भारताचे स्वतःचे वेगळे चिंतन आहे. त्याचे वेगळे वैशिष्टय आहे. सर्व सृष्टीत एकच चैतन्य नांदते, असे आपल्याकडे सांगितले गेले आहे. आम्ही त्या एकाच चैतन्याचे अंश आहोत, भले मग आमची रूपे वेगवेगळी का असेनात! यामुळे येथे संघर्षाचे काही कारणच नाही! चैतन्याचे प्रकटीकरण शरीराच्या माध्यमातून होते. जो आतून चांगला असेल तो बाहेरूनही चांगलाच दिसणार आणि मनात जर अनेक दोष भरलेले असतील तरी एकच आत्मा असूनही शरीराच्या माध्यमातून त्या दोषांचेच प्रकटीकरण होईल.
आपण काम करत असलेल्या विषयामध्ये त्याच्या सैध्दान्तिक पार्श्वभूमीच्या बळावरच गुणवत्ता निर्माण होते. काम करत असताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी आपल्याला विचारांतूनच ऊर्जा मिळत असते. त्यामुळे त्याच विषयाचे पुन:पुन्हा स्मरण करणे योग्यच असते. आपण जप करतो तेव्हा एकाच शब्दाची वारंवार पुनरावृत्ती होत असते. यात नवीन गोष्ट नसते, पण त्यापासूनही लाभ होतोच होतो. त्यामुळे मार्गावरून वाटचाल करीत असताना थोडे थांबून आपल्या वाटचालीचा मागोवा घेणे आवश्यक असते.
स्वातंत्र्यपूर्वकाळात आपल्याला कोणतीही गोष्ट करण्याची फारशी मोकळीक नव्हती. सर्व गोष्टी शासक वर्गच करीत असे. समोर आलेली गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागत असे. आपले मत मांडायचाही अधिकार नव्हता आणि मांडलेच तर ते विचारात घेतले जाईल याची काहीच हमी नव्हती. या परिस्थितीत 1947 सालानंतर बदल घडून आला. इंग्रज गेल्यानंतर नवीन लोक सत्तेवर आले. त्यांनी असा विचार केला की, नवीन गोष्टी केल्या तर त्यात आपल्याला यश मिळेल की नाही ते सांगता येणार नाही. तेव्हा इंग्रजांनी जी चाकोरी तयार केली आहे त्यावरून वाटचाल करणे चांगले राहील, कारण आपल्याला नव्या प्रयोगात अपयश आले तर इंग्रजांचे राज्यच चांगले होते, असे लोक बोलल्यावाचून राहणार नाहीत. त्यामुळे तेव्हाच्या नेतृत्वाने नवीन गोष्टी करण्याचे धाडस केले नाही. याचे आणखी एक कारण सांगता येईल आणि ते म्हणजे भारताच्या मूलभूत चिंतनावर असलेला अविश्वास. त्यामुळे जे आतापर्यंत चालत आले आहे तेच पुढे घेऊन जाण्याची दिशा त्यांनी स्वीकारली असावी. आपण प्रदीर्घ काळ गुलामीत होतो, आपले विचार मागास आहेत, आपल्याकडे कुठले आले आहे वेगळे चिंतन अथवा विचार आणि आपण तरी किती काळ जगणार आहोत? यामुळे 1947 नंतर देशात संभ्रमाची अवस्था होती. कोणता मार्ग स्वीकारावा, कोणती दिशा धरावी, कोणती पध्दत अंगीकारावी याबाबतीत काहीच ठोस विचार झाला नाही. आज 68 वर्षांनंतरसुध्दा आम्ही तेथेच उभे आहोत. आपल्या देशासाठी काही उचित आहे आणि काय अनुचित आहे? आपण कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे? याबाबतचा विवेक संपुष्टात आला आहे. प्राचीन काळातील ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या पुन्हा आणल्या पाहिजेत असा विचार झाला नाही असे नाही, पण नवीन गोष्ट कशी सोडून देणार? कारण नव्या गोष्टीची आता सवय झाली होती. अशा रीतीने देश संभ्रमावस्थेत सापडला होता.
काही प्राचीन गोष्टी चांगल्या होत्या, तर काही नव्या गोष्टी चांगल्या होत्या. रेल्वेचे रूळ कोठे मीटरगेजचे असतील आणि कोठे ब्रॉडगेजचे असतील तर त्यावरून गाडी धावणार कशी? सिध्दान्त शाश्वत असतात आणि व्यवस्थांमध्ये युगानुकूल बदल केले जातात. कोणतीही व्यवस्था ही निर्जीव असते. तिच्यात प्राण फुंकावे लागतात. सिध्दान्त चेतन असतात. त्यामुळे सिध्दान्तांशी तडजोड न करता नवे बदल स्वीकारणे योग्य असते. आपल्याला युगानुकूल परिवर्तन घडवून आणायला हवे, हीच गोष्ट पं. दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख आणि पूजनीय श्रीगुरुजी यांनीही सांगितली आहे.
