गरज माध्यमस्नेही होण्याची!
अश्विनी मयेकर
समाजहिताची चिंता करताना प्रसारमाध्यमांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातील उणिवा, दोष अवश्य शोधावेत व समोर मांडावेत; पण समाजाच्या भल्यासाठी संघाच्या माध्यमातून जे जे चांगले चालले आहे, त्याचेही वस्तुनिष्ठ प्रक्षेपण अवश्य करावे असे मला वाटते. एकवेळ स्तुती केली नाही तरी चालेल, पण निष्पक्षपणे जे जे उत्तम सुरू आहे, किमान त्याची दखल घेतली तरी बरेच गैरसमज दूर होतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदाच्या विजयदशमीला ९० वर्षं पूर्ण होत आहेत. आज देशातील हे सर्वांत मोठे संघटन आहे. संघाचे काम देशाच्या कानाकोपऱ्या त फैलावले आहे. ते समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांत व सर्वस्तरांत जाणवेल इतके प्रस्थापित झाले आहे. भारताबाहेर सुमारे ४० देशांत नित्य संघकाम चालते. त्याचाही प्रभाव त्या त्या देशात व भारतातही जाणवतो. एक विचारधारा म्हणून ((School of Thought)) संघाचा विचार व व्यवहार समाजात प्रभावी झाला आहे. कुठलाही सामाजिक वा राजकीय प्रश्न, संघविचार आणि व्यवहार संदर्भास घेतल्याखेरीज पुरा होऊ शकत नाही, अशी आजची स्थिती आहे.
प्रखर विरोध असतानासुद्धा वाढलेले हे संघटन म्हणजे संघ आहे. दडपण्याच्या पाशवी प्रयत्नांना तोंड देऊन संघाचे काम या स्थितीला पोचले आहे. साधारण त्याच वयाच्या असणाऱ्या साम्यवादी विचारधारा, विविध दले व संघटना नामशेष झालेल्या आहेत. त्यातील काही तर शासनाचा हातभार किंवा सर्वप्रकारची अनुकूलता असूनही वाढू शकलेले नाहीत. संघ मात्र कार्यकर्त्यांनी केलेल्या निःस्वार्थ व अमाप संघटित प्रयत्नांमुळेच संघाची आजची गौरवास्पद स्थिती येऊ शकली आहे.
संघ दखलपात्र झाल्यामुळे विविध माध्यमे व विचारधारा यांच्याकडून टीकाटिप्पणी सततच होत असते. खंडणमंडण करूनही संघाची दखल सतत घेतली जाते. माध्यमांपुरतेच म्हटले तर, उत्तेजनपर दखल फारच कमी घेतली जाते. कोणत्या गुणांमुळे संघटन वाढले, संघाचे बलस्थान कशात आहे, संघाचे योगदान काय आहे, याविषयी फार कमी बोलले-लिहिले जाते. एकूणच या सर्व मांडणीत दोषैक दृष्टी (Cynicism) अनुभवाला येते, अनेक दोष माथी मारले जातात. माध्यमांचे हे कामच आहे असे गृहीत धरले, तरी एकूणच संघविचाराला व कार्य-पद्धतीला माध्यमातून उचित न्याय दिला जात नाही, हे वास्तव आहे.
माध्यमांचे किंवा दखल घेणाऱ्यांचे वेगवेगळे गट करता येतील. प्रामाणिक मतभिन्नता असणाऱ्यांचा पहिला गट हा कमी संख्येचा आहे. संघ विचारांविषयी त्यांची मूलभूत मतभिन्नता आहे. यामध्ये खूपच क्षीण झालेली गांधीवादी विचारधारा, सर्वोदयाचा अवलंब करणारे विचारवंत व विश्लेषक यांचा अंतर्भाव होतो. निहित हितसंबंध नसलेले काही उच्चभ्रू विचारवंत व विश्लेषक यात मोडतात. यातील अनेकजण मतभिन्नता विधायक पद्धतीने व्यक्त करतात आणि मतभिन्न नसलेल्या विषयात सहकार्य करतात. प्रकटपणे गुण-ग्रहणही करतात.
दुसरा गट म्हणजे कोणत्यातरी विचारधारेला बांधलेले, पूर्वग्रहांसहित (दूषित नव्हे), राजकीय किंवा अन्य हितसंबंध असलेले असे असतात. ही मंडळी माध्यमांतून विचार व्यक्त करताना, ठामपणे विरोध करतात. त्यात प्रामाणिकपणा असतो. त्याचबरोबर काही विधायकताही असते, परंतु टीकाटिप्पणी करताना सभ्यतेचे व सामाजिक आत्मीयतेचे संकेत पाळताना आढळून येतात. काँग्रेस विचारधारेमधील अनेकजण या पद्धतीने विचार व व्यवहार करताना अनुभवास येतात. यातील अनेकजण खाजगीमध्ये वेगळ्या पद्धतीने बोलतात आणि वागतात, पण प्रकटपणे त्यांचा दुसराच चेहरा अनुभवाला येतो.
