गरज माध्यमस्नेही होण्याची!
अश्विनी मयेकर
पतंग आकाशात उंच उडवायचा असेल, तर आकाशापर्यंत पोचणारा मांजा आवश्यक असतो. पतंग म्हणजे ध्येयवाद आणि मांजा म्हणजे ध्येयपूर्तीसाठी लागणारे साधन वा संघटना. संघामध्ये ध्येयवाद व साधनांची संघटना यात समतोल आढळत नाही. मांजा करण्यात शक्ती घालवली आणि त्याला पतंग जोडलाच नाही तर काय होईल? संघटनेसाठी संघटना, संघटना हेच ध्येय असे रूपांतर होईल. संघाची अवस्था ‘संघटना बलवान, पण ध्येय लहान आहे’, अशी झाली आहे.
रा. स्व. संघ एक शिस्तबद्ध व राजकारणावर परिणाम करणारी संघटना आहे. तिची स्थापना १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. हिंदूंना प्रभावी व सुसंघटित केले तर भारतावर कोणा परकीयाचे आक्रमण होणार नाही, अशी संघाची मूलभूत धारणा आहे. हिन्दू बहुसंख्य आहेत. ते जितके बलवान व ते तेजस्वी बनतील, तितके भारत हे राष्ट्रदेखील तेजस्वी व बलवान बनेल, अशी त्यांची भूमिका आहे. समाज बलवान बनायचा असेल तर त्यात ऐक्य-भावना, बंधुभावना प्रशिक्षणाने टोकापर्यंत नेता येईल, असे त्यांना वाटते. किमानपक्षी भारतातील ८०% हिंदूंपैकी एक टक्का हिन्दू संघाच्या दैनंदिन शाखेवर नित्यक्रमाने यायला हवा. प्रथम ते संघबंधू बनतील. त्यानंतर शाखापद्धतीत ऐक्य भावनेने, गुंफतील, अशी संघाची कल्पना आहे. संघाबाहेरील लोकांच्या मनात किंवा प्रसारमाध्यमांमध्ये संघाची प्रतिमा सुयोग्य नाही, अशी संघाची नित्य कुरकुर असते, ते फारसे खरे नाही. खरे म्हणजे संघ स्वत:च प्रचारमाध्यम आहे. देशातील सर्व प्रसारमाध्यमांत (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियात) संघबंधू आहेत. ते आपली चुकीची भूमिकादेखील पुढे रेटत असतात.
संघ व भारतीय समाज यांच्यामध्ये प्रचंड विसंगती आहे. त्यामुळे सामान्य भारतीयांना संघाचे काम गूढ वाटते. विचारवंतांना संघाची भूमिका देशाच्या दृष्टीने चुकीची व घातक वाटते. अनेक त्यागी लोकांनी आपल्या आयुष्याचे सिंचन करून संघ वाढविला. तीन चार पिढ्यांनी संघाचे पोषण केले, तरी नव्वद वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात अपेक्षेप्रमाणे संघाची वाढ झाली नाही, ही खरी संघाची खंत आहे. त्यासाठी इतरांमध्ये दोष शोधून खरे उत्तर मिळणार नाही. संघाने आपला ध्येयवाद, भारतीय समाज, आपली संघटनात्मक रचना, वैचारिक मांडणी यांचे आत्मपरीक्षण केले, तर अनेक प्रश्नांची उकल होऊ शकते. पतंग आकाशात उंच उडवायचा असेल तर आकाशापर्यंत पोचणारा मांजा (दोरा) आवश्यक असतो. पतंग म्हणजे ध्येयवाद आणि मांजा म्हणजे ध्येयपूर्तीसाठी लागणारे साधन वा संघटना. संघामध्ये ध्येयवाद व साधनांची संघटना यात समतोल आढळत नाही. मांजा करण्यात शक्ती घालवली आणि त्याला पतंग जोडलाच नाही तर काय होईल? संघटनेसाठी संघटना, संघटना हेच ध्येय असे रूपांतर होईल. सध्या संघाची अवस्था ‘संघटना बलवान, पण ध्येय लहान आहे, अशी झाली आहे.
