कल्याणकारी परमवैभवाची चळवळ

 

शताब्दी साजरी करणे हे संघाचे ध्येय नाही. संघ आणि समाज असे द्वैत संघाला मान्य नाही. संघात स्वयंसेवक सामील होतात त्यात सदस्यता सुद्धा नसते. सदस्य आणि संस्था इतके द्वैतही संघाला ठेवायचे नाही. स्वयंसेवक संघाचे सदस्य होत नाहीत, तर घटक बनतात. संघाचे बोलणे हेच स्वयंसेवकांचे जगणे असते. याच्या पुढे जाऊन संघाला याच भावनेने समाज भारून टाकायचा आहे तेव्हा संघ आणि समाज या दोन भिन्न गोष्टी राहणार नाहीत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2015 च्या विजयादशमीला 90 वर्षे पूर्ण झाली. संघ शताब्दीकडे चालला आहे. ज्या उद्देशाने आणि ज्या परिस्थितीत संघाची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत संघाची वाटचाल कशी आहे ? आज संघकार्याचा विस्तार, प्रासंगिकता आणि भविष्याची दिशा यावर या निमित्ताने चिंतन, विश्‍लेषण होणे स्वाभाविक आहे.

संघाची स्थापना 1925 साली विजयादशमीच्या दिवशी झाली. त्याच काळात म्हणजे साधारणत: 1900 ते 1950 या कालावधीत भारतात सामाजिक, राजकीय क्षेत्रांत ज्या चळवळी, संघटना सुरू झाल्या त्यांच्याशी तुलना केली की, संघाचे समाजजीवनातील आणि राष्ट्रजीवनातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. याच कालावधीत भारतात महात्मा गांधी यांच्याकडे भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस चे नेतृत्त्व आले आणि गांधीवाद या वैचारिक भूमिकेतून एक चळवळ सुरू झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापनाही 1925 सालीच डिसेंबरमध्ये कानपूर येथे झाली. हिंदू महासभेची स्थापना 1910 मध्ये करण्यात आली. पुढे भारतात जमाते इस्लामी (1941), राष्ट्र सेवा दल (1942), समाजवादी पार्टी अशा राजकीय, सामाजिक चळवळी, संघटना, राजकीय पक्ष यांची सुरुवात झाली. संघाच्या काही वर्षे आधी आणि काही वर्षे नंतर सुरू झालेल्या या चळवळींची आजची स्थिती काय आहे ? त्यांच्या तुलनेत संघ कुठे आहे ? याचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, या बाकीच्या संस्था, संघटना, पक्ष भरकटले, विसंगतीमध्ये अडकले. त्यांचा प्रभाव कमी कमी होत गेला. संघाचा मात्र या काळात प्रभाव आणि विस्तार दोन्हीही वाढतच गेले आहेत. कॉन्ग्रेस ही त्या काळात स्वातंत्र्याकरिता काम करणारी चळवळच होती. महात्मा गांधी यांच्याकडे या चळवळीचे नेतृत्त्व लोकमान्य टिळकांच्या नंतर आले. स्वातंत्र्यानंतर आता राजकीय पक्षाच्या स्वरूपात कॉन्ग्रेस   ची वाटचाल चालू आहे. आता कॉन्ग्रेस   ची अवस्था इतिहासात सर्वांत कमकुवत अशी झाली आहे. कम्युनिस्ट ही एक वैचारिक चळवळ अगदी संघाची स्थापना झाली त्याच वर्षात भारतात स्थापन झाली. मात्र आज त्यांचा प्रभाव वरचेवर कमी कमी होत चालला आहे. पश्‍चिम बंगाल आणि केरळ या दोन राज्यांत काही काळ सत्तेत डावी आघाडी राहिली, मात्र तेथेही त्यांचा प्रभाव कमीच होत चालला आहे. देशभरात आता अस्तित्व दर्शविण्यापुरतेच त्यांचे स्थान उरले आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्र सेवा दल अशा नावाने सुरू झालेल्या समाजवादी विचारांच्या चळवळी देशात फारसा प्रभाव दाखवू शकल्या नाहीत. आता त्यांचे अस्तित्व अगदी छोट्या स्वरूपात शिल्लक आहे. हिंदू महासभा, आर्य समाज या हिंदुत्ववादी संघटना स्वराज्यानंतर हिंदूंचे संघटन प्रभावी करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. संघाच्या स्थापनेच्या काळात सुरू झालेल्या या संघटना, संस्थांमध्ये एकतर अनेकदा मतभेद, फूट अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले किंवा संघटन म्हणून समाजाचे व्यापक समर्थन त्यांना मिळेनासे होत गेले.