तिसर गट आहे, कट्टर विरोधकांचा! हे दुस्वास करतात, हेटाळणी करतात, तुच्छता दर्शवतात, धादांत असत्य विधाने करतात. वेळोवेळी विसंगत भूमिका मांडतात. रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे भूमिका बदलतात. यापैकी अनेकजण, वेगवेगळ्या राजकीय प्रवाहात आहेत, काहीजण नष्टप्राय झालेल्या संघटना किंवा दलाशी संबंधित आहेत, यातील अनेकांचे व्यक्तिगत व सामाजिक हितसंबंध आहेत. या मंडळींना संघाचे कुठलेच, काहीच चांगले दिसत नाही. ही मंडळी ‘विषाक्त’ (Toxic) भाषा वापरतात. असभ्य टीका करतात. काहीजण नुसतेच ‘मुखर’ (Vocal) असतात. आजकालच्या TRP मोजमापाच्या दिवसात यांना प्रसिद्धी जास्त मिळते.
विविध विषयासंबंधी माध्यमांचे दर्शन कसे असते? संघाच्या शिस्तीविषयी सामान्यतः सर्वांना कौतुक वाटते, पण अनेकांना त्याच्यात सक्तीचा, हुकूमशाहीचा विषय वाटतो. वास्तविक संघामध्ये येण्यासाठी, कोणतेही बाह्य भौतिक आकर्षण नाही. लोक स्वयंप्रेरणेने येतात, वर्षांनुवर्षे टिकतात, कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करतात आणि हेच संघाचे बलस्थान आहे. अत्यंत बेशिस्त असणाऱ्या आपल्या समाजाला, सामाजिक शिस्तीची नितांत आवश्यकता आहे, पण संघाच्या कार्यक्रमात शिस्तीत ठेवलेल्या ‘पादत्राणांचीसुद्धा टिंगल करणारे ‘विचारवंत’ आहेत. यांच्या बुद्धीला काय म्हणावे?
संघ कामावर ‘गुप्त कार्यपद्धतीचा आरोप’ केला जातो, पण संघाच्या शाखा उघड्या मैदानावर चालतात. तेथे येण्यासाठी कोणालाही बंदी नाही. बहुसंख्य कार्यक्रम, उत्सव यात कोणी यावे यासाठी बंधन नाही. संघासंबंधीचे वाङ्मय गुप्तपणे छापले, वाटले जात नाही. संघाचे अधिकारी चर्चेसाठी कोणालाही सहज उपलब्ध असतात. ही वास्तविकता ध्यानात घेतली, तर गुप्ततेचा आरोप अत्यंत व्यर्थ आहे, हे ध्यानात येऊ शकते.
संघात केव्हातरी ‘एकचालकानुवर्तित्व’ हा शब्द वापरला जात असे. कालानुरूप तो शब्दही पूर्णपणे बाजूला ठेवला गेला आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात सर्वच सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांची रचना ‘एकचालकानुवर्तित्वाची’च होती. आजही असे एकखांबी तंबू समाजात ठिकठिकाणी विविध रूपांत दिसतात. तृतीय सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस यांनी ‘सहविचारात्मक नेतृत्व पद्धती’ रुजवली आहे. सात-आठजणांचा कोअर ग्रुप, पंचवीस-तीसजणांची केंद्रीय कार्यकारिणी यांच्यामार्फत सर्व विचार व व्यवहार यांचे चिंतन होते. त्यानंतर निर्णय होतात. चिंतन होताना सखोल चर्चा होते, भरपूर मतभिन्नता असते, पण एकदा निर्णय झाल्यावर तो सर्वांचा असतो. मनापासून तो स्वीकारला जातो. हे संघाचे बलस्थान आहे. त्याचे अनेकांना आश्चर्य, तर काहीजणांना वैषम्य वाटते. याचे चांगले उदाहरण सांगता येईल. एकदा केंद्रीय बैठकीत एका वादग्रस्त विषयाची चर्चा चालू होती. काही टोकाच्या चर्चाही त्यामध्ये झाल्या. त्यातून (Consensus) एकमताकडे वाटचाल झाली. संघाच्या बैठकीतही ठराव मताला टाकला जातो, हे लोकांना माहीत नाही. हा ठराव मताला टाकल्यावर, ज्यांनी आधी टोकाचा विरोध केला होता, त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी होकारात्मक हात वर केला. कोणीतरी या विषयावर मागाहून छेडल्यावर ते म्हणाले, ‘‘आधी व्यक्त केलेले माझे मत होते, आता हे संघाचे मत आहे.’’ अशा पद्धतीने संघाचे काम चालते.