कोणती व्यवस्था हजारो वर्षे तशीच टिकून राहू शकते? जीवनशैली, खानपान इत्यादी बाबतीत बदल होत राहतात. राहणीमानात बदल होतात. वैज्ञानिक शोधांमुळे बदल होत जातात. नव्या सुविधा निर्माण झाल्यामुळे बदल होतात. आपली त्याबाबतीत काही तक्रार नाही. आपले पूर्वज पायी प्रवास करीत असत. आदिशंकराचार्य तर कालडीहून बद्रिनाथला पायीच गेले होते. त्यामुळे आपणही पायीच प्रवास करावा, असा आपला आग्रह नाही. पायी जाणे अथवा विमानाने जाणे हा व्यवस्थेत बदल घडविण्याचा विषय आहे. यात वादाचा विषय नाही. योग्य तो बदल आपण स्वीकारून पुढे जात असतो. मूलभूत वैचारिक भूमिकेत मात्र बदल होत नाही. आपले भारतीय चिंतन सार्वकालिक आहे. ते अमुक एखाद्या कालखंडाला लागू पडते असे नाही. ते हजारो वर्षांपासून चालत आले आहे आणि भविष्यकाळातही पुढे जात राहील. तसेच ते वैश्विक चिंतन आहे, त्याला कोणत्याही भौगोलिक सीमा बांधून ठेवू शकत नाहीत. हे चिंतन सर्वत्र स्वीकारण्यायोग्य आहे.
व्यवस्थेबद्दल भिन्न चिंतन असू शकते. सर्व अधिकार हे राजालाच असतात, मग आपण राजा का होऊ नये, असा प्रजेने विचार केला व यातून लोकशाही व्यवस्थेचा जन्म झाला. मतदानाच्या माध्यमातून सर्वाधिक प्रतिनिधी निवडून आणणारा पक्ष सत्तेवर येतो. लोकशाही राज्यव्यवस्थेचा मोठया प्रमाणात अंगीकार करण्यात आला. आपण यामुळे सुखी होऊ असे सर्वांना वाटले. काही लोक राजे झाले, पण भाकरीचा प्रश्न सुटला नाही. माक्र्सवादाचा उदय झाला. माक्र्सने सांगितले, आपल्याला राजाशी काही घेणेदेणे नाही, तर सर्वांना भाकरी मिळाली पाहिजे. त्यालाही अनुयायी लाभले. पुढे लोकांनी असाही विचार केला की, संघर्षावाचून काही लाभणार नाही. आपले राज्य हवे आहे? मग संघर्ष करा. भाकरी हवी आहे? मग संघर्ष करा, राजाच्या विरोधात संघर्ष करा, श्रीमंतांच्या विरोधात संघर्ष करा. जे त्यांच्यापाशी आहे ते आमच्यापाशी नाही आणि ते आम्हाला हवे आहे, मग यासाठी संघर्ष केला पाहिजे. त्यामुळे सबळ आहे तोच यात टिकणार हा परिणाम यातून दिसून आला. याला मत्स्यन्याय म्हणतात. मोठा मासा लहान माशाला खाऊन टाकतो. तसे 'बळी तो कान पिळी' असे चित्र निर्माण होणार आणि दुर्बळांचा त्यात नाश होणार. अशा रीतीने वेगवेगळया विचारधारांच्या आधारावर वेगवेगळया राज्यव्यवस्था जगभरात उभ्या राहिल्या. भांडवलशाहीच्या आधारावर, लोकशाहीच्या आधारावर, तर कोठे समाजवादाच्या आधारावर व्यवस्था विकसित झाल्या.
जगात सर्वत्र सारखे हवामान नाही, सारखे वातावरण नाही, सारखी परंपरा नाही आणि सारखी जीवनमूल्येही नाहीत. या भिन्नत्वातही जो काही सारखेपणा आहे तो पाहण्याची गरज आहे. वरवरच्या गोष्टी या भिन्न असू शकतात. वरून सर्व सारखे दिसले पाहिजेत, असे म्हणणे हे अव्यवहार्य आणि अशास्त्रीय आहे. यामुळे आपले चिंतन शास्त्रीय पायावर आधारलेले असले पाहिजे. ते विवेकपूर्ण असायला हवे. विचारवंतांनी यासाठी 'शास्त्रसिध्द' आणि 'विवेकपूर्ण' हे दोन शब्द वापरले आहेत. उचित काय आणि अनुचित काय? वर्तमानात काय करायला हवे आणि भविष्यात काय करायला हवे याचा विचार करणे म्हणजेच विवेक होय. आपण हीच पध्दत स्वीकारली आहे. दुसऱ्याचे मत ऐकून घेणे हे भारताचे प्राचीन काळापासून वैशिष्टय आहे. आम्ही वेगळा विचार कधीच नाकारला नाही. जर मनुष्याचे हित होणार असेल, समाजाचे हित होणार असेल आणि राष्ट्राचे हित होणार असेल तर ते चिंतन या देशात अवश्य स्वीकारले जाते. येथे विद्वानांचे म्हणणे ऐकून उचित गोष्टींचा सदैव स्वीकार करण्यात आला आहे.