संघ मात्र या सर्वांच्या तुलनेत वरचेवर प्रभाव आणि विस्तार या दोन्हीदृष्ट्या वाढत गेला आहे. संघाने जगातील मानवांचेच नव्हे, तर प्राणिमात्रांचे आणि जीवजंतूंचे कल्याण चिंतणारा हिंदुत्वाचा सनातन सिद्धांत आपले तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारला आहे. संघाकडे संघटन उभे करण्याची एक अमोघ, अलौकिक कार्यपद्धती विकसित केलेली आहे. कसलाही स्वार्थ नसताना झोकून देऊन काम करणारे असं‘य देवदुर्लभ कार्यकर्ते या कार्यपद्धतीतून विकसित होत आहेत. याशिवाय संघ वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे संघाने आपले ध्येय आणि वैचारिक सिद्धांत यावर कायम राहून आपल्या कार्यपद्धतीत अनेक कालसुसंगत असे बदल अगदी सहजपणे स्वीकारले आहेत. त्यामुळे संघ टिकला आहे, वाढतो आहे. संघाचा प्रभाव देशातच नव्हे, तर जगात वाढत चालला आहे.

संघाने स्वीकारलेले हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान हे या देशाचे मूळ तत्त्वज्ञान आहे. टीकाकारांनी हिंदुत्वाविषयी कितीही टीका आणि बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न केला तरी हे तत्त्वज्ञान विशाल, व्यापक, जीवजंतूंचेही कल्याण चिंतणारे असल्यामुळे कोणत्याही एका प्रार्थनापद्धतीशी निगडित नसल्यामुळे आणि हे प्रत्यक्षात आदर्श जीवनपद्धतीशी निगडित असल्यामुळे त्यामध्ये कसलीही खोट नाही. साम्यवादाचे तत्त्वज्ञान प्रात्यक्षिक पातळीवर संयुक्त सोव्हिएतमध्येच पराभूत झाले, तसे हिंदुत्वाच्या विचारधारेच्या बाबतीत शक्यताच नाही. फक्त हे तत्त्वज्ञान जसे जसे समजत जाईल तसे तसे त्याचे तेज अधिकच प्रखर होऊन जगाला प्रभावित करत राहील. अलौकिक तत्त्वज्ञान आणि त्याच्या विरुद्ध व्यवहार, वैभवशाली परंपरा आणि लाजिरवाणे वर्तमान अशी जी अवस्था भारतात हिंदू समाजात आक्रमणांमुळे, गुलामगिरीमुळे, अज्ञानामुळे निर्माण झाली ती अवस्था संपवून हा सनातन सत्य सिद्धांत प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणारा, मानवतेला पावन करील असे जीवनदर्शन प्रत्यक्षात आविष्कृत करणारा समाज उभा करणे यासाठी संघ काम करत आहे. याची अनुभूती जसजशी समाजाला येते आहे तसतशी संघाची स्वीकारार्हता वाढते आहे. तसतसा संघ समाजाला जिंकतच चालला आहे.

अद्वितीय कार्यपद्धती

संघाच्या स्थापनेपासून आतापर्यंत संघाने आपले उद्दिष्ट साध्य करण्याकडे वाटचाल करताना एक अलौकिक अशी कार्यपद्धती विकसित केली आहे. ‘व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण’ असे या कार्यपद्धतीचे दोन शब्दांत वर्णन नेहमी केले जाते. संघाची रोज गावागावात वस्तीवस्तीत भरणारी शाखा हे व्यक्तिनिर्माणाचे केंद्र आहे. संघाची शाखा म्हणजे व्यक्तिमत्त्वविकासाची एक अलौकिक अशी प्रयोगशाळा आहे. व्यक्तिमत्त्व या शब्दातच प्रथमपुरुषी एकवचनी भाव आहे, स्वत:ची एक ओळख असा त्याचा समानार्थ आहे. मात्र अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व विकसित करताना पहिल्या क्षणापासून ‘विकसित व्हावे अन् अर्पित होऊन जावे.’ हा भाव संस्कारित करणारी एक अद्वितीय कार्यपद्धती या शाखातंत्रामध्ये आहे.

