अंधाराचे भय (न) कुणा !


मी संघाच्या महाविद्यालयीन विभागाचा कार्यकर्ता आहे. त्या निमित्ताने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या संपर्कात येत असतो. एका महाविद्यालयात संघाच्या माध्यमातून काही कार्यक्रम करण्याचा विचार तरुणांसमोर बोलून दाखवला. आणि त्यांनी तो मोठ्या उत्साहाने स्वीकारला. नंतर मुले आणि मुली दोघांनी मिळून अपार कष्ट करून तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. तरुणांची दृष्टी पूर्वग्रह रहित असते. त्यांना जे भावते ते करून मोकळे होतात आणि जे करायचे त्याचे समर्पक उत्तर त्यांच्याकडे असते. अगदी मनापासून सांगतो, मला या नवतरुणांच्या सहवासात राहायला फार आवडते. त्यांच्या सोबत काही काळ घालवला की एक प्रचंड सकारात्मकता मनात भरून राहते. आपले तरुण आहेतच असे उत्साही !

मात्र त्याच महाविद्यालयात त्याच कार्यक्रमाविषयी महाविद्यालयाच्या प्रमुखांशी संपर्क आला तेव्हा मात्र, संघाचे काम आम्हाला माहित आहे. आम्हीही संघाचे आहोत. संघाचे विचार आम्हाला मान्य आहेत. तुमच्या कार्यक्रमाला ही आमचा विरोध नाही. पण तुम्ही अन्य नावाने कार्यक्रम करा. संघाच्या नावाने कार्यक्रम करून नका. असा सल्ला आम्हाला मिळाला. प्रथमदर्शनी त्यांची अडचण समजण्यासारखी होती. पण ती वास्तवातील अडचण होती की तशी मानसिकता होती?

मला अनेक महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, अन्य कर्मचारी यांनाही भेटण्याची संधी मिळते. संघाचा कार्यकर्ता असल्याने विषय अर्थातच संघाचा असतो. या सर्व लोकांशी चर्चा करताना संघाचा विचार समजणारे, संघाचा विचार मनापासून स्वीकारणारे अनेक लोक भेटतात. संघाचा मनापासून विरोध करणारे सुद्धा सापडतात. आणि मी त्यांच्या प्रांजळपणाचे कौतुक करतो. परंतु संघाचा विचार मुळापासून समजण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला तो विचार पुढील चार मुद्द्यांमुळे पटला नाही असा अभ्यासपूर्ण विरोध करणारे जवळपास कोणीही सापडत नाही. बहुतांश लोक संघाचा विरोध करताना ऐकीव माहिती, वर्तमानपत्रातील बातम्या, दृश्यमाध्यमांनी पेटवलेला वाद यावर आधारित आपले मत बनवतात व त्यावर आधारित विरोध करतात. त्यामुळे काही टिपिकल मुद्द्यांशिवाय त्यांच्याकडे बोलायला काहीच नसते. त्यांची अभ्यास करण्याची तयारी सुद्धा नसते. जणू त्यांना याची खात्री असते की आपण खरंच संघाचा अभ्यास केला तर आपले संघासंबंधीचे मत बदलू शकते !