भारताचे स्वतःचे वेगळे चिंतन आहे. त्याचे वेगळे वैशिष्टय आहे. सर्व सृष्टीत एकच चैतन्य नांदते, असे आपल्याकडे सांगितले गेले आहे. आम्ही त्या एकाच चैतन्याचे अंश आहोत, भले मग आमची रूपे वेगवेगळी का असेनात! यामुळे येथे संघर्षाचे काही कारणच नाही! चैतन्याचे प्रकटीकरण शरीराच्या माध्यमातून होते. जो आतून चांगला असेल तो बाहेरूनही चांगलाच दिसणार आणि मनात जर अनेक दोष भरलेले असतील तरी एकच आत्मा असूनही शरीराच्या माध्यमातून त्या दोषांचेच प्रकटीकरण होईल.
यामुळे आम्ही विश्वकल्याणाची कामना व्यक्त करणारे वैश्विक चिंतन करतो. केवळ भारताचाच विचार करीत नाही. 'सर्वे भवन्तु सुखिनः।' हा आमचा सिध्दान्त आहे. यामुळे पृथ्वी हे एकच कुटुंब आहे असे सांगून आम्ही 'वसुधैव कुटुंबकम्' हा सिध्दान्त मांडला. हा संघर्ष अथवा शोषणाचा सिध्दान्त मुळीच नव्हे. येथे सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. पाश्चिमात्य चिंतन असे सांगत नाही. तेथे केवळ सबळांनाच जगण्याचा अधिकार आहे. हे संपूर्ण सृष्टिचक्र परस्परावलंबी आहे, परस्परपूरक आहे, त्यामुळे येथे संघर्षाला थारा नाही, असे आमचे चिंतन सांगते. अखिल ब्रह्मांड हे अखंड मंडलाकार आहे. येथे कोणी वर नाही आणि कोणी खाली नाही. सर्वांना त्यांचे-त्यांचे स्थान आहे. वर्तुळाला प्रारंभबिंदूच नसतो आणि अंत्यबिंदूही नसतो. चक्रामध्ये सर्वांचा स्तर एकच असतो, हा सिध्दान्त आपण मांडलेला आहे.
आपण या भूमीचेच उदाहरण घेऊ. या जमिनीवर गवत उगवते, अन्नधान्य उगवते. पशू चारा खातात आणि मानव अन्नधान्य खातो. अन्नपचन झाल्यावर जे काही शिल्लक उरते ते मलविसर्जन या भूमीवरच पशू आणि मानव करतात. त्याचे खत बनून पृथ्वीचे पोषण होते. भूमी सुपीक होते. हे चक्र सतत चालू असते. हा शाश्वत सिध्दान्त आहे.
आपण श्वासोच्छ्वास करताना कार्बनडाय ऑक्साइड वायू बाहेर टाकतो. तो वनस्पतींना आवश्यक असतो. कार्बन घेऊन वनस्पती ऑक्सिजन बाहेर टाकतात. तो मानवाला आवश्यक असतो. जर हे चक्र तुटले तर दोघांचेही अस्तित्व धोक्यात येईल. पावसाचे पाणी जमिनीवर पडते. त्याचे बाष्प बनून आकाशात जाते. तेथे बाष्पाचे ढग बनतात आणि त्यातून पुन्हा पाऊस पडतो. असे हे अखंड मंडलाकार चक्र सतत चालू असते. ते कोणी तोडू शकत नाही. यामुळे परस्परावलंबन आणि परस्परपूरकता हाच सिध्दान्त भारतीय विचारवंतांनी मूलाधार मानला, संघर्ष नव्हे!
