महात्मा गांधी व पं. दीनदयाळ उपाध्याय


दरिद्रीनारायण हे दोघांचे उपास्य आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी सर्वाधिक गरीब आणि दुर्बल व्यक्तीला त्याचा उपयोग काय होईल हे तपासायला गांधीजी सांगतात. रोजीरोटीच्या प्रश्नाने गांजलेल्या, डोक्यावर छप्पर नसलेल्या व शरीर झाकायला वस्त्र नसलेल्यांचे जीवन सुखी बनवणे हे आपले व्रत आहे, असे दीनदयाळजी म्हणतात. त्यांचेच शब्द उद्धृत करायचे झाले तर, म. गांधी 'यंग इंडिया'तील लेखात म्हणतात, 'जिवापाड मेहनत करणाऱ्या आणि बेरोजगार असणाऱ्या त्या लाखो-करोडो लोकांकरिता, ज्यांना दिवसभरात एकदाही पोटभर जेवण मिळत नाही आणि शिळया भाकरीचा एक तुकडा आणि चिमूटभर मीठ याच्या आधारावर जे संपूर्ण जीवन कंठतात, स्वराज्य मिळवण्याकरिता मी प्रयत्नरत आहे.'

''व्यक्तिगत स्वातंत्र्य मूल्यवान आहे हे मला मान्य आहे; परंतु आपण हे विसरू नये की, माणूस हा मूलतः सामाजिक प्राणी आहे. समाजाच्या प्रगतीच्या गरजेप्रमाणे आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याला मुरड घातल्यामुळे तो आजच्या स्थानावर पोहोचला आहे. निरंकुश व्यक्तिस्वातंत्र्य हा जंगली पशूचा नियम आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि सामाजिक संयम यातील मध्यमार्ग आपल्याला शोधावा लागेल. संपूर्ण समाजाच्या कल्याणाकरिता स्वेच्छापूर्वक सामाजिक संयम स्वीकारल्यामुळे व्यक्ती व समाज, ज्या समाजाची ती व्यक्ती सदस्य आहे, या दोघांचेही कल्याण होते.'' हे उध्दरण आहे म. गांधींचे ('हरिजन' 27.5.1939, पृ. 144) सध्या देशभर सुरू असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर ते अधिकच प्रासंगिक ठरते.

''भारताने म्हणून आपल्या चिंतनातून हा निष्कर्ष काढला की, व्यक्ती आणि समाजामध्ये द्वंद्व मानणे ही चूक आहे. विकृतीची आणि अस्वस्थतेची स्थिती सोडून देऊ, ती दूर करण्याचे उपाय करणे जरुरी असते; परंतु मूलभूत सत्य हेच आहे की, व्यक्ती आणि समाज अभिन् आणि अविभाज्य आहेत. सुसंस्कृत अवस्था हीच आहे की, व्यक्ती स्वतःची काळजी करण्यासोबत समाजाची काळजी घेईल. दोघांमधील परस्परपूरकता ही सामान्य स्थिती आहे. समाजाचे वाईट करून आपले चांगले करण्याचा विचार जो करतो तो चुकीचा विचार करतो. ही विकृत स्थिती आहे. त्यामध्ये त्याचेदेखील भले होणार नाही, कारण समाज ज्या अवस्थेत जाईल ती व्यक्तीलाही भोगावीच लागेल.''

हे विचार आहेत पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे. ('पं. दीनदयाल उपाध्याय कि वाणी, व्यक्ति और समाज', पृष्ठ 8, मूळ हिंदी) दोन्ही उध्दरणे भाषेच्या, अभिव्यक्तीच्या दृष्टीने थोडी भिन् असली तरी भावात्मक एकरूपता आहे हे सहज ध्यानात येते. दोन्ही विचार आजच्या घडीला समकालीन वास्तवावर भाष्य वाटावे इतके ताजे आहेत.

