नव्वद वर्षे झाली, आता तरी थोडा अभ्यास करा!

 संघाचा सिध्दान्त तुम्हीच सांगणार, संघाची कार्यशैली व कार्यपध्दती तुम्हीच ठरविणार, तुम्हीच म्हणणार सरसंघचालक म्हणजे सुप्रीमो, म्हणजे तुम्हीच न्यायमूर्ती बनणार, वकीलपत्रही तुमचेच, साक्षीपुरावेही तुमचेच... सत्यावर केलेला हा 'मिलेनियम फ्रॉड' मानावा लागेल आणि त्याबद्दल तुम्हाला येणाऱ्या पिढया आणि इतिहास क्षमा करणार नाहीत. अर्थात, याची चिंता तुम्हाला नसणारच! कारण तुम्ही पडले पुरोगामी.. तेव्हा 'कशाला उद्याची बात, बघ सरून चालली रात' पंथातले! तरीसुध्दा राहवत नाही म्हणून सांगावेसे वाटते की नव्वद वर्षे झाली, आता तरी थोडा अभ्यास करा!



विजयादशमी 2015 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्थापन होऊन नव्वद वर्षे पूर्ण होतील. भारतातील संस्थागत इतिहास पाहता कोणतीही फूट न पडता एखादी सार्वजनिक संस्था नऊ दशके काम करते, हे एक आश्चर्यच आहे. रामकृष्ण मिशनचेही तसेच आहे. राजकीय पक्ष याला अपवाद आहेत. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष अनेक वेळा फुटला, समाजवादी पक्षाचे किती तुकडे झाले याची मोजदाद करणेदेखील अवघड आहे. विचारावर आधारित आणि कार्यकर्त्यांवर आधारित कम्युनिस्ट पक्षदेखील अनेक फुटींचा शिकार झाला. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय पक्षांशी तुलना करण्याचा विचार नाही. कारण अशी तुलना होऊ शकत नाही. फक्त एवढाच मुद्दा मांडायचा आहे की, राजकीय पक्ष झाला तरी ते एक संघटन असते आणि या संघटनेत परिस्थितीप्रमाणे फाटाफूट होत जाते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात फाटाफूट झाली नाही, याचे कारण काय? संघात वैचारिक मतभेद नसतात काय? जसे अन्य पक्षांत असतात, तसेच तीव्र मतभेद संघातही असतात. आणीबाणीला संघाने पाठिंबा द्यावा की देऊ नये यावर तीव्र मतभेद होते. संघाने सेवाकार्ये करावीत का करू नयेत, संघाने भाजपाला समर्थन द्यावे की देऊ नये, यावरदेखील वेगवेगळे विचारप्रवाह होते. नव्वद साली तर भाजपाला पर्याय म्हणून एक स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा, कारण भाजपा हिंदुत्वाचे जितके समर्थन करायला हवे तितके समर्थन करीत नाही, यावरदेखील चर्चा होत. आरक्षणाचे काय करायचे? यावरदेखील वेगवेगळे विचारप्रवाह संघात असतात. परंतु विचारांची मतभिन्नता असली तरी तिचे परिवर्तन मनभिन्नतेत होत नाही. आणि मनभिन्नता झाल्याशिवाय संघटनेत फूट पडत नाही.

