गरज माध्यमस्नेही होण्याची!
अश्विनी मयेकर
समाजात घडणा-या विविध घटनांचे विश्लेषण प्रत्येक जन आपल्या पध्दतीने करत असतो. लोककल्याणाचे ध्येय समोर ठेवून त्यासंबंधी चिकित्सा करून काही निष्कर्ष मांडणारे विविध विचारप्रवाह कालौघात निर्माण झाले. या प्रत्येक विचारप्रवाहात विकासाच्या स्वत:च्या अशा व्याख्या आहेत. परस्पर विरोधी विचारप्रवाहांच्या मुद्द्यांना तर्काच्या आधारे खोडून काढणारी अथवा प्रामाणिकपणे त्यांना तपासून त्यातील कच्चे दुवे समाजासमोर मांडणारी प्रगल्भ वैचारिक परंपरा भारतात प्रसिद्ध आहे. परंतु ही परंपरा लोप पावत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे. याचे कारण असे की,वैचारिक क्षेत्रातील काही प्रस्थापित मंडळीनी आपल्या गैरसोयीच्या व म्हणून न पटना-या वैचारिक संकल्पनांच्या बाबतीत टोकाचा तिरस्कार निर्माण करण्याची कुप्रथा चालू केली आहे. 'सांस्कृतिक राष्ट्रवाद' ही अशीच एक वैचारिक संकल्पना आहे की ज्यावर उजव्या विचारसरणी चा शिक्का मारला जात आहे. एकवेळ हा शिक्का मारला गेला की मग ती व्यक्ती,विचार,संस्था यांचे सर्वच निवेदन त्याज्य,अस्पृश्य ठरवले जाते. परस्पर विरोधी मताचा अस्वीकार करत असताना आपली वागणूक ही आपल्या विचारातील संकुचितपणा अथवा व्यापकता अधोरेखित करते.
‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ हा सध्याच्या काळातील असाच एक दुर्दैवी शब्द आहे. भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या प्रदेशातील मानवी समुहात त्यांच्या दैनदिन आयुष्यात आचरणाचे काही जीवनमूल्ये स्वीकारली गेलेली आहेत.पती-पत्नी, पिता-पुत्र, बंधू या नाते संबंधात परस्परांमध्ये आदर्श आचरण करण्यासाठी काही जीवनमूल्ये सांगितली आहेत. कर्म करत असताना ज्ञान प्राप्ती करून जगण्यात दिव्यता प्राप्त करणे या जीवन पध्दतीत महत्वाचे मानले गेले आहे. कर्मांची नैतिक,अनैतिक अशी विभागणी केली गेली आहे. सामुहिक स्तरावर आचरणाच्या काही संकल्पना रुजल्या गेल्या आहेत. जसे की, कुटुंबसंस्था, पाप-पुण्य, पारलौकिक जीवन इ. यासारख्या संकल्पनांमध्ये नैतिक आचरणाला विशेष महत्व असते. प्रामाणीकपणा, त्याग, निस्पृहता या मुल्यांच्या विशेष आदर केला जातो. मानवी व्यक्तिमत्वातील सद्गुणांचा संपूर्ण विकास हे जीवनाचे ध्येय मानले गेले आहे.समाजजीवनाला आधारभूत असणा-या या सर्व संकल्पनांना आपण संस्कृती म्हणतो. भाषा,वेश याबाबतीत प्रचंड विविधता असलेल्या प्रदेशातील मानवी समूहात या संस्कृती च्या आधारावर एकतेची भावना नैसर्गिकरीत्या निर्माण होते. कदाचित यामुळेच धर्म, भाषा, वेश याबाबतीत विविधता असली तरी ‘सांस्कृतिक जीवनपद्धती’ ही एकसमान आढळून येते. केवळ उपासनापध्दती बदलली म्हणून पिढ्यानपिढ्यांपासून चालत ही सांस्कृतिक जीवनपद्धतीमध्ये फार मोठा बदल झालेला आढळून येत नाही. अशी सांस्कृतिक जीवन पध्दती ही भारतीयत्वाची ओळख बनलेली आहे. या आधारावर लोकसमुहामध्ये देशाविषयी एक आत्मीयता निर्माण होते. या आत्मीयतेलाच राष्ट्रभक्ती म्हणता येईल. संपूर्ण जगभर सन्मानाने परिचित असलेली ‘भारतीय संस्कृती’ ही अशीच एक सांस्कृतिक जीवनपध्दती आहे. म्हणजे या देशाच्या नागरिकामध्ये सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर देशाविषयी अपरिमित निष्ठा आहे व म्हणूनच आपल्या देशबांधवाविषयी आत्मीयता आहे. ही सांस्कृतिक जीवनपध्दती या राष्ट्राच्या एकतेचे सूत्र आहे. याचे कारण ही जीवनपध्दती राष्ट्रजीवनाला मजबूत करते. पर्यायाने कोणतीही व्यक्तिगत उपासना पध्दती राष्ट्रहिताच्या आड येत नाही. परंतु काही असामाजिक तत्वे व्यक्तिगत उपासना पध्दती चा आधार घेऊन सांस्कृतिक जीवनपध्दती ला त्याज्य ठरवतात तेव्हा राष्ट्रहिताला बाधा उत्पन्न होते. धर्मतत्वे राष्ट्रहिता पेक्षा वरचढ ठरू लागतात त्यावेळेस राष्ट्र संकटात येते. केवळ भारतातच नव्हे तर तसेच संपूर्ण जगभरात धर्मतत्वे ही त्या राष्ट्रांच्या समोर मोठेच संकट निर्माण करत आहेत. अशा परिस्थितीत पूर्वग्रहदुषित न होता कालसुसंगत सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी करणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने सांस्कृतिक राष्ट्रवाद हा शब्दच इतका अस्पृश्य झाला आहे की त्यावर बोलले की तात्काळ त्याला धर्मांध ठरवले जाते. एकवेळ धर्मांध,प्रतिगामी ही विशेषणे चिकटवली की नंतर तो व्यक्ती कितीही महत्वाचे सांगत असला तरी त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. खरे म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे एखादी विशिष्ट उपासना पध्दती नव्हे. अथवा हिंदुत्व म्हणजे परधर्मियांचा नरसंहार नव्हे. सोयीच्या राजकारणाचा हा अपप्रचार आहे.
‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ ही संकल्पना सांस्कृतिक मुल्यांवर आधारित असलेली एक राष्ट्रसाधना आहे. महत्वाचे म्हणजे धार्मिक जीवनाचा आत्यंतिक प्रभाव असलेल्या या देशात धर्म तत्वांच्या आधारे राष्ट्रजीवन साध्य करता आले तर हे सुदैवच आहे.‘राष्ट्रसाधना ही व्यक्तिगत धार्मिक जीवनाला पोषक आहे’ असा संदेश देता आला तर राष्ट्रजीवन ख-या अर्थाने मजबूत होईल. परंतु ‘धर्मनिरपेक्षता’ सोयीनुसार स्वीकारल्यामुळे राष्ट्रजीवनाचे काही प्रमाणात का असेना नुकसानच होते आहे. अत्यंत क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी काही असामाजिक धार्मिक तत्वांना ‘धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर अभय दिला जात आहे. किबहुना आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच अल्पसंख्याक समुदायामध्ये बहुसंख्याकाविषयी भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. राष्ट्रहिताला अत्यंत घातक असा हा प्रकार आजही चालतोच आहे. असे नसते तर केवळ उपासना पध्दती वेगळी आहे म्हणून संपूर्ण देशाविषयीच तिरस्काराची भावना निर्माण करण्याचे उद्योग केले गेले नसते. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात अल्पसंख्याक समाजाला संरक्षण शासकीय लाभ, सोयी-सुविधा यामधून अत्यंत सकारात्मक वातावरण असताना त्यांच्यामध्ये वेगळेपणाची भावना निर्माण करून आपणच एकमेव त्यांचे तारणहार आहोत असे देशविघातक कारस्थाने करण्याचे धाडस कोणी केले नसते. याला उत्तर केवळ सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या माध्यमातून देणे शक्य आहे. राष्ट्रवादाच्या संकल्पनेत उपासना पध्दतीच्या स्वातंत्र्यासह राष्ट्राविषयी बांधिलकी, कर्तव्य अपेक्षित आहे. स्वत:च्या उपासना पद्धतीचा अवलंब करताना इतर धर्मीयांविषयी आदरभाव अपेक्षित आहे .राष्ट्रासाठी,समाजासाठी काही देण्याची भावना सांस्कृतिक राष्ट्रवादात अपेक्षित आहे. एकूणच राष्ट्रजीवन पोषक करण्याचे,मजबूत करण्याचे हे साधन आहे.
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या विकासाची संधी उपलब्ध होण्यासाठी व पर्यायाने समाजाची उन्नती होण्याकरता राष्ट्राचे बळकट असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या देशाविषयी आत्मीयता, भावनिक बंध असले पाहिजेत. कोणतेही धार्मिक तत्व हा आत्मीयतेपेक्षा मोठे असू नये. या प्रकारच्या राष्ट्रजीवनातच राष्ट्राचे व पर्यायाने सर्व नागरिकांचे हित सामावले आहे. यासाठी सांस्कृतिक राष्ट्रवादाबद्दल भयगंड न बाळगता त्याकडे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे सूत्र म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. धर्मतत्वे ही राष्ट्रहिताला,समाजहिताला कशा पध्दतीने अनुकूल होतील हा विचार आवश्यक आहे. समाजाला धर्मनिरपेक्ष करण्यापेक्षा त्यांच्या धार्मिक जीवनात राष्ट्रीय चरित्र निर्माण होईल असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. याचे कारण असे आहे की,आपण कितीही नाकारले तरी समाजात धार्मिक,आध्यात्मिक जीवनपध्दती उत्तरोत्तर वाढत आहे. मानसिक अशांतता, ताणतणाव, प्रचंड धावपळ यासारखी निरनिराळी कारणे असली तरी धर्म,अध्यात्म या बाबीकडे समाज उत्तरोत्तर आकर्षित होत आहे. याकरिता त्याना धर्मनिरपेक्ष करणे सहजशक्य नाही. म्हणून त्यांच्या धार्मिक,आध्यात्मिक जीवनात राष्ट्रजीवन रुजवले गेले तर निश्चितच राष्ट्रीय चरित्र मजबूत असणारी पिढी निर्माण होऊ शकेल. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या माध्यमातून हे ध्येय साध्य करणे शक्य आहे. जे धर्मनिरपेक्ष म्हणवतात त्यांना राष्ट्रहित हे सर्वोच्च प्राथमिकतेवर असले पाहिजे. राष्ट्र व समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येक नागरिकात असणा-या विविधतेत एकसमान असणारे तत्व शोधून त्यांची उर्जा राष्ट्र उभारणीच्या महान कार्यात केंद्रित करण्याची क्षमता सांस्कृतिक जीवनपध्दतीत आहे. अशा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या या संकल्पनेच्या बाबतीत सकारात्मक विचारमंथन होणे गरजेचे आहे.
अश्विनी मयेकर
अभिराम दीक्षित
अनिल शिदोरे
शेफाली वैद्य