म. गांधी (1869-1948 ) व पं. दीनदयाळ उपाध्याय (1916-1968) या दोघांच्या कालखंडाचा विचार केला तर लक्षात येते की, गांधीजी 1909 साली 'हिंद स्वराज' लिहितात तिथून 30 जाने. 1948 पर्यंत त्यांची विचारयात्रा सातत्याने सुरू आहे. तिला निश्चितच काही तत्कालीन परिस्थितीचे संदर्भ आहेत. त्याचबरोबर फार मोठा शाश्वततेचादेखील स्पर्श त्या विचारांना आहे. पं दीनदयाळ उपाध्याय यांचा 1937 साली महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना रा.स्व. संघाशी संपर्क आला व 1942 पासून त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून कार्य सुरू केले.

1952 साली ते नवगठित भारतीय जनसंघाचे महामंत्री झाले. तिथून 1968 साली भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होईपर्यंत सातत्याने जनसंघाचे वैचारिक अधिष्ठान मांडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. विशेष उल्लेख 1965 साली त्यांच्या मुंबई येथे कार्यकर्त्यांच्या समोर दिलेल्या एकात्म मानववादावरील 4 व्याख्यानांचा करावा लागेल. दीनदयाळजींच्या विचारयात्रेलाही काळाचे संदर्भ आहेतच, पण शाश्वततेचा धागा त्यांच्या विचारातही अनुस्यूत दिसतो. त्यामुळेच म. गांधींप्रमाणे आजच्या परिस्थितीसाठी मार्गदर्शन त्यांच्याही विचार दर्शनामध्ये आपल्याला गवसते.

गांधीजी आणि दीनदयाळजी दोघांचेही समग्र विचार दर्शन आता इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांसाठी अध्ययनासाठी उपलब्ध आहे. हा भावी पिढीसाठी अमूल्य असा ठेवा आहे. गांधीजी आणि दीनदयाळजींच्या विचारांतील साम्यस्थळे अनेक दाखवता येतील.

दरिद्रीनारायण

दोघांचेही लक्ष समाजातल्या सर्वांत शेवटच्या पायरीवर असणाऱ्या व्यक्तीकडे आहे. दरिद्रीनारायण हे दोघांचे उपास्य आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी सर्वाधिक गरीब आणि दुर्बल व्यक्तीला त्याचा उपयोग काय होईल हे तपासायला गांधीजी सांगतात. रोजीरोटीच्या प्रश्नाने गांजलेल्या, डोक्यावर छप्पर नसलेल्या व शरीर झाकायला वस्त्र नसलेल्यांचे जीवन सुखी बनवणे हे आपले व्रत आहे, असे दीनदयाळजी म्हणतात. त्यांचेच शब्द उद्धृत करायचे झाले तर, म. गांधी 'यंग इंडिया'तील लेखात म्हणतात, 'जिवापाड मेहनत करणाऱ्या आणि बेरोजगार असणाऱ्या त्या लाखो-करोडो लोकांकरिता, ज्यांना दिवसभरात एकदाही पोटभर जेवण मिळत नाही आणि शिळया भाकरीचा एक तुकडा आणि चिमूटभर मीठ याच्या आधारावर जे संपूर्ण जीवन कंठतात, स्वराज्य मिळवण्याकरिता मी प्रयत्नरत आहे.' ('म. गांधी, यंग इंडिया', 26-3-1931, पृ. 53) आणि हेच भाव दीनदयाळजी व्यक्त करताना म्हणतात, ''ज्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्न आहे, ज्यांना राहण्यासाठी ना घर आहे ना शरीर झाकायला कपडा, आपल्या मळक्या मुलाबाळांसोबत जे आज दम तोडत आहेत, अशा गावात व शहरात राहणाऱ्या कोटयवधी निराश बांधवांना सुखी व संपन् बनवणे आपले व्रत आहे.''-('पं. दीनदयाल उपाध्याय कि वाणी, हमारा व्रत', पृष्ठ 1, मूळ हिंदी) 

अशा अनेक विषयांची मोठी यादी करता येईल. उध्दरणे व संदर्भांच्या जंत्रीत न अडकता दोघांच्या विचारांतील साम्यस्थळे सहज दाखवता येतील.