समष्टिभाव हाच स्वभाव

मनभिन्नता न होण्याचे कारण काय? याचे उत्तर फार सोपे आहे. हे उत्तर संघाच्या ध्येयवादात दडलेले आहे. 'माझ्यापेक्षा राष्ट्र मोठे, मला माझ्या सर्वशक्तीनिशी माझ्या राष्ट्राला महान करायचे आहे' हा संघाचा ध्येयवाद आहे. यामुळे मतभिन्नता मनभिन्नतेत परावर्तित होत नाही. मनभिन्नतेसाठी अहंकार लागतो. मी एवढा मोठा विचारवंत, माझी सगळी हयात संघटनेत गेली, मला खूप कळते आणि तरीही माझ्या बोलण्याकडे कुणी लक्ष देत नाही, हा झाला व्यक्तिगत अहंकार. तो संघात रुजत नाही. न रुजण्याचे कारण असे की, डॉ. हेडगेवारांनी संघाची रचना पूर्णपणे निःस्वार्थतेच्या पायावर केली आहे. स्वार्थ असेल तर मीपणा निर्माण होईल, अहंकार निर्माण होईल. जेथे अहंकाराचा पूर्ण लोप झाला, तेथे व्यक्ती समष्टिजीवनाचे अंग बनते. समष्टिभाव हा तिचा स्वभाव होतो आणि मग 'जे सर्वांचे मत, ते माझे मत' अशी तिची वृत्ती बनते. हा संघाचा स्वभाव झाल्यामुळे संघात फूट पडणे शक्य नाही.

या देशात राष्ट्राचा विचार करणारी संघ ही एकमेव संस्था आहे, असे जर विधान मी केले तर काही लोक त्यावर आक्षेप घेण्याचा संभव आहे. या देशात राष्ट्रीय स्तरापासून प्रादेशिक स्तरापर्यंत अनेक राजकीय पक्ष आहेत. संघाला जवळचा भारतीय जनता पक्षदेखील आहे. परंतु हे पक्ष राष्ट्रीय विचार करतात असे म्हणणे फार धाडसाचे होईल. ते राजकीय विचार जरूर करतात. राजकीय विचार म्हणजे मते कशी मिळवायची, मतपेढया कशा निर्माण करायच्या, मते मिळविण्यासाठी लोकभावना कशा उत्तेजित करायच्या, जनप्रिय होण्यासाठी कोणते कार्यक्रम आणि विषय हाती घ्यायचे, विरोधी पक्षावर कुरघोडी करण्यासाठी कोणते डावपेच वापरायचे अशा सर्व गोष्टींचा विचार राजकीय पक्ष करीत राहतात. ते जर राष्ट्राचा विचार करू लागले, तर राजकारणात यशस्वी होणे शक्य होणारे नाही.

राष्ट्राचा विचार म्हणजे काय? संघाचा राष्ट्रविचार काय आहे? 'हे हिंदू राष्ट्र आहे' हा संघाचा पायाभूत सिध्दान्त आहे. 'हिंदू समाज या राष्ट्राचा राष्ट्रीय समाज आहे' हा दुसरा सिध्दान्त आहे. आपले राष्ट्र प्राचीन असून त्याचे जीवनदर्शन आहे, त्याची जीवनशैली आहे, त्याची मूल्यपरंपरा आहे, तिचे नाव आहे हिंदुत्व. हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचा विषय नाही. स्वतःला विचारवंत म्हणविणारे, पुरोगामी म्हणविणारे बेधडक विधान ठोकतात की, संघाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे आणि ते घटनाविरोधी आहे. घटनेने सेक्युलर राज्य निर्माण केले आहे. ज्यांना राष्ट्र आणि राज्य यातील भेदही कळत नाही, त्यांनी अज्ञानाचे प्रदर्शन करू नये. आपली राज्यघटना भारतीय राज्याची राज्यघटना आहे. हे राज्य खंडित राज्य आहे. हिंदू राष्ट्राचे खंडित रूप आहे. हिंदू राष्ट्रात आजचा पाकिस्तान, गांधार, बांगला देश, ब्रह्मदेश, उत्तर सीमेवरील सर्व राज्ये येतात. हे स्वरूप सांस्कृतिक राष्ट्राचे आहे. राजकीय राष्ट्र-राज्याचे नाही. यामुळे या सर्व देशांवर आक्रमण करून त्यांना हिंदू राष्ट्रात आणायचे अशी काही संघाची विषयसूची नाही.