कोणी कितीही शक्तिशाली का असेना? लहानमोठया गोष्टीसाठी त्यालाही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. जर आपली क्रयशक्ती वाढली आणि अन्नधान्याचे उत्पादनच झाले नाही तर आपण पैसे खाऊन पोट भरू शकत नाही. शेतकऱ्याने सत्याग्रह पुकारून शेतीच केली नाही तर आपली उपासमार होईल. शेतकरी अन्नधान्याचे उत्पादन करून त्याची विक्री करतात म्हणूनच आपल्याला खायला मिळते. हेसुध्दा एक चक्र आहे. जर श्रीमंत माणूस म्हणेल की, मी काहीही करीन, तर मग शेतकरीसुध्दा तसेच म्हणू शकतो. यामुळे कोणती विकृती निर्माण झाली आहे ते पाहा. मी एका कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेलो होतो. त्याच्याकडे एक हजार एकर शेती आहे. तो केवळ गव्हाची शेती करीत असे; पण आज केवळ आपल्या कुटुंबापुरते गव्हाचे पीक घेतो आणि उरलेल्या सर्व जमिनीवर ऊस, कापूस, तंबाखू, हळद अशी व्यापारी पिके घेतो. यात भरपूर पैसा मिळतो; पण लक्षात घ्या, सर्वांनीच अशी पिके घेतली तर मग गव्हाचे पीक घेणार तरी कोण? काही वर्षांनंतर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. मनुष्य स्वतःला मोठा बुध्दिमान समजतो. तो निसर्गावर विजय मिळविण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे 'जास्तीत जास्त मिळवा' हाच विचार तो करतो. मात्र हवे तेवढे मिळेल हा निसर्गाचा नियम आहे. मला घेता येईल तेवढे मी घेतल्यावाचून राहणार नाही, हा माणसाचा अहंकार आहे. यामुळे त्याचा निसर्गाशी संघर्ष सुरू झाला आहे. आपण जर निसर्गाचे रक्षण केले तर निसर्ग आपले रक्षण करील हाच परस्परपूरक सिध्दान्त आहे.
दोन शब्दप्रयोग ऐकण्यात येतात. एक म्हणजे कल्पवृक्ष आणि दुसरा म्हणजे कामधेनू. या कल्पना कोठून आल्या ते माहीत नाही; पण वनस्पतिजगत माणसाला हवे ते सर्व देते यातूनच कल्पवृक्ष ही कल्पना आली असावी. हा वृक्ष आपल्या सर्व कामना आणि अपेक्षांची पूर्ती करतो. तसेच कामधेनू हा शब्द प्राणिसृष्टीविषयी वापरला जातो. प्राणिजगतही माणसाच्या सर्व गरजा पूर्ण करते. त्याचे प्रतीक म्हणून गोमातेलाच कामधेनू संबोधले जाते. जर आपण ही भावना ठेवली तर प्राणिजगत व वनस्पतिजगत यांचे आपोआप संरक्षण होईल. आम्ही शोषण नव्हे तर दोहन करणार असे येथे ठरविण्यात आले.
अहंकाराच्या बीजामुळे आपल्यासमोर आज संकट उभे ठाकले आहे. माणसाने शास्त्रीय व्याख्या करताना असे सांगितले की, मी निसर्गाला उघडे करून टाकणार आहे. त्यापासून सर्व काही लुटून घेणार आहे; पण त्याने भावी पिढीचा विचार केला का? कोळसा संपणार नाही का? आपण पाणी शोषून घेत आहोत की नाही? पाण्याची पातळी किती खाली गेली आहे? परस्परावलंबन आणि परस्परपूरकता हा सिध्दान्त अमलात आणला तरच असमतोल नष्ट होऊ शकतो. विज्ञान तर उलट दिशेने चालले आहे. सुखाचे चिंतन सुरू आहे. सर्व मनुष्य आणि समाजाचा अजेंडा 'सुखी होणे' हाच आहे. देशाला प्रगतिपथावर घेऊन जाणे हा सरकारचा अजेंडा आहे. भांडवलवादी सरकार असो, साम्यवादी सरकार असो किंवा समाजवादी सरकार असो, प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. यात काहीच चूक नाही; पण व्यक्ती म्हणजे कोण? याची व्याख्या काय आहे? व्यक्ती म्हणजे हाडामांसापासून बनलेले शरीर अशी व्याख्या केली जाते. शारीरिक गरजा पूर्ण झाल्या तर मनुष्य सुखी होतो; पण त्यापुढचा विचार केला गेला नाही. पश्चिमी विचारवंतांनी मनुष्याचे शरीर लक्षात घेऊनच चिंतन केले. पंचज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. चांगले खायला मिळावे, चांगले ल्यायला मिळावे, चांगले वाटेल असेच ऐकायला आणि पाहायला मिळावे याचा त्यांनी विचार केला आणि सर्व क्षेत्रांमध्ये या भौतिक गरजांची पूर्तता करणारी नवनवीन साधने निर्माण केली.