अस्पृश्यता

दोघांच्याही दृष्टीने अस्पृश्यता पाप आहे, पण दोघेही समाजाच्या व्यवस्थेसाठी समाजातील वर्ग परस्परपूरक, परस्परावलंबी व आत्मीयतेने बांधलेले असतील अशा समाजव्यवस्थेची कल्पना करतात. वर्णाश्रम व्यवस्थेचे मूळ स्वरूप हे चार वर्ण समाजाचे परस्परपूरक अवयव आहेत, कोणीही लहानमोठा नाही, प्रत्येक भागाला समान महत्त्व आहे. त्यातील उच्च-नीचता विकृती आहे, असे दोघांचेही मत आहे.

साधनशुचिता

ध्येयप्राप्तीसाठी कोणत्याही सुक्तासुक्त मार्गांचा अवलंब करण्याचा दोघेही निषेध करतात. दोघांचे राजकारण नैतिक व सैध्दांतिक मूल्यांवर आधारित होते. त्यानुसार दोघांचे जीवन पारदर्शक होते. सिध्दांत या दोघांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होते.

स्वदेशी

दोघांच्या आर्थिक चिंतनाचा पाया स्वदेशीवर आधारित होता. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर तसेच स्वदेशी साधनांवर अवलंबून अधिकाधिक गरजा भागवल्या पाहिजेत याबद्दल दोघे आग्रही होते. चरखा हे गांधीजींच्या स्वदेशी व स्वावलंबनाच्या विचारांचे प्रतीक व कार्यक्रम असे दोन्ही होते. दीनदयाळजी गावातील विविध हस्तकौशल्य असणाऱ्या शिल्पकारांचे कसब वाढवून त्यांना सुयोग्य तंत्रज्ञानाची जोड द्यावी अशा स्वरूपाची मांडणी करतात. मोठया उद्योगांचे महत्त्व दोघेही स्वीकारतात, पण मोठे उद्योग स्वावलंबन व स्वदेशी आधारित कुटीर उद्योगांना पूरक असावेत असे मानतात. इंग्रज असेपर्यंत विदेशी भावनेला दूर ठेवण्यात गौरव मानायचो, पण इंग्रज जाताच विदेशी विचारधारा आमच्या अनुकरणाचा व आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली आहे याकडे दीनदयाळजी लक्ष वेधतात. गांधीजी म्हणतात, स्वदेशीच्या तत्त्वानुसार आपण स्वतःला पूर्वजांच्या धर्मातच सीमित ठेवले पाहिजे, राजकारणाच्या क्षेत्रात स्वदेशी संस्थांचा स्वीकार केला पाहिजे, शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये देशी भाषामधून शिकवले गेले पाहिजे.

विकेंद्रीकरण

दोघेही सर्व प्रकारच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने आग्रह धरतात. ग्रामविकास हा दोघांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे म्हणून 'प्रत्येकाला रोजगार व प्रत्येक शेताला पाणी' हा दीनदयाळजींचा नारा आहे. गावांचे औद्योगिकीरण व्हावे ज्यायोगे शहराकडे पलायन थांबेल. ग्रामवासीयांचे कौशल्य वाढले तर त्यांच्या उत्पादित वस्तू बाहेर जाताच हातोहात खपतील. सोबतच गावेही स्वावलंबी बनतील. केंद्रस्थानी व्यक्तीपासून प्रारंभ करून स्वावलंबी ग्राम, त्यावर परस्परपूरक असे ग्रामसमूहांचे वृत्त, त्यावर जनपद अशा प्रकारे राष्ट्रीय पातळीपर्यंत रचना विकसित व्हावी. सर्व वलये परस्परपूरक परस्परांचे पोषण करणारी असावीत. अशी विकेंद्रित राजकीय व आर्थिक रचना दोघांच्याही मांडणीत पाहायला मिळते. गांधीजी विस्तारणाऱ्या समुद्री वलयांची उपमा वापरतात. एकात्म मानव दर्शनमध्ये व्यक्ती, परिवार, ग्राम, जनपद, राष्ट्र, विश्व मानवता, सृष्टी व परमेष्ठी या सर्वांना एका सूत्रात बांधणाऱ्या अखंड मंडलाकार रचनेची संकल्पना मांडण्यात आली आहे.