अनेकांना ‘संघात भांडणे कशी होत नाहीत?’ किंवा ‘ती चव्हाट्यावर कशी येत नाहीत?’ याचे आश्चर्य वाटते. अधिकार-पदाच्या स्पर्धेविषयी माध्यमे विषय चघळतात. त्यांच्या दुर्दैवाने संघातले बदल हे फार सहजपणे होतात. मतभिन्नता किंवा खळबळ अजिबात नसतेच असे नाही, पण ती पृष्ठभागावर येऊ न देण्याची काळजी सर्वजण घेतात. आपण काही उदात्त हेतूंसाठी या कामात सहभागी झालो आहोत. यात व्यक्तिगत हितसंबंध असणार नाहीत, याची जागृत जाणीव सतत असते. त्यामुळे संघटनेपेक्षा व्यक्ती मोठी होत नाही. ही परंपरा जोपासली गेली आहे. म्हणूनच कोणी कार्यकर्ता कोणत्याही कारणांनी मूळ प्रवाहापासून बाजूला झालाच, तरी तो संघाचा शत्रू बनत नाही. हे संघकामाचे आगळे वैशिष्ट्य आहे.
माध्यमांचा आणि इतर काहीजणांचा चवीचा एक विषय असतो, ‘राजकीय आणि संघ संबंध’, ‘तात्कालिक सामाजिक उद्रेक व संघसंबंध’ याविषयी अतिरंजित अनेक वृत्ते पसरवली जातात. संघाचे व प्रमुख कार्यकर्त्यांचे कार्यक्रम सुमारे वर्षभर आधी काटेकोरपणे निश्चित केलेले असतात. एखादी बैठक, सरसंघचालकांचा प्रवास याचा संबंध एखाद्या राज्यातील निवडणुकीशी किंवा तात्कालिक विषयाशी जोडणे, हे निव्वळ हास्यास्पद आहे. राजकीय क्षेत्रात काम करणारे संघ कार्यकर्ते आपल्या मातृसंस्थेशी संबंध ठेवणारच, त्यात वावगे ते काय?
संकुचित, मर्यादित राजकीय क्षेत्रापेक्षा समाजकारणाची संघाची धारणा फार व्यापक आहे. त्यामुळे असे संवाद असणे, हे योग्यही आहे व आवश्यकही आहे. राजकीय क्षेत्रच काय, अन्य अनेक अखिल भारतीय कार्ये, संघ स्वयंसेवकांनी चालवलेले छोटेमोठे संस्थात्मक उपक्रम, हे त्या त्या संस्थेने ठरवलेल्या गतिविधीनुसारच चालावयाचा संकेत आहे; म्हणून प्रत्येक संस्था ‘स्वायत्त-स्वतंत्र-समांतर’ आहे, असे आवर्जून पू. सरसंघचालक सांगत असतात. विविध संस्थांमध्ये व मातृसंस्थेशी संवाद तर असलाच पाहिजे, म्हणून समन्वय बैठका चालतात. छोट्या मोठ्या मतभिन्नता या ‘दुसऱ्या च्या डोळ्यातील कुसळ दिसतं, पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही’ या म्हणीप्रमाणे सवंगपणे मांडणाऱ्या माध्यमांना व विचारधारांना काय म्हणावे?
गेल्या तीस चाळीस वर्षांत, विशेषतः आणीबाणीच्या जीवघेण्या संकटानंतर संघकामात चौफेर वाढ झालेली आहे. असंख्य समाजोपयोगी उपक्रम व सेवाकार्ये संघकार्यकर्त्यांनी विलक्षण परिश्रमातून सर्वदूर उभी केली आहेत. सहकारी क्षेत्रात, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रतिष्ठाने उभी केली आहेत. त्या त्या क्षेत्रात त्यांनी विश्वसनीयता प्राप्त केली आहे. आपत्ती निवारणातील संघाचा सहभाग, माध्यमे आवर्जून दृष्टीआड करतात. समाजाला मात्र ती ‘हाफ चड्डी’ प्रकर्षाने दिसते.
अनेकजण डोळ्यांवर कातडी ओढून घेतात, त्यांना ती कशी दिसेल? मात्र विरोधी विचारांचे असूनही प्रामाणिकपणे हे पाहणारेही अनेकजण असतात. त्याची दोन उदाहरणे देतो.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी नित्य संघकामात असलेल्या एका मित्राने पुढे राजकीय आकांक्षेने अन्य कुठल्या पक्षात स्वतःचे मजबूत स्थान निर्माण केले. गेल्या दहा वर्षांत त्यांनी पुण्यात स्थलांतर केले. आमच्या व्यक्तिगत संबंधात मात्र कधीच बाधा आली नाही. पुण्यातील त्यांच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमात त्यांच्या पक्षाच्या अनेकांबरोबर अनौपचारिक संवादाचा मला योग आला. माझा व संघकामाचा परिचय करून देताना आमच्या या जुन्या मित्राने ‘मन की बात’ केली. त्यांनी रुग्णालयाचे व अन्य कामांचे वर्णन करून म्हटले, ‘‘हे लोक कशा पद्धतीने काम करतात, याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही. आपल्या सर्वांच्या विचाराच्या व व्यवहाराच्या पलीकडचे ते आहे!’’ आणि मग त्याने तपशीलवार अनेक कामांचे वर्णन केले.
लातूरमध्येच एका खाजगी कार्यक्रमांत शहरातील आम्ही प्रमुख चाळीस-पन्नासजण होतो. भोजनाची व्यवस्था होती. यजमानांनी भोजनाला बोलावले, त्यावेळी मी व माझे रुग्णालयातील सहकारी विश्वस्त, दोघांनी व्यक्तिगत कारणासाठी भोजनाला नकार दिला. यजमानांनी आग्रह केला, ‘काहीतरी खा, थोडंतरी खा.’ आम्ही दोघांनीही म्हटले, ‘काही खाणार नाही, पण तुमच्या बरोबर बसू व संवाद करू.’ एक ज्येष्ठ राजकीय नेते तिथेच होते. सोबत त्यांचे पक्ष कार्यकर्ते होते. त्या नेत्यांनी तात्काळ मार्मिक प्रतिक्रिया दिली, आमच्याकडे बोट करून ते म्हणाले, ‘‘बघा, हे लोक काही खात नाहीत, त्यांच्या संस्था चांगल्या चालतात. नाहीतर आपले लोक... आणि आपल्या संस्था!’’ या दोन्ही प्रसंगावर अन्य टिप्पणीची आवश्यकता नाही.
समाजाविषयी शुद्ध कर्तव्यभावना, संघटनेत सर्वांविषयी असलेली नितळ आत्मीयता व पूर्णपणे नि:स्वार्थ भावना या आधारावर संघाचे काम व विविध क्षेत्रातील कामे उभी आहेत. त्यांना समाजाची मान्यता व आता तर राजकीय मान्यताही मिळाली आहे. यात कोठेच उणे किंवा दोष नाही, असा दावा कोणीच संघकार्यकर्ता करणार नाही, पण सातत्याने केलेल्या परिश्रमातून अनेक प्रश्नांनी ग्रासलेल्या समाजात, हिरवळीची अनेक बेटे संघ कामातून निर्माण झालेली आहेत. समाजहिताची चिंता करणाऱ्या माध्यमांनी उणिवा, दोष अवश्य शोधावेत व मांडावेत, पण समाजाच्या भल्यासाठी संघाच्या माध्यमातून जे जे चांगले चालले आहे, त्याचे वस्तुनिष्ठ प्रक्षेपण अवश्य करावे, स्तुती केली नाही तरी चालेल, समाजाचे व्यापक हित त्यातून वृद्धिंगत होईल.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी एका प्रथितयश दिवाळी अंकाने ‘संघ या विषयावर परिसंवाद योजला होता. त्याकाळच्या एका विचारवंताने (संघद्वेषाची काविळ झालेल्या) लिहिले होते, ‘‘मी संघ हा दखलपात्र विषय मानत नाही, त्यावर परिसंवादही घेण्याचे कारण नाही; जो विचार, जी संघटना येणाऱ्या काही वर्षांतच मरणार आहे, त्यावर मी कशाला लिहू? पण संपादकांनी सांगितले म्हणून मी माझी लेखणी झिजवली आहे.’’ त्या प्रख्यात विचारवंताचे व त्यांच्या विचारांचे काय झाले माहीत नाही! बहुदा अस्तित्वच राहिले नसावे. संघकार्य मात्र मुळच्याच ध्येयनिष्ठेने, परिश्रमाने अनेक पटीने वृद्धिंगत होत राहिले, हे विरोधकांसकट सर्व समाज अनुभवत आहे.
सौजन्य: ग्राहक हित दिवाळी अंक
अश्विनी मयेकर
अभिराम दीक्षित
अनिल शिदोरे
शेफाली वैद्य