गरज माध्यमस्नेही होण्याची!
अश्विनी मयेकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 90 वर्षे पूर्ण करून शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. संघाशी थेट संबंधित नसलेल्या मात्र संघाबद्दल मनात अढी न बाळगणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला यानिमित्ताने काय वाटायला पाहिजे? गेली जवळपास तीस वर्षे दूर-दूर राहून, त्याच्या कार्याबद्दल ऐकून-वाचून संघाबद्दल काही एक मत बनविलेली व्यक्ती म्हणून एवढेच सांगावेसे वाटते, की संघाने अधिक आक्रमक व्हायला हवे.
सध्याचे जग हे प्रतिमा आणि प्रचाराचे जग आहे. सरकार निवडण्याचेच नाही तर सरकारची विषयपत्रिका ठरविण्याचे अधिकार जनतेच्या हातात आहेत. मग जनतेच्या मनात स्थान मिळवायचे तर जनतेपर्यंत जाणे, याला पर्याय काय? कार्याला महत्त्व आहेच, परंतु निव्वळ तेवढ्याने हे होणार नाही. कार्यकर्त्याच्या सचोटीवर आणि सत्कार्याला मान मिळेलच असे नाही. संघाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून माणसे त्याच्याकडे येतीलही, पण त्या येण्याचा वेग काय आणि जगाच्या बदलांचा वेग काय, याचाही अंदाज घ्यायला हवा का नको'
सेनापती बापट जिथे जात तिथे परिसर स्वच्छता करत असत. त्यावेळी आजूबाजूचे लोक आपल्या घरातील कचरा आणून तिथे टाकत आणि सेनापती बापटांकडून तो स्वच्छ करून घेत. संघाकडे सेनापती बापट होण्यासारख्या अनेक व्यक्ती असतील, पण कचरा टाकणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कैकपट आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी संघ काय करणार, हा खरा प्रश्न आहे.
गेल्या 90 वर्षांमध्ये संघाच्या अगणित कार्यकर्त्यांनी अक्षरश: आपले जीवनसर्वस्व वाहून आणि घाम व रक्ताचे सिंचन केले, यावर वाद होऊ शकत नाही. त्याचीच फलश्रुती म्हणून की काय, संघाच्या कार्य व विचाराबद्दल लोकांमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे. स्वयंमन्य पुरोगाम्यांनी संघाबद्दल निर्माण केलेल्या दुष्प्रतिमा पुसट होत आहेत. एकूणच हिंदू आणि हिंदुत्ववादी असणे, याबद्दलचा अपराधगंड कमी होत आहे. वातावरणातील या बदलांमागे स्वयंसेवकाच्या प्रयत्नांचा वाटा थोडा आहे. सेक्युलरांच्या लबाडीला कंटाळलेल्या जनतेने स्वत:च शोधलेता तो प्रवाह आहे. 'क्रांती स्वतःच नेतृत्व करते (लिबर्टी लीडस् इटसेल्फ)' या फ्रेंच राज्यक्रांतीतील घोषवाक्याप्रमाणे जनरेट्याने ही दिशा स्वत:च शोधली होती किंवा आहे.
एक साधे उदाहरण घ्या. संघाची प्रेरणा हिटलर आहे आणि संघाची रचना नाझींसारखी आहे, हा सेक्युलरांचा आवडता सिद्धांत आहे. त्यांच्या प्रत्येक लेखात हे वाक्य हटकून असतेच. आणि त्याच विद्वानाच्या दुसऱ्या लेखात, पुस्तकात किंवा भाषणात इस्राएलबद्दल (ज्यूंबद्दल, कारण ते अरबांना पुरून उरलेत!) संघाचा पाठिंबा असल्याचेही सांगितले जाते. आता हिटलर आणि त्याने ज्यांचा अतोनात छळ केला त्या इस्राएली ज्यू या दोहोंना एकच संघटना कसे काय आदर्श मानू शकते? मार्क्सवाद आणि भांडवलवाद हे दोन्ही एकाच व्यक्तीचे आदर्श असू शकतात काय, समाजसेवा आणि नफा हे एकाच संघटनेचे उद्दिष्ट असू शकतात काय? एकच व्यक्ती माओ आणि गुरूजी गोळवलकर या दोघांनाही आदर्श मानू शकते काय आणि त्यांच्या विचारांनुसार काम करण्याचा दावा करू शकतात काय? मग हिटलर आणि ज्यू या दोघांनाही संघ कसा काय आपला आदर्श मानू शकतो? या आरोपाची हद्द म्हणजे गेल्या वर्षी लोकसभा पराभव झाला, त्यामागे इस्राएल आणि संघाची हातमिळवणी केली, असा जावईशोध काँग्रेसचे नेते मोहन प्रकाश यांनी लावला होता.
संघाच्या कार्यकर्त्यांनी कधीही संघर्ष केला नाही, हा एक जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक रूढ केलेला समज. वास्तविक आणीबाणीच्या काळात कितीतरी संघ कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला, परंतु त्याचे श्रेय घ्यायला समाजवादी पुढे. स्वातंत्र्य आंदोलनात संघाच्या स्वयंसेवकांचा सहभाग नव्हता, गांधी हत्येत संघ सहभागी होता इ. अशी कितीतरी वाक्ये ही या मंडळींची 'आप्तवाक्ये' झाली आहेत आणि विशेष अभ्यासू लोक सोडले तर सामान्य जनतेला ती खरीच वाटतात.