समाजवाद व भांडवलवादविरोध

समाजवाद व भांडवलवाद या दोन्हीला दोघांचाही विरोध आहे आणि तो मूलभूत दृष्टिकोनातून आहे. दोघांनीही या विचारधारांचे विश्लेषण केले आहे. त्याचा आधार त्यांची भारतीय जीवनदृष्टी आहे. गांधीजी सत्य, अहिंसा या सनातन, शाश्वत मूल्यांच्या निकषावर त्यांना त्याज्य ठरवतात, अमानवीय ठरवतात, तर दीनदयाळजी या दोन्ही विचारधारांच्या एकांगी भौतिकवादी स्वरूपाचा निर्देश करतात. भारतीय दृष्टीने मनुष्य केवळ आर्थिक पशू अथवा राजकीय पशू नसून त्याचे व्यक्तिमत्त्व चतुर्विध आहे, असे ते प्रतिपादन करतात.

संघर्ष नव्हे तर समन्वय

भारतीय दृष्टी एकात्म दृष्टी आहे. संघर्ष नव्हे तर समन्वयप्रधान आहे यावर दोघांची दृढ आस्था आहे. सृष्टीमध्ये संघर्ष व सहकार दोन्ही दिसतो, पण संघर्ष हा अनुकरणीय अथवा आधारभूत मानून रचना बनवणे विकृती आहे.

धर्मराज्य व रामराज्य

लोकशाहीचा ते दोघे स्वीकार करतात, पण तिचे आध्यात्मिकरण व्हावे अथवा भारतीयकरण व्हावे, अशी आकांक्षा व्यक्त करतात. दीनदयाळजी त्यासाठी 'धर्मराज्य' असा शब्द वापरतात, तर गांधीजी रामराज्याची संकल्पना मांडतात. दोघांच्याही राजकीय विचारांचे मूळ धर्म संकल्पनेत आहे. धर्माचा व्यापक अर्थ आहे. तो पंथ/संप्रदाय याच्याशी जोडणे अयोग्य आहे. धर्मराज्य म्हणजे थिओक्रेटिक राज्य नव्हे, असे दीनदयाळजी बजावतात. गांधीजींचे रामराज्य सत्य व धर्मावर आधारित खऱ्या लोकशाहीचे राज्य आहे जिथे राजा असो वा रंक सर्वांना समान न्याय आहे.

अशी अनेक साम्यस्थळे दोघांच्या विचारात आपणास पाहायला मिळतात. जरी शब्द भिन् असले, अभिव्यक्ती वेगळी असली तरी भाव एक आहे हे सहज ध्यानात येते.