एकूणच भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्योत्तर काळात एखाद्या संस्था-संघटने बाबत हेतूपुरस्सर गैरसमज पसरवण्याचे आणि त्याद्वारे त्या संघटनेचे खच्चीकरण करण्याचे इतके योजनाबद्ध षड्यंत्र अन्य कोणत्याही संघटनेच्या बाबतीत घडले नसेल. जागतिक पातळीवर याला समांतर उदाहरण शोधायचेच झाले तर ते ज्युंचे म्हणावे लागेल. त्यात काही समानता सापडतात पण एक वेगळेपण मात्र डोळ्यात भरण्याजोगे आहे. ज्यूंना त्यावेळी स्वतःचा देश नव्हता आणि हिंदुत्वाचा पक्ष घेणाऱ्या व मातृभूमीवर नितांत प्रेम करणाऱ्या संघाला मात्र आपल्याच मातृभूमीत पराकोटीचा विरोध आणि अत्याचारांचा सामना करावा लागला. संघाबाबत एकापेक्षा एक अभिनव आरोप शोधुन शोधून लावले गेले की असे आरोप करणाऱ्यांची तारीफ करायला हवी ! अगदी संघाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही इथपासून ते संघाने गांधीजींची हत्या केली आणि पुढे जाऊन भारतात घडणाऱ्या प्रत्येक धार्मिक दंगलीचे मूळ कारण संघच होता, संघ जातवादी, दलितांच्या विरोधात आहे, संघ मनुवादी आहे, संघ आरक्षण विरोधी आहे, संघाला भारताचे विभाजन करायचे आहे, इथपर्यंत काय वाट्टेल ते! प्रत्यक्ष वास्तव मात्र या आरोपांच्या बरोब्बर विरुध्द होते. हा योगयोग म्हणावा की षड्यंत्र ? अर्थात अशा साऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी या लेखाचे प्रयोजन नाही. असल्या आरोपांना उठता बसता उत्तर देण्याची संघाची पद्धत नाही. तसे केले असते तर आतापर्यंत संघाची इतकी बळकट संघटना निर्माण झाली नसती. इथे प्रश्न हा पडतो की देशाचे भले इच्छिणाऱ्या एका संघटनेला इतक्या दिव्यातून का जावे लागावे? असे आरोप करणाऱ्यांचे उद्देश काय होते? त्यांचे उद्देश साध्य झाले का? ते कोणामुळे साध्य झाले?

स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे स्वातंत्र्य हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून संघाची स्थापना केली गेली. हिंदू संघटन सुद्धा त्यासाठीच करायचे होते. स्वाभाविकपणे अशा शिस्तबद्ध संघटनेला आटोक्यात ठेवणे ब्रिटिशांना आवश्यकच होते. ते त्यांनी केले. स्वातंत्र्यानंतर मात्र सर्वच काँग्रेसी नेत्यांना स्वातंत्र्य आंदोलन काळात स्वतःच घालून दिलेली सर्व मुल्ये गुंडाळून ठेवून केवळ सत्ता हस्तगत करायची होती. अशा वेळी मूल्याधारित सांस्कृतिक संघटन असलेला संघ प्रतिस्पर्धी म्हणून उभा ठाकला असता. त्यामुळे कोणत्याही प्रकारे संघाला ठेचून काढण्याची अहमहमिका सर्वांमध्ये लागली होती. पंडित नेहेरुंसारख्या कोमल मनाच्या (!) नेत्याने सुद्धा संघाला चिरडून टाकण्याची भाषा करावी याला काय म्हणावे ? त्याच उद्देशाने प्रथम गांधीजींच्या हत्येच्या आरोपावरून संघावर बंदी घातली गेली. नंतर तर संघाला तर देशद्रोही ठरवून त्यात भाग घेणाऱ्या लोकांना सरकारी नोकरीत स्थान मिळू नये म्हणून परिपत्रके काढली गेली. त्या काळात सरकारी नोकरी फार प्रतिष्ठेची होती. अशा काळात संघाशी संबंध ठेवल्याने नोकरीवर गदा येत असेल तर उघडपणे संघाशी संबंध कोण ठेवणार?

पुढे १९७४-७५ मध्ये इंदिरा गांधींनी सुद्धा देशात विरोधी वातावरण तयार होत आहे आणि आता सत्ता गमवावी लागेल असे लक्षात येताच संपूर्ण देशावर आणीबाणी लादली आणि सर्वात पहिले काम म्हणजे संघावर बंदी लावली. हजारो संघ कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले. हजारो कुटुंबांना प्रचंड हाल-अपेष्टांना सामोरे जावे लागले. पुन्हा एकदा संघ स्वयंसेवक असणे हा गुन्हा ठरला.

या नंतरच्या दशकातही विविध माध्यमातून, विविध पातळ्यांवर, विविध प्रकारे संघाशी संबंध ठेवणे म्हणजे एक घृणास्पद कृत्य आहे असा भाव समाजात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. मग संघाबाबत मनाला येतील तसे बेछूट आरोप करणे सुरु झाले. कोणी संघाला ब्राम्हण्यवादी म्हटले, कोणी संघाला प्रतिगामी म्हटले, कोणी संघाला वर्णव्यवस्था आणायची आहे असे म्हटले, कोणी धार्मिक तेढ निर्माण करणारा संघ असेही म्हटले. समाजात काहीही वाईट घडले तरी त्याला संघच जबाबदार असे म्हटले जाऊ लागले.