पण शारीरिक सुखालाही मर्यादा असते. सुखाची कामना करणारे सुखाने झोपसुध्दा घेऊ शकत नाहीत. जर अपमान अथवा यातना सहन करण्यास लावून खायला पक्वान्ने देण्याची अट घातली तर कोणता माणूस ती सुखाने खाऊ शकेल? मानापमान, सुखदुःख या संवेदना माणसाच्या भुकेवरही प्रभाव गाजवितात. मनाची प्रसन्नता शारीरिक ऊर्जेला प्रभावित करते. लग्नसमारंभाच्या वेळी वडीलधारी माणसे दिवसभर धावपळ करताना दिसतात. ही ऊर्जा येते कोठून? आपल्या मनाची अवस्था शरीरावर प्रभाव टाकत असते. शरीराच्या पलीकडे मानसिक संवेदना असते. बौध्दिक क्षमतेतूनही एक वेगळाच आनंद लाभत असतो. जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतो तेव्हा त्याला खाण्यापिण्याचे भान राहत नाही. त्याला आवडीचा पदार्थही गोड लागत नाही. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा विचार त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याचप्रमाणे एखादे कोडे सोडविण्याचा मनुष्य प्रयत्न करीत असतो तेव्हा त्याचे उत्तर सापडेपर्यंत खाणेपिणे विसरून जातो. कोडे सुटल्यानंतर त्याला अचानक भूक लागते. त्याला आराम लाभतो. मग सुखाचा अनुभव त्याला होतो. हे सुख इंद्रियातीत असते. अनेक प्रकारे कष्ट सहन करून, मनाला यातना देऊन, बुध्दीपुढे आलेली आव्हाने स्वीकारूनदेखील काही गोष्टी करण्यात माणसाला आनंदच लाभत असतो. ते कोणते सुख असते बरे? आपण बसमधून प्रवास करताना खूप वेळ उभे राहिल्यावर एकदाची बसायला सीट मिळते; पण बसल्यावर आपल्याला एक वृध्द माणूस उभा राहिलेला दिसतो. आपण उभे राहून त्या वृध्द माणसाला बसायला जागा देता. तेव्हा आपल्या मनाला जे समाधान लाभते ते सांगता येईल का? कोणत्या सुखासोबत याची आपण तुलना कराल? आपल्याला जे मिळाले ते दुसऱ्याला देण्यातला आनंद खरोखरच वेगळा असतो. साधुसंत, साधक, समाजसेवक अशा प्रकारचा आत्मिक आनंद भोगत असतात. मनुष्य म्हणजे केवळ शरीर नव्हे! पशूलाही शरीर असते. मग दोघांत फरक तो कोणता? मनुष्य आणि पशू यांना जीवनावश्यक वस्तू सारख्याच लागतात. त्यांचा शरीरधर्म सारखाच असतो; पण मनुष्य कुटुंब मानतो, बंधुभाव मानतो. मनुष्याला देवाने बुध्दी आणि संवेदना दिलेली आहे. दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची शक्ती दिलेली आहे. मनुष्य जर आत्मकेंद्रित झाला. तर त्याच्यात आणि पशूत कोणताच फरक उरणार नाही. निसर्गाने समतोल ठेवण्यासाठी प्राणिजगताला आवश्यकतेपेक्षा अधिक उपभोग घेऊन नये हा नियम घालून दिला आहे आणि त्याचे पशू पालन करतात; पण माणूस समोर दिसेल तो पदार्थ खाल्ल्यावाचून राहत नाही. अपचन झाले तर त्यासाठी त्याने हाजमोला बनविला आहे. आपली बुध्दी वापरून माणसाने हे केले आहे; पण पशूंना हे करता येत नाही. पशू समतोल राखतो, पण त्याला बुध्दी नाही. मनुष्याला बुध्दी आहे, पण समतोल ठेवता येत नाही. भारतीय तत्त्वज्ञानात सांगितले आहे की, शरीर, मन, बुध्दी व आत्मा यांचे संतुलन साधले पाहिजे; पण पाश्चिमात्य जीवनशैली वेगळी असल्यामुळे ते हे तत्त्वज्ञान समजू शकत नाहीत; पण संवेदना समजू शकले तर हे तत्त्वज्ञानही नीट समजून घेऊ शकतील.