हिंद स्वराज

गांधीजींनी 1909 साली 'हिंद स्वराज' लिहिले. गांधीजी 1893 पासून द. आफ्रिकेत राहत होते. 1909 साली लंडनहून द. आफ्रिकेला जहाजाने प्रवासात असताना त्यांनी ही पुस्तिका लिहिली. कांती शाह यांनी 2005 साली सेवाग्राममध्ये मांडलेले टिपण प्रस्तावना रूपामध्ये 2007 साली नवजीवन ट्रस्टने प्रकाशित 'हिंद स्वराज'मध्ये उपलब्ध आहे. ते लिहितात, फक्त (ता. 13 ते 22 नोव्हेंबर 1909) दहा दिवसांत ही पुस्तिका लिहिली गेली. उजवा हात थकून गेला की, ते डाव्या हाताने लिहू लागत आणि हस्ताक्षर पाहून कळते की, केवढया गतीने ती लिहिली गेली असणार. समुद्रात जहाजावर हे लेखन झाले. समुद्राच्या लाटांवर जहाज हेलकावे खात असणार; परंतु 'हिंद स्वराज'मध्ये प्रकट झालेल्या विचारांत कुठेच डळमळ नाही. त्यांत तर समुद्राची खोली आणि गांभीर्य आहे.' श्रीयुत शाह पुढे असे म्हणतात, 'पश्चिमेची भौतिकवादी आधुनिक सभ्यता जेव्हा आपल्या गौरवाच्या शिखरावर होती, सर्वत्र तिचा बोलबाला होता, जगात तिचेच अधिराज्य होते, सर्वांना तिने दिपवून टाकले होते; परंतु गांधीजींनी तिला आव्हान दिले, तिला संपूर्ण नकार दिला, तिच्यावर कठोरतम टीका केली, तिच्याविरुध्द बंडाचे निशाण उभारले. या सभ्यतेने ते तिळमात्रही प्रभावित झाले नाहीत. उलट त्यांनी पाहिले की, ही सभ्यता अशा विपरीत - उफराटया तत्त्वज्ञानावर उभी आहे, ...ते तत्त्वज्ञान मानवद्रोही आहे, अनीतिमान आहे, आसुरी आहे; मनुष्यजातीचे सर्वार्थाने अकल्याण करणारे आहे.'

धर्मपाल 'गांधीजींना समजून घेऊ' या पुस्तकात 'हिंद स्वराज'चे नेमके वर्णन करतात. ते म्हणतात, 'आधुनिक पाश्चात्त्य संस्कृतीच्या विनाशकारी कथा 'हिंद स्वराज'मध्ये आहेतच त्याचबरोबर गांधीजींच्या कल्पनेतील समाज आणि त्या समाजनिर्मितीसाठी अपेक्षित नियमन आणि संयमाचे चित्रपण स्पष्टरूपाने चित्रित आहे.'

 इंग्रजांचे आक्रमण केवळ राजकीय आक्रमण नसून युरोपीय सभ्यतेचे भारतीय संस्कृतीवरील आक्रमण आहे. युरोपीय सभ्यतेचे नेमके स्वरूप काय याचा पूर्वपक्ष करून तिचे खंडन करण्याची व भारतीय दृष्टीने उत्तर देण्याची जी वैचारिक प्रक्रिया भारतात घडली त्यामध्ये गांधीजींच्या 'हिंद स्वराज'मधून मांडलेल्या 'सर्वोदयी' चिंतनाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.

