणि संघाची उदासीनता

माध्यमांमध्ये संघाविषयी असं नकारात्मक वातावरण असण्याला मुख्यत्वे कारणीभूत आहे ती, तथाकथित डाव्या विचारसरणीची माध्यमांवर असलेली पकड आणि संघाची, तसंच संघपरिवाराची माध्यमांविषयी असलेली उदासीनताही.

'आपण आपलं काम करत राहावं, प्रसिद्धीचा विचार करू नये' ही शिकवण संघ कार्यकर्त्यांच्या हाडीमांसी भिनलेली. त्यामुळे प्रसिद्धिसमुखता म्हणजेच प्रसिद्धिलोलुपता हे समीकरण डोक्यात पक्कं बसलेलं. प्रसिद्धिपराङ्मुखता हा एकेकाळी संघाचा गुणविशेष असेलही; पण 'जो छपता है, वो बिकता है।' अशी मानसिकता असलेल्या आपल्या समाजात हा गुणविशेष कालसुसंगत आहे का, याचा विचार व्हायला हवा.

शाखांच्या माध्यमातून सुसंस्कारी पिढ्या घडवण्याचं काम आजवर संघाने केलं. मात्र हे संस्कार व्यक्तिगत स्वरूपाचे होते. प्रसारमाध्यमं सामूहिक संस्कार करण्याचं प्रभावशाली साधन आहे आणि आजच्या काळात ते गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन या विषयासंदर्भात नव्याने विचार करण्याची गरज आहे असं वाटतं.

इथे संघ असं वारंवार म्हणताना रा.स्व. संघ ही शिखर संघटना आणि तिचं मातृत्व मानणाऱ्या, तिच्या विस्तीर्ण छायेत काम करणाऱ्या सर्व संस्था/संघटना म्हणायचं आहे, हे लक्षात घ्यावं.

राजकारण असो वा समाजकारण.. दोन्हीसाठी आज प्रसारमाध्यमं कळीची भूमिका बजावत आहेत. त्यांचं महत्त्व वादातीत आहे. अशा काळात वावरताना 'प्रसिद्धिपराङ्मुख' राहण्याची पारंपरिक भूमिका संघाला त्यागावी लागेल आणि आजच्या संदर्भात माध्यमांचं, त्यातून होणाऱ्या समूहसंपर्काचं महत्त्व लक्षात घ्यावं लागेल. इथे माध्यमांचं महत्त्व लक्षात घ्यावं म्हणताना, माध्यमांचा अनुनय करावा असं अजिबात म्हणायचं नाही. त्याची संघाला गरजही नाही. मात्र माध्यमांची जनमानसावर असलेली पकड लक्षात घेऊन याचा प्रभावीपणे उपयोग करण्यासाठी, आपलं काम - आपले विचार योग्य शब्दांत पोहोचवण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.

संघाच्या प्रसिद्धिपराङ्मुखतेमुळे सोयीस्कर अर्थ काढायच्या भरपूर संधी आजवर बाकीच्यांना मिळाल्या आहेत. त्याने संघप्रतिमेवर विपरीत परिणाम झाला आहे, हे लक्षात घेऊन पावलं उचलायला हवीत.

काही प्रश्न...

या संदर्भात काही प्रश्न समोर ठेवावेसे वाटतात.

पत्रकारितेकडे किंवा माध्यमांच्या या जगाकडे पाहण्याचा संघाचा दृष्टीकोन नेमका कसा आहे?
बदलत्या काळाबरोबर माध्यमांचे बदललेले प्रवाह, नव्याने सामील झालेले काही प्रवाह याची नोंद घेतली जाते का?
प्रसारमाध्यमांचं किंवा नियतकालिकांचं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं लोकशाहीतलं स्थान, सर्वसामान्यांच्या मनावर त्यांचा होणारा परिणाम संघात किती गांभीर्याने घेतला जातो?

व्रत आणि व्यवसायही!

पत्रकारिता हे एक व्रत खरं, पण आजच्या काळात तो एक व्यवसायही (धंदा नव्हे!) आहे, हे आपण मान्य करायला हवं आणि त्यानुसार दृष्टीकोन बदलायला हवा. व्यवसाय आहे हे वास्तव एकदा स्वीकारलं की व्यवसायाचे नियम या क्षेत्रालाही लागू होतात आणि व्यावसायिक स्पर्धा अटळ होते.

माध्यमजगताचे स्वत:चे असे नियम आहेत. वर्षानुवर्षं ते पक्के झालेले आहेत. ते बदलावे असं वाटत असेल तर माध्यमांच्या या खेळात उतरायला हवं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा. आपलं सामर्थ्य सिद्ध करून या खेळाचे नियम बदलण्याची सूत्रं स्वत:कडे घ्यायला हवीत.

संघ समाजव्यापी व्हावा, तो इतका की संघ आणि समाज हे द्वैत उरू नये ही पूर्वसुरींची विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी संघाने समाजव्यापी प्रसारमाध्यमं आपलीशी करायला हवीत. लोकांची मानसिकता ओळखून आपल्या विचारांचा प्रसार इतका मर्यादित विचार न करता, एक अभिरुचिसंपन्न भारतीय समाज घडवण्यासाठी माध्यमांचा कसा उपयोग करता येईल याचा विचार व्हावा. अन्यथा त्याला संघटनेच्या मुखपत्राचं स्वरूप आलं तर सर्वसामान्य माणूस चार हात लांब राहील, तर कार्यकर्ता वर्ग 'याची आपल्याला आवश्यकता नाही' असं वाटून लांब राहील. तेव्हा हा धोका लक्षात ठेवून कार्यपद्धती निश्चित व्हायला हवी. विचारधन पोहोचवणं जसं महत्त्वाचं, तसं लोकांच्या दैनंदिन आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात साहाय्यभूत ठरणंही महत्त्वाचं, याचं भान राखायला हवं.