पाश्चात्त्य समाज सोशल काँटॅ्रक्ट थिअरीवर आधारित आहे. एक पुरुष, एक महिला आणि त्यांची तीन मुले हीच त्यांची कुटुंबाची संकल्पना आहे; पण पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले ही आमची संकल्पना आहे. पाश्चिमात्य लोक मानवी संबंधांना कायद्याचा आधार देतात. अठरा वर्षांचा होईपर्यंत मुलाचे पालनपोषण करावे असा त्यांचा कायदा सांगतो. इंग्रजांच्या पूर्वी आपल्या देशात विवाहाची नोंदणी केली जात नसे. देवाब्राह्मणासमक्ष लग्न लागले की त्यांचा लोक पती-पत्नी म्हणून स्वीकार करीत असत. ही कल्पना पाश्चात्त्यांना पटणार नाही. आपल्याकडे चिंतन, शैली, परंपरा, मूल्ये आणि नियम आपोआपच तयार होत गेले आहेत. आपण काम, क्रोध, लोभ आणि मोह या विकारांनाही समजून घेतले आहे. हे विकार सर्वांच्यात असतात, पण आपण त्यांचे दमन केले पाहिजे. यामुळेच आपले तत्त्वज्ञान सांगते की, मानवाचा समग्र विचार करा. मनुष्य म्हणजे केवळ शरीर, हाडामांसांनी बनलेला इंद्रियसमूह नाही. यामुळे पं. दीनदयाळ सांगतात की, जर सुखाची कामना करायची असेल तर सर्वांच्या सुखाची कामना करायला हवी. तसेच आपल्याकडे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ मानले जातात; पण यामध्ये कोणता पुरुषार्थ मोठा आणि कोणता लहान असा भेद केलेला नाही.
धर्माची व्याख्या करताना व्यक्तीला सामाजिक जीवनात काही मर्यादांचे पालन करण्यास सांगितले आहे. घरात पूजापाठ करण्यास सांगितले, पण कर्मकांड नाही. धर्म म्हणजे आपल्या कर्तव्यांचे पालन करणे, आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडणे, मर्यादेचे पालन करणे होय. आंब्याचे झाड खतपाणी घातल्याने नारळाएवढे उंच होत नाही. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. जर धर्माचार्यांनी बिल्वपत्राला चार पाने असावी असा ठराव संमत केला तर तसे बिल्वपत्र कुठेच मिळणार नाही. सर्वत्र तीन पानांचेच बिल्वपत्र मिळते. नदी आपल्या पात्राची मर्यादा सांभाळून वाहत असते. समुद्राला भरती-ओहोटी येते, पण तोही मर्यादेचे उल्लंघन करीत नाही; पण मर्यादेचे पालन करणे माणसालाच जमत नाही. आपला धर्म मर्यादा सांगतो. जीवन जगण्यासाठी अर्थाची आवश्यकता आहे. पैसे नसले तर मनुष्य सुखी होऊ शकत नाही. पैसे मिळविण्यासाठी मग चोरीमारी करू शकतो. धन नसले तर समस्या निर्माण होतात, पण मर्यादेपलीकडे धन गोळा केले तरीसुध्दा समस्या निर्माण होतात. यामुळे अर्थाचा अभावही नको आणि प्रभावही नको, असे आपल्याकडे सांगितले जाते. जीवनात समतोल हवा. राजकीय क्षेत्रात अर्थाचा केवढा मोठा प्रभाव निर्माण झाला आहे हे आपण आज पाहतो आहोत. त्यामुळे धर्माची मर्यादा राखून अर्थप्राप्ती करायला हवी. माणसाला काही गरजा असतात आणि त्या पूर्ण होणे आवश्यक आहे. मनुष्यजातीचा पुढे विकास होत गेला पाहिजे आणि परंपरा पुढे चालत राहिली पाहिजे या दृष्टीने विवाहाची गरज आहे. यातूनच नवी पिढी जन्माला येत असते. म्हणून या गोष्टीकडे उपेक्षेने पाहता येणार नाही. ब्रह्मचर्य हे श्रेष्ठ आहेच, पण गृहस्थाश्रमाचीही उपेक्षा करता येत नाही. तोसुध्दा आपल्या परीने श्रेष्ठच आहे. मात्र अलीकडे मर्यादा पाळली जात नाही. जर काम या विषयाला अमर्याद महत्त्व प्राप्त झाले तर मग मानवाचे पशूत रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही; पण त्यालाही आपण पुरुषार्थ मानले आहे.
बुभुक्षितं किं न करोति पापम्। असे म्हणतात; पण हे पूर्ण सत्य नाही. आपण स्वतः भुकेले राहून दुसऱ्यांसाठी झटण्याची आपली परंपरा आहे. भुकेले लोक पापच करतात असे मानण्याची मुळीच गरज नाही; पण सतत उपासमार झाली तर मनुष्य पापाकडे वळण्याची शक्यता असते. म्हणून कुणाची उपासमार होणार नाही याकडे लक्ष पुरविले पाहिजे. पैशाच्या बळावर समाजात दडपशाही करणारी मंडळी आपण पाहू शकतो. त्यामुळे मर्यादेपेक्षा अधिक धनदौलत एखाद्याकडे असणे ही गोष्ट समाजासाठी घातक आहे. त्यामुळे चौथा पुरुषार्थ मोक्ष आणि धर्म यांच्या मधोमध काम व अर्थ या पुरुषार्थाचे स्थान सांगितले आहे. अशी मर्यादा पाळली तर मानवजातीचे कल्याण होईल.