एकात्म मानव दर्शन

पं. दीनदयाळजींनी 'एकात्म मानववाद' या विषयावर मुंबईत दि. 22 ते 25 एप्रिल 1965 साली चार व्याख्याने दिली. चार व्याख्यानांचे विषय आहेत 'राष्ट्रवादाची सम्यक अवधारणा', 'एकात्म मानववाद', 'व्यष्टी, समष्टी-परमेष्ठी' व 'युगानुकूल अर्थरचना'. दीनदयाळ शोध संस्थानने प्रकाशित केलेल्या पं. दीनदयाळ उपाध्यायप्रणीत - 'एकात्म मानव दर्शन एवं उसका व्यावहारिक प्रयोग चित्रकुट प्रकल्प' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत नानाजी देशमुख राष्ट्रवाद, प्रजातंत्र, समाजवाद या तीन युरोपला प्रभावित करणाऱ्या विचारधारांचा उल्लेख करून म्हणतात, 'मानवाच्या दैवी प्रवृत्तीमधूनच या तिन्हीचा जन्म झाला आहे; पण यापैकी एकही विचार परिपूर्ण नाही. इतकेच नव्हे, तर यातील प्रत्येक विचार व्यवहारात एकमेकांसाठी घातक ठरला आहे. राष्ट्रवादाने विश्वशांतीला धोका उत्पन् केला आहे, लोकशाही भांडवलदारांशी साटेलोटे करून शोषणाचे कारण बनली आहे. भांडवलशाही संपवून समाजवाद आला तर त्याने लोकशाहीसोबत व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे.' पुढे ते म्हणतात, 'दीनदयाळजींनासुध्दा युगानुकूल, व्यावहारिक आणि सर्वांगपरिपूर्ण जीवन दर्शनाची आवश्यकता तीव्रतेने जाणवू लागली..... याच कारणामुळे त्यांच्या सतत अध्ययन, चिंतन आणि मननातून 'एकात्म मानववादाने' जन्म घेतला आहे.' दुसऱ्या व्याख्यानात दीनदयाळजी पाश्चात्त्य विचारधारांचा आढावा घेतात. त्यांच्या अपयशाचे विश्लेषण करतात. विश्व आज तेथील समस्यांपुढे किंकर्तव्यमूढ अवस्थेत आहे. अशा वेळी भारतीय संस्कृती या समस्यांच्या निराकरणासाठी योगदान करू शकते, असा आत्मविश्वास ते व्यक्त करतात. राष्ट्रीय दृष्टीने विचार करताही आपल्या संस्कृतीतच प्रश्नांना उत्तरे शोधणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ते करतात. पाश्चात्त्य खंडित दृष्टी नव्हे, तर एकात्म भारतीय दृष्टी केवळ भारतासाठीच नव्हे तर 'चौराहे पर खडे' विश्वमानवासाठी दिग्दर्शक ठरेल, हा आशावाद ते प्रकट करतात. दीनदयाळजींनी या व्याख्यानांतून एकात्म मानव दर्शन सूत्ररूपाने मांडले आहे. विस्तृत मांडणी करण्याची ते तयारी करत होते, पण दुर्दैवाने तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. चार व्याख्यानांतील विवेचन पाहिले की लक्षात येते की, दीनदयाळजी- देखील गांधीजींसारखा पाश्चात्त्य जीवनदृष्टीचा पूर्वपक्ष करतात व तिचे खंडन करतात. मात्र दीनदयाळजी पाश्चात्त्य संस्कृतीतील सर्वच त्याज्य न मानता त्यातील स्वीकारणीय ते देशानुकूल करून घेण्याची आवश्यकता मांडतात. त्यासोबतच भारतीय संस्कृतीतील चिरंतन मूल्यांवर आधारित युगानुकूल असे एकात्म जीवन दर्शनही मांडतात.