वास्तवाकडे काणाडोळा

जे खंडित राज्य आपल्या हाती आहे, त्या राज्याने आपल्या मूळ प्रकृतीप्रमाणे आपला व्यवहार केला पाहिजे, हा संघाचा आग्रह आहे. ही संघाची राष्ट्रीय विषयसूची आहे. अनेक वेळा ती मतदानाच्या संदर्भात किंवा राजकीय संदर्भात अनेकांना गैरसोयीची वाटते. उदा. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे मदर टेरेसा यांच्याबद्दलचे आणि आरक्षणाच्या समीक्षेबाबतचे वक्तव्य अनेकांना आवडले नाही. यामुळे राजकीय नुकसान होईल असे समर्थकांचेदेखील म्हणणे पडले. परंतु संघाला राजकीय लाभहानीचा विचार अभिप्रेत नसतो. या देशात लोकशाही नांदायची असेल, परमतआदराची भावना (ज्याला पुरोगामी शब्दप्रयोग आहे - सर्वधर्मसमभावाची भावना) कायमस्वरूपी टिकवायची असेल, देशाची बहुविधता टिकवून ठेवायची असेल तर देशात हिंदूंची बहुसंख्या असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या सर्व गोष्टी हिंदूंच्या केवळ स्वभावातच नसून त्या सर्व त्याच्या रक्तात आहेत. असा हिंदू संघटित झाला आणि आपल्या जीवनमूल्यांच्या आधारे जगू लागला, तर बहुविधता आणि विविध उपासना पध्दती यांचा उत्तम मेळ कसा बसवायचा याचा आदर्श जगापुढे येईल. हे संघाचे राष्ट्रीय लक्ष्य आहे.

जगातील कोणत्याही मुस्लीम देशात अन्य धर्मीयांना सन्मानाने जगू दिले जात नाही. हे ढळढळीत वास्तव आहे. नुसतेच अन्य धर्मीयांना जगू दिले जात नाही असे नसून पाकिस्तान, इराक आणि सीरियामध्ये मुसलमानांतील वेगवेगळे पंथ आपापसांत हिंसक लढाया करून वेगळा इस्लामी विचार मांडणाऱ्यांना ठार करतात, हे वास्तव आहे. राजकीय लाभासाठी आणि पुरोगामी झेंडा खांद्यावर मिरविण्यासाठी ते जर समजूनच घ्यायचे नाही असे काही लोकांनी ठरविले असल्यास त्याला आपण काही करू शकत नाही. त्यांचा हा मूर्खपणा आहे, आत्मघातकीपणा आहे आणि त्यांचा विचार क्षणिक राजकीय फायद्याचा असू शकतो; परंतु तो राष्ट्राचा घात करणारा आहे.

खंडित राष्ट्रातील हिंदू समाज अनेक कारणांमुळे विघटित आहे. जातिभेद, अस्पृश्यता ही त्या अनेक कारणांतील दोन मुख्य कारणे आहेत. ही आपल्या समाजातून गेली पाहिजेत. ते घालविण्याचे काम हे राष्ट्रीय काम आहे, राजकीय नव्हे! राजकीय काम जातींच्या भावना वाढविण्याचे आहे. जातीय अस्मिता वाढविण्यासाठी या देशातील अनेक विचारवंत अनेक राजकीय पक्ष अस्मितेच्या राजकारणाची (आयडेंटिटी पॉलिटिक्सची) भाषा करतात. आम्ही हिंदू समाजापासून वेगळे आहोत, तुमचा 'काऊ नॅशनॅलिझम' असेल तर आमचा 'बफेलो नॅशनॅलिझम' आहे, आम्ही बळीराजाचे वारस आहोत, रावण, नरकासुर, महिषासुर हे आमचे पूर्वज आहेत अशा प्रकारची मांडणी होते. त्यावर पुस्तके लिहिली जातात. लहानसहान पुस्तिकांचा तर पाऊस पडलेला असतो. हे सर्व अराष्ट्रीय राजकारण आहे. राष्ट्राचा घात करणारे राजकारण आहे. अगोदर दुर्बल असलेल्या राष्ट्रीय हिंदू समाजाला अधिक दुर्बल करणारे राजकारण आहे. यासाठी त्याचा विरोध करावा लागतो.

