संघस्थानावरचा संघ


तसा मी सामान्य स्वयंसेवक आणि संघ कार्यात माझे योगदान तसे नगण्यच. माझ्या बाबांच्या कडेवर बसून संघात गेल्याने शाखेत केव्हापासून जात आहे हे सांगणे कठीण. माझे बाबा भंडारा जिल्ह्यातले संघाचे कार्यकर्ते असल्याने आमच्या घरी संघ कार्यकर्त्यांची वर्दळ नेहमीच असायची. त्यांचे संस्कार आम्हा भावंडावर खूप झाले. माझ्या बहिणी कधीही समिती मध्ये गेल्या नाहीत. पण त्या सुद्धा संघावर अचूकपणे बोलू शकतात. असे सखोल संघ संस्कार असंख्य संघ कार्यकर्त्यांनी केलेत. त्यामुळे संघ आधुनिक की पुरातन मतवादी, संघ माध्यमातला की वास्तवातला, संघ म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे संघ, संघ विज्ञान निष्ठ की संघ वेद निष्ठ ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा मला शाखेत कळलेला, उमजलेला संघ मला सांगावासा वाटतो. चक्रधर स्वामीनी सांगितलेल्या आंधळ्यासारखी माझी स्थिती आहे. त्यामुळे मी लिहिलेले म्हणजेच संघ अशी समजूत वाचकांनी करू नये ही विनंती.

सध्या माध्यमा मध्ये ज्याप्रकारे संघाबद्दल बोलले जाते की संघ उग्रवादी संघटना आहे, संघाला हिंदुत्ववाद साऱ्या भारतावर लादायचा आहे, संघाला भारतातली विविधता नष्ट करून एकच मार्ग मानणारा जात्यंध हिंदू समाज निर्माण करायचा आहे. असा माध्यमातला प्रचार ऐकल्यावर माझ्या सारखा सामान्य स्वयंसेवक सुद्धा गोंधळात पडतो. मग मलाच काही प्रश्न पडतात. ते प्रश्न मी वाचकाशी वाटू इच्छितो.

  • संघ हिंदूंचे संघटन आहे तर शाखेत पूजा, अर्चना, आरती, महा आरती, भजन, किर्तन, प्रसाद का नाही?
  • संघ हिंदूंचे संघटन आहे तर संघात कोणत्याही देव देवताची पूजा का केली जात नाही?
  • संघ हिदुत्वाचे रक्षण करू इच्छितो. संघात विजयादशमी साजरी होते पण दिवाळी, गणपती, होळी, पोंगल, असे सण का साजरे केले जात नाही?
  • पाया पडून नमस्कार करने ही हिंदूंची सर्वसामान्य व सर्वमान्य प्रथा आहे. मग स्वयंसेवक मा. सरसंघचालकच्या पायावर लोटांगण का घालत नाही?
  • संघाचे प्रचारक ऐहिक जीवनाचा त्याग करून राष्ट्र निर्माणाचे कार्य संन्यासा सारखे करतात. मग ते भगवे वस्त्र परिधान का करत नाही?
  • संघाचे सभासद स्वतःला स्वयंसेवक म्हणतात धर्मरक्षक का म्हणत नाही?
  • संघाला भारतीय संस्कृतीचे रक्षण करायचे आहे. मग संघाचा गणवेष पाश्चांत का आहे? संघाच्या घोषातले वाद्य पाश्चांत का आहे?
  • संघ ह्या देशाला भारत का म्हणतो?
  • स्वयंसेवक प्रार्थनेच्या शेवटी "भारत माता की जय" म्हणतो "हिंदू धर्म की जय" का म्हणत नाही?
  • संघाच्या बऱ्याच संघटनाच्या नावात "भारतीय" शब्द आहे (विश्व हिंदू परिषद वगळता) तिथे “हिंदू” शब्द का नाही?
  • संघ अयोध्येत रामजन्मभूमी आणि राम मंदिरासाठी लढा लढत आहे. मग संघाने संपूर्ण भारतात एकही हिंदू देवतांचे मंदिर का बांधले नाही?
  • समजा एक मंदिर बांधले असे मानले तर कन्याकुमारी मध्ये स्वामी विवेकानंदाचे स्मारक का बांधले?
  • इतर हिंदू महात्म्याचे, संताचे, धर्मगुरूचे स्मारक संघाने अजून पर्यंत का बांधले नाही अगदी दिवंगत सरसंघचालकांचे सुद्धा?

