जातिभेदापलीकडे जाऊन कार्यरत संघ

जात-धर्म-पंथ याच्या पलीकडे जाऊन निरलसपणे संघाचे कार्य अखंड सुरू आहे. अभ्यासपूर्वक हे कार्य खरोखर समजून घेतले, तर तेथे हुकूमशाही नाही हेही समजेल. इथे मोकळेपणाने विचारविनिमय होतो, प्रसंगी टोकाची मतेही व्यक्त केली जातात; पण तरीही एकदा निर्णय झाला की तो सर्वजण संघटितपणे मान्य करून अंमलबजावणी करतात. म्हणजे खरे तर संघटना करण्याचे शास्त्र संघाकडून शिकले पाहिजे. पण याबाबतचा विचार माध्यमांनी कधी लक्षातच घेतला नाही.

 


 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातली सर्वांत मोठी स्वयंसेवी संघटना आहे. त्या संघटनेच्या विचारधारेचाच पक्ष आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्येही सत्तेत आहे. त्यामुळे संघ आणि संघ परिवार सार्वजनिक जीवनात आणि माध्यमांमध्ये चर्चेत असणं अगदी साहजिक आहे. माध्यमांमधील वर्षानुवर्षे चाललेली चर्चा आणि तिचा सूर पाहिला, तर प्रत्यक्षातला संघ आणि माध्यमांमधला संघ यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आपल्याला जाणवतो. संघाची स्थापना करणारे डॉ. हेडगेवार स्वत: काँग्रेसमध्ये होते आणि स्वातंत्र्य चळवळीतही होते. डॉक्टरांना ओळखणारे आणि त्यांचे चरित्रकार नाना पालकर यांनी त्या चरित्रात असे म्हटले आहे, की ‘स्वातंत्र्यचळवळीत असताना डॉक्टरांना जाणवले की, आपण ज्या रस्त्याने चाललो आहोत, त्या रस्त्याने स्वातंत्र्य तर मिळेल, पण ते टिकविता येणे आणि समर्थ होता येणे शक्य होणार नाही.’ डॉ. हेडगेवारांच्या संकल्पनेमध्ये भारताचा जो मुख्य बहुसंख्य समाज आहे, तो हिन्दू समाज, संघटित आणि सशक्त झाल्याखेरीज भारत सशक्त होणार नाही. म्हणूनच त्यांनी १९२५ च्या विजयादशमीला नागपूरमध्ये संघाची स्थापना केली. तेच डॉ. हेडगेवार १९३०च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतही आपले सरसंघचालकपद सोडून सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी खुद्दार यांच्याकडे सरसंघचालकपद सुपूर्द केले होते. पुढे डॉ. हेडगेवार यांनी त्यावेळी तरुण असलेल्या गोळवलकर गुरुजींना सरसंघचालकपदी नेमले आणि बघता बघता संघ आणि संघपरिवाराचा विस्तार जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये झाला. गुरुजींनीच एका ओटीसीमध्ये म्हटले होते, की आत्ता माझ्यासमोर संपूर्ण भारताचे संक्षिप्त स्वरूप बसलेले आहे. याचाच अर्थ संघाच्या कार्याचा विस्तार स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर झालेला होता. त्यातूनच पुढे आता रूढार्थाने ज्याला संघपरिवार म्हटले जाते, त्या सर्वांची वाढ होत गेली.