दिवसभर वावरताना, काम करताना मनाने आणि शरीराने थकल्यामुळे सहजपणे पडणारी वेडीवाकडी पावले संघाच्या सायंशाखेची वेळ होत आली की, अगदी ताठ पडू लागतात. संघाच्या शाखेत रोज येणारे, नवीन येऊ शकणारे यांना हाका मारत, गोळा करत, हास्यविनोद करत संघस्थान गाठले जाते. संघशाखेवर जाताच दक्ष ही आज्ञा मिळण्याआधीच तो स्वयंसेवक मनाने दक्ष झालेला असतो. ध्वजप्रणामापासून व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा आणि व्यक्तित्वाच्या समर्पणाचा संस्कार सुरू होतो. ध्वजप्रणामापाठोपाठ मुख्यशिक्षकाला प्रणाम करताना तो कोणत्या जातीचा आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, शिकलेला आहे की निरक्षर आहे, असले कसलेही भेदाचे विषय मनातही येत नाहीत. त्याला प्रणाम करायचा आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तासभर शाखेमध्ये रममाण व्हायचे. शाखेतील खेळ, व्यायाम, गाणी, वैचारिक चिंतन हे सगळेच देशभक्ती, समाजप्रेम यांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येकाला आत्मसन्मान, विकसनाची आणि प्रकट होण्याची संधी देत चाललेले असते. सामूहिक प्रयत्नांचे, स्वत: समर्पित करण्याचे संस्कार प्रत्येक कृतीतून सहजपणे मिळत असतात.

‘व्यक्ती व्यक्ती जमवुनी भवती, जागृत करणे तयाप्रती,

नकोच कीर्ती नको पावती, संघटनेने ये शक्ती ।

असे एक संघाच्या कार्यपद्धतीचे वर्णन करणारे अतिशय सुंदर, समर्पक गीत आहे. प्रथमपुरुषी, एकवचनी असे व्यक्तिमत्त्वाचे विकसन करायचे आणि अनेकवचनी एकसंघ असा व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार घडवायचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा पूर्ण सन्मान ठेवून समर्पित होण्याचा, शिस्तीचा, सामूहिक कृतीचा मनोज्ञ आविष्कार घडवायचा असे तंत्र संघाने प्रत्यक्षात यशस्वी करून दाखविले आहे. एकचालकानुवर्तित्वावर टीका करणार्‍याना संघातील व्यक्तिमत्त्वविकासाच्या या अमर्याद दिशा कधी दिसल्याच नाहीत.

संघ न समजल्याने किंवा ज्यांनी तो मुद्दाम समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही त्यांनी संघाचे उद्दिष्ट काय आणि त्याकडे जाण्याची रचना काय याचा विचार न करता संघाच्या समाजाला दिसणार्‍या बाह्यरूपाची टिंगलटवाळी आणि टीका करण्यातच धन्यता मानली. पुण्यात तळजाई येथे 1983 साली संघाचे महाशिबीर झाले. स्वखर्चाने गणवेषात 35 हजार स्वयंसेवक सगळ्या समाजघटकांतून एकत्र आले, ठरलेल्या वेळापत्रकानुसार कार्यक्रम झाले. पुण्यातील घराघरातून गुळाच्या पोळ्या या स्वयंसेवकांकरिता सहजपणे जमा झाल्या. या शिबिरात जातिभेद संपवून बंधुभाव जागविण्याचा संकल्प करण्यात आला. हे सगळे दुर्लक्षित करून स्वत:ला विचारवंत म्हणविणार्‍या पुण्यातील एका समाजवादी टीकाकाराने या शिबिरासाठी आलेल्या स्वयंसेवकांच्या पथसंचलनानंतर खवचट प्रश्‍न मिडियासमोर केला की, ‘या 35 हजार काठ्या कोणाच्या डोक्यावर पडणार ?’ संघाचे टीकाकार नेहमीच संघाची वस्तुस्थिती दुर्लक्षून संघाबाबत समाजाची दिशाभूल करण्याच्या नादात स्वत:ची दिशा हरवून बसले. संघ मात्र पुढे पुढेच जात राहिला.

