संघाची ९० वर्षे: गरज मंथनाची, संधी आत्मचिंतनाची, समीक्षा विचारवंतांची


९० वर्षे !! समर्पित कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाची, सम्पूर्ण समाजाला गवसणी घालणाऱ्या विस्ताराची सलग नव्वद वर्षे लाभलेली अशी ही भारतातील एकमेव संघटना. आज आपले समर्थक कुठे आणि किती आहेत याची मोजदाद लागणे सुद्धा ज्यांना कठीण अशी ही संघटना.

नव्वद वर्षात तसे म्हटले तर खुप काही बदलले. फक्त भारतातच नव्हे तर जगात सुद्धा. शास्त्र, तंत्रज्ञान या साऱ्यामुळे अनेक संदर्भ बदलले. अनेक वैचारिक चळवळी अस्तंगत झाल्या. किंबहुना विचारधारेशी बांधिलकी ही  कल्पनाच जगात अनेक ठिकाणी कालबाह्य होत चालली.  या पार्श्वभूमीवर संघाची ही वाढ तशी आश्चर्यकारक.

पण काही गोष्टी आहे तशाच राहिल्या. संघाचे समर्थक खुप वाढले पण विरोधक आपल्या विरोधावर सुद्धा तेवढेच अडून राहिले. आज कदाचित अधिकच कटुतेने ते संघावर तुटून पडलेले दिसतात. त्यातही गम्मत अशी की त्यांचे संघाविषयी ज्ञान सुद्धा ९० वर्षांपासून आहे तेवढेच राहिलेले दिसते. म्हणून गेल्या ३०-४० वर्षात संघावर होणारे आरोप, त्या आरोपांसाठी वापरलेले संदर्भ, टीकेची परिभाषा यात काडीमात्र बदल झालेला दिसत नाही. परंतु यातील त्यांच्या विचारानुसार प्रामाणिक विरोध करणाऱ्या व्यक्तींना तरी देशहिताच्या साठी का होईना संघाशी संवाद होणे आवश्यक आहे असे मानावे लागेल इतके  आज संघाने  समाजात मध्यवर्ती स्थान प्राप्त केले आहे. 

 संघ हा केवळ समाजातील एक संघटन होउन राहण्यात धन्यता मानणारा असता तर त्याला विरोधाची एवढी पर्वा करण्याचे सुद्धा कदाचित कारण राहिले नसते. पण 'समाजातील एक संघटन' नव्हे तर  'संपूर्ण समाजाचे संघटन' हे ज्या संघाचे ध्येय त्याला केव्हा तरी या विरोधाला आत्मसात करण्यासाठी काही तरी करावेच लागणार. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे प्रामाणिक विरोधकांचे म्हणणे शांतपणे समजून घेणे.  

पण मंथन, चर्चा ही काही केवळ एवढयाच कारणासाठी आवश्यक आहे असे नव्हे. आज जागतिकीकरणामुळे प्रत्येक छोट्या घटनेला सुद्धा वैश्विक संदर्भात व जगात आज जी परिभाषा चालते त्या परिभाषेत मोजण्याची - व मांडण्याची सुद्धा - आवश्यकता निर्माण झालेली आहे. या संदर्भात आपण कुठे आहोत असे जर संघ समर्थकाला सुद्धा समजुन घ्यायचे असेल तरीदेखील अशी चर्चा, मंथन हे खुपच मूल्यवान ठरेल.

वेब या माध्यमाचे सौंदर्य असे कि येथे लहान मोठेपणाच्या, भौगोलिक अंतराच्या, ठराविक वेळेच्या अशा सर्व मर्यादा ओलांडता येतात. त्याचबरोबर विविध विचारांचा अनिर्बंध सामना करण्यासाठी सुद्धा तयार राहावे लागते. अशा परिस्थितीत या मंथनाला उपयुक्त माध्यम हेच असे समजून या 'ई विवेक' च्या पण तरीही मुक्त अशा मंचावर आपले मत मांडण्यासाठी आपले स्वागत आहे. आपले मत आपण प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देऊन सुद्धा मांडू शकता किंवा स्वतंत्र लेखाच्या स्वरूपात 'संपर्क' पेज वर जाउन पाठवू शकता. अभ्यासपूर्ण लेखांना, मग ते संघाच्या समर्थनार्थ असो किंवा विरोधात, अवश्य प्रसिद्धी दिली जाईल.