३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाली. हत्या करणारा नथुराम गोडसे हा आपली विचारधारा हिंदुत्वाचीच असल्याचे सांगत होता. तेव्हा संघालासुद्धा यात आरोपी मानून त्यावेळी संघावर बंदी घालण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत सर्व प्रकारचे आरोप-प्रत्यारोप सुरू राहिले. यामध्ये खऱ्या पेक्षा खोट्या गोष्टीच मांडणे किंवा विचारपूर्वक केलेली टीका-खरेखुरे असलेले मतभेद बोलून दाखविणे यापेक्षा असलेले तथ्य विकृत करून तिसरीच गोष्ट मांडणे या पद्धतीचे चित्र माध्यमांमध्ये दिसून येते. खऱ्या  अर्थाने विधायक टीका दिसत नाही. ज्याला समतोलपणाचा दावा करायचा आहे, त्याने तो करताना संघ आणि संघपरिवार तितकेच उत्तम कामही करत आहे, हेही मांडणे आवश्यक आहे. ते मांडल्यानंतर मग करायची तितकी टीका करा. पण आधी संघाचे काम समजावून घ्या. जे काही लिखित विचार मांडले गेले आहेत, ते पाहा आणि मग तुमचे मत मांडा. मात्र तसे होताना दिसत नाही. आपल्याला दिसतं की, प्रत्यक्षातला संघ ही जगातली सर्वांत मोठी स्वयंसेवी संघटना आहे. पण माध्यमांमध्ये संघाविषयीचे चित्र मांडताना नेहमी टीका-टवाळी, गैरसमज, आकस, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन हेच मोठ्या प्रमाणात दिसून येते.

समतोल बुद्धीने थोडा जरी विचार करावयाचा असेल तर आपला देशही लोकशाही आहे, एवढेच नव्हे तर मला कळलेल्या ‘भारतीय’ किंवा शब्दच वापरायचा झाला तर ‘हिन्दू संस्कृती’चा आत्माही सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचाच आहे. आपण एका विशेष आनंदाने म्हणतो की, उभ्या भारतीय संस्कृतीची रचना ‘एकम् सत्विप्राः बहुधा वदन्ती’ या सूत्राप्रमाणेच आहे. आपल्याला या संस्कृतीच्या आद्यकाळीच हे समजले आहे, की विश्वाचे, मानवी समाजाचे मूळ सत्य एकच आहे. फक्त तिकडे जाण्याचे रस्ते वेगवेगळे आहेत. ज्याला मनापासून जो रस्ता पसंत आहे, त्याने तसे जावे; त्यासाठी एकमेकांचा द्वेष, हिंसाचार, रक्तपाताची गरज नाही. मी म्हणेन की हीच हिंदुश्रद्धा आहे. वेदप्रामाण्य, ईश्वराचे अस्तित्व, पुनर्जन्माचा सिद्धान्त, यज्ञादी कर्मकांडाची उपयुक्तता नाकारणारा आणि ‘कर्ज काढून तूप प्या आणि उपभोग घ्या’ असे सांगणारा चार्वाकसुद्धा या परंपरेमध्ये ऋषी आहे. तेव्हा विरोधी विचार, वेगळे विचार, टीका या सर्वांचे स्वागतच आहे. ‘भारतीय’ किंवा ‘हिन्दू’ या परंपरेमध्ये (बाळासाहेब देवरसांनी हे दोन्ही शब्द समानार्थीच आहेत, असेच म्हटलेले आहे.) वेद न मानणाऱ्या, आत्मा न मानणाऱ्या, जातिव्यवस्थेविरोधात बंड करणाऱ्या, यज्ञसंस्थेवर टीका करणाऱ्या बुद्धांना आपण भगवान बुद्धच म्हणतो. ही उदारताच आहे. कारण त्या संस्कृतीला हे समजले आहे आणि तीच शक्ती आहे. तेव्हा एखाद्याला संघाचा विचार पटला नाही, तर त्याचा आदर होऊ शकतो, तो त्याचा हक्क आहे. पण बोलताना अभ्यास करून बोलणे, टीका करताना विधायक टीका करणे एवढी माफक अपेक्षा आहे. मतभेद समजू शकतात. एवढेच नाही, तर बघण्याच्या दृष्टिकोनावरून अनेकांना काही वेगळे दिसू शकते, हेही समजू शकते, पण जाणीवपूर्वक संभ्रम पसरवणे, विकृतीकरण करणे चुकीचे आहे.

