पाश्चात्त्य विचारधारा आणि साम्यवादी विचारधारा माणसाच्या सुखोपभोगाशी निगडित आहेत. भांडवलशाहीची प्रेरणा असलेला पाश्चात्त्य विचार पृथ्वीतलावरील जे आहे ते सारे माणसाला उपभोग करण्यासाठीच आहे असे मानून माणसाने सृष्टीला ओरबाडायला सुरुवात केली. तिथे माणसाच्या सोयीकरिता सगळया सुविधा उभ्या राहू लागल्या. निसर्गाने माणसालाच फक्त बुध्दी देऊ केली असल्याने निसर्गातील इतर सर्व घटकांचा स्वत:साठी वापर करायला प्रारंभ केला. माणसांना जंगलात जाऊन वाघ-सिंहासारखे प्राणी बघता येत नाहीत म्हणून माणसाने प्राणिसंग्रहालये उभारली. हेतू एकच, निसर्गाचा वापर करून घ्यायचा.
आपली स्वत:ची आदर्श व्यवस्था अस्तित्वात असताना आपण जगातील इतर व्यवस्थांच्या नादी लागून आपले समाजजीवन बिघडून घेतले का? असा एकात्म मानववादाचे अध्ययन करताना प्रश्न पडला. शिवाय कोण्या पाश्चात्त्याने सांगितलेला पशू, पक्षी, वृक्षवेली म्हणजे एकूण निसर्गरक्षणाचा विचार मानायचा, पण तेच हिंदू विचार म्हणून कोणी सांगायला गेले तर त्याची हेटाळणी करायची. असे का होत राहिले? कर्मकांडाच्या आहारी गेलेल्या भारतीय समाजावर स्वातंत्र्यानंतर सर्व सुखांचा मार्ग हा वस्तू मिळविण्यातून आणि उपभोगातून मिळतो, असे बिंबवले गेल्याने जीवनाचा खरा आनंद समाज घेऊ शकला नाही. कुठे व्यक्तिकेंद्रित तर कुठे समूहाशी बांधील व्यवस्था निर्माण होत असताना व्यक्तीला कुटुंब, समाज, देश, जगाशी जोडता जोडता त्याला एका परमशक्तीशी जोडणारा विचार दीनदयाळजींनी दिला. तो विचार गांधीजींनीही स्वदेशीच्या माध्यमातून मांडला होता; पण स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या त्यांच्या शिष्यांनी गांधीजींची तर पूजा करायला सुरुवात केली; पण त्यांच्या विचारांची बोळवण केली. दीनदयाळजींच्या एकात्मवादाचे वाचन करताना या विचारानुसार आचरण करायचे असेल तर आपल्याला वेगळे काहीच करायची गरज नाही. आपण तसेच जगतोय. फक्त त्यात शिस्त आणि निसर्गाप्रति आपले कर्तव्य चोख बजावले तर आपले जीवन सुखमय होत जाईल. शिवाय या विचारांचे काही प्रतिबिंब विविध उपक्रमांच्या माध्यमातून काही विभूतींनी उभ्या केलेल्या कामातून दिसते. तो हाच विचार असावा असे मला वाटते.