हा लेख लिहिताना मनात अनेक साशंकता आहेत. खरे तर संघाला टीका सहन होत नाही. त्यासाठी वैचारिक क्षमता असावी लागते. सर्व बाजूंनी विचार करण्याची शिकवण संघाच्या स्वयंसेवकांना दिली जात नाही. त्यामुळे कोणताही भिन्न विचार म्हणजे आपल्यावर आक्रमण आहे असे स्वयंसेवकांना वाटते. प्रत्येक टीका म्हणजे शत्रूने केलेला प्रहार आहे असे त्यांना वाटते. लगेच शत्रुत्वाची भावना मनात कार्यरत होते. या मानसिकतेमधून आपण वेगळे पडलो आहोत, अशा भावनेने मन भारावून जाते.
जे संघबंधू नाहीत, जे आपल्या विचारांचे नाहीत, ते संघाचे शत्रू असतात, असे मानणे चुकीचे आहे. हे तत्त्व हिटलरमध्ये होते आणि रशियाचा हुकूमशहा स्टॅलिन याच्या व्यक्तिमत्त्वामध्येही होते, म्हणून ते विरोधकांचा काटा दूर केला पाहिजे असे मानत. या मानसिक धारणेपोटी जर्मनी व रशिया या दोन्ही राष्ट्रांत मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली. संघाने हा विचार जर्मन देशातील नाझीवादातून घेतला असावा. हिन्दू राष्ट्र निर्मितीसाठी सध्या शैक्षणिक भगवेकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या माध्यमातून संघाचा दृष्टिकोन पुढे रेटला जात आहे. आम्ही फक्त एक सांस्कृतिक संघटना आहोत, सांस्कृतिक राष्ट्रवाद हे आमचे ध्येय आहे, असा संघाचा दावा असतो; पण नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असावेत हा निर्णय संघाचा होता व भाजपने ते स्वीकारले. ही वस्तुस्थिती कुणी नजरेआड करू शकत नाही.
संघाची स्थापना १९२५ साली झाली. ती अचानक घडलेली घटना नाही. आधीच्या काही वर्षांचा संदर्भ आणि पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणाऱ्या सुधारकांचा काळ सुरू झाला होता. लोकहितवादी, आगरकर, न्या. रानडे, गोखले, कर्वे वगैरे ब्राह्मण समाजातील विचारवंत मांडणी करू लागले होते. परकीय शक्ती आपल्या समाजावर सहजपणे सत्ता का गाजवू शकतात, याबद्दल त्यांनी चिंतन केले होते. महाराष्ट्राबाहेर राजा राममोहन रॉय यांच्यासारखे सुधारक ब्रिटिश सरकारच्या साहाय्याने सामाजिक सुधारणा घडवून आणत होते. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर हे विद्रोही विचारधारा मांडत होते. पारंपरिक समाजमान्यतांना धक्का लागत होता. ब्रिटिश राज्याला आव्हान देण्यासाठी समाजाची तयारी चालू होती. त्यासाठी साधन म्हणून १८८५ साली अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाच्या मंडपात सामाजिक परिषदेचे अधिवेशन होत असे. त्यात सामाजिक परिवर्तनाचे ठराव संमत होत असत. सनातनी मंडळी व समाज सुधारक यांच्यामध्ये संघर्ष चालू होता. परकीयांचे राज्य घालविण्याला अग्रक्रम द्यायचा असेल, तर सामाजिक सुधारणा काही काळ स्थगित ठेवाव्यात, असा लोकमान्य टिळकांचा विचार होता. याउलट आपल्या समाजातले दोष दूर केल्याशिवाय आपण स्वराज्यासाठी पात्र होणार नाही, असे सुधारक सांगत होते. इंग्रजांना मात्र सत्तेच्या सोयीनुसार भूमिका घ्यायची होती. त्यांचा कल सुधारकांकडे होता. लोकमान्यांमुळे सनातनी मंडळी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात असली तरी सुधारकांना निष्प्रभ करणे हा त्यांचा अग्रक्रम होता. युरोपमध्ये इटालियन विचारवंत जोसेफ मॅझिनी यांनी मांडणी केलेल्या राष्ट्रवादाची चलती होती. राजेशाही विरुद्ध राष्ट्रवाद असा संघर्ष चालू होता. मॅझिनीप्रणीत राष्ट्रवाद म्हणजे बहुसंख्यांकवाद होता.