आज देशातील माध्यमांनी उभे केलेले संघाचे चित्र काय आहे? तर, एखादी गोष्ट संघाशी संबंधित आहे, मग ती चूकच आहे, असे चित्र दिसते. माझ्या मते, यातून माध्यमांनी एक नवी जातिव्यवस्थाच उभी केली आहे आणि त्यामध्ये संघ, संघपरिवार आणि हिंदुत्वाचा विचार म्हणजे अस्पृश्यताच ठरविली आहे. मी म्हणेन की, माध्यमेच असहिष्णुता दाखवीत आहेत. अनेक ठिकाणी दिसेल, की माध्यमांमध्ये संघाचे चित्र, कार्य, विचार योग्य पद्धतीने मांडले जात नाहीत. त्याची योग्यप्रकारे चिकित्साही केली जात नाही. संघाच्या कार्यातून देशभरातून अक्षरश: हजारो-लक्षावधी माणसे प्रचंड त्याग आणि तपस्या करून या देशाला सर्वस्व अर्पण करून काम करत आहेत. कधी त्यांच्या कार्याबद्दल आदर तर सोडाच, दोन ओळींचा लवलेशही दिसत नाही. आज कुणीतरी एका गावाच्या विकासासाठी स्वत:ला झोकून दिलेले असते, कुणी एखादी पाणलोट योजना केलेली असते, कुणी नद्यांचे पुनरुज्जीवन केलेले असते अशा व्यक्तींची कामे छानच आहेत. त्याबाबत दुमत नाही; त्यांचा मी आदरच करेन; पण असेच काम संघ आणि संघ परिवारातील अनेकांनी अक्षरश: काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कोहीमापर्यंत केलेले आहे. असे कार्य करणाऱ्यांनी जात, पात, धर्म, पंथ न पाहता ही कामे उभी केली आहेत. अनेकांचा यात जीवही गेला आहे. पण त्याचा कधी माध्यमांमध्ये योग्य आदराने उल्लेखही दिसून येत नाही.त्यांच्या कामाचा आदर बाळगणे तर दूरच; पण त्याऐवजी जे मांडले जात आहे ते अयोग्य आणि विकृतपणानेच मांडले जात आहे, असेच चित्र आपल्याला दिसून येते.

गांधीहत्येचे उदाहरण घ्या. संघावर आरोप झाला म्हणून बंदी आली. पुढे दूरान्वयेही गांधीहत्येत संघाचा वाटा नव्हता, हे साक्षीपुराव्यांनी सिद्ध झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी करायची ती टीका संघावर केलेली आहे; पण आताच्या टीकाकारांनी पटेल यांचा आदर्श घेतला पाहिजे. टीका करायची झाली तरी ती समतोल करावी. आज देशाला राज्यघटना लागू आहे, त्या चौकटीत पावले उचलावीत. १९४७-४८ मध्ये सरदार पटेल यांनी संघावर टीका केली होती. पण त्यावेळचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना पटेल भेटले. या देशाच्या कायद्यानुसार संघाचीही लिखित घटना पाहिजे असा आग्रह पटेलांनी धरला. गोळवलकर गुरुजींनीही लिखित घटना केली. म्हणजे, आज बोलायचे झाले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारताच्या राज्यघटनेनुसार आणि कायद्याच्या चौकटीत काम करणारी संघटना आहे, ती घटनाविरोधी नाही. पण तरीही अनेकदा माध्यमांमध्ये ‘संघ, संघविचार, कार्यपद्धती म्हणजे राज्यघटनेला विरोधी आहे, यांना राज्यघटना मोडायची आहे, यांना देश तोडायचा आहे, लोकशाही खाली आणायची आहे,’ असा विकृत प्रचार होतो.

संघाच्या विचाराचे सूत्र एकचालकानुवर्तित्व आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास असा केला की, एकचालकानुवर्तित्व म्हणजे हुकूमशाही. हे कोठून आणि कोणी ठरवले? ‘एक चालक अनुवर्तित्व’ याचा अर्थ एक नेता असेल आणि आमची मते काहीही असली, तरी त्या नेत्याने निर्णय दिला की तो मानायचा- याला एकचालकानुवर्तित्व म्हणतात. संघाचे कार्य खरोखर समजून घेतले, तर तेथे हुकूमशाही नाही हे समजेल. सर्वजण एकत्र बसतात, मोकळेपणाने विचारविनिमय होतो, प्रसंगी टोकाची मतेही व्यक्त केली जातात; पण तरीही एकदा निर्णय झाला की तो सर्वजण संघटितपणे मान्य करून अंमलबजावणी करतात. म्हणजे खरे तर संघटना करण्याचे शास्त्र संघाकडून शिकले पाहिजे. पण याबाबतचा विचार कधी लक्षातच घेतला गेला नाही.