दीनदयाळजींनी मांडलेला हा विचार नवा नाही. मानवी जीवनात येणाऱ्या विविध कालखंडांत माणसाने कसे वागले पाहिजे हे धडे हिंदू कुटुंबात आपोआप शिकता येतात. त्यातूनच सामाजिक व राजकीय व्यवस्था उभी राहिली; परंतु काळाच्या ओघात चुकीच्या रूढींमुळे काही समाजघातक गोष्टी घडल्या. त्यामुळे बदनाम झालेला हिंदू विचार जगाचे कल्याणच करणारा असताना किमान भारतात तरी त्यानुसार व्यवस्था लावता आली असती; पण तसे झाले नाही; परंतु मातीत एकरूप झालेल्या या विचाराने केव्हाही चालायला हरकत नाही इतका हा जिवंत विचार आहे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या जनजीवनावर राजकारण्यांचा पगडा बसला. त्यातून कथनी आणि करणीतला फरक म्हणजेच यशस्वी राजकारण या मार्गावरून वाटचाल सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर गांधीजींनी दाखविलेल्या मार्गाने जायचे आहे हे भाषणातून तर सांगायचे, पण रस्ता पाश्चात्त्य नि कम्युनिझमकडे झुकणारा पकडायचा हेच धोरण अवलंबले. पाश्चात्त्यांचा विज्ञान नि उद्योगाला वाहिलेला मार्ग निवडण्यात गैर काहीच नव्हते, परंतु त्याला आपल्या भारतीय व्यवस्थेची जोड नसती का देता आली? कारण नवी व्यवस्था अंगवळणी पडण्यापेक्षा ती आपल्या देशावर लादली गेली असे दिसले, कारण आपल्या निर्मितीपेक्षा परदेशी आयातच आपल्या माथी अधिक मारली गेली. त्यामुळे काळाच्या ओघात जग निर्माता झाला नि भारत त्यांच्यासाठी मोठी बाजारपेठ. आजही जगात आपली मोठी बाजारपेठ अशीच ओळख राहावी हे 125 कोटी देशवासीयांसाठी अभिमानाची बाब नाही. त्यामुळेच माहिती क्रांतीच्या युगात नारायण मूर्ती यांच्यासारखे भारतीय माहितीतज्ज्ञ 2015 साली म्हणालेच होते की, ''गेल्या 60 वर्षांच्या काळात भारतीय तरुणाईने क्रांतिकारी असे संशोधन केलेच नाही.'' परंतु जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा देशातील तंत्रज्ञांनी देशासाठी मोठे योगदान दिल्याची उदाहरणे आहेत. ते परम संगणकाचे असो अगर क्रायोजेनिक इंजिन, परंतु नारायण मूर्ती म्हणतात त्यानुसार संशोधन बाहेर झाले आणि त्यातल्या शिळोप्यावर आपण आपली गुजराण करू लागलो असाच याचा अर्थ होतो. यात तथ्य असले तरी त्याचे कारण आपली पूर्वतयारीच नव्हती. औद्योगिक आणि माहिती युगात जगातील ठरावीक देश प्रगत झाले असतील; परंतु भारतीय समाज किती टक्के प्रगत नि सुखी झाला?
बाजारात सुखसुविधांची रेलचेल झाली असताना ती साधने वापरण्याची क्षमता येण्यापूर्वीच ती आपल्याजवळ असण्याची इच्छा प्रबळ झाली. आज अशी असंख्य कुटुंबे आपण पाहू शकतो, जी गटाराच्या काठावर अस्वच्छतेच्या सान्निध्यात राहतात. अगदी लहान खेडयापासून ते मुंबईसारख्या महानगरापर्यंत पक्के घर बांधण्याची ऐपत येण्यापूर्वीच पोरांना महागडे शिक्षण देण्याची हौस जन्म घेते. भरपूर पैसा खर्चून त्यांची लग्ने लावून देण्यात घर नि आपले जीवन सजविण्याची हौस कुटुंबप्रमुखाला मारून टाकावी लागते. गरज किंवा हौस म्हणून वाहन खरेदी होते. घरात टीव्ही, त्याला महागडी डिश नि