सलग भूमी, सलग धर्म, सलग भाषा हा राष्ट्रवादाचा गाभा होता. १९१९ साली पहिले जागतिक महायुद्ध झाले. त्यात भिन्नभिन्न राष्ट्रवादांचाच टकराव होता. त्या महायुद्धात इटली, जर्मनी व जपान ही राष्ट्रे पराभूत झाली होती. युद्ध तहकुब झाल्यावर शरणागत राष्ट्रांवर लष्कर उभे करायचे नाही, असे बंधन होते. पराभूत राष्ट्रात राष्ट्रीय भावनेतून इटलीत फॅसिझम व जर्मनीत नाझीवाद फोफावला. राष्ट्र-भावनेत व्यक्तीने विलीन व्हावे असा फॅसिझम व नाझीवादाचा नारा होता. व्यक्तीने आपले स्वातंत्र्य अर्पण केल्याशिवाय राष्ट्र तेजस्वी बनत नाही, असे सांगितले जात होते. त्यातून मुसोलिनी व हिटलर हे हुकूमशहा उदयाला आले. जी व्यक्ती त्यांना शरण जाणार नाही ती राष्ट्रद्रोही आहे, असे मानण्यात आले. परिणामत: सामुदायिक हिंसा, मानवसंहार या गोष्टींना पावित्र्य आले. विनायक दामोदर सावरकर हे युरोपमध्ये शिकून भारतात परत आले. ते मॅझिनीप्रणीत राष्ट्रवाद डोक्यात घेऊन आले होते. त्यांनी हिंदुराष्ट्र ही संकल्पना मांडली. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत, म्हणून ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर इथे हिंदुराष्ट्र बनावे अशी त्यांची भूमिका होती. मुस्लीम, ख्रिश्चन इत्यादी धर्म भारताबाहेरून आपल्या धर्माची आध्यात्मिक प्रेरणा घेतात, म्हणून राष्ट्रवादाच्या प्रक्रियेत त्यांना गौण स्थान द्यावे, असा आग्रह होता.
या वैचारिक मंथनाच्या पार्श्वभूमीवर संघाची स्थापना झाली. संघाची स्थापना महाराष्ट्रातील ब्राह्मण वर्गाने केली. त्यांनीच संघ का स्थापन केला? त्यांना हिंदुराष्ट्राच्या नावाखाली देशाचे सत्ताधीश बनावे असे का वाटले? याची कारणे इतिहासात सापडतात. भारतात अनेक भाषिक गट आहेत, पण एका भाषिक गटाने दुसऱ्या भाषिक गटावर राज्य करावे अशी अपेक्षा नव्हती, याला अपवाद करून महाराष्ट्रातील ब्राह्मण वर्ग बाकी भाषिक गटात- ब्राह्मण क्षत्रियांच्या राजदरबारात आश्रित म्हणून होते. महाराष्ट्रात पेशव्यांच्या रूपाने ते सत्ताधीश होते. पुणे व नागपूर येथून ते दरसाल लष्करी मोहिमा काढत. नागपूरमधून ओरिसा, बंगाल व बिहार या राज्यांमध्ये जाऊन लुटालूट करत. पुण्याहून दिल्लीच्या दिशेने जात. अफगाणिस्तानातील अटकेपर्यंत आपले राज्य असावे अशी त्यांची आकांक्षा होती, फक्त मराठी भाषिकांचे अन्य भाषिकांवर राज्य होते. आक्रमकता हा गुण पेशवाईत ब्राह्मणांनी आत्मसात केला होता. बडोदा, ग्वाल्हेर, झाशी इथे त्यांनी राज्य केले. पहिला बाजीराव पेशवा हा त्यांचा आयकॉन म्हणजे आदर्श होता.
त्यांच्यामध्ये इतिहासातून आलेल्या आत्मविश्वासाचा वारसा संघाने स्वत:कडे घेतला.
स्वातंत्र्यलढ्यावर समाजसुधारकांचा पगडा होता. १९२० साली लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. लोकमान्यांनंतर त्यांचे वारस म्हणून काँग्रेस पुण्यातील ब्राह्मणवर्गाच्या हातात राहील, अशी जी आशा होती, ती भंग पावली. बहुतांश ब्राह्मण इंग्रजांच्या चाकरीत होते. स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणे ब्राह्मणांच्या सोयीचे होते. ब्रिटिशांच्या कृपेचा त्यांना लाभ होत असे. ब्रिटिशांच्या धर्तीवर त्यांच्या आर्मी मॅन्युअलप्रमाणे रा. स्व. संघाने आपली रचना केली. प्रारंभी ब्रिटिश लष्करातील आज्ञावली जशीच्या तशी संघाने स्वीकारली होती. नंतर त्यांनी संस्कृत आज्ञा सुरू केल्या. आजही त्यांची रचना ब्रिटिश लष्कराच्या रचनेप्रमाणेच आहे.