एकाही टीकाकाराला संघासारखी संघटना बांधता आलेली नाही. त्यामुळे ती बांधून त्यागपूर्वक देशसेवेसाठी दूरवर जाणे हे तर दूरच. शाखा हे संघाचे मुख्य माध्यम आहे. डॉक्टरांचे एक सुप्रसिद्ध आणि मला आवडणारे वाक्य आहे, ‘प्रत्येक स्वयंसेवक हा तुमचा मित्र हवा आणि प्रत्येक मित्राला स्वयंसेवक करा.’ यातून माणसे जोडत नेण्याची प्रक्रिया शिकवली जाते. एखादी व्यक्ती पहिल्यांदा कोणाचे तरी बोट धरून संघात येते म्हणजे ‘बुद्धं शरणं गच्छामी.’ पुढे त्या व्यक्तीची संघाबरोबर ओळख होते, विचार कळतात आणि मग संघ त्या व्यक्तीच्या पलीकडे जातो. निष्ठा तयार होते. ही निष्ठा म्हणजेच ‘संघं शरणं गच्छामी.’ मग शेवटची सर्वांत महत्त्वाची पातळी येते, ती म्हणजे ही संघटना कोणत्यातरी ध्येयासाठी आहे, ते ध्येय आणि विचार कळतात. त्या ध्येयविचारांशी ती व्यक्ती एकरूप होते. त्याला शब्द आहेत ‘धम्मं शरणं गच्छामी.’ असे करत माणसे त्यागपूर्वक कामास तयार होतात. टीकाकारांनी हे समजावून घेऊन मग टीका करावी. तसे न होता, सध्या सुरू असलेली टीका ही आकसाने होते आहे.

एकदा गांधीजींनी एका ‘ओटीसी’ला भेट दिली होती. त्यावेळी तेथे डॉ. हेडगेवार उपस्थित होते. गांधीजींनी डॉक्टरांना विचारले की, ‘इथे दलित, अस्पृश्य किंवा बहुजन समाजाचे किती लोक आहेत?’ यावर डॉक्टरांनी उत्तर दिले, ‘एकदा संघात आल्यावर आम्ही सर्व हिन्दू समान. आमच्या इथे आल्यावर आम्ही इतर जाती-पातींबद्दल विचारतही नाही.’

माझे म्हणणे आहे की, यावर सर्वांनीच विचार करावा. पुरोगामित्वाच्या नावाखाली आजपर्यंत ज्यांनी नुसतेच जाती-पातींचे राजकारण केले आणि आपली दुकाने चालवली, त्यांनी समता आणली? की त्यागपूर्वक काम करणारी संघटना ज्यांनी बांधून कामे उभी केली त्यांनी आणली? माझे म्हणणे आहे की, यावर चिकित्सा करा, ते समजावून घ्या आणि मग टीका करा. वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी परिषद, राष्ट्रसेवा सेविका मंच यांचे काम आणि आता महाराष्ट्रात काम करत असलेल्या सामाजिक समरसता मंचाचे काम, या सर्व माध्यमातून जात-पात, धर्म यांना बाजूला ठेवून समाज एकत्र आणण्याचे काम फक्त संघाने आणि संघ परिवारानेच केले आहे.