असा विरोध केला की मग प्रचार सुरू होतो - संघ दलितविरोधी आहे, संघ आदिवासीविरोधी आहे, संघ आरक्षणविरोधी आहे. संघ आपल्याच लोकांचा विरोध करू शकत नाही. संघाचे ब्रीदवाक्य असे आहे की 'आसेतुहिमाचल हिंदू समाज त्याच्या सर्व गुणदोषांसहित माझा समाज आहे. त्याची सुखदुःखे माझी सुखदुःखे आहेत, त्याच्या कल्याणात माझे कल्याण आहे, त्याच्या अवनतीत माझी अवनती आहे.' हा संघाचा खोलवरचा संस्कार असल्यामुळे आपल्याच बांधवांविरुध्द संघ उभा राहू शकत नाही, आंदोलन करू शकत नाही.

संघाचा विरोध अराष्ट्रीय विचारधारेला

संघाचा विरोध अराष्ट्रीय विचारधारेला आहे, अराष्ट्रीय संघटनांना आहे, अराष्ट्रीय लेखनाला आहे. हा विरोध म्हणजे कोणत्याही समाजाचा विरोध नाही. असे लेखन करणारे आणि आंदोलन करणारे स्वतःकडे सर्व समाजाच्या वतीने बोलण्याचा ठेका घेतात. त्यांचा विरोध म्हणजे समाजाचा विरोध असे समीकरण मांडतात. ते वास्तवाला धरून नसते. अनेक कारणांमुळे अशा देशविघातक शक्तींना केंद्र आणि राज्य सत्तेने समर्थन दिलेले आहे. त्यात त्यांची त्यांची मतांची गणिते असतात. दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला संघाशी वैचारिक लढाईसाठी अशी फुकटची फौज लागत होती. त्यामुळे शासनाने या सर्वांचे उत्तम भरणपोषण केले, त्यांना संस्था काढून दिल्या, त्यांना पैसा दिला, पुरस्कार दिले, सन्मान दिले. यातील काही लोक आता सन्मान परत करू लागले आहेत. त्याची चिंता करायचे कारण नाही. त्यांचे सन्मान सन्मानाने परत घ्यावेत आणि आजवर राष्ट्रासाठी झीज सोसणाऱ्या हजारो लोकांना जे दूर ठेवले आहे, त्यांना सन्मानित करावेत. सत्ताधारी पक्षाच्या राज्यासाठी स्वतःच्या बुध्दीला आणि लेखणीला बाजारबसवी करणाऱ्यांचे दिवस आता संपत चालले आहेत, असा संदेश जाणे फार गरजेचे आहे. आणि कसल्याही राजकीय लाभाची पर्वा न करता जे राष्ट्राच्या हिताचे आहे तेच लिहू, तेच बोलू आणि तेच करू अशी ज्यांची मानसिकता आहे त्यांना सन्मानित करण्याची गरज आहे.

संघ नव्वदी गाठत असताना संघविरोधी सुपारीधारकांना, स्वतःच्याच वैचारिक तुरुंगात जगणाऱ्या बुध्दिवाद्यांना, प्रत्येक प्रश्नाकडे केवळ राजकीय दृष्टीनेच पाहणाऱ्या लोकांना, लोकशाही, सेक्युलॅरिझम, बहुविधता यांच्या रक्षणाचा ठेका आपल्याकडेच आहे या घमेंडीत जगणाऱ्या सर्वांना सांगणे आहे की, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गांभीर्याने अभ्यास सुरू केला पाहिजे. दोन गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत, की संघ तुमच्या शिव्याशांपामुळे अडचणीत येत नाही आणि उद्या तुम्ही स्तुती केल्यामुळे संघ वाढत नाही. तुमच्या रडण्याचा, आदळआपटीचा काहीही उपयोग नसतो. संघाच्या दृष्टीने ते अरण्यरुदन आहे. जंगलात रडत बसला, ऐकायला कोणी नाही आणि सांत्वनालादेखील कोणी नाही.

अभ्यास केला का?