आता मोबाइलसुध्दा. ही साधने एकामागून एक मनावर आक्रमणे करतात. ही सगळी साधने घेणे गरजेचे आहे का? हा विचार आजच्या कालखंडात केला जात नाही. शिवाय आपली क्षमता आहे का? हा विचार तर डोकावू दिला जात नाही. त्यामुळे शिक्षण घेण्यापासून ते साधनांच्या वापरापर्यंत आपण सारे मार्केटिंग आणि भोगवादी समाजरचनेच्या आहारी चाललो आहोत. ऐपत नसताना महागडे जीवन जगण्यातून अव्यवस्था निर्माण होऊ लागलीय. त्यातूनच कुटुंबांमध्ये कलह निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडू लागले आहे. परिणाम स्पष्टच आहेत. जी गावे भारताच्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचा आधार होती ती बकाल आणि क्षमतेपेक्षा जास्त शहरे फुगू लागली. भारतीय संस्कृतीचा चैतन्याचा झरा ज्या गावांत वाहायचा ती गावे आज वृध्दाश्रम होत चालली आहेत. मिळेल त्या रोजगारासाठी तरुण शहरात, तर नापिकीने गांजलेले म्हातारे मायबाप खेडयात अशी अवस्था खेडयांची झाली आहे. येथेच गांधीजींनी सांगितलेला विचार कामी येऊ शकतो- खेडयाकडे चला! आता गावे बकाल झाली म्हणजे संपली असे होत नाही. दीनदयाळजींनी सांगितलेला हा विचार एखाद्या पुस्तिकेत जरी बंद असला तर तो वर्षानुवर्षे समाज जगत असल्याने मरगळीच्या कालखंडानंतर पुन्हा उभारीचा कालखंड येऊ लागल्यासारखे दिसते. गावातीलच व्यक्तींनी एकत्र येऊन गावे उभी केलीत. गावे उभी करताना फक्त आर्थिक विचार झालेला नाही. मानवी सहभागातून निसर्गाचे रक्षण हा त्यातला मुख्य हेतू साध्य झाल्याचे दिसते. त्यातील राळेगणसिध्दी, बारीपाडा, हिवरेबाजारसारखी गावे ठळकपणे दिसून येतात. बारीपाडातील चैत्राम पवारांनी तर लहानातल्या लहान पालेभाज्यापासून ते जंगलरक्षणाचाही विडा उचलला आहे. निसर्गाच्या रक्षणातून, लोकसहभागातून गावातील लोकांच्या सगळया गरजा पूर्ण होऊ शकतात हे बारीपाडा असेल किंवा पाटोदा असेल या गावांत दिसून येते. स्व. नानाजी देशमुखांनी चित्रकूट परिसरातील सुमारे 500 गावे स्वयंपूर्ण करण्याचा उभारलेला प्रकल्प दीनदयाळजींच्या एकात्म मानववादाची प्रेरणा देतो. या ठिकाणी खेडुतांच्या शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग व अध्यात्मापर्यंत काम चालले आहे. गावे स्वच्छ, स्वयंपूर्ण करायचा हा स्वदेशी विचार गांधीजी, दीनदयाळजींनी मांडला तो तेव्हाही सयुक्तिक होता नि आजही ते यशस्वी आहे. लोक शहराकडे धावत असताना गावाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, ही अण्णा हजारे, चैत्राम पवारांची भूमिका हा विचार शाश्वत असल्याचे स्पष्ट होते.
स्वकीय व स्वदेशी हा मानववादाच्या रचनेतील महत्त्वाचा भाग. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सगळे जग जवळ आले असताना स्वदेशीचा आग्रह टिकाव धरेल का? असे अनेक उद्योग आहेत की, ज्यांचा मूलाधार स्वदेशी आहे. उदाहरण एक-दोन पुरेसे ठरावे. त्यात विको मंजन, पेस्ट व क्रीम, तर अलीकडचा बाबा रामदेव यांनी उभा केलेला पतंजली ब्रँड. स्वदेशी शक्य आहे हे यातून सिध्द होते.