संघाच्या संस्कारातून देशाचा आणि समाजाचा विचार करणार्‍या, त्यासाठी झोकून देणार्‍या लाखो कार्यकर्त्यांची एक फळी देशात उभी राहिली आहे. या कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात संघविचाराने राष्ट्रउभारणीची दिशा निश्‍चित करणारी कामे उभी केली आहेत. संघटना, संस्था, सेवाकार्ये यांपैकी जे जे शक्य, जे जे आवश्यक ते ते उभे केले आहे.

परमवैभवाची कल्पना

संघाचे उद्दिष्ट काय ? असे विचारले की, एकमुखी उत्तर येते, ‘परम वैभवं नेतु मे तत् स्वराष्ट्रम्’ हे आहे. संघाच्या प्रार्थनेची ही ओळ आहे. हे राष्ट्र परमवैभवाला घेऊन जाणे हे संघाचे उद्दिष्ट आहे. मात्र परमवैभवाची संघाची कल्पना काय आहे आणि ती कल्पना कशी साकार होणार आहे हे पाहणेही जास्त महत्त्वाचे आहे. ही कल्पना साकार करण्यासाठी लागणारे संघटन जे हिंदुत्त्वाच्या कल्पनेवर अढळ निष्ठा ठेवून विजयाकडे मार्गक्रमण करेल. राष्ट्रवादाची किंवा परमवैभवाची कल्पना जगातील अन्य देशांना पराभूत करून मांडलिक करून ठेवण्याची वसाहतवादी नाही, तर अजिंक्यतेची आहे. कोणी आम्हाला जिंकता कामा नये इतके आम्ही बलसंपन्न होऊ. साधनसंपत्तीने हा देश स्वयंपूर्ण होऊन इतरांचे पोषण करण्याइतका संपन्न करू. भारताचा जो मानवकल्याणाचा जगातील सर्वश्रेष्ठ विचार आहे तो आचरणातून प्रकट करणारा समाज उभा करणे हा परमवैभवाकडे जाण्यातील एक महत्त्वाचा पैलू आहे. हिंदुत्व किंवा भारत ही एक जीवनदृष्टी आहे. एक चिंतन आहे. हे चिंतन जीवनाच्या सर्व क्षेत्रांत अभिव्यक्त होईल अशा प्रकारे समाजरचना करण्याचा प्रयत्न म्हणजेच या परमवैभवाकडे जाणारी वाटचाल आहे.