आपली आणि पाश्चिमात्यांची समाजाची व्याख्या वेगवेगळी आहे. ते असे सांगतात की, मनुष्यसमूहाच्या काही गरजा असतात आणि त्यामुळे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जेव्हा मनुष्यसमूह तयार करतो तेव्हा त्याला समाज असे म्हणतात. अशा समूहाला गर्दी अथवा कळप म्हणता येईल, पण समाज म्हणता येणार नाही. त्यामुळे व्यक्तीचे विकसित रूप समाज आहे असे आपण मानतो. व्यक्तीचा समाजाशी संबंध असतो. सामाजिक जीवनाची पहिली पायरी म्हणजे व्यक्तीचे कुटुंब. मी एकटा नाही तर मला आईवडील आहेत, भाऊबहिणी आहेत हे तो जाणतो. हे नातेसंबंध तो लक्षात घेतो. अशाच प्रकारे आपला समाज हे विशाल कुटुंब आहे असेच तो मानतो. यामुळे मनुष्यांच्या भावभावनांच्या आधारावर एकमेकांबद्दल मनात असलेली कर्तव्यभावना जाणून एकत्रित येणे म्हणजे समाज होय. समाज आणि व्यक्ती यामध्ये संघर्ष नसतो, पण दोन भिन्न समाजांत संघर्ष होऊ शकतो.
आपण एका श्रेष्ठ संस्कृतीचे वारस आहोत, असे भारतातील प्रत्येक हिंदू मानतो. आपल्याला हा वारसा लाभलेला आहे. आपली भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, परंपरा आणि मूल्ये इतकी श्रेष्ठ आहेत की, त्याचा प्रत्येकाला स्वाभिमान वाटतो. 'सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय' या तत्त्वाचे कोणी आपल्या खासगी जीवनात पालन करीत नसला तरी त्याला सामाजिक संकेत काय आहेत, समाज काय सांगतो याचे भान असते. समाजालाही एक आत्मा असतो. यासाठी पं. दीनदयाळजींनी 'चिती' हा शब्द वापरला आहे. समाजमनावरही आघात होत असतात. सोमनाथाचे मंदिर सोळा वेळा फोडण्यात आले, त्याचे आपल्याला आजही दुःख वाटते. विकसित राष्ट्रांमध्ये भारताचा नामोल्लेख झाला नाही तर मनाला वेदना होते. विदेशी शक्तीबरोबरच्या युध्दात जर विजय मिळाला तर आपल्याला आनंद का होतो? आपण युध्दभूमीवर जाऊन लढत नाही, तेथे आपली सेना लढत असते. पराभव आणि पतनामुळे आपण दुःखी होतो व उत्थान आणि विजयामुळे आनंदी होतो. आपण स्वतः विश्वगुरू व्यक्तिशः बनणार नाही; पण भारतमाता विश्वगुरुपदावर विराजमान होऊन संपूर्ण जगाला मार्गदर्शन करीत आहे हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य म्हणताना आपल्याला आनंद का होतो? असे स्वप्न पाहतानासुध्दा आनंद होत असतो. या वेळी 'चिती' म्हणजे समाजाच्या आत्म्याला खरा आनंद होत असतो. हे व्यक्ती ते समष्टी असे नाते आहे. आपली संपूर्ण जीवनशैली पर्यावरणकेंद्रित आहे. हेच आमचे चिंतन आहे. आपले या भूमातेशी नाते जोडण्याचे काम आपले संस्कार करीत असतात. वृक्षतोड करू नका, घाण करू नका, नद्यांची पूजा करा, असे आपले संस्कार सांगतात. निसर्गाचा आदर करण्याची आपली परंपरा आहे. पर्यावरणाचे प्रदूषण होऊ नये, याची आपण काळजी घेतो; पण सध्याच्या काळात या गोष्टी आपण कर्मकांडाच्या रूपात करताना दिसतो. यामधील मूळ चिंतन आपण विसरून गेलो आहोत. वटपौर्णिमेला महिला वडाची पूजा करतात. यासाठी शहरात वेगळीच गोष्ट पाहायला मिळते. या दिवशी तेथे वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून विकायला ठेवतात आणि महिला त्या घरी नेऊन त्यांची पूजा करतात. याला म्हणतात कर्मकांड. खरे म्हणजे 'झाडे वाचवा' हा संदेश देण्यासाठी वटवृक्षाची पूजा केली पाहिजे; पण त्याऐवजी वृक्षतोड केली जाते. ही कसली पूजा? आपली तीर्थक्षेत्रे पाहा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदी अथवा तलाव असतो. जर नसेल तर तेथे हौद तरी असतो. म्हणजे मंदिर तेथे पाणी असतेच. मंदिरात धूप जाळला जातो. वातावरण शुध्द व्हावे या हेतूनेच असे करतात. मंदिराच्या ठिकाणी वनस्पती, पाणी आणि धूप कशासाठी? तर पर्यावरण रक्षणासाठी! हे कर्मकांड मुळीच नाही. आपले निसर्गाशी जे नाते आहे त्याचे स्मरण करून देण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. नदीला घाण करू नये म्हणून तिची पूजा करायची असते. निसर्गासोबतचे आपले नाते आपण प्रामाणिकपणे जपले तर कोणत्याही प्रकारची प्रदूषणाची समस्या उभी ठाकणार नाही. आमच्या ओळखीच्या एका राजकीय पुढाऱ्याला वनमित्र पुरस्कार मिळाला होता. त्याच्या क्षेत्रामध्ये विपुल जंगल होते. नंतर त्याच्या घरावर सरकारी विभागाने छापा घातला तेव्हा अडीच कोटी किमतीचे मौल्यवान लाकूड त्याच्या घरात सापडले. म्हणजे मैत्री एवढी दाट झाली होती की, जंगलातील लाकूड घरातच आणून ठेवले. वनमित्र पुरस्काराचा असाही अर्थ लक्षात आला. आपले चिंतन असे सांगते की, सर्व ब्रह्मांड एकच आहे. या ब्रह्मांडासोबत आपले नाते आहे. या ब्रह्मांडामुळेच सूर्य, चंद्र आणि पृथ्वीचे अस्तित्व आहे. या सौरमंडलामुळे जल, वायू व वातावरण यांचे संतुलन होते आणि मानवजातीसाठी या गोष्टी उपलब्ध होतात. यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीसोबत आपले नाते आहे. त्याबाबत आपल्या मनात श्रध्दाभाव आहे. यामुळे पं. दीनदयाळ सांगत की, मी केवळ एक व्यक्ती नाही, मी कुटुंबाचा घटक आहे, कुटुंब समाजाचा घटक आहे आणि समाज 'वसुधैव कुटुंबकम्' या संकल्पनेशी जोडला गेला आहे. या ब्रह्मांडाच्या आधारावरच ही सृष्टी टिकून राहिली आहे अशा प्रकारचा भाव मनात जागृत ठेवला तर मनुष्यजातीसमोर कोणतीही समस्या उभी राहू शकणार नाही. माणसाने स्वतःमध्येच आधी एकात्मता निर्माण केली पाहिजे. शरीर, मन, बुध्दी आणि आत्मा यांना एकात्म ठेवून संस्कारित करण्यासाठी त्याने प्रयत्न केला पाहिजे. आपल्या गरजांची पूर्तता करताना त्याने चारी पुरुषार्थांचे भान ठेवले पाहिजे आणि या विशाल ब्रह्मांडाचा मी एक छोटासा घटक आहे, अशी भावना बाळगली पाहिजे. जर अशी भावना मनात असेल तर तो सृष्टीसोबत एकात्म होऊ शकेल आणि परमेष्ठीसोबतही एकात्म होऊ शकेल. मग येथे लढाई, संघर्ष, शोषण, अन्याय यांचे नावनिशाणही उरणार नाही. म्हणून संपूर्ण जगानेच न्याय, शांती, परस्परपूरकता आणि परस्परावलंबनाच्या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे. यासाठीच पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शनाचा सिध्दान्त आपल्यासमोर ठेवला आहे. या सिध्दान्ताच्या आधारावरच सर्व रचना उभी करायला हवी असे मला वाटते. या सिध्दान्ताच्या आधारावर समयाला अनुकूल व्यवस्था उभी राहावी याची चिंता करू नये. आपल्याला आज ज्या गोष्टी आवश्यक वाटतात त्याच कदाचित उद्या अनावश्यक वाटू शकतात. उद्या काही नव्या गरजा निर्माण होतील. यामुळे रचनेमध्ये बदल करण्याचे आव्हान स्वीकारताना मुळीच घाबरू नये. मात्र परस्परपूरकता, परस्परावलंबी जीवन हे मूलभूत सिध्दान्त आणि या संपूर्ण सृष्टीसोबत असलेल्या आपल्या नात्याचे विस्मरण होता कामा नये. हे मनुष्यजातीसाठी आणि संपूर्ण ब्रह्मांडासाठी हानीकारक ठरणार आहे. यामुळे आपण याच सिध्दान्ताच्या आधारावर वाटचाल केली पाहिजे आणि नवनवीन प्रयोग केले पाहिजेत असे मला वाटते.