मात्र आजपर्यंत याचा परिणामकारक प्रतिवाद करणारा एकही प्रयत्न मला आढळला नाही. माध्यमे आपल्याला जवळ करत नाहीत, आपल्याला प्रसिद्धी देत नाहीत, वैचारिक क्षेत्रात आपण टक्कर देऊ शकत नाहीत, तो आपला प्रांतच नाही हे मानूनच जणू काही संघ स्वयंसेवकांनी आपले जग निर्माण केले आणि त्यातच सेवाकार्य करत राहिले. संघाबद्दल काही चांगल्या बाबी असल्या तरी त्या जनतेपर्यंत पोचत नाहीत, स्वयंसेवकांपुरत्या त्या मर्यादित राहतात.
दुसरीकडे संघ कार्यकर्त्यांनी मोकळ्या सोडलेल्या रानामध्ये सेक्युलरांनी सत्यापलापाचे मनसोक्त पीक काढले. गंमत बघा, कम्युनिस्ट आणि सेक्युलर संघावर हिटलरप्रेमाचा आरोप करणार आणि स्वतः मात्र गोबेल्सनीतीनुसार खोट्या माहितीचा भडीमार करून ती खरी म्हणून खपविणार. शिवाय लोकांपर्यंत खरी माहिती न गेल्यामुळे विनाकारण संघटनेभोवती गुप्ततेचा गुंता तयार होतो आणि हे कोणीतरी भयंकर लोक आहेत, असे चित्र उभे करणे सोपे जाते.
प्रसिद्ध पत्रकार फ्रांस्वा गॉतिए यांनी एका ठिकाणी म्हटले आहे, की "1980च्या काळात मी रा. स्व. संघाच्या लोकांना भेटलो, तेव्हा अत्यंत भयानक लोकांना मी भेटेल, असे मला वाटत होते. परंतु मला हे निरुपद्रवी आणि कालबाह्य खाकी चड्ड्यांमधील बाबा माणसे भेटली." यात गॉतिएंचा काही दोष नव्हता. संघाची छबीच तशी चितारण्यात आली होती. त्यावेळी भिंद्रनवालेंची मुलाखत घेणारे प्रीतीश मोदी किंवा प्रभाकरनची मुलाखत घेणारे पत्रकार नायक मानले जाते होते परंतु संघाच्या कार्याला किंवा संघाच्या पदाधिकाऱ्याला प्रसिद्धी देणे हे ईश्वरनिंदेच्या बरोबरीचे पाप होते. अगदी आजही हाच प्रयत्न होतो. गेल्याच महिन्यात इरफान हबीब यांनी संघ आणि आयसिसला एका पारड्यात ठेवले, ते आणखी वेगळे काय वेगळे होते?
याचे कारण म्हणजे दस्तावेजीकरणात आणि प्रसिद्धीमध्ये पुरोगामी आणि समाजवाद्यांनी घेतलेली आघाडी. एकीकडे संघाबद्दल अपप्रचाराचा धुरळा उडवायचा आणि दुसरीकडे आपली ढोलकी वाजवायची, हे तंत्र त्यांनी यशस्वी केले. खरोखर मला तर वाटते, की पुरोगाम्यांनी मॅकिएव्हेली पचवला परंतु संघाच्या लोकांना किंवा हिंदुत्ववाद्यांना चाणक्य पचलाच नाही.
आता सुदैवाने परिस्थिती बदलली आहे. नरेंद्र मोदींच्या कृपेने सोशल मीडियाचा वापर करून स्वतंत्र विचारांची माणसे प्रश्न विचारू लागली आहेत. हबीब यांनी केलेले विधान वीस वर्षांपूर्वी केले असते, तर त्याला आव्हान मिळाले नसते. परंतु आता परिस्थिती बदलली असल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. यात आमच्यासारखे संघाशी नाळ न जुळलेले परंतु धागा जुळलेले लोकही सहभागी होतो. त्यामुळे ट्वीटरसारख्या व्यासपीठावर अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण वक्तव्याचा यथास्थित समाचार घेण्यात आला. तीच गत असहिष्णुतेच्या वादंगाची. अत्यंत नियोजनपूर्वक आणि सहेतूक उभा करण्यात आलेला हा वाद होता. सोशल मीडिया नसता तर यातील पात्रांचे पितळ उघडे पाडण्यात जे यश विचारी लोकांना मिळाले, ते मिळाले असते का हा प्रश्नच आहे.
अपेक्षा अशी, की संघाने हेही कार्य आता आपलेच मानले पाहिजे. प्रसिद्धीत आम्हाला रस नाही, हे कार्याचा भक्कम पाया तयार होईपर्यंत ठीक होते. परंतु आता प्रसिद्धी नको पण कुप्रसिद्धीला उत्तर तरी सक्रियपणे द्यावेच लागेल. 'येनकेनप्रकारेण प्रसिद्धो भवेत्' हा मंत्र अक्षरशः पाळणाऱ्यांची येथे रांग लागली आहे. त्यांना नामोहरम करण्यासाठी तरी संघाला पुढे यावेच लागेल.
' सततदुर्गत: सज्जनो' (सातत्याने संकटात सापडणारा सज्जन) हे भर्तृहरीने आपल्या सात शल्यांपैकी एक शल्य मानले होते. संघ ही सज्जनशक्ती आहे, असे मानले जाते आणि आजपर्यंतचा अनुभव त्यापेक्षा वेगळा नाही. मग या सज्जनशक्तीला सतत होणारी स्वतःची ससेहोलपट टाळण्यासाठी पावले टाकावीच लागतील. संघाला आक्रमक व्हावेच लागेल!
अश्विनी मयेकर
अभिराम दीक्षित
अनिल शिदोरे
शेफाली वैद्य