थोडक्यात संघ हे नागरी सैन्य आहे. सैन्याला शत्रू व मित्र असतात. ब्रिटिश त्यांचे मित्र होते व म. गांधी त्यांचे शत्रू होते. सनातनी विचार मांडणारे हिंदू त्यांचे मित्र आहेत. चातुर्वण्य समाज रचनेतील काही शूद्रांनी विद्रोह केला. मानवतेची वागणूक मिळाली तो धर्म त्यांनी स्वीकारला. बौद्ध धर्म, मुस्लीम व ख्रिश्चन हे धर्म म्हणजे गुलामगिरीच्या विरोधातील आध्यात्मिक बंड आहे. संघ त्यांना शत्रू मानतो. संघ पुरुषप्रधान संस्कृती मानणारा आहे. म्हणून त्यांची हिन्दू या शब्दाची व्याख्या अशी आहे की, ‘जो मुस्लीम किंवा ख्रिश्चन नाही तो हिन्दू’. संघामध्ये महिलांना प्रवेश नाही. या मुद्यावर पुढे बराच खल झाला. पुढे त्यांनी राष्ट्रसेविका समिती (आर. एम. एस.) स्थापन केली. त्यात फक्त स्त्रिया असतात. लष्करात कठोर प्रशिक्षणावर भर असतो. माणसाच्या डोक्यातले स्वाभाविक विचार काढून टाकून त्यात लष्करी विचार भरले जातात. याला रेजिमेंटेशन - म्हणजे सर्वांची विचार पद्धती एकाच दिशेने जाणारी करणे असे म्हणतात.
शाखेत ओ.टी.सी.मध्ये एक महिन्याचे वार्षिक प्रशिक्षण शिबिर घेऊन कच्च्या मडक्याचे पक्के मडके केले जाते. ओ.टी सी.चे तृतीय वर्ष पूर्ण करणे म्हणजे संघ विद्यापीठाचा पदवीधर होणे. आपल्या दृष्टिकोनाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘सरस्वती विद्या’ नावाची संस्था स्थापन केली आहे. तिच्यामार्फत देशात २० हजार शाळा चालविल्या जातात. इतरांपेक्षा त्यांचे सारे वेगळे असते. त्यांची भाषा वेगळी, शब्द वेगळे. उदा. ज्यांना सर्वजण आदिवासी म्हणतात, त्याला ते वनवासी म्हणतात. हे वेगळेपण सकारण आहे. आदिवासी म्हणजे भारताचे मूळचे रहिवासी. त्यांना मूळ जनता म्हणून प्रतिष्ठा दिली तर आर्य बाहेरून आले, ते परकीय आहेत, हे ओघानेच येते. वनवासी या शब्दात ते अर्थ डोकावत नाही. ज्यांना शहरात राहणे आवडते ते शहरवासी आणि ज्यांना वनात राहणे आवडते असे वनवासी. अशी सामाजिक विभागणी करणे सोपे जाते.
नागपूर येथील रेशीमबागमध्ये संघाचे मुख्यालय आहे. त्याचा कारभार आर्मी हेडक्वार्टरसारखा चालतो. ब्रिटिशांविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्यलढ्याला संघाचा विरोध होता. हिंदूंना तेजस्वी बनवायचे म्हणजे त्यांना हिंसाचाराचे प्रशिक्षण द्यायचे म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी हिंदुत्वाची जी व्याख्या केली, ती समजून घेतली पाहिजे. ‘जो अहिंसा मानतो तो हिन्दू’. जो हिन्दू अहिंसेचा त्याग करून हिंसेवर निष्ठा ठेवतो, तो हिंदुत्वाचा स्वीकार करतो. या वाक्यात खोल अर्थ भरलेला आहे. हिन्दू होण्यासाठी कोणा धर्मसंस्थापकावर निष्ठा किंवा विशिष्ट धर्मग्रंथावर श्रद्धा असण्याची गरज नसते. जो प्राचीन काळापासून भारतात राहतो आणि शूद्रांनी अन्य धर्म संकल्पना मान्य केल्या तरी जो त्यांचा द्वेष करीत नाही. तो हिन्दू...!!