अशा वातावरणात, संघाच्या वर्तुळात मात्र अशा आरोपांना उत्त्तर देणे तर सोडाच पण आरोप करणाऱ्यांची यथेच्छ चेष्टा केली जात असे. कार्यकर्ते अशा आरोपांना हसत असत, क्वचित कीव करत आणि फारच राग आला तर दोन चार या हासडून पुन्हा कामाला लागत. पण कार्यकर्त्यांची कार्यावर निष्ठा अशी होती की त्यांनी संघाचे काम सोडले नाही. ते पुढेच नेले. वाढवले. समाजात संघाबद्दल आदर वाढवला. आणि आरोपांना परस्परच उत्तरे मिळू लागली.

पण हे झाले स्वयंसेवकांचे–कार्यकर्त्यांचे ! ज्यांना आयुष्याच्या कोणत्यातरी वळणावर संघाच्या शाखेत जाण्याचे भाग्य लाभले त्यांचे. पण ज्यांना असे भाग्य लाभले नाही, समाजातील अशा असंख्य लोकांचा संघाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा होता? असे समाजघटक संघाकडे दुरून तटस्थ पणे पाहत होते. त्यांच्या पाहण्यात कौतुकाची नजर होती, पण मनात भीतीचा ठाव होता. संघाचे विचार आपल्याला पटतात पण आपण प्रत्यक्ष काही करू शकणार नाही असे त्यांना वाटत असे. आपण जेथे राहतो तेथे किंवा काम करतो तेथे आपण संघाच्या निकट आहोत असे कळले तर काय होइल या भीतीने ते संघापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करीत. संघाला मदत करीत, पण लपून-छपून ! तो काळ असा होता की संघाला अशा मदतीची सुद्धा गरज होतीच. आणि अशा असंख्य संघ हितचिंतकांनी संघाला अनेक अडचणीच्या प्रसंगात मदतीचा हात दिला. अशा समाजघटकांबद्दल संघ स्वयंसेवक नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतात.

पुढे काळ बदलला. संघाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून यशाच्या एकेक पायऱ्या पार करत संघ व्यापक बनत गेला. पण संघाची व्याप्ती वाढली म्हणून संघाच्या नशिबीचे आरोप आणि उपेक्षा मात्र कमी झाली नाही. एका अर्थाने ती सामाजिक-राजकीय बहिष्कृतीच होती. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू यांचे नाव घेऊन, त्यांचा वारसा आपणच चालवतो असे सांगणाऱ्या आणि सामाजिक समतेचा जयजयकार करणाऱ्या तथाकथित पुरोगाम्यांनी ही नवीन अस्पृश्यता मात्र निष्ठेने पाळली. जणू संघ विरोधकांनी संघाला वाळीत टाकण्याचा विडाच उचलला होता. परंतु समाजरुपी जनार्दनाने नेहमीच संघाला भरभरून प्रेम दिले. अशा बहिष्कृतीचा एक अनाहूत परिणाम समाजातील घटकांवर झाला. अगदी संघ स्वयंसेवकांवर देखील ! त्यामुळेच अनेक ठिकाणी संघ स्वयंसेवक आपले स्वयंसेवकत्व उघड करीत नाहीत. किंवा उघड झालेच तर काहीसे खजील होतात किंवा अपराधीपणाची भावना त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. ते apologetic बनतात. संघात जावेसे वाटले किंवा संघाला काही मदत करावी असे वाटले तरी त्यांच्या मनात एक अनामिक भीती दाटून येते. संघ संबंधित कुटुंबातील सध्या सैन्यात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याला, सुट्टीवर पुण्यात आला असताना सैन्यात भरती होण्यासाठी काय करावे लागते याची माहिती देण्यासाठी एका संघ शिबिरात मी आमंत्रित केले. त्या अधिकाऱ्यानेही ते आमंत्रण मोठ्या आनंदाने स्वीकारले. काही दिवसांनी त्यांचा अचानक फोन आला आणि त्या कार्यक्रमाला येण्याबाबत असमर्थता दर्शवली. हे कळवताना त्यांचा कंठ अवरुद्ध झाल्याचे मला जाणवले. ते म्हणाले, “क्या करू यार, मै आना चाहता हुं, लेकीन मेरे बॉस ने कहा, क्यू खुद का करिअर खराब कर रहा है?” संघाच्या कार्याविषयी आस्था असणाऱ्या अधिकाऱ्याची संघाविषयी अशी असहाय्यतेची भावना का व्हावी?