संघाला लांबून पाहणारे, न समजून घेता संघावर टीका करणारे, संघ जितका समजेल त्यावरूनच मत बनविणारे संघाबाबत बरेच गैरसमज पसरवीत असतात. संघाचे काम कमी होत चालले आहे, संघ फक्त शहरी भागात आहे, संघात तरुण येतच नाहीत, संघ पांढर्‍या मिशांचा म्हणजे प्रौढ लोकांचा आहे अशा प्रकारे संघाचे प्रतिमाहनन करण्याचा प्रयत्न संघविरोधक किंवा संघापासून अनभिज्ञ असूनही माध्यमांमधून संघ मांडणारी मंडळी करत असतात. याबाबत वस्तुस्थिती काय आहे हे जरा पाहण्याची गरज आहे. आज देशात संघाच्या शाखा वाढत आहेत. आता एकही तालुका असा नाही जेथे संघाची शाखा नाही. यापुढची पायरी एकही पंचायत मंडल शाखेशिवाय राहणार नाही. या शाखांमध्ये जी उपस्थिती असते त्याची जी माहिती एकत्रित झालेली आहे त्यानुसार चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍यांची संख्या फक्त 9 टक्के आहे. 91 टक्के संख्या चाळीसपेक्षा कमी वय असणार्‍यांची आहे. 66 टक्के संख्या बाल, तरुण विद्यार्थ्यांची आहे. संघाच्या शाखांचे क्षेत्र लक्षात घेऊन जर वर्गीकरण केले तर साठ टक्के शाखा ग्रामीण भागात आहेत. संघमंडळी म्हणजे संघाचा विचार घेऊन काही नियमित अंतराने एकत्र येऊन कार्यक्रम करणारे गट तसेच साप्ताहिक मिलन म्हणजे आठवड्यातून एकदा शाखा असे जे उपक‘म चालतात ते देशभर मोठ्या संख्येने ग्रामीण क्षेत्रातच चालतात. संघाबाबत टीका, गैरसमज, बुद्धिभेद करण्याचा इतका प्रयत्न चालू असूनही संघाबाबत विश्‍वास आणि उत्सुकता वाढते आहे. संघाच्या आरएसएस डॉट ओआरजी या वेबसाईटवर जॉईन आरएसएस या माध्यमातून संघात काम करू इच्छिणार्‍यांची नोंदणी केली जाते. यात प्रामुख्याने तरुणांची नोंदणीच मोठी असते. 2012 मध्ये जॉईन आरएसएसमध्ये दरमहा एक हजार जण नोंदणी करत होते. आता वाढत वाढत हे प्रमाण 2015 मध्ये दरमहा आठ हजार जण इतके वाढले आहे.

संघाच्या शाखेतून व्यक्तिनिर्माणाचे काम तर चालू आहेच, पण व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाची प्रकि‘याही वेग घेते आहे. काही विषयांत स्वयंसेवकांनी त्यांना स्थिती पाहून राहवले नाही म्हणून स्वयंस्फूर्तीने कामे उभी केली आहेत. काही विषयांत संघाने जाणीवपूर्वक प्रयत्न करून राष्ट्रनिर्माणाच्या प्रकि‘येला गती देण्यासाठी उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये पहिला विषय आहे सेवाकार्यांचा. जेथे जेथे गरज होती, आपलेच समाजबांधव दैन्य, दारिद्र्य, समस्या यांत पिचले होते तेथे केवळ सरकारवर जबाबदारी न ढकलता, केवळ ओरड करत न बसता, केवळ मोर्चे-आंदोलने करत न बसता संघाच्या स्वयंसेवकांनी सरकारचे एक पैशाचे अनुदान न घेता समाजामधून ताकद उभी करून सेवाप्रकल्प उभे केले. आरोग्य केंद्रे, रुग्णालये, रक्तपेढ्या, संस्कारवर्ग, शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे, एकल विद्यालये, अभ्यासिका, किशोरी विकास प्रकल्प, कौशल्य प्रशिक्षण केंद्रे, बालवाडी, फिरती प्रयोगशाळा अशा कितीतरी प्रकारांतील सुमारे दीड लाख सेवाकार्ये देशभरात काम करत आहेत. समाजाचे प्रश्‍न समाजानेच सोडवावेत हा संस्कार समाजावर बिंबविण्यात संघ यशस्वी झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्येही भूकंप, वादळ, अपघात, पूर अशा प्रसंगी संघाच्या स्वयंसेवकांनी नागरिकांमधूनच मदतकेंद्रे, पुनर्वसनाची कामे केली आहेत.

याशिवाय प्रयत्नपूर्वक संघाने काही विषय देशभर हाती घेतले आहेत. त्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था कृषिआधारित आहे आणि गाय हा कृषी व्यवहाराचा केंद्र आहे. त्यामुळे गावरान गो-संर्वधनाची जाणीव जागृती आणि पथदर्शक प्रकल्प उभे करणे या विषयात काम चालले आहे. गोमूत्र, गोमयापासून अनेक औषधी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, कॅन्सरसारख्याअसाध्य रोगावर औषधे, गोमयापासून तपमानाचा परिणाम न होणारे लाकूड असे कितीतरी प्रकार पुढे आले आहेत. ग्रामीण विकास ही भारताला समृद्धतेकडे आणि वैभवाकडे जाणारी महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे ग्रामविकासहा विषय संघाच्या स्वयंसेवकांनी हाती घेतला आहे. जलसंपदा, भूसंपदा, जनसंपदा, वनसंपदा, प्राणीसंपदा यांचे रक्षण, संवर्धन असे कितीतरी विषय घेऊन ग्रामीण भागातून उपक‘म केले जात आहेत.