या लेखावर प्रदीप नाईक यांची प्रतिक्रिया
हिन्दू हा एथनिक धर्म आहे. म्हणजे पर्यावरणाशी जुळवून घेऊन ज्याने ह्या भूमीत भिन्न चालीरीती, प्रथा, सण-उत्सव जगताना निर्माण केले, तो हिन्दू. भारत हा जगातला सर्वांत प्राचीन देश आहे. याचा अर्थ जगामध्ये सर्वांत प्रदीर्घ काळ त्याला इतरांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्याचा इतिहास आहे. हा भारतीय दुसऱ्याच्या भिन्नत्वाचा स्वीकार करतो व आदरही करतो. त्याला सहअस्तित्वाची कला ठाऊक आहे. त्यातून त्याने अहिंसा धर्म जोपासला. येथे राहणाऱ्या भिन्न धार्मिक संकल्पना असणाऱ्या लोकांनी एकमेकांच्या सहकार्याने भारतीय संस्कृती निर्माण केली आहे. या भूमीत त्यांच्या पूर्वजांच्या स्मशानभूमी, दफनभूमी, कबरी, समाध्या हा पुरावा आहे. सहअस्तित्व व अहिंसा यांचे जुळ्या भावंडासारखे नाते असते. हिन्दू हा शब्द इराणी लोकांनी त्या विशिष्ट जीवनशैलीला नाव देण्यासाठी वापरला. या भूमीत धर्मापेक्षा संप्रदायाला महत्त्व आहे. भूमीवर निवास करण्याला महत्त्व आहे. समुद्रबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी वगैरे अनेक निर्बंध घातले. जो जगण्यासाठी मायभूमी सोडून परदेशात गेला, त्याला हिन्दू म्हणविता येत नाही. कारण इथल्या पर्यावरणाशी जो लय जुळवून घेतो, त्याला हिंदू म्हणता येते. भारतीयांना जगात अन्यत्र जाऊन आपल्या धर्माचा प्रसार करावा किंवा परकीय समाजांना अंकित करून त्यांच्यावर सत्ता गाजवावी, वा आपण महासत्ता व्हावे, अशी आकांक्षा नाही. ही भारतीयांची वैशिष्ट्ये जगात आगळीवेगळी आहेत.
बाहेरून आलेल्या धर्मसंकल्पना येथे रुजल्या. त्यामुळे भारतात आज १२ धर्म अस्तित्वात आहेत. याची दोन कारणे देता येतील- भारतीय लोक धर्माबाबत कट्टरपंथी नव्हते. ते धर्माला संप्रदाय म्हणत. त्यांनी त्यांच्याबरोबर जुळवून घेतले. जाती व्यवस्थेच्या उतरंडीमुळे ज्यांच्यावर अन्याय होत होता, त्यांना बाहेरून आलेल्या धर्मातील समतेचा विचार आकर्षित करत होता. शिवाय बाहेरून आलेल्या धर्मसंकल्पना इथल्या वातावरणाशी जुळवून घेत जनमानसात रुजल्या. बाहेरून आलेल्या धर्माचा स्वीकार केलेल्या भारतीय लोकांनी त्यांचे भारतीयीकरण केले.
ते काही म्हणोत, संघाची विचारसरणी राजकीय व सत्ता प्राप्त करण्यासाठी आहे. पूर्वी लेखन, वाचन, अध्ययन, उपदेश या सर्व गोष्टी ब्राह्मणवर्गाच्या ताब्यात होत्या. इतरांना लिहिण्या-वाचण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे जुन्या ग्रंथात एका वर्गाला सोयीचे होईल असे लेखन झाले आहे. लोकसंस्कृतीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रवाद ही संकल्पना सवर्णांच्या राजकीय वर्चस्वाची भलामण करणारी आहे. देशाने स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रणालीचा अंगीकार केल्यामुळे आता लोकसंस्कृतीचा विकास होऊ लागला. तिचे वर्चस्व वाढू लागले. सुरुवातीच्या काळात संघामध्ये ब्राह्मण नेते व ब्राह्मण प्रचारक यांचा भरणा होता. समर्पित कार्यकर्त्यासाठी तीन अटी असत. ब्रह्मचर्य व पदवीधर असणे आवश्यक होते. अनिकेत म्हणजे घराबाहेर राहणे वा घरावाचून राहणे. प्रचारकांचा पत्ता संघाचे कार्यालय असे. ही सैन्याची पद्धत. साहजिकच ब्राह्मणवर्गात संघाबद्दल आपुलकी असली तरी ब्राह्मणेतरांमध्ये दुरावा होता.
महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर भारत सरकारने संघावर बंदी घातली. बहुजन समाजात संघाची इमेज ‘पोरांना वाकड्या मार्गाने घेऊन जाणारे लोक’ अशी होती. ७९ वर्षांच्या वृद्ध व नि:शस्त्र महात्म्याची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेने कोणता पुरुषार्थ गाजवला, असा प्रश्न लोक विचारत. ग्रामीण भागात प्रचारकाला लोक तोंडावर विरोध करत. ‘तुमची संगत नको रे बाबा. तुम्ही म्हाताऱ्या बापाला मारायची अक्कल पोराला देता. तुमच्या संगतीने आमची पोरं बिघडतील,’ असे त्यांना लोक म्हणत. संघावर बंदी होती तेव्हा ती उठवावी, असा आवाज कोणीही काढला नाही. या एकटेपणाच्या भावनेतून जनसंघ या राजकीय पक्षाची संघाने स्थापना केली. निदान लोकसभेत संघावरच्या टीकेला उत्तर देणारा एखाद दुसरा खासदार असावा, अशी कल्पना होती. धार्मिक अल्पसंख्यांक, दलित व आदिवासी हे वर्ग काँग्रेसला मिळणाऱ्या मतदानाचे बालेकिल्ले होते. हे बालेकिल्ले उद्ध्वस्त करण्याकडे त्यांचे लक्ष होते.
१९६४ साली पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. त्यावेळी त्यांची शासन व प्रशासन यावर पकड कमी होती. डॉ. राममनोहर लोहिया हे समाजवादी नेते. विशेषत: त्यांचे आणि एकूणच समाजवादी चळवळीचे त्यांनी आभार मानले पाहिजेत. १९६४ सालानंतर म्हणजे पंडित नेहरूंच्या निधनानंतर समाजवादी नेत्यांच्या पुढारपणाने अँटिकाँग्रेसिझम किंवा गैर काँग्रेस-वाद या राजकीय तत्त्वज्ञानाचा उदय झाला. परिणामत: नऊ राज्यांमध्ये संयुक्त विधायक दल या आघाडीची सरकारे आली. या आघाडीत जनसंघ व कम्युनिस्ट या तत्त्वज्ञानाला संघ चिकटून राहिला. मात्र १९७४ साली जयप्रकाशजींच्या आंदोलनात सामील झाला. त्या काळात संघ राजकीय अस्पृश्यतेच्या परिस्थितीमधून मुक्त झाला.
संघाकडे जननेता तयार झाला नव्हता. केडर पद्धतीतून तो निर्माण होणे शक्य नव्हते. संसदीय लोकशाहीत जननेता व भिन्न समाजाचे पुढारी आवश्यक आहेत, हे संघाच्या लक्षात आले. त्यांनी काँग्रेसची वोट बँक तोडण्यासाठी आणि सामान्य हिंदूंना हिंदुत्ववादी करण्यासाठी विविध संघटना काढल्या. भाजपसहित या संघटनांनी अल्पसंख्यांकांबद्दल हिंदूंच्या मनात द्वेष निर्माण करावा, हे मुख्य सूत्र होते. भारतीय राज्यघटनेने जातिव्यवस्था व तिची उतरंड अमान्य करून सर्वांना नागरिकत्वाचा समान दर्जा बहाल केला. हिन्दू राष्ट्र निर्मितीसाठी ८०% हिंदूंची व्होट बँक आधी तयार करावी लागते, अशी त्यांची धारणा होती.
संघाच्या आदेशानुसार, पण आपापला कारभार स्वायत्त संस्था म्हणून त्यांनी सांभाळावा, अशी कल्पना होती. द्वेषातून हिंसा आपोआप निर्माण होते.
हिंदुत्ववाद्यांच्या कारवाया वाढू लागल्या.
हिंदूंना हिंदुत्ववादी बनवले जाऊ लागले. धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून मतदाराचे मन भाजपकडे वळवून सत्ता हाती घेता येईल, हे धोरण होते. धिटाईने चढाईचे धोरण स्वीकारण्यात आले.