माध्यमांना आणि टीकाकारांना समजा हिंदुत्व पसंत नसेल, तर मी म्हणेन, त्याचा आदर झालाच पाहिजे, ती आपली संस्कृती आहे. पण याबाबत चिकित्सा केल्यास लक्षात येईल की, इथे जातिव्यवस्थेचे समर्थन जराही नाही. मात्र तरीही संघामध्ये ब्राह्मणी वर्णवर्चस्व आहे, तेथे स्त्रीला दुय्यम स्थान आहे, असा आरडाओरडा केला जातो. प्रत्यक्ष पाहाल तर तसे नाही. मी म्हणेन की, आरोप जरूर करा, पण तत्पूर्वी चिकित्सा करा. अशा पद्धतीच्या चिकित्सेचा उत्तम आदर्श राम बापटांनी घालून दिला आहे. राम बापट हे मूळचे समाजवादी व्यक्तिमत्त्व. पण खुल्या मनाचे होते. त्यांनी अभ्यास करून २५ वर्षांपूर्वी आणीबाणीनंतर ‘माणूस’मध्ये दोन लेख लिहिले होते. दुसरे उदाहरण म्हणजे जयप्रकाशजी. ते आधी संघाचे विरोधक होते. नानाजींच्यामुळे ते संघाच्या संपर्कात आले. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात नानाजींनी संघाची सगळी ताकद ‘जेपीं’च्या आंदोलनाच्या मागे आणि नंतर जनता पक्षाच्या मागे उभी केली. त्यानंतर ‘जेपीं’चे मतपरिवर्तन झाले. स्वतः जेपी म्हणाले होते - ‘‘आधी माझीही अशी समजूत होती की संघ ही जातीयवादी संकुचित संघटना आहे; पण प्रत्यक्ष पाहिल्यावर मला दिसले की भारताचे भवितव्य हे यांच्याद्वारेच व्यक्त होईल.’’

मी मगाशी ज्या अस्पृश्यतेबद्दल बोलत होतो; त्याबाबतचे आजचे चित्र पाहताना, अनेक तथाकथित पुरोगाम्यांकडून संघाशी काही संबंध असणाऱ्या  व्यक्तीला झिडकारलेच जाते. त्यांना कार्यक्रमांना बोलावले जात नाही. अनेक तèहेचे वैचारिक परिसंवाद होतात तिथेही बोलावले जात नाही. आज वृत्तवाहिन्यांवरही हेच चित्र दिसते. एकतर बोलवायचेच नाही किंवा बोलावलेच तरी त्याला फारसे बोलू द्यायचे नाही किंवा काही सांगायचा प्रयत्न करत असल्यास त्याला ‘कॉर्नर’ करायचे, त्याचे बोलणे अर्धवट तोडायचे असे सर्व प्रकार सर्रास दिसून येतात. ही माध्यमांमधील शिस्त नाही आणि भारतीय संस्कृतीतील शब्दांत सांगायचे तर, हा पत्रकारितेचा खरा धर्म नाही.

आज हिंदुत्व या विचारधारेवर आक्षेप घेतला जात आहे. पण ही विचारधारासुद्धा भारताच्या राज्यघटनेनुसार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत निकाल दिलेला आहे की, ही घटनात्मक विचारधारा आहे. असे असताना राहुल गांधी अमेरिकेच्या राजदूताला सांगू लागले की, ‘आमच्या देशाला इस्लामिक दहशतवादापेक्षाही फार मोठा धोका आरएसएसकडून आहे.’ तर माझ्या मते हे वाक्यच देशद्रोही आहे. पण माध्यमे ते वाक्य ‘ब्रेकिंग न्यूज’ करून एकांगी आणि विकृतपणे त्याचा प्रसार करतात.

अशा प्रकारची एकांगी टीका करण्यापेक्षा, जर समजा असे कोणी म्हणाले की, संघाचे काम आणि विचार यामध्ये अधिक आधुनिकता येण्याची गरज आहे. तर मीही म्हणेन, जरूर. कारण यामुळे तरुण पिढीचा सहभाग येईल. असे सर्व आधुनिकत्व असायला हवे. पण ते फक्त टेक्नॉलॉजीचे आधुनिकत्व असू नये; तर विचारांचेसुद्धा व्हायला हवे.