कुटुंबव्यवस्था हा भारतीय जीवनदर्शनाचा मुख्यभाग आहे. चंगळवादाच्या झंझावातात भारतीय जीवनदर्शनाचे हे मुख्यअंग क्षतीग‘स्त होता कामा नये यासाठी कुटुंबप्रबोधन हा विषयही हाती घेतलेला आहे. त्यासाठी कौटुंबिक मेळाव्यातून, चर्चेतून, सहज आचरणातून भारतीय जीवनदर्शनातील मूल्ये संक‘मित केली जात आहेत.

सामाजिक समरसता हा एक विषय प्राधान्याने संघाने हाती घेतला आहे. हिंदू समाजातील भेदांमुळेच आजवर आक‘मणे आली. गुलामगिरी सोसावी लागली. वैभवशाली परंपरा, उच्च तत्त्वज्ञान, पण कालौघात आलेल्या दोषांमुळे माणसाला माणूस म्हणूनही न स्वीकारणारे, स्पर्शही सहन न करणारे लाजीरवाणे वर्तमान अशी जी स्थिती आली ती बदलण्याचा संकल्प म्हणजे समरसतेची चळवळ आहे. शब्दांचे बुडबुडे किंवा शब्दछल करत न बसता सहज आचरणातून, सहज सहवासातून जातिभेद नष्ट करण्याचे प्रयत्न म्हणजे समरसता आहे.

प्रचंड नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी, अतिशय उच्च विचार असतानाही भारतात दैन्य आणि मागासलेपण का आहे याचा विचार करून संघाने प्राधान्यक्रमाने अस्मिता जागरणाबरोबरच गोसेवा, समरसता, ग्रामविकास आणि कुटुंबप्रबोधन हे विषय हाती घेतले आहेत. व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाकडे जाणार्‍या प्रकि‘येचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.

अनुभवाने विश्‍वास

संघावर प्रसारमाध्यमातून प्रचंड टीका आणि गैरसमज निर्माण करण्याचे विरोधकांचे अटोकाट प्रयत्न, असे असतानाही संघ कसा वाढतो आहे असा प्रश्‍न अनेकांना पडत असतो. मात्र संघ टीकेला उत्तरे देत न बसता प्रत्यक्ष काम करण्यावर भर देतो. संघाबाबतची टीका लोक ऐकतात; मात्र त्यांच्या घराजवळ, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात संघाचे स्वयंसेवकांचा प्रत्यक्ष व्यवहार, शाखेतील कार्यक्रम, सेेवाकार्यातील अनुभव लोकांना वेगळेच सांगतो. ऐकीव टीकेपेक्षा या प्रत्यक्ष अनुभवानंतर लोक संघात अधिक उत्साहाने आणि आनंदाने सामील होतात, जवळ येतात. टीकाकारांनी फक्त चातुर्य आणि कपट वापरून संघाचे प्रतिमाहनन करून संघाला दूर लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र संघ कृतीने, शुद्ध सात्त्विक प्रेमाच्या आधारे समाजाच्या जवळ जात राहिला. त्यामुळे समाजात संघाला जबरदस्त पाठिंबा मिळतो आहे. संघाचे ढोंग आहे अशी टीका ज्यांनी केली ती टीका हेच ढोंग असल्याचे सिद्ध होत गेले. संघ मात्र कसोटीवर बावनकशी उतरत गेला.

संघाचे आकलन करणार्‍यांमध्ये एक मोठी चूक अशी असते की, ते संघाकडे राजकीय चष्म्यातून पाहतात. राजकीय परिवर्तन हेच सामाजिक चळवळीचे अंतिम उद्दिष्ट आहे असे गृहित धरून त्याच मापदंडाने सामाजिक चळवळीकडे पाहण्याची चूक वारंवार केली जाते. राजकीय सत्ता हे समाजपरिवर्तनाच्या अनेक साधनांपैकी एक प्रभावी साधन आहे इतकेच राजकीय क्षेत्राचे महत्त्व असते. संघही तसेच मानतो. त्यामुळे एखाद्या राजकीय परिवर्तनाने संघाचे काम कमी किंवा जास्त होत नाही. प्रयत्नांची दिशा बदलत नाही.