गरजांना नियंत्रित ठेवण्याचा, साध्या राहणीचा, आपली क्षमता ओळखून निर्णय घेण्याचा, स्वदेशी हा तो विचार. आज हा शब्द उच्चारल्यावर कोणीही लगेच मागासलेला विचार अशीच हेटाळणी होणार; परंतु स्वदेशीचा विचार करताना जगाचे चांगले ते आपल्या सोयीने व उपयुक्त असेल तसे वापरायला हरकत नसावी. गांधीजींनी म्हणूनच स्वदेशीचा आग्रह धरला होता. आज वैश्विकीकरणाच्या काळात स्वदेशीचा आग्रह धरता येईल का? मला वाटते, धरता येईल. आपले हित साधून घेण्यासाठी अनेक देश जागतिक पातळीवर त्या त्या वेळी वैश्विकीकरणाला फाटा देतातच ना! आपल्याही देशात आपण शेतमालाचा देशांतर्गत तुटवडा असला की निर्यातबंदी करतोच ना! म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण वागतो. शिवाय देशहित लक्षात घेऊन परदेशी ज्ञान व विचार आपल्या सोयीने वापरण्याचे संकेत पंडितजींनी दिले होते. गांधीजींप्रमाणेच दीनदयाळजींचा स्वदेशीचा आग्रह होता. आपल्या एकात्म मानववादाच्या सिध्दांतात दीनदयाळजी म्हणतात, ''जगातील मानवजातीने जे ज्ञान मिळविले आहे ते फुकट थोडेच घालवता येईल. आपल्या देशात जे स्फुरले तेच तेवढे ज्ञान असे थोडेच आहे. आपल्या देशात हजार वर्षांचा आक्रमणाचा काळा कालखंड होता, त्या काळात जगातील इतर देशांत जी ज्ञानाची प्रगती झाली, विचारांची प्रगती झाली ती फुकट घालवायची का? तिचा उपयोग करायचा नाही का? ही भूमिका बिलकूल मान्य नाही. जोपर्यंत शाश्वत सिध्दांत व प्रस्थापित सत्य यांचा संबंध आहे तोपर्यंत संपूर्ण मानवजातीचे ज्ञान व शोध यांचा एकत्रित विचार करावा व या ज्ञानातून निघणाऱ्या तत्त्वातून जी तत्त्वे आमची आहेत ती आजच्या युगाला अनुकूल अशी व जी तत्त्वे परकीय आहेत ती आपल्या देशाला अनुकूल होतील अशी करून पुढे चालण्याचा विचार करावा.'' म्हणजे जागतिकीकरणाच्या कालखंडातसुध्दा काही गोष्टी आपण आपल्या देशाला अनुकूल करून घेण्याचा दीनदयाळजींचा हा विचार महत्त्वाचा आहे. त्यामुळेच स्वदेशी जागरण मंचाने ज्या वेळी स्वदेशी अभियान राबविले होते त्या वेळी चिप्स विदेशी चालतील; कॉम्प्युटर चिप्स, पोटॅटो चिप्स नव्हे. देशाला ज्या गोष्टींशिवाय तरणोपाय नाही त्यासाठी विदेशी तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही; पण जगाचेच अनुकरण करत निघालेलो आपल्याकडे जगालाही देण्यासारखे होते. अध्यात्म ही एक अशी देणगी आहे की, भौतिक सुखाने समाधान न होणाऱ्या माणसाचे चित्त भारतीय अध्यात्मामुळे शांत होते. आजही जग भारताकडे त्याच अपेक्षेने पाहते, असे दीनदयाळजींना म्हणायचे आहे.