आधुनिकीकरणाचा मुद्दा एका महत्त्वाच्या दृष्टीने मला मांडावासा वाटतो. संघ आणि संघ परिवाराने प्रसारमाध्यमे हाताळणे, माध्यमांना सामोरे कसे जायचे, माध्यमांना विश्वासात कसे घ्यायचे आणि मुख्य म्हणजे स्वतः ही प्रसारमाध्यमे कशी चालवायची यातही पुढे जाणे आवश्यक आहे. हे म्हणताना मला खेद वाटतो की, महाराष्ट्रात संघाने चालवलेली वृत्तपत्रे एकतर बंद तरी पडली किंवा जनमानसात ती लोकप्रिय नाहीत. माझ्या बोलण्याने माझे कित्येक मित्र नाराज होतील; पण याबाबत स्पष्ट बोलणे आवश्यक आहे. जेव्हा संघाची वृत्तपत्रे चालवली जात होती तेव्हा संघाच्या कार्यकत्र्यांच्या घरात निष्ठेसाठी संघाचे वृत्तपत्र घेतले जाते होते, पण वाचण्यासाठी मात्र दुसरे वृत्तपत्र घेतले जात असे. शेवटी पत्रकारितेचाही एक धर्म असतो आणि त्यानुसार ते चालवले गेले पाहिजे. धर्म याला आधुनिक व्यवस्थापनशास्त्रात ‘प्रोफेशनलिझम’ असे म्हटले जाते आणि यामध्ये संघ कमी पडतो हे नाकारून चालणार नाही. गुरुजींचे एक वाक्य होत की, ‘संघ कुछ नहीं करेगा, संघ कुछ नहीं छोडेगा.’ म्हणजे कल्पना ही की, संघ ही माणसे निर्माण करणारी नर्सरी आहे आणि नंतर त्याने त्याला हवे त्या क्षेत्रात आपले काम करावे. मात्र माझ्या मते- तो ज्या क्षेत्रात जाईल तिथला तो तज्ज्ञच व्हावा. उदाहरण द्यायचे तर, संघाच्या तालमीत तयार झालेल्या एखाद्या उद्योजकाला व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक ते कौशल्य आत्मसात करावेच लागणार आहे. केवळ संघाच्या तालमीत तयार झाला म्हणून त्याला व्यवसायात यश मिळणार नाही. त्याचप्रमाणे या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे आहे. ही माध्यमे चालवण्यासाठीचे कौशल्य असायलाच हवे.

जगाने अभ्यास करावा असा आदर्श नरेंद्र मोदींनी करून दाखवला आहे. मेन स्ट्रीम मीडिया पूर्णपणे विरोधात असताना त्यापलीकडे जाऊन सोशल मीडियाचा उत्तम वापर करून त्यांनी पहिली निवडणूक जिंकून दाखवली. इतकंच नव्हे तर आजही मेन स्ट्रीम मीडिया विरुद्ध असताना ते स्वतःचे विचार समाजापर्यंत पोचवत आहेत. या गोष्टी संघ परिवाराने विचारात घेण्याची आवश्यकता आहे. संघाच्या कार्यकत्र्यांंनी-प्रचारकांनी माध्यमांना सामोरे कसे जायचे, माध्यमांमध्ये कसे बोलावे, विधाने कशी करावीत याबाबतचे शास्त्र अनुकरण्याची आवश्यकता आहे. मी पुन्हा सांगतो की, काही वेळा टीव्हीवर संघाचे प्रवक्ते आपले म्हणणे नेमक्या पद्धतीने, गोळीबंद पद्धतीने, असलेल्या वेळेत फटकन आपला मुद्दा कसा मांडावा, काही वेळा शब्दांनी प्रतिस्पर्ध्याचा मुद्दा कसा खोडायचा याबाबतच्या कौशल्यामध्ये कमी पडतात. निष्ठा, त्याग, तपस्येत ते कमी नाहीत; पण मीडियाच्या अभ्यासात ते थोडे कमी पडतात. याचेही एक कारण आहे. संघाच्या एकंदर संस्कारात प्रसिद्धि- विङमुखता आहे. ‘असु आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच काम आमुचे शील’ ही संघाची शिकवण आहे. त्यामुळेच हे घडते आहे. पण बदलत्या काळाप्रमाणे संघामध्ये हे बदल घडणे आवश्यक आहे.