पाश्चात्त्य आक्रमणाचे स्वरूप ओळखून त्याचा पूर्वपक्ष करून त्याचा प्रतिवाद करणे, त्यासोबत भारतीय जीवनदृष्टीच्या आधारावर युगानुकूल मार्ग सुचवणे याला सर्वोदय म्हणा अथवा एकात्म मानव दर्शन म्हणा; म. गांधींच्या व पं. दीनदयाळजींच्या जीवनातले हे साम्यदेखील महत्त्वपूर्ण आहे. सर्वोदय, (1909) व एकात्म मानव दर्शन (1965) दोघांमध्ये 50/55 वर्षांचे अंतर आहे. गांधीजी पाश्चात्त्य सभ्यता व संस्कृतीच्या वैभवाच्या कालखंडात इंग्लंड येथे राहून आले आहेत. तरीही तिच्या तथाकथित यशामुळे दिपून न जाता 'ही चार दिन की चांदनी आहे' असे त्यांचे विश्लेषण आहे. बरोबर 56 वर्षांनंतर 1965 साली पं. दीनदयाळजी एकात्म मानव दर्शन मांडतात. भारत स्वतंत्र होऊन 15 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. गांधींचे वारस म्हणवणाऱ्या धुरिणांनी गांधींच्या विचारांना खुंटीला टांगून ठेवून पाश्चात्त्य विचारधारांचा स्वीकार आंधळेपणाने केला आहे. देशभर समाजवादाचा बोलबाला आहे. पंचवार्षिक योजनाची धामधूम आहे. अशा वेळी पर्यायी विचार या स्वरूपात एकात्म मानव दर्शन मांडले गेले आहे. आज त्यानंतर 50 वर्षांचा कालखंड होऊन गेला आहे. मार्क्सवाद व त्याचा रशियातील प्रयोग अपयशी झाला आहे. भांडवलवादाने रशियाच्या पतनानंतर 'जितं मया'च्या उन्मादात ओढवून घेतलेल्या 2008 च्या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आज सर्व जग पर्यायी मार्गाचा शोध घेत आहे. आधुनिक विज्ञानानेदेखील खंडित दृष्टी सोडून एकात्म दृष्टी धारण करून 100 वर्षे झाली आहेत. पर्यावरणाच्या समस्येमुळे मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जागतिक इस्लामिक जिहादी दहशतवाद इसिसच्या रूपाने उग्र रूप धारण करून समोर उभा ठाकला आहे. त्याबरोबरीने आज भारत वेगाने वाढणारी आर्थिक महाशक्ती म्हणून पुढे येत आहे.

भारताचा वैशिष्टयपूर्ण विचार स्वीकारला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगापुढील या समस्यांना उत्तर शोधण्यासाठी भारतीय जीवन-दृष्टीकडे वळावे लागेल. पुन्हा गांधीजी व दीनदयाळजी यांच्याप्रमाणे आजच्या परिस्थितीचे सम्यक आकलन भारतीय जीवनदृष्टीच्या आधारावर करावे लागेल. आजच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी भारतीय जीवन दर्शनाच्या आधारावर युगानुकूल मार्ग शोधावा लागेल. हे काम म्हणजे दीनदयाळजींच्या शब्दात सांगायचे तर 'कुठल्या तरी पुराणवस्तू संग्रहालयाचे संरक्षक' बनण्याचे नसून 'संस्कृतीचे संरक्षण करून, तिला गती देऊन सजीव व सक्षम बनवण्याचे आहे'. म. गांधींच्या जन्मशताब्दी वर्षात सांगलीतील एका कार्यक्रमात भाषण करताना प.पू. श्रीगुरुजींनी गांधीजींचे हिंदू धर्माच्या भवितव्याविषयी व्यक्त केलेले विचार सांगितले आहेत. ते म्हणतात, 'हिंदू धर्म म्हणजे न थांबणारा, हट्टाने पुढे जाणारा, सत्याचा शोध घेण्याचा मार्ग आहे. आज हा धर्म थकल्यासारखा, पुढे जाणाऱ्या प्रेरणेला साथ न देणारा, असा वाटतो; याचे कारण आपण थकलो आहोत; धर्म थकला नाही आणि ज्या क्षणी आपल्यातील ही थकावट नाहीशी होईल त्या क्षणी हिंदू धर्माचा मोठा विस्फोट होईल आणि भूतकाळात कधीही नाही इतक्या मोठया प्रमाणात हिंदू धर्म जगापुढे आपल्या प्रभावाने आणि प्रकाशाने चमकून उठेल. महात्माजींची ही भविष्यवाणी खरी करण्याची जबाबदारी आपल्यावर पडली आहे.' म. गांधींच्या व पं. दीनदयाळजींच्या जीवनातून मिळणारा हा कर्तव्यबोध; विशेष करून दीनदयाळजींचा वारसा सांगणाऱ्या आपणा सर्वांना, भारतीय जीवनदृष्टीच्या कालसुसंगत प्रकटीकरणासाठी तत्पर होण्यासाठी प्रेरक ठरावा.