एका सरकारी संस्थेमध्ये, काही कामासाठी मी गेलो होतो. अचानक मला तेथे एक चांगले स्वयंसेवक मित्र भेटले. आम्हाला आनंद झाला. आमच्या खूप गप्पा झाल्या. तेथे ते उच्च पदावर होते. आमच्या गप्पा चालू असताना त्यांचा एक कनिष्ठ सहकारी तेथे आला. आमच्या गप्पा चालू असलेल्या पाहून त्याने विचारले की तुमची व त्यांची ओळख कशी? मी सहज पणे सांगितले की आम्ही संघाच्या शाखेत एकत्र होतो. ते स्वयंसेवक मात्र इतके अस्वस्थ झाले की पुढे काय बोलावे त्यांना सुचेना. आणि मग मीही एकदम गप्प झालो !

एका बाजूला संघाचे स्वयंसेवक असलेल्या कर्तृत्ववान व्यक्ती समाजात, नोकरीत, व्यवसायात आपला संघाशी असलेला संबंध कोणताही बडेजाव न मिरवता आपल्या व्यवहारातून प्रकट करतात. अनेक वेळा हा संबंध बोलून सांगावा लागत नाही. त्या त्या व्यक्तीचे बोलणे, चालणे, सलगी देणे समोरच्या व्यक्तीला काही सांगून जाते. मात्र दुसऱ्या बाजूला अनेक शिक्षण संस्था, खासगी कंपन्या, सामाजिक संस्था अशा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असे असंख्य लोक भेटतात, दिसतात, जे स्वयंसेवक आहेत हे आपल्याला माहित असते. त्यांचे कार्य-कर्तृत्व हे फार मोठे असते. समाजात त्यांचा गौरव होतो. व्यावसायिक प्रतिष्ठा, सन्मान मिळतात. मात्र त्या त्या ठिकाणी आपल्या स्वयंसेवकत्वाचा त्यांना विसर पडतो किंवा तसे सांगणे त्यांना गैरसोयीचे वाटते. असे का होते?

याचे कारण म्हणजे अगदी संघाच्या स्थापने पासून संघ विरोधकांनी केलेला गोबेल्स तंत्राचा वापर. त्यातून निर्माण झालेली भीती, असुरक्षितता. लोकापवादाचे भय ! एक काळ असा होता की हे भय खरे होते. संघाचे काम केल्यानंतर खरोखर नोकरीवर पाणी सोडावे लागत असे. संघाच्या स्वयंसेवकांची कामे होत नसत. अडवून ठेवली जात असत. हेतुपुरस्सर त्रास दिला जात असे. संघ कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्यांनी हा त्रास, हा अपमान, असह्य वेदना सोसली. पण त्यांनी त्रास देणाऱ्यांवर कधी उलट वार केला नाही. “त्यांना अद्याप संघ समजला नाही, संघ समजला तर ते असा त्रास देणार नाहीत” असे म्हणत, त्या व्यक्तीला संघाच्या नजीक आणण्याचा प्रयत्न केला.

