संघाकडून माझ्या अपेक्षा


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तसा माझा प्रत्यक्ष संबंध खूप कमी आलाय, पण अशी ना तशी संघपरिवाराच्या सामाजिक कार्याची जीवनाच्या बऱ्याच वळणांवर ओळख होत गेली आणि ह्या संस्थेबद्दलचा माझा आदर वाढत चालला. माझे वडील गोव्याच्या स्वातंत्र्यलढयातले एक खंदे सेनानी होते, अर्थात त्यांचा मार्ग सशस्त्र क्रांतीचा होता. त्यांच्या 'नगरहवेलीचा मुक्तीसंग्राम आणि मी' ह्या पुस्तकात मी संघाबद्दल पहिल्यांदा वाचलं. ते पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हा मी जेमतेम अकरा वर्षांची असेन. पापांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं की आझाद गोमंतक दलाबरोबर तेव्हा संघस्वयंसेवक सुद्धा दादरा-नगरहवेलीच्या मुक्तीसंग्रामात लढायला गेले होते. त्या स्वयंसेवकांमध्ये प्रख्यात गायक सुधीर फडके हे देखील होते. पुढे मी चौदा-पंधरा वर्षांची असताना गोव्यातल्या आमच्या गावात संघशाखा भरवायचे काही प्रयत्न झाले पण ते काही फारसे सफल झाले नाहीत, पण तेव्हासुद्धा घरोघरी फिरणाऱ्या प्रचारकांची तळमळ जाणवायची. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्याला आले, मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यामुळे राजकीय वाचन खूप वाढलं, त्या वाचनाचा भाग म्हणून संघाबद्दलही बरंच काही भलं-बुरं वाचनात आलं, त्यातही भलं कमी, बुरं जास्त होतं. पण पुण्यात राहत असताना समाजकार्याची हौस होती म्हणून त्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्थांची माहिती काढायला सुरवात केली, काहींची कामं प्रत्यक्ष जाऊन पहिली, तेव्हा लक्षात यायला लागलं की सामाजिक कार्यात पूर्ण तळमळीने अंग झोकून देणाऱ्या ज्या काही पूर्ण स्वदेशी संस्था आहेत त्या संस्था चालवणाऱ्या लोकांच्यात संघ विचारांच्या लोकांचा खूप मोठा सहभाग आहे. इतरही बऱ्याच एनजीओंचं काम जवळून पाहिलं होतं, पण त्यात सतत व्यावसायिकता जाणवली होती, आणि देशाबाहेरून येणाऱ्या पैशासाठी अश्या संस्थांचे चालक कसा जीव टाकतात हेही बघितलं होतं. पण संघपरिवारातल्या संस्थांचे लोक मात्र तसे नव्हते. ज्या काही थोडक्या लोकांना मी भेटले त्यांचा साधेपणा, समाजकार्याविषयीची त्यांची तळमळ, त्यांचा अफाट लोकसंग्रह सगळंच भारून टाकणारं होतं. 

 

पुढे नोकरीकरता मुंबईला गेले. मी दादरला एका कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. त्या काकांचा कल संघविचारांकडे होता, त्यांच्याकडे बरेच लोक यायचे, जाता-येता संघकार्याविषयी बरंच कानावर पडायचं. पुढे ते एका वर्षाकरता अमेरिकेत गेले. आता त्या घरात मी एकटीच रहात होते, बहुधा ९८ साल असावं. त्या वर्षी जुलैमध्ये एकदा खूप पाऊस पडला. आख्खा दिवस अखंड पाऊस कोसळत होता आणि त्यात दर्याची भरती. सगळे रस्ते पाण्याने भरून गेलेले. वाहतूक पूर्ण तुंबलेली. गाड्या, बसेस रस्त्यावर कंबरभर पाण्यामध्ये तासंतास उभ्या. ट्रेन्स बंद, त्यामुळे लोक कंबरभर पाण्यातून चालत घरी निघालेले. सुदैवाने मी त्या दिवशी थोडासा ताप असल्यामुळे ऑफिसला गेले नव्हते. संध्याकाळी सातच्या सुमारास दाराची घंटी वाजली, दरवाजा उघडला तर संघाचा गणवेष घातलेले एक काका होते, ते मला म्हणाले की 'आम्ही काही स्वयंसेवक पावसात अडकलेल्या लोकांना मदत म्हणून गरम चहा, खायचं वगैरे नेऊन देतोय पण गाड्यांमध्ये, बसेसमध्ये खूप बायका अडकलेल्या आहेत बराच वेळ, त्यांना कदाचित टॉयलेटची गरज भासत असेल, तू येऊन त्यांना विचारशील का आणि त्यांना जायचं असलं तर घरी आणशील का?' खूप कळकळीने ते मला सांगत होते. मी अर्थातच हो म्हटलं. त्या रात्री साडेबारा वाजेपर्यंत मी मग बायकांना घेऊन घरी जा-ये करत होते आणि संघाचे कार्यकर्ते कसे वय-हुद्दा सगळं विसरून तळमळीने मदत कार्यात गुंतलेत ते बघत होते. एकदा तर तेच गणवेषातले काका पाच-सहा बुरखाधारी बायकांना घेऊन घरी आले. त्या पूर्ण भिजल्या होत्या. वरळीहून चालत माहिमला निघाल्या होत्या बिचाऱ्या. त्यांना आम्ही चहा करून दिला, केस पुसायला टॉवेल दिले. त्यांच्यातल्या एका आजींना ते काका स्वतः हात धरून काळजीपूर्वक वर घेऊन आले होते. सोशल मिडिया पूर्वीचे दिवस होते ते नाहीतर त्यांचा फोटो कधीच व्हायरल झाला असता. त्या बायका परत परत त्या काकांना आणि मला 'शुक्रिया, शुक्रिया' असं म्हणत गेल्या. काकांनी परत त्या आजींना रस्त्यापर्यंत सोडलं. जवळ-जवळ दोन तास त्या घरी बसल्या होत्या, ना त्यांना काकांचा गणवेष खटकला होता ना काकांना त्यांचा बुरखा! 