स्वतःला महान बुध्दिवादी समजणाऱ्यांची संख्या देशात कमी नाही. त्यात अमर्त्य सेन, कुमार केतकर, तिस्ता सेटलवाड, अरुंधती रॉय, गेल आम्बेट, सीताराम येचुरी, प्रकाश करात, अभिषेक मनू सिंगवी... अशी नावेच लिहायची असतील पानभर पुरणार नाही. यांनी कधी संघाच्या संघटनशास्त्राचा अभ्यास केला आहे का? यांनी कधी संघाच्या नेतृत्वशैलीचा अभ्यास केला आहे का? यांनी कधी संघाची जी विविध सेवाकार्ये चालतात त्यांचा अभ्यास केला आहे का? संघस्वयंसेवक अनेक बँका चालवितात, त्या बँकांचा कधी अभ्यास केला आहे का? संघस्वयंसेवक शेकडो शिक्षणसंस्था चालवितात, त्या संस्थांचा कधी अभ्यास केला आहे का? नानाजी देशमुखांनी चित्रकूट प्रकल्प उभा केला, त्याचा कधी यांनी अभ्यास केला आहे का? वयाच्या सहाव्या वर्षापासून ते 80-90 वर्षापर्यंत संघस्वयंसेवक काम करतात, त्यांच्या प्रेरणांचा कधी शोध घेतला आहे का? संघविचाराच्या प्रेरणेतून शेकडो संस्था चालतात, या संस्थांचे आणि संघाचे परस्परसंबंध कोणत्या मूल्यांवर आधारित आहेत याचा कधी शोध घेतला आहे का? संघाचे सरसंघचालकपद म्हणजे काय आहे? ते सुप्रीम नेता आहेत की एकमेव नेता आहेत की अद्वितीय नेता आहेत की सरसंघचालकांचे दायित्व पार पाडणारे स्वयंसेवक आहेत?

हे अगदी सामान्य प्रश्न झाले. नव्वद वर्षे झाली, अजून किती अज्ञानात तुम्ही राहणार आहात? अजून किती काळ तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या पत्त्यांच्या बंगल्यांत आणि काचेच्या घरात बसून राहणार आहात? हा तुमच्या बुध्दिमत्तेचा घोर अपमान आहे असे तुम्हाला वाटत नाही का? अभ्यासाचा सामान्य सिध्दान्त असा असतो की, ज्या संस्थेचा अभ्यास करायचा तिचा जन्म कधी झाला? का झाला? तिचे नेते कोण होते? तिचे सिध्दान्त काय आहेत याची मूळ माहिती शोधून अभ्यास करावा लागतो. एपीजे अब्दुल कलाम यांनी तो केला असावा का? कारण त्यांची सगळी पुस्तके वाचताना माझ्यासारख्या अभ्यासकाला पानापानांवर संघ दिसू लागतो. एपीजे संघाचे कोठेच नाव घेत नाहीत. त्याने काही बिघडतही नाही. पण संघाच्या सगळया गाभ्याच्या सिध्दान्तांवर ते भाष्य करीत जातात. ते हृदयात जाऊन पोहोचते.

तुम्ही बुध्दिवादी कसे आहात? संघाचा सिध्दान्त तुम्हीच सांगणार, संघाची कार्यशैली व कार्यपध्दती तुम्हीच ठरविणार, तुम्हीच म्हणणार सरसंघचालक म्हणजे सुप्रीमो, म्हणजे तुम्हीच न्यायमूर्ती बनणार, वकीलपत्रही तुमचेच, साक्षीपुरावेही तुमचेच... सत्यावर केलेला हा 'मिलेनियम फ्रॉड' मानावा लागेल आणि त्याबद्दल तुम्हाला येणाऱ्या पिढया आणि इतिहास क्षमा करणार नाहीत. अर्थात, याची चिंता तुम्हाला नसणारच! कारण तुम्ही पडले पुरोगामी.. तेव्हा 'कशाला उद्याची बात, बघ सरून चालली रात' पंथातले! तरीसुध्दा राहवत नाही म्हणून सांगावेसे वाटते की नव्वद वर्षे झाली, आता तरी थोडा अभ्यास करा!

सौजन्य: सापताहिक विवेक