पुढे पुढे तर संघाचा स्वयंसेवक असणे हे चांगले लक्षण बनले. सरकारी नोकरीत असूनही आपल्या कार्यालयात उघड पणे संघाशी असलेला संबंध प्रकट करणारे व आपल्या स्वयंसेवकत्वाला बाधा न येऊ देता, कामावरील पकड, निष्ठा, चोखपणा या गुणांमुळे त्या पदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या स्वयंसेवकांकडे कोणीही अंगुली निर्देश करण्याची हिम्मतही करू शकत नसे ! अशी असंख्य उदाहरणे जागोजागी दिसू लागली. काही ठिकाणी तर आम्हाला या ठिकाणी संघाचा कार्यकर्ता मिळाला तर हवा आहे अशी मागणी येऊ लागली. संघ स्वयंसेवकांचे कर्तृत्व, कामाविषयी निष्ठा, व तळमळ यामुळे सर्वत्र त्यांची वाहवा होऊ लागली. आता काळ आणखी बदलला आहे. राजकीय बहिष्कृती जाऊन स्वीकृती निर्माण झाली आहे. समाजात संघासंबंधी जिज्ञासा आहे. स्वयंसेवकांना, संघशाखेला लोक आमंत्रण देतात. तुम्ही आमच्या येथे येवून काम करा आम्ही तुम्हाला सारी मदत देऊ असे सांगतात. उत्साहाने संघ म्हणेल त्या कामात सहभागी होण्यास उत्सुक असतात !

मी काही वर्षांपूर्वी आफ्रिकेतील एका देशात वास्तव्याला होतो. तेथील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा स्थिती फारच चिंताजनक होती. त्यामुळे आम्हाला आमच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सक्त ताकीद दिलेली असे की संध्याकाळी सात नंतर कोणीही बाहेर फिरायचे नाही. आम्ही ती सूचना कसोशीने पाळत असू. मात्र काही वेळा कामा निमित्ताने बाहेर गेले की उशीर होत असे. आणि सायंकाळचे सात वाजून गेले की अस्वस्थता वाटते असे. प्रत्येक वेळी काही दुर्घटना घडत असेच असे नाही. मात्र मनावर भीतीचे दडपण असे. काही वर्षांनी मी पुण्यात परत आलो. पण ती सवय मनाला लागलेली होती. इथे आल्यानंतर सुद्धा जवळपास सहा महिने माझ्या मनावर तो परिणाम कायम होता. संध्याकाळचे सहा वाजले की जेथे असेल तेथून परत निघण्याची माझी घाई सुरु होत असे. मन अस्वस्थ होत असे. एके दिवशी माझ्या मित्राने मला आठवण करून दिली की “अरे, तू आता आफ्रिकेत नाहीस, भारतात आहेस!”

एका अर्थाने आता संघाचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु झाले आहे. अंधारयुग संपत आहे. अंधारयुगात चोरून-छपुन मदत करणे ठीक होते. त्यावेळी ते आवश्यकही होते. तसे केले नसते तर संघ वाढला नसता. पण आता आपण मन:स्थिती बदलायला हवी. माझ्या मनात तर असा विचार येतो, प्रत्येक महाविद्यालयात जसे NCC असते, NSS असते, SCOUT GUIDE असते, तसे RSS का असू नये ? या अन्य कोणत्याही संघटनेच्या तुलनेत संघात कोणती उणीव आहे? कदाचित संघात या कार्यांपेक्षा अधिक देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि सामाजिक शिस्त शिकवली जाते. संघ ही युवकांच्या मनावर व जीवनावर अधिक परिणाम करणारी संघटना आहे. नव्हे ती जगण्याला वळण लावणारी अद्वितीय कार्यपद्धती आहे !

संघ स्वयंसेवकांनी आता दुय्यम नव्हे प्रथम भूमिका स्वीकारायला हवी आणि निभावायला सुद्धा हवी. त्यासाठी स्वयंसेवकांनी आणि संघ हितैषी समाज घटकांनी मनातील apologetic भावना काढून टाकायला हवी. पूर्वी लोक संघाच्या नावाने कार्यक्रम करू नका असे म्हणत. त्यामुळे आपण अडचणीत येऊ असे त्यांना वाटत असे. पण आज समाज संघाला सारे नेतृत्व द्यायला तयार आहे. अशा वेळी मनातील दुबळेपण, साशंकता, आपल्या विचारांबाबतची अनिश्चितता, कर्तृत्वाबाबतचा संभ्रम या साऱ्या गोष्टी दूर भिरकावून देताना ताठ मानेने साऱ्या जगाला सांगायला हवे, “होय, मी संघाचा स्वयंसेवक आहे.” आणि त्या सुंदर गीताच्या ओळी ओठावर यायला हव्यात,

“एक आस अंतरी आमच्या, अंधाराचे भय न कुणा | आसमंत व्यापून निनादे हिंदू गर्जना पुन्हा पुन्हा ||”