आर्थिकदृष्ट्या फायद्यात चाललेली नियतकालिकं वा वाहिन्या अगदी मोजक्याच असतात. कारण हा व्यवसाय असला, तरी इथली आर्थिक गणितं अन्य व्यवसायांपेक्षा वेगळी, उफराटी वाटावीत अशी असतात. त्यामागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. आणि वस्तुस्थिती अशी असली तरीही त्याच्याकडे पाठ फिरवणंही सोयीचं ठरणारं नाही. याचं कारण म्हणजे प्रसारमाध्यमातून विचारांचा होणारा प्रसार, जनमानस तयार करण्याची त्यांची ताकद. एकदा राजकीय परिवर्तन घडलं आणि सत्तापालट झाला की तो टिकवण्यासाठी प्रसारमाध्यमं मोठी भूमिका बजावत असतात. त्यांचं हे मोल आर्थिक फायद्यापेक्षाही मोठं आहे, हे लक्षात घेऊन सर्वसामान्य व्यवसायाचे नियम त्याला लावले जाऊ नयेत.

आर्थिक पाठबळाचा प्राणवायू

एका ठरावीक चाकोरीत चालणाऱ्या संघसंबंधित नियतकालिकांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल, तर विचार मांडण्याच्या पद्धतीत बदल आणि आवश्यक त्या साधनसामग्रीची उपलब्धता, या दोन्हीची जोड देण्याची गरज आहे. अशी नव्या रूपातली ही नियतकालिकं देशाच्या सर्व भागातल्या कोटयवधी स्वयंसेवकांपर्यंत आणि अन्य वाचकांपर्यंतही पोहोचण्यासाठी, या नियतकालिकांना गरजेचं असेल तितकं आर्थिक बळ पुरवायला हवं. ती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत करायला हवी. संघाच्या अजेंड्यावर हे अग्रक्रमाने यायला हवं, असं वाटतं.

हे झालं प्रिंट मीडियाबाबत.. पण आज इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वरचश्मा आहे. अष्टौप्रहर चालणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि मनोरंजनपर वाहिन्या लोकमानस घडवण्यात मोठा हातभार लावत असतात. या माध्यमासाठी वेगळ्या प्रकारची तज्ज्ञता लागते. प्रभावी लेखणीइतकंच संवादकौशल्य, वादविवाद कौशल्य महत्त्वाचं ठरतं. अनेकदा चांगले मुद्दे असूनही वृत्तवाहिनीवरील चर्चेत ते प्रभावीपणे मांडता न आल्याने संघाची बाजू नेमकेपणाने समोर येत नाही, असं घडतं.

प्रशिक्षण गरजेचं...

वाहिन्यांवर बाजू मांडण्यासाठी संघ परिवारात व्यक्ती मिळाली नाही, की जी संघटना हिंदुत्ववादी विचारसरणीची असेल, (मग भले त्या संस्था/संघटनेचा संघपरिवाराशी दूरान्वयानेही संबंध नसो) त्या संघटनेचा प्रतिनिधी माध्यमांसमोर येतो आणि त्याचं मत हे संघाचं मत असा अपप्रचार माध्यमांकडून जाणीवपूर्वक केला जातो. त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करणं, अनुल्लेखाने सोडून देणं हे महाग पडू शकतं असं वाटतं. माध्यमात प्रभावीपणे बाजू मांडू शकणाऱ्या, संवाद आणि वादविवाद कौशल्यात तरबेज अशा व्यक्तींची फौज निर्माण करायला हवी. अशा व्यक्ती हेरून त्यांना प्रशिक्षित करायला हवं.

फरक लक्षात घ्यावा...

प्रचार-प्रसारार्थ सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करू शकणारी बरीच मंडळी संघ परिवारात आहेत. फेसबुक, व्हॉट्सऍप किंवा टि्वटर ही माध्यमं वाऱ्यापेक्षाही वेगाने लोकांपर्यंत पोहोचतात हे खरं; पण त्यांचा परिणाम तात्कालिक ठरतो, हा इतिहास अलीकडचाच आहे. या माध्यमांमुळे एखादी चळवळ उभी राहत नाही, तर फक्त चळवळीचा एक आभास निर्माण होतो...

तर वृत्तवाहिन्या आणि प्रिंट मीडिया या क्षेत्रांत पत्रकारितेची पार्श्वभूमी असणारी माणसं लागतात. तसंच उत्कृष्ट व्यवसाय करू शकणारे माध्यमतज्ज्ञही लागतात. या दोघांचं तौलनिक मिश्रण आणि बाजारपेठेची नस ओळखणाऱ्या व्यक्ती, असं मनुष्यबळ गरजेचं आहे. वाहिन्यांचं एक मोठं नेटवर्क हाताशी असेल तर चांगलंच; पण जर ते शक्य नसेल, तर संघविचारांच्या मंडळींचा वरचश्मा असलेलं माध्यमांचं जाळं तरी असायला हवं. अशा माध्यमांमधून संघविचार कोणत्याही विकृत भेसळीशिवाय जगासमोर येतील. मात्र त्यासाठी गरज आहे संघाने पूर्वग्रहांचा त्याग करून माध्यमांना समजून घेण्याची... माध्यमस्नेही होण्याची.