ह्या प्रश्नांची गंमत अशी आहे की संघाचे विरोधक हे प्रश्न कधीच विचारणार नाही. ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संघाचा हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद दडलेला आहे. वाचकांनी हे प्रश्न नीट अभ्यासले आणि उत्तर मिळवली तर त्यांना संघ लगेच कळेल. पण ह्या प्रश्नाचे उत्तर संघ साहित्य वाचून मिळू शकत नाही. त्यासाठी शाखेत नियमित यावे लागेल. संघ परिस आहे. जे लोक समर्पण करू शकतात ते संघाचे स्वयंसेवक होवू शकतात. त्यामुळे जे लोक समर्पण करू शकत नाही, त्यांना सबबीसाठी संघावर टिका करणे चांगला मार्ग आहे. स्वयंसेवकांनी संघ हुंडाबंदीचे आंदोलन उभे करेल काय अश्या शुल्लक प्रश्नांना उत्तरच देवू नये. हे आणि असे अनेक प्रश्न कुंपणावर बसून विचारता येतात. जर अश्या प्रश्नाशी इतकीच संवेदना असेल तर संघात यावे आणि हे आंदोलन उभे करावे. संघ तुमच्या पाठीशी सर्व ताकतीने उभा राहील. संघाच्या कित्तेक स्वयंसेवकाने हे केले आहे आणि करत आहेत पण ती व्यक्ती तितक्या ताकदीची असावी लागते.

एका सामान्य व्यक्तीला संघाच्या शाखेत येणे ही असाधारण घटना असे मी मानतो. ती आत्म्याच्या चेतनेची राष्ट्रभक्तीसाठी केलेली आर्त आरोळी आहे. संघ हे खडतर व्रत आहे. त्यासाठी निस्वार्थ भावाने समाजासाठी काम करावे लागतं. कित्तेक स्वयंसेवकांना सुद्धा हे निरंतन करने शक्य होत नाही. दूर गेलेले स्वयंसेवक आपण नेहमीच बघतो. त्यांची संघावरची श्रद्धा कमी झाली नसते फक्त चेतना कमी झाली असते. मग समाजाला जर संघ समजून घ्यायचा असेल तर एवढे समर्पण करावे लागेल. ज्यांनी हे प्रयत्न केले त्यांना संघ समजला आणि ते संघाचे भाग झालेत.

मला कधी संघ विचार आणि उद्धिष्ट ह्या बद्दल संभ्रम निर्माण झाला की मी मा. श्री. रंगा हरीजींचे संघ प्रार्थने वरचे बौद्धिक ऐकतो आणि मला उत्तर मिळते. संघ प्रार्थनेत स्वयंसेवक परमेश्वराजवळ पाच आशिर्वाद मागतो अजेय शक्ती, विवेक, सत्चरित्र, निष्ठा आणि वीरव्रत. संघ स्वयंसेवकाचे ध्येय फक्त दोन वाक्यात प्रार्थना सांगते.

“विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । (हिंदू धर्म रक्षण)
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं । (वैभवसंपन्न राष्ट्र)”

प्रार्थनेने ध्येय सिद्धीचा मार्ग समुत्कर्ष (ऐहिक उन्नती) आणि निःश्रेयसचा (आध्यात्मिक उन्नती) राहील हे पण सांगितले आहे. माझ्यासाठी संघ एवढाच आणि फक्त एवढाच आहे ना कमी ना जास्त! त्यामुळे कोणा एका संघ स्वयंसेवकाच्या किंवा कधी-कधी संघ अधिकाऱ्याच्या व्यक्तव्यावरुन संघाची भूमिका मानण्याची मी घाई करत नाही.

शिवशक्ती संगमाच्या संपर्काच्या निमित्याने शेकडो व्यक्तींना भेटण्याचा योग आला. माझ्या संघ जीवनातला तसा हा पहिलाच अनुभव. नेहमीच्या संपर्का पेक्षा काही वेगळाच उपक्रम आहे. एक दोन अनुभव सोडले तर समाजात संघा बद्दल आदर दिसतो. समाजाला संघकार्याची उपयुक्तता आणि गरजेची जाणीव आहे आणि हे समाजातल्या सर्व स्थरातून दिसून येते. कित्येक महिलांनी आनंदाने शिदोरी तयार करून द्यायला मान्य केले.ह्या संपर्काच्या दरम्यान आपलेच परिश्रम तोटके पडतात असे प्रकर्षाने जाणवले. संघा बद्दल भीती आणि संशय तर दूर दूर दिसत नाही.