पाश्चात्त्य विचारधारा आणि साम्यवादी विचारधारा माणसाच्या सुखोपभोगाशी निगडित आहेत. भांडवलशाहीची प्रेरणा असलेला पाश्चात्त्य विचार पृथ्वीतलावरील जे आहे ते सारे माणसाला उपभोग करण्यासाठीच आहे असे मानून माणसाने सृष्टीला ओरबाडायला सुरुवात केली. तिथे माणसाच्या सोयीकरिता सगळया सुविधा उभ्या राहू लागल्या. निसर्गाने माणसालाच फक्त बुध्दी देऊ केली असल्याने निसर्गातील इतर सर्व घटकांचा स्वत:साठी वापर करायला प्रारंभ केला. माणसांना जंगलात जाऊन वाघ-सिंहासारखे प्राणी बघता येत नाहीत म्हणून माणसाने प्राणिसंग्रहालये उभारली. हेतू एकच, स्वत:साठी निसर्गाचा वापर करून घ्यायचा. नवनव्या शोधातून मानवी जीवन अधिकाधिक सुखकारक करण्याचा खटाटोप सुरू झाला. त्यातून निसर्गावर जय मिळविण्याची अभिलाषा जन्माला आली. निसर्गाशी दोन हात करीत उभ्या राहिलेल्या सुखसुविधांची निर्मिती ही पाश्चात्त्यांची देण आहे. भारतीय जनमानसासाठी ते उपयुक्त आहे की नाही याची चाचपणी केली गेली नाही. त्यात भारतीयांचे किंवा भारतीय विचारांचे कोणतेच योगदान नाही. मग ते अंगीकारायला हवे की नको? असा प्रश्न पुढे येतो. हा प्रश्न निर्माण होण्याआधीच आपण फार पूर्वीच त्या मार्गावरून पुढे निघालो आहोत. साधनांच्या वापरासाठी आपलीही जगाशी सतत स्पर्धा सुरू आहे.
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित दीनदयाळजींचा 50 वर्षांपूर्वी सांगितलेला हा विचार आपल्या दैनंदिन जगण्यापेक्षा कुठे वेगळा आहे? दीनदयाळजींनी सांगितलेला हा विचार सर्व सृष्टीच्या चलनवलनाशी निगडित असल्याने तो फक्त राजकीय नाही, आर्थिक नाही, धार्मिक नाही. त्यात व्यक्तीपासून ते परमेष्टीपर्यंत विचार करण्यात आलाय. पाश्चात्त्य संस्कृती भोगप्रधान असल्याने निसर्गाला आपल्या सेवेत जुंपण्याकडे त्यांचा कल आहे. त्यातून निसर्ग उद्ध्वस्त होत चालल्याचे दिसते. आज लाखो हेक्टर वनांची कत्तल करून आपण पृथ्वीचे तापमान वाढवून बसलो आहोत. वातावरणातील बदलाने सगळया सजीव सृष्टीसमोर संकटांची एक मालिकाच उभी ठाकली आहेत. ते संकट कधी दुष्काळ तर कधी पुराच्या रूपाने असे माणसाला हैराण करीत आले आहे. अलीकडच्या काळात विषारी वायूच्या उत्सर्जनातून ओझोनच्या थराला भगदाड पडणे ही कोणाची देण आहे? प्रगत देशांमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे हा प्रश्न निर्माण झालाय. निसर्गावर आक्रमण करून सुखी होण्याचा माणसाला अधिकार नाही. त्याच वेळी निसर्गातील पशू, पक्षी, डोंगरदऱ्यांनाही देवत्व बहाल करून त्यासमोर नतमस्तक होण्याचा विचार आपल्या देशात आधीपासून अस्तित्वात होता.