आगामी काळात संघाने समरसता प्रत्यक्ष समाजात अनुभवाला येण्याच्या दृष्टीने काही उपक्रम हाती घ्यायचे ठरविले आहे. संघशक्तीचे विराट आणि आश्‍वासक दर्शन समाजाला देणारे हजारो, लाखो स्वयंसेवकांचे कार्यक्रम प्रान्ताप्रान्तात होत आहेत. प्रचंड गर्दीत तरीही शिस्तीत, साधे आणि समाजशक्तीच्या आधारे हे कार्यक्रम होत आहेत. संभाजीनगर येथे देवगिरी महासंगम या नावाने कार्यक्रम 11 जानेवारी 2015 रोजी झाला होता. आता पुण्यात शिवशक्ती संगम या नावाने कार्यक्रम जानेवारी 2016 मध्ये होणार आहे. संभाजीनगर येथील कार्यक्रमात सरसंघचालकांनी भाषणात एक विषय मांडला होता. एका गावात पाणवठा, मंदिर आणि स्मशानभूमी सर्व समाजाकरिता एकच असली पाहिजे. समरसतेचे, एकात्मतेचे, एकरसतेचे दर्शन घडविणार्‍या या तीन गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्याची एक चळवळ गतिमान होणार आहे. एकसंध गावे, एकसंध समाज, एकसंध राष्ट्र याकडे जाणारा एक मोठा टप्पा या एक पाणवठा, एक मंदिर, एक स्मशानभूमीच्या उपक्रमाने साधला जाणार आहे.

शताब्दी साजरी करणे हे संघाचे ध्येय नाही. संघ आणि समाज असे द्वैत संघाला मान्य नाही. संघात स्वयंसेवक सामील होतात त्यात सदस्यता सुद्धा नसते. सदस्य आणि संस्था इतके द्वैतही संघाला ठेवायचे नाही. स्वयंसेवक संघाचे सदस्य होत नाहीत तर घटक बनतात. संघाचे बोलणे हेच स्वयंसेवकांचे जगणे असते. याच्या पुढे जाऊन याच भावनेने समाज भारून टाकायचा तेव्हा संघ आणि समाज या दोन गोष्टी राहणार नाहीत.

जीवनदर्शनात वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करून जग आता एका शाश्‍वत मार्गाच्या शोधात आहे. अशावेळी जगाला कल्याणाचा मार्ग दाखविणारे जीवनदर्शन प्रत्यक्ष लोकांच्या घरापासून राष्ट्रजीवनात उभे करून दाखविण्याची गरज आहे. तेवढे विचारवैभव, उच्च सिद्धांत आणि प्रात्यक्षिक दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. जागतिक योगदिवसाच्या निमित्ताने भारतीय तत्त्वज्ञान जगाकडून कसे स्वीकारले जाते ते पुढे आलेच आहे. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी राष्ट्रनिर्माणाची कल्पना स्पष्ट करताना मुंबई येथे ‘हिंदुस्थान समाचार’च्या कै. श्रीकांतजी जोशी स्मृती व्यख्यानाच्या कार्यक्रमात म्हणाले की, ‘जगावर हुकुमत गाजवेल अशी भारत एक महासत्ता अशी आपली कल्पना नाही, तर जगाला कल्याणकारी मार्गदर्शन करेल असा महान भारत बनविण्याची आपली कल्पना आहे.’ संघाचे प्रयत्न, संघाचा उद्देश या सर्व गोष्टी या एका वाक्यात सामावल्या आहेत. संघाला किती वर्षे झाली आणि शताब्दी कशी होणार यापेक्षा हा महान भारत उभा करणे संघाला जास्त महत्त्वाचे वाटते, हे लक्षात घेतले पाहिजे.

सौजन्य: विश्व संवाद केंद्र, पुणे