मुळातच, हिन्दू विचारांना बदलाचे, विज्ञाननिष्ठेचे आणि आधुनिकतेचे अजिबात वावडे नाही. याबाबतचे उदाहरण म्हणजे, सध्याचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी अलीकडेच सांगितले की, ‘हिन्दू धर्मांतील कोणताही विचार जर विज्ञानविरोधी असेल तर तो टाकून दिला पाहिजे आणि वैज्ञानिक विचार स्वीकारला पाहिजे.’ माझ्या मते, माध्यमांनी हे वाक्य उचलून धरून त्याला प्रसिद्धी द्यायला हवी. आज तुम्हाला आवडो न आवडो; पण भारतातील सर्वांत मोठ्या हिन्दू संघटनेचा प्रमुख हे वाक्य म्हणतोय, मग त्याचा गौरव व्हायला नको का? एकेकाळी विज्ञाननिष्ठेचा मार्ग धरल्याने सावरकर एकटे पडले. पण आज संघाचे प्रमुख ते सांगताहेत. मग ते मोठे नाहीत का? पण त्याऐवजी तिरकस, विकृत असेच काहीतरी प्रसिद्ध का केले जाते?  दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणात मोहनजींच्या विधानाबाबत हा प्रकार अधिक प्रकर्षाने दिसून आला. ‘भारतीय संस्कार असले तर स्त्रीशी आम्ही सन्मानाने वागतो, त्या संस्कारांच्या अभावामुळे हे प्रकार घडतात. त्या अनुषंगाने त्यांचे वाक्य होते की ‘हे प्रकार इंडियात होतात, भारतात नाही’ मीडियाने या वाक्याची फिरवाफिरव करून ते अर्थहीन बनवले.

आणखी एक उदाहरण म्हणजे, सरसंघचालकांच्या राखीव जागांबद्दलच्या विधानाचा केलेला विपर्यास. प्रत्यक्षात सरसंघचालकांनी ‘राखीव जागांचा फायदा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचत नाही. तो पोचावा यासाठी त्याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे आणि त्यासाठी समिती नेमावी अशी मी सरकारला विनंती करतो’ असे म्हटले होते; पण माध्यमांनी त्यातील फक्त ‘राखीव जागांचा पुनर्विचार व्हावा’ एवढेच वाक्य घेऊन ते चुकीच्या पद्धतीने दाखवले. याला विकृतीकरण (डिस्टॉर्शन) म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? चिकित्सा करून मांडणी करा. ती नक्कीच स्वीकारार्ह असेल; पण अशाप्रकारचे विकृतीकरण हे सर्वथा अयोग्य आहे.

भारतीय संस्कृतीत काळानुसार बदलण्याची ताकद आहे. मी संघाला, भारतीय संस्कृतीला कळलेला एक ‘क्रिएटिव्ह रिस्पॉन्स’ असे म्हणेन. संघ हा काळाचे आव्हान ओळखणारा आहे. उदाहरणार्थ, आमचा देश वक्तशीर पाहिजे. संघाच्या कार्यामध्ये त्याचे संस्कार आहेत. अध्यात्म हा देशाचा आत्मा आहे तर संघाच्या कार्यात तो आत्मा जतन केला गेला आहे. सगळे आधुनिकेतचा आग्रह आहे.

त्याबाबत स्वतः सरसंघचालकच सांगताहेत. देशामध्ये जाती-पाती आहेत; तर संघात जाती-पाती नाहीत. देशाला आजपर्यंत स्वामिनिष्ठा किंवा व्यक्तिनिष्ठेचा शाप आहे; आज देशात दिसते की अशी घराणेशाही, व्यक्तिनिष्ठा ही काँग्रेस पक्षात आहे. संघ परिवारात नाही. मी अनेकदा गमतीने म्हणतो की भाजपमध्ये किंवा संघ परिवारात घराणेशाही असूच शकत नाही; कारण त्यासाठी ‘घराणे’ असावे लागते. इथे होणारा प्रमुख एक तर अविवाहित असतो किंवा विवाहित असून त्याने संन्याशासारखा संसार केलेला असतो. मग जर हा देश जातिव्यवस्थेच्या पलीकडे जात असेल, घराणेशाहीच्या पलीकडे जात असेल तर त्याचे सर्वांनीच स्वागत करायला हवे.

सारांश.....संघाचे कार्य वाढो आणि ते वाढणारच आहे. मात्र, माध्यमांनीही आपली जबाबदारी लक्षात घेऊन मांडायचे जे चित्र आहे, ते समतोल आणि न्यायबुद्धीने मांडावे एवढीच विनंती. सर्वांनाच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.