निसर्गाचे नुकसान न होता मानवी गरजा पुरवणारी भारतीय शेतीची परंपरा राहिली आहे; परंतु भारतीय शेती आणि शेतकऱ्यांसाठी आजचा काळ अतिशय यातनादायी आहे. हरितक्रांतीने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवले व लोकांच्या भुकेचा प्रश्न संपवला, असा दावा केला जातो. दोन्ही गोष्टी साध्य झाल्या असतील असे एक वेळ मान्य करताही येईल, परंतु त्यातून शेतकरी आणि समाजाचे हित साधले गेले का? शेतीत आलेले हे सगळे तंत्र विदेशी होते. रासायनिक खते, कीटकनाशके सगळे विदेशी तत्रज्ञान. ते वापरायला लागलो म्हणजे आपला पैसा आपण विदेशी कंपन्यांच्या घशात घातला. उत्पादन जरी वाढले तरी पैसा ना शेतकऱ्याच्या घरात उरला ना देशाच्या तिजोरीत. पाहता पाहता शेती विषारी, नापीक आणि शेतकरी कर्जबाजारी. उत्पादन खर्च अधिक होऊन हाती पैसे राहात नसल्याने शेतकरी आत्महत्या करू लागले. आज देशातील बहुतेक गावांत आत्महत्या होत आहेत. याला कारणीभूत विदेशी तंत्राने केलेली शेती नाही का? त्याच वेळी दुसरीकडे भारतीय गाईंच्या संगोपनाच्या आधारे व गोआधारित शेती करीत असंख्य शेतकरी सुखी झाले आहेत. नुकताच ज्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले ते सुभाष पाळेकर गेली अनेक वर्षे आध्यात्मिक शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचे काम करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून आज देशात लाखो शेतकरी शून्य खर्चाची शेती करून सुखी होत आहेत. त्याच स्वरूपाचे काम गोंडल गुजरातमध्ये रमेशभाई रुपारेलीया करीत आहेत. येथे जमिनीपासून घेण्यापेक्षा जमिनीला देण्याचा विचार आहे. जमिनीला पाहिजे ते मिळते. जमीन स्वत:ही अन्नपूर्णा आहे, त्यामुळे ती शेतकऱ्याला भरपूर देते. गाई पालन-पोषणातून होणाऱ्या या शेतातून विषमुक्त अन्न मिळत असल्याने कॅन्सर, डायबेटीस यांसारख्या रोगांना पायबंद बसणार आहे.
रासायनिक पध्दतीने शेती करताना शेतकरी मोठया प्रमाणात विषारी कीटकनाशकांची फवारणी करतात. दिवसेंदिवस औषधांचा वापर वाढत गेल्याने शेतीशी निगडित पक्षी-शत्रूकीटक-मित्रकीटक यांच्यातला समन्वय संपला. विषारी औषधांमुळे उपयुक्त पक्षी मरण पावले व मित्र-कीटकांचाही नायनाट झाला. फवारणीद्वारे व खताद्वारे जे विष पिकांना दिले जाते ते थांबून आता लोकांनाही विषमुक्त अन्न मिळू लागेल. येत्या काळात भारतीय शेतीला फक्त गोआधारित शेतीच वाचवू शकेल हे अभ्यासांती सिध्द झाले आहे. गाईंच्या संगोपनातून समृध्दी निर्माण होऊ शकते. दीनदयाळजींनी या पुस्तकात म्हटलंय त्यामागे निव्वळ गाईविषयीचा भक्तिभाव नाही, तर त्याला वास्तवाचा आधार आहे. त्याला धार्मिक अधिष्ठान लाभल्यास अधिक उपयोग होऊ शकतो. त्याची जिवंत उदाहरणे पाळेकरांचे तंत्रज्ञान, देशभरातील विविध गोशाळा, चित्रकूट, जळगावच्या अहिंसा गो-तीर्थासारख्या प्रकल्पातून दिसून येते. वर्षानुवर्षे भारतीय गाय कमी दूध देते व पशुपालकांना गाय पाळणे म्हणजे एक संकट म्हटले जात होते; परंतु परदेशी जनावरांची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी देशी गाईची घेतल्यास त्या फारच उपयोगी असल्याचे सिध्द झाले. अलीकडे तर जगातील सर्वाधिक दूध देणारी भारतीय वंशाची गीर गाय असून मात्र ती ब्राझिलमध्ये आहे. एकूण माणसाला आपल्या हक्कापेक्षा कर्तव्याची जाणीव करून देणारा हा विचार म्हणजे एकात्म मानववाद!