आदिवासींमध्ये हिंदुत्ववाद्यांनी जाऊन ‘तुम्ही हिन्दू आहात आणि वनवासी आहात’ हे रुजविण्याचा प्रयत्न केला. सत्तेच्या गरजेतूनच सामाजिक दंगे घडवून आणले. बाबरी मशीद पाडल्यानंतर बरोबर तेवीस वर्षांनी संघाचे धु्रवीकरण वाढले. हिंदुत्व व ध्रुवीकरण यांना वेगाने गती दिली आहे.
‘कुजबुज मोहीम’ हे संघाचे प्रभावी साधन आहे. सोशल नेटवर्किंग मीडियाच्या माध्यमातून मुस्लीमद्वेष पसरवला जातो. सध्या देशात राष्ट्रवादाचा नेमका अर्थ काय, यावर संघर्ष चालू आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला आणि भारत गेली अडुसष्ट वर्षे अखंड राहून प्रगती करीत आहे. हे गांधीजींच्या विचार-सरणीचेच यश आहे. जुन्या समाजरचनेत अन्याय, विषमता व दारिद्र्य होते. त्यामुळे पुन्हा भूतकाळातून प्रेरणा घेणे याचा सरळ अर्थ आधुनिक भारताच्या निर्मितीला विरोध करणे असा होतो. संघाने स्वातंत्र्य- लढ्यात सहभाग घेतला नाही. गांधीजींच्या हयातीत आणि त्यांच्या हत्येनंतर आजपावेतो त्यांचा द्वेष शिकवला; हाच दोन भिन्न राष्ट्रवादाच्या संकल्पनांचा टकराव असल्याचा पुरावा आहे, संघाला फक्त हिंदू संस्कृती हवी आहे. इतर धर्मीयांचे भारतीय संस्कृतीत योगदान आहे, हे वास्तव मानायला ते तयार नाहीत.
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून वर्षभर धार्मिक ध्रुवीकरणाचे कार्यक्रम जोशात होते. संघामध्ये आदेश पद्धतीला मान्यता आहे. त्यांचे प्रिय विचार म्हणजे ‘लक्ष लक्ष पाय; पण चाल एक. लक्ष लक्ष डोळे; पण दृष्टी एक.’ सध्या तर भगवेकरणाची प्रक्रिया वेगात आहे. केंद्रीकरणाची प्रक्रिया मोदींच्या रोमारोमात आहे. नरेंद्र मोदींच्या मान्यतेशिवाय एक पान हलू शकत नाही. कॅबिनेटला मोदींच्या पायपुसण्याइतकी किंमत आहे. लोकसभेत त्यांना रस नसतो. विरोधकांशी संवाद ठेवत संवाद चालविणाऱ्या ची जबाबदारी सरकारची असते, हे तत्त्व त्यांना मान्य नाही.
लोकसभा ते ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकांमध्ये मोदींना उभे केले जाते. प्रश्न असा आहे की, लोकसभेला पर्याय म्हणून धर्मसंसद आणता येईल काय...?
कुंभमेळ्याच्या रूपाने बैरागी व तथाकथित साधूंचे दर्शन होते. धर्म-भावनेतून लोक त्यांच्या पाया पडतील. साधु बैराग्यांनी भारताला आकार द्यावा हे जनता मान्य करणार नाही. सत्तेचे केंद्रीकरण लोक अमान्य करतील.
जातिधर्मनिरपेक्षतेच्या व समान नागरिकत्वाच्या तत्त्वाला धक्का लावला तर अस्थिरता व अराजक निर्माण होईल. संघ-भाजपचे केंद्र सरकार सत्तेवर आले; पण या बिंदूपासून राज्यघटना रद्दबातल करून हिन्दू राष्ट्र निर्माण करणे शक्य होईल. असा निष्कर्ष काढायला वर्तमानकाळ पुष्टी देत नाही. जातिधर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर भाजपने वाटचाल केली तर कदाचित काँग्रेस पक्षाचा पर्याय म्हणून भाजपला जनता निवडून देईल. या उलट हिंदुराष्ट्राच्या दिशेने वाटचाल झाली तर अँटीभाजपइझम झपाट्याने निर्माण होईल.
कॉंग्रेसला सत्तेवरून घालवणे सोपे होते, पण सत्तेवर आल्यावर भाजप वेगाने काँग्रेस बनत आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
सौजन्य: ग्राहक हित दिवाळी अंक
अश्विनी मयेकर
अभिराम दीक्षित
अनिल शिदोरे
शेफाली वैद्य