 

पुढे पैसे कमवायला लागल्यावर ठरवलं की दर महिन्याला एखाद्या संस्थेला जमेल तशी मदत करायची, फक्त मिशनरी संस्था सोडून. त्या निमित्ताने वनवासी कल्याण आश्रम, संघपरिवाराने चालवलेली वसतिगृहे, वस्त्यांमध्ये चालणाऱ्या अभ्यासिका वगैरे कामं जवळून बघण्याचा योग आला. घरचा सगळा ऐषोआराम सोडून स्वतःला समाजकार्याला वाहून घेतलेली माणसं बघितली, त्यातली काही अतिशय उच्चशिक्षित होती, अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या वगैरे सोडून आलेली. संघपरिवाराच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेली मुलं भेटली, त्यांच्याशी बोलताना त्यांची संस्थेबद्दल असलेली कृतज्ञतेची भावना ठायीठायी जाणवत होती. संघाच्या समाजकार्याबद्दलचा माझा आदर वाढतच गेला. 

 

आज संघ नव्वदीच्या उंबरठ्यावर उभा आहे. संघस्थापना जेव्हा झाली तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. आव्हानं कमी झालेली नाहीयेत, उलट वाढलेलीच आहेत. आख्खा डाव्या विचारांच्या लोकांनी भरलेला मिडिया संघाच्या विरोधात दंड थोपटून उभा आहे. सरसंघचालक शिंकले तरी त्या शिंकेचा विपर्यास करून त्या घटनेला जाणून बाजून धार्मिक वळण देणारे लोक भरपूर आहेत. इस्लामी दहशतवादी ईसीस आणि रास्वसं म्हणजे एकच असा विखारी प्रचार जाणून-बुजून केला जातोय. मोदींचे रीतसर लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून पाडणे हा एकमेव अजेंडा असलेले लोक संघाविरुद्ध समाजात गरळ पसरवायचं काम इमानेइतबारे करताहेत. ह्या अश्या प्रतिकूल परिस्थितीत देखील संघ वाढतोय, बहरतोय, पण कधी कधी वाटतं की ही संघाची वाढ निकोप आहे का की नुसतीच सूज आहे? 

 

बदलत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत जर संघाला रेलेवंट राहायचं असेल तर काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं, पहिली गोष्ट म्हणजे समाजकार्यावर भर देणे. संघपरिवार समाजात खूप चांगलं काम करतोय, पण करण्यासारखं अजूनही खूप आहे. भारतातल्या प्रत्येक माणसापर्यंत संघाचं समाजकार्य पोचलं पाहिजे. त्यासाठी प्रसारमाध्यमं, सोशल मिडिया ह्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला पाहिजे. नवी पिढी जर संघाकडे आकर्षित करायची असेल तर संघाने आपला कालबाह्य गणवेष बदलला पाहिजे. शिस्त महत्वाची असतेच, पण ती शिस्त समाजकार्यात असावी, संचलन, शाखा ह्या असल्या गोष्टींवरचा भर कमी झाला पाहिजे. तसेच इंग्रजी भाषेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. नव्या पिढीपर्यंत जर संघविचार पोचले जावेत अशी जर संघाची अपेक्षा आहे तर संघाची भाषा तरुण झाली पाहिजे, चेहेरे तरुण दिसले पाहिजेत. मोठ्या प्रमाणावर संघात स्त्रियांचा सहभाग असला पाहिजे. स्त्री-पुरुष दोघांच्याही एकत्र शाखा का भरू नयेत? दुसरी महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे जातीनिरपेक्ष हिंदू समाज हे खरं संघाचं ध्येय असलं पाहिजे आणि त्यासाठी विविध जातीधर्माच्या स्त्री-पुरुषांनी एकत्र येवून संघाच्या समाजकार्यात भाग घेतला पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या पिढीला संघकार्यात जोडून घेणं खरं तर सहज शक्य आहे पण त्यासाठी संघाने काही जुन्या गोष्टी सोडून द्यायची